पाणथळी पक्ष्यामध्ये कदाचित सर्वात रुबाबदार पक्षी कुठला तर क्रौंच पक्ष्यांकडे बोट दाखवावे लागेल. क्रौंच पक्ष्यांच्या अनेक जाती आहेत अत्यंत लांबवर उड्डाणांसाठी प्रसिद्ध असलेले हे क्रौंच पक्षी इतर पाणथळी पक्ष्यांपेक्षा बरेच दुर्मिळ आहे. दुर्मिळ असण्याचे मुख्य कारण त्यांची होणारी शिकार तसेच प्रजननाचे कमी प्रमाण व इतर मानवी हस्तक्षेप इत्यादी आहेत. इतर पाणथळी पक्ष्याचे म्हणजे हेरॉन, करकोचे व बगळ्यांचे क्रौंच हे भाउबंद आहेत. लांब वरुन हे सारखेच दिसतात परंतु क्रौंच पक्षी जेव्हा उडतात तेव्हा त्यांची मान लांब करून उडतात तर इतर बगळे व करकोचे हे मान इंग्रजी एस आकारात दुमडुन उडतात. तसेच इतरांपेक्षा क्रौंच पक्षी हे लांबवर उड्डाणे भरतात. काही आंतरखंडीय स्थलांतर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते कधी कधी मोठे मोठे कळप करून राहातात तर कधी कधी एकटे अथवा फक्त जोडिदाराबरोबर असतात.
क्रौंच भारतीय संस्कृतीमध्ये प्रेमाचे प्रतिक मानले जाते. त्याचे कारण म्हणजे क्रौंचामध्ये बहुतकरुन नर-मादी जोडी असते जी आयुष्यभर बरोबर राहाते, क्रौंचाच्या प्रणयक्रिडा व नृत्य बऱ्याच जणांनी पाहिले असेल. क्रौंच पक्षावरुनच महर्षी वाल्मिकिंना काव्य स्फुरले असे सांगतात.
भारतात सारस क्रौंच, सायबेरियन क्रौंच, कांड्या करकोचा (क्रौंच) व साधा क्रौंच हे मुख्यत्वे आढळून येतात. सायबेरियन क्रौंच हा हिवाळ्यात सायबेरिया येथुन राजस्थानमधील भरतपुर येथे स्थलांतर करतो. हा पक्षी आता अत्यंत दुर्मिळ झाला असून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सायबेरीयन क्रौंच हा भारतात सापडणाऱ्या अति संकटग्रस्त पक्ष्यांपैकी एक होय. पालास नावाच्या पक्षी शास्त्रज्ञाने १७७३ला जगासमोर आणला. पण पालासने हा पक्षी शोधण्यापूर्वी सुमारे १४८ वर्षे भारतातील लोकांना हा पक्षी ज्ञात होता. जहांगीर बादशहाच्या दरबारातील प्रसिद्ध चित्रकार उस्ताद मन्सूर यांनी १६२५ साली या क्रौंच्याचे चित्र काढून वर्णन केले होते. या पक्ष्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे याच्या शरीराचा शुभ्र पांढरा रंग आणि लाल रंगाचा चेहरा व पाय ही वैशिष्ट्ये त्याला क्रौंच प्रजातीतील सर्वात सुंदर क्रौंचचे स्थान देतात. याचे दुसरे वैशिष्ट म्हणजे याचे नर मादी एकमेकांशी आयुष्यभर एकनिष्ठ राहतात, एकदा जोडी बनली कि ती आयुष्यभरासाठी एकत्र राहते. हा सगळ्यात महत्वाचा गुण..! पश्चिमात्य राष्ट्रातील जनतेने यातून धडा घ्यावा.
हा प्रामुख्याने आर्क्टिक रशिया, याकुशिया आणि पश्चिम सैबेरीया येथे आढळतो. आजमितीस यांचे दोन समुदाय अस्तित्वात आहेत एक रशियाच्या पश्चिमेला व एक पूर्वेला आढळतो. पूर्वेकडील क्रौंच चीन मध्ये स्थलांतर करतात, तर पश्चिमेकडील क्रौंच इराण आणि भारतात स्थलांतर करत.
हा पक्षी प्रामुख्याने मोठ्या पाणथळ प्रदेशातील पाणवनस्पतींनी भरलेल्या दलदलीमध्ये वावरतो. हा मिश्र आहारी असल्यामुळे प्राणी आणि वनस्पती दोन्हीही खातो. स्थलांतरा आधी हे प्रामुख्याने छोटे प्राणी, कीटक वगैरे खातात याचे कारण कदाचित तिथे पडणारी थंडी आणि स्थलांतरासाठी लागणारी उर्जा असावी. पण स्थलांतरित प्रदेशात आल्यावर मात्र हे प्रामुख्याने पाणवनस्पतीच खातात. काही प्राणी संग्रहालयात पाळलेले क्रौंच, कीटक खाताना आढळले आहेत. मजेची गोष्ट म्हणजे खाल्लेले अन्न बारीक करण्यासाठी अधून मधून हे छोटे दगड गोटे ही खातात.
हे क्रौंच विणीच्या हंगामात त्यांच्या हद्दी प्रस्थापित करतात व दुसऱ्या पक्ष्यांना तिथे येऊ देत नाहीत. दलदलीतील पाणवनस्पती गोळा करून, त्याच्या ढिगाऱ्यावर खळगे करून मादी त्यात २ अंडी घालते. मादी अंडी उबवत असताना, नर हा मादी व घरट्याचे संरक्षण करतो. दोन पैकी एकच पिल्लू जगते. या जगलेल्या पिल्लांपैकी फक्त १०% पिल्ले प्रौढावस्थेपर्यंत पोहोचतात. हा यांच्या संवर्धनातील सर्वात मोठा अडथळा ठरला आहे.
हे स्थलांतर करून भारतात ऑक्टोबरच्या शेवटी येत असत आणि मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या सुरवातीला परतीचा प्रवास करत. ते पूर्वेकडे बिहार पर्यंत तर दक्षिणेकडे नागपूर पर्यंत सापडल्याच्या नोंदी आहेत. मॅकमास्टर या ब्रिटीश अधिकाऱ्याने १८७१ च्या सुमारास नागपूर जवळ हा पक्षी मारल्याची एक नोंद आहे. यांच्या स्थलांतराचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे सर्व क्रौंच प्रजातीमध्ये सर्वात दूर व सर्वात उंच स्थलांतर करण्याची त्यांची क्षमता. हे स्थलांतरा दरम्यान जवळपास १६००० किमी चा प्रवास करतात. तसेच या पक्ष्यांना हिमाचल प्रदेश येथील चंबा यथे सुमारे १२ हजार फुट उंचीवरून हिमालय पार करताना यांना पहिले गेले आहे.
क्रौंच जगभरात केवळ ३२०० इतकीच उरले आहेत. पश्चिमेकडील समुदायात आता फक्त १० क्रौंच शिल्लक आहेत बाकीचे पक्षी हे पूर्वेकडील समुदायात आहेत. पूर्वेकडील समुदायातील जवळपास ९५% पक्षी चीन मधील पोयांग सरोवराच्या आसपासच्या दलदलीत स्थलांतर करतात. दुर्दैवाने चीनमधील महत्वकांक्षी थ्री-गोर्जेस धरणामुळे त्यांचा हा अधिवास धोक्यात आला आहे. यांच्या खालावत चाललेल्या संख्येला मुख्य कारण म्हणजे यांचा नष्ट होत चाललेला अधिवास. पाणथळ जागांचे शेतीत केले जाणारे परिवर्तन, शेतीसाठी होणारा पाण्याचा वारेमाप वापर आणि पाणथळ जागांचे प्रदूषण ही या मागची प्रमुख कारणे आहेत. पण यापूर्वीच या पक्ष्यांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली होती. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची झालेली अपरिमित शिकार. हे पक्षी स्थलांतर करताना अफगाणिस्तान, पाकिस्तान, कझागिस्तान अशा भागातून प्रवास करत. येथील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती नेहमीच संघर्षमय होती. त्यामुळे यांची शिकार थांबविण्यात आणि संवर्धनाचे काम करण्यात बऱ्याच अडचणी आल्या. याचा परिणाम म्हणजे यांची खालावलेली संख्या. भारतात येणारे पक्षी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मार्गे येत. या मार्गावर त्यांची प्रचंड शिकार झाली असावी. १९ व्या शतकात हे क्रौंच भारतात मोठ्या संख्येने पाहायला मिळत. पण हळूहळू त्यांची संख्या कमी होत गेली. १९७४ मध्ये भरतपूरच्या केवलदेव राष्ट्रीय उद्यानात ७४ क्रौंच दिसले होते. १९९२ साली याची एकच जोडी दिसली आणि शेवटचा क्रौंच २००२ साली पाहण्यात आला. त्यानंतर एकही वन्य सायबेरीयन क्रौंच इथे दिसलेला नाही.
या क्रौंच पक्ष्यांचा पश्चिमेकडील समुदाय वाचविण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. सॅटेलाईट टेलीमेट्रीच्या (पक्ष्याच्या पाठीवर बसविण्यात येणारे एक यंत्र) सहाय्याने या पक्ष्यांच्या जाण्यायेण्याचे मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणे शोधण्यात आली. या जागांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्याच प्रमाणे वन्य क्रौंच पक्ष्यांची अंडी कृत्रिम रित्या उबवून तयार झालेली पिल्ले वाढवून निसर्गात सोडण्यात आली. अशा प्रकारचा एक प्रयोग भारतात देखील करण्यात आला. याकूशिया मधून आणलेले एक पिल्लू भरतपूरच्या केवलादेव राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले. अपेक्षा अशी होती कि हे पिल्लू सामान्य क्रौंच पक्ष्यांसोबत याकुशियाला परतेल, पण दुर्दैवाने असे घडले नाही. त्यामुळे हा पक्षी आता भारतात परत पाहायला मिळण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. इराणमधे मात्र अजूनही प्रयत्न चालू आहेत, इथे स्थलांतर करून येणाऱ्या थव्यातील एका पक्ष्याला ‘ओमिड’ असे नाव देण्यात आले आहे; ओमीडचा अर्थ आहे ‘आशा’. हा थवा पश्चिमेकडील समुदायाची शेवटची आशा आहे. असाच आशेचा अजून एक किरण म्हणजे पूर्वेकडील क्रौंच समुदायाला वाचविण्यासाठी चाललेले भागीरथी प्रयत्न. रशिया, मंगोलिया आणि चीन देशांच्या संयुक्त प्रयत्नांनी या पक्ष्याचा अधिवास वाचविण्याचे कार्य सुरु आहे आणि काही अंशी त्याला यशही येत आहे.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply