दुर्गा नारायण भागवत म्हणजेच दुर्गा भागवत यांचा जन्म १० फेब्रुवारी १९१० साली झाला. त्या मराठी लेखिका तर होत्याच परंतु त्यांनी संशोधनपर , समीक्षात्मक , वैचारिक , कथा , चरित्र, संपादन , अनुवाद, बालसाहित्य , ललितगद्य असे विविधअंगी लेखन केले. त्यांची सुमारे सत्तर पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. दुर्गाबाई विणकाम, भरतकाम, स्वयंपाक यामध्ये पारंगत होत्या . त्यांनी काही नव्या पाककृतीही शोधून काढल्या आहेत. दुर्गाबाईंचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. तर हायस्कुलमधील शिक्षण अहमदनगर, नाशिक, धारवाड आणि पुणे यथे झाले. त्यांनी ‘ अर्ली बुद्धिस्ट ज्युरिस ज्यूरिसप्रूडन्स ‘ हा विषय घेऊन एम.ए केले. विद्यार्थीदशेत असताना त्यांनी महात्मा गांधींच्या चळवळीतही भाग घेतला होता. भारताच्या आद्य स्त्री-शास्त्रज्ञ कमला सोहोनी या त्यांच्या भगिनी होत्या. दुर्गाबाईचे फ्रेंच, जर्मन, संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते.
मला आठवतंय एकदा बोलता बोलता विन्दा करंदीकर म्हणाले होते आपण ‘ नाही ‘ म्हणण्याची ताकद हरवून बसलो आहोत. दुर्गाबाई ह्यांची ‘ नाही ‘ म्हणण्याची ताकद अत्यंत महत्वाची होती . त्यांनी इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ सरकारने देऊ केलेले पदमश्री आणि ज्ञानपीठ पुरस्कार नाकारले होते. दुर्देवाने आज असे किती लेखक आहेत हे ‘ एकगठ्ठा ‘ संस्कृतीवरून दिसून येते. मला आठवतंय ते ठाण्यातले त्यांचे मराठी ग्रंथ संग्रहालयातील आणीबाणीतले भाषण. ते आइकून वाटले दुर्गाबाईवर सरकारची वक्रदृष्टी पडणारच आणि ती काही दिवसात पडलीच कारण त्यांना तुरुंगात डांबले गेले.
दुर्गाबाईचे ऋतुचक्र , गोधडी , डूब , दिव्यावदान , पैस , मुक्ता, रुपरंग ही ललित पुस्तके आहेत तर व्यासपर्व हे ललित लेखाचे पुस्तक आहे. त्यांनी बालसाहित्यही लिहिले आहे आठवले तसे , गुजराथच्या लोककथा भाग १ आणि २ , डांगच्या लोककथा { चार भाग } , तुळशीचे लग्न अशी अनेक पुस्तके आहेत.
त्यांच्या ऋतुचक्र , डूब ,पैस , भावमुद्रा, व्यासपर्व, रुपरंग ह्या पुस्तकांना शासनाचा पूरस्कार मिळाला आहे. तर पैस ह्या पुस्तकांना १९७१ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी कराड येथे झालेल्या ५१ व्या ‘ अखिल मराठी
साहित्य संमेलना ‘ चे अध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या परखड स्वभावामुळे त्या कुणाचाही मुलाहिजा ठेवत नसत त्यामुळे त्याचा दरारा साहित्य क्षेत्रात होता. अत्यंत साधी रहाणी आणि सतत् त्यांचा अभ्यास चालू असे . मुंबईतील एशियाटीक सोसायटीच्या त्या क्रियाशील कार्यकर्त्या होत्या.
दुर्गाबाई भागवत यांचे ७ मे २००२ रोजी निधन झाले. त्यांनी मृत्यूनंतर नेत्रदान केले होते. मला आठवतंय गिरगावच्या विदुत दाहिनीत त्यांचे अंत्यसंस्कार झाले त्या वेळी मी तिथे होतो मनात एकच विचार येत होता ‘ आग आगीला ‘ भेटत होती.
– सतीश चाफेकर.
Leave a Reply