नवीन लेखन...

दुरून डोंगर साजरे – भाग १

दूरून डोंगर साजरें…….. (प्रवास वर्णन – भाग एक)

  1. प्रयाण !

आम्ही बॅंगलूरहून कॅनडाला  आल्याला 11 जानेवारी 2017 ला सहा महिने झाले. हे सहा महिने कसे गेले कळलंच नाही.  इकडे येण्याआधी कॅऩडा हा प्रदेश कसा असेल अशी उत्सुकता होती.

2016 जुलैच्या १0 तारखेला आम्ही दोघे बेंगलूरूहून निघालो. ऐन वेळी घोटाळा होऊं नये म्हणून हिने टॅक्सी संध्याकाळी 5 वाजतांच बोलवावी असं ठरवलं. फोन केल्यावर टॅक्सी 3 वाजतांच आली. ड्रायव्हर “नानू कायता इद् देने” (मी वाट पहातो)   म्हणून गाडीत झोपला. त्याने मीटर आम्ही गाडीत बसल्यावर चालूं केलं. त्याने इमाने इतबारे गाडी साडेसहाच्या सुमारांस केंपेगौडा विमानतळावर आणली. आम़चं अवज़ड सामान ट्रॉलीत चढवून दिलं. इथून आमच्या पुढच्या प्रवासाला सुरूवात झाली.

आम्ही विमानतळाच्या आवारात शिरलो. मी Wheel chair (ढकल खुर्ची ) च्या शोधात निघालो. एक गणवेषातला माणूस व्हील चेयरजवळ उभा  होता. त्याच्याकडे चौकशी करावी म्हणून गेलो. हिने त्याला कानडीत विचारलं. त्याला कानडी समजत नसावी असं मला वाटलं. मी हिंदीत विचारलं. त्याने व्यवस्थित उत्तर दिलं. त्याने आम्हाला पायी Air France  च्या ऑफिसापर्यंत आणून सोडलं.

Air France च्या ऑफिसात शुकशुकाट होता. अंधारातच एक गणवेषातली तरूण बाई कंप्यूटरवर काम करत होती. हिने सुचवलं म्हणून मी त्या बाईकडे चौकशी केली.  तिने माझा पासपोर्ट घेऊन कंप्यूटरवर पहाणी केली. आम्हा दोघांकरता wheel chair आणि diabetic – vegetarian food  असं कन्फर्म केलं.

मला लघ्वीला जायचं होतं. ही सामानाच्या ट्रॉलीवर लक्ष ठेवून एका खुर्चावर बसली. मी थोड्या अंतरावर असलेल्या wash room मध्ये जाऊन लघ्वी करून परत निघालो. चालता चालता उजव्या  पायात अतिशय कळा येऊं लागल्या. कसाबसा आपल्या जागेवर आलो. हिने लगेच मला समोरच्या Air France च्या ऑफिसात पुन्हा चौकशी करायला सांगितलं. “नेकु काल वली” (“माझा पाय दुखतोय”)  या माझ्या उत्तराला हिने नाक मुरडलं. “नाल अडी पोना अंद आफिस. चुम्मा ड्रामा ” (“चार पावलांवर तर ते ऑफिस आहे उगीच नाटक ”) “ड्रामा अल्ला, निजम्मा ओरबाड काल वली ” (“नाटक नाही, खरंच पाय फार दूखतोय”) याखेरीज  माझ्याकडे उत्तर नव्हतं.  माझ्या शेजारच्या रिकाम्या खुर्ची वर एक काळी एयर होस्टेस येऊन बसली. तिला मी इंगलिशमध्ये सांगितलं. एयर फ्रान्स चं ऑफिस उघडलं होतं. तिथे एक गणवेषातला माणूस काम करत होता. त्या माणसाक़डे त्या एयर होस्टेसने जाऊन सांगितलं. “The man behind the counter will attend to you within 5 minutes” असं ती मला म्हणाली. तो माणूस आला. त्याने सर्व नीट समजावून घेतलं आणि आम्हांला सांगितलं. आम्हां दोघांकरता शाकाहारी जेवण, व्हील चेयर आणि हो ! विमानात बसायच्या जागाही त्याने राखून ठेवल्या. हिच्याकरता खिडकीजवळ, माझ्याकरता हिच्या शेजारी आणि त्यानंतर रिकामी जागा. मला अधून मधून वॉश रूमला जाण्याची सोय ! चेक इन काउण्टरवर तोच असणार असंही म्हणाला.

योग्य वेळी व्हील चेयर घेऊन गणवेषातले दोन इसम आले. त्या दोघांनी आम्हाला व्हील चेयरवर बसवून सर्व formalities  करून घेऊन प्रतीक्षा कक्ष waiting longue  पर्यंत   आणलं. हिने चांगल्या मनाने शंभर रुपये देऊ केले. “नाऊ इब्बुरू इद्देवे” (“आम्ही दोघे आहोंत”) असं म्हणून त्यानी आणखी शंभर रुपये घेतले. विमानाच्या प्रवेशद्वारापर्यंत त्यानी आम्हाला व्हील चेयरने आणलं. त्यानंतर एका एयर होस्टेसने आम्हाला आमच्या जागेवर बसवलं. आमच्या हॅणड बॅग्स वरच्या रॅक्सवर ठेवून दिल्या. आम्ही आमच्या जागेवर स्थानापन्न झालो.

 

अकरा जुलै 2016 च्या मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारांस विमानाने आकाशात झेप घेतली. विमानात बसण्याची ही माझी पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी कित्येकदा मी विमानाने प्रवास केला असेन, तरी विमानाचं उड्डाण (take off) पहायची हौस काहीं औरच ! या खेपेला मिट्ट अंधार, शिवाय ही खिडकीशेजारी बसून झोपलेली, काहीं दिसण्यासारखं नव्हतं, पण माझी निराशा झाली नाहीं ! समोरच्या टी.व्ही. स्क्रीनवर take off चं दृष्य दाखवलं जात होतं !

विमान आकाशात आल्यावर (airborne) कंबरेचे पट्टे (seat belts) काढायची सूचना झाली. मी वॉश रूमला जाऊन आलो. आमच्याकरतां खांस जेवण सर्वांच्या आधी आलं. ते शाकाहारी आसल्याची मी खात्री करून घेतली. जेवणानंतर “coffee or massala tea?” असं विचारत एक पुरूष steward  आला. मी कॉफी मागितली. हिने मसाला चहा मागवला. कॉफीचं तंत्र मला समजलं नाही. कॉफी मिळमिळित लागली. त्याऐवजी मसाला चहा बरा लागला असता असं वाटलं.

सर्व प्रवासी झोपायच्या तयारीला लागले. माझ्यासमोर तीन पर्याय होते. झोप आल्यास झोपावं, किंवा समोरच्या टी.व्ही. वर चित्रपट पहावे, किंवा इतर सहप्रवाश्यांची हालचाल पहावी. अधून मधून मी दोन-तीनदा वॉशरूमला जाऊन आलो. सबंध प्रवासात माझा पाय दुखला नाही अरूंद जागेत  जखडून बसल्यावर माझा पाय दुखेल अशी मला शंका होती पण तसं काही झालं नाही. डुलकी लागली तेंव्हा झोपलो. समोरच्या टी.व्ही. वर काय पहावं हे समजलं नाही. मला अजून लहान मुलांसारखी कार्टून पहायची हौस आहे, पण त्याचाही कंटाळा आला. अचानक मला टी.व्ही.वर नकाशा दिसला. आमचं विमान कसं आणि कुठे चाललंय हे पहायला मिळालं. सहज शेजारच्या aisle सीटवर माझी नजर गेली. एक मध्यम वयाची बाई आपल्या अंगाचं मुटकुळं करून बसल्या जागेत झोपायचा प्रयत्न करत होती. ती बाई तामिळ असावी असं मला वाटलं. मी माझ्या पत्नीशी तामिळमध्ये बोलतांना या बाईने पाहिलं असावं, असं तिच्या हावभावावरून वाटलं. “यंग पोरीं गS?”(कुठे जाणार आहांत हो?) इथून जुजबी संवाद झाले. ही बाई पॅरीसला उतरणार होती हे समजलं. वेळ बरा गेला.

 

  • सकाळ झाली. माझ्या मनग़टी घ़ड्याळात सकाळचे सात वाजलेले पाहिले. “When will I get my breakfast?” मी एका एयर होस्टेसला विचारलं. “ Within half an hour” असं उत्तर मिळालं. साडेसातच्या सुमारांस न्याहारी आली. मी माझ्या ताटावरलं आवरण उघडलं. एका पुडक्यावर “NON VEGETARIAN” असं लाल अक्षरांत इंगलिशमध्ये छापलं होतं. मी चपापलो. समोरच्या तामिळ बाईने माझी अवस्था पाहिली. “इदु सापडला मं गS, पर्वा इल्लैं गS” (हे खायचं असतं हो, हरकत नाही हो.) अशी ग्वाही दिली. “इदु अश़ैव. नां सापडले” (हे मांसाहारी मी खाणार नाही) मी उत्तरलो. “इल्लैंगS इदु शैव तानंगS” (नाही हो, हे शाकाहारीच आहे हो). ती ठांसून म्हणाली. “धडपडला इंग्लिशले “ऩॉन व्हजिटेरियन्” नु अच्च पोटिरकु” (मोठ्या थाटात इंग्लिशमध्ये चक्क NON VEGITARIAN असं छापलंय) मी म्हणालो. माझं समाधान झालं नाही असं पाहून तिने पुढच्या रांगेत बसलेल्या एका जोडप्याला विचारलं. त्यानंही इंगलिशमध्ये असंच उत्तर दिलं. मी एका एयर होस्टेसला विचारलं. ती घाईगर्दीत होती. म्हणून तिचं बोलणं मला समजलं नाही.  तामिळ बाईला इथल्या भागाच्या प्रवासाचा अनुभव असावा असं मला वाटलं. शिवाय मला भूक लागली होती. मी माझ्या ताटातले सर्व पदार्थ खाल्ले. हिने सावधपणे आपल्या ताटांतलं नॉन व्हेजिटेरियनचं पुडकं बाजूला ठेवलं. थोड्या वेळाने उष्टी ताटं गोळा करायला एक स्टेवर्ड गाडी ढकलत आला. मी त्याला विचारलं. त्याने चूक कबूल केली. “Sorry” म्हणाला. हिच्या ताटातलं नॉन व्हेजचं पुडकं त्याने परत घेतलं. “Shall I bring something else” असं त्याने विचारल्यावर हिने “no” म्हण्टलं. मी ह्या खेपेस मसाला चहा मागवला. बरा लागला.

हाच स्टेवर्ड मला वॉशरूमला जातांना भेटला. पुढच्या प्रवासाकरता मी व्हेज फुड आणि व्हील चेयर बद्दल परत एकदा खात्री करून घेतली. त्याने खात्री दिली. बोलता बोलता विषय निघाला. “You are coming from Bangalore?” त्याने विचारलं. “Yes” मी उत्तर दिलं. “Oh! I am going to Bangalore in this plane in the return flight” असं म्हणतांना त्याचा चेहरा आनंदला. “Good luck” मी म्हणालो.

माझ्या मनग़टी घड्याळात सकाळचे अकरा वाजले होते, पण समोरच्या टी.व्ही, वरल्या नकाशात साडे आठ वाजलेले दिसले. “You will have to wait for wheel chairs till all the passengers alight” तो स्टेवर्ड म्हणाला. ते समजण्यासारखं होतं. विमान पॅरीसला “चार्ल्स ड गॉल” विमानतळावर उतरलं. विमानाच्या दारात आमच्याकरता दोन व्हील चेयर्स तयार होते. ते ढकलायला गणवेषातले दोन इसम आले. आम्हा दोघांची फारकत होऊ नये म्हणून दोघांचे व्हील चेयर्स जवळ-जवळ ठेवायला सांगून ठेवलं. चिरिमिरी द्यावी लागणार नसल्याची खात्री करून घेतली. त्या दोघांनी आम्हांला सर्व formalities करून टोरंटोला जायच्या वेटिंग लॉन्जमध्ये आणून एका खुर्चीवर बसवलं. “35 minutes before your next flight either we or somebody else will come and take you to the plane” असं म्हणून ते दोघे निघून गेले.

 

पॅरीसला कमीत कमी चार तास वाट पहावी लागणार होती. आम्हाला आमच्या ट्रॅव्हल एजंटने अमेरिकन डॉलर्स दिले होते ते मी हिच्याकडे दिले होते. हिच्याक़डून मी 20 डॉलरची नोट घेतली. हिला सामानाबरोबर ठेवून मी कॉफीच्या शोधात निघालो. एका स्टॉलमध्ये चौकशी करायला गेलो. तिथल्या बाईला माझं म्हणणं समजलं नसावं. मला इतकंच समजलं की तिथे अमेरिकन डॉलरस चालणार नव्हते. एका मशीनीत एक माणूस सॉफ्ट ड्रिंक्सच्या बाटल्या भरत होता. त्याला मी विचारलं त्यानेही “नो डोलार” असं उत्तर दिलं. मी पुन्हा एकदा पहिल्या स्टॉलवर गेलो. या खेपेस दुसरी बाई होती. गर्दी ओसरल्यावर तिने माझ्यकडे लक्ष दिलं. दोन कप कॉफी डिस्पोसेबल मग्स मध्ये दिले. 20 अमेरिकन डॉलर्सच्या बदल्यात 5 डॉलर्स घेऊन 15 डॉलर्सच्या ऐवजी यूरोची मोड दिली. आमच्या कॉफीची सोय झाली.

आमच्या मोबाईल्सच्या बॅटरीज चार्ज करायच्या होत्या. हिचा मोबाईल चटकन् मिळाला. मला माझा मोबाईल आमच्या कॅरी बॅगमध्ये शोधून मिळेना. जास्त शोधतांना सामान विस्कटेल आणि हिला राग येईल ही भीति होतीच. तसंच झालं. हिला शोधून मोबाईल मिळला नाही. हिने माझ्यावर गबाळेपणाचा आरोप करून तोंडसुख घेतलं. मला त्याबद्दल वैषम्य वाटलं नाहीं. मोबाईलसारखी मौल्यवान वस्तु दिसेनाशी होते, त्यापेक्षा त्यातला डेटा गैर इसमाच्या हाती लागण्याची भीति जास्त. मी मनांतल्या मनांत श्री साईबाबांचं स्मरण केलं. कॅनडाला पोहोचल्यावर त्यांच्या मंदीराला जाऊन दानपेटीत दक्षिणा घालीन असं सांकडं घातलं. आणि हिला तो मोबाईल कॅरी बॅगमध्ये मिळाला. हिने तो रागारागाने मला दिला. मी शांतपणे आधी कॅनडात असलेल्या माझ्या मुलीला आम्ही पॅरीसला सुखरूप आलो असा मेसेज पाठवायचा प्रयत्न केला. तो मेसेज गेला नाही. मी माझ्या भाचीला गोव्याला असाच मेसेज पाठवला. तो व्यवस्थित गेला. माझं समाधान झालं. मी दोन्ही मोबाईल्सच्या बॅटरीज चार्ज करून घेतल्या. मी माझा लॅपटॉप चालू करायचा प्रयत्न केला. लागेना. नाद सोडला.

वेळ घालवायला मी आजूबाजूला पॅरीसच्या विमानतळाचा परीसर पाहू लागलो. इतर प्रवाश्यांकडे दृष्टी घातली. त्यांचे चित्र-विचित्र पोषाख पाहिले. माझी नजर कांही अंतरावर उभ्या असलेल्या एका माणसाकडे गेली. काळा, पण सुदृढ, उंच आणि खरोखर आकर्षक ! चेहरा ओळखीचा वाटला. कदाचित टी.व्ही.वर पाहिला असावा. आठवलं. क्रिकेट कॉमेंट्री करणारा असावा. नांव आठवेना. हिच्या विरोधाला न जुमानता मी त्याच्या समोर गेलो. “ Excuse me, I think I have seen you on the TV as a cricket commentator. Your face is quite familiar” मी म्हणालो. “ You mean ‘Iyan Bishop’?” तो म्हणाला. खरंच ! मला आठवलं. “ But I  am not him” तो म्हणाला. हे कदाचित त्याचं सावधगिरीचं धोरण असावं असं मला वाटलं.  “Oh ! You are his ‘look-alike?’”  मी विचारलं. त्यावर तो दिलखुलास हंसला. त्याने हस्तांदोलन केलं.

विमानाच्या प्रवासात असंच कोणी तरी अचानक पहायला मिळतं. मागे मी मुम्बईहून बॅंगलोरला जातांना मुम्बईच्या विमानतळावर मला प्रसिद्ध ऩट दिलीप कुमार आणि सायरा बानू हे जोडपं  दिसलं. अनिल कपूर,रजनीकांत, राज बब्बर, श्रीदेवी, वगैरे दिसले. मी त्याना भेटायला सामोरा गेलो नाही तरी दुरून पाहिल्याचं समाधान झालं. बेंगलूरला आसरानी, सी. एस. दुबे ह्यांच्याशी जुजबी गप्पाही झाल्या. मागे एकदा माईकेल फरेरा ओझरता दिसला होता. मला बिलीयर्डस ह्या खेळाबद्दल फार कमी माहिती होती पण त्याकाळी  त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती. प्रसिद्ध सॅक्साफोन वादक (कर्नाटक शैली) डॉ. कदरी गोपालनाथ ह्या व्यक्तीचं दर्शन झालं. संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा आणि उस्ताद झाकीर हुसेन (तबला वादक) ह्या दोघांचं दर्शन झालं. डॉ. एल् सुब्रमण्यम, व्हायलिन वादक (कर्नाटक शैली) आणि कविता क़ृष्णमूर्ती ह्या जोडप्याचंही दर्शन झालं. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल ह्यांचही दर्शन झालं. आत्ता पॅरीसच्या विमानतळावर कदाचित रवि शास्त्री, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर अनिल कुंबळे यांसारखे कोणीतरी दिसावं असं उगीचंच वाटलं.

पॅरीसच्या विमानतळावर कधी वॉशरूमला जायला, कधी मोबाईल्सच्या चार्जिंगकरता माझ्या चकरा झाल्या, पण माझा उजवा पाय अजिबात दुखला नाहीं । हा माझा नवा आजार नव्हता.  कांही वर्षांपूर्वी ह्या आजारामुळे मी कोर्टात जायचं बंद केलं होतं. नाहीतरी वाढत्या वयाबरोबर ढांसळणारी प्रकृती म्हणूनही वकीली चालत नव्हती. माझ्या मुलीने आणि बायकोने पटवून दिलं म्हणून मी वकीली सोडून घरी बसून  घरची कामं सांभाळू तागलो. आत्ता विमानतळावर जास्त पायपीट करावी लागू नये म्हणून पदोपदी व्हील चेयरची सोय करावी लागत होती. ह्या क्षणी पायाचं दुखणं नाहीसं झालं होतं.

हळूं हळूं घड्याळाचे कांटे पुढे सरकले. टोरंटोला जायच्या गेटवर तयारी दिसली. कौण्टरवर गणवेषातली एक गोरी बाई होती. तिला मी विचारलं. व्हील चेयरची चौकशी केली. “Please wait ” म्हणाली. व्हील चेयर्स दिसेनात. किंवा ती ढकलणारी माणसं दिसेनात. विमानात जाणारे प्रवासी ओसरले. मी गोंधळलो. मी पुन्हा त्या बाईला विचारलं. व्हील चेयरची चौकशी केली. ह्या खेपेस गणवेषातल्या दोन काळ्या मुली तिथे व्हील चेयर पाशी उभ्या असलेल्या दिसल्या. त्या दोघी आम्हा दोघांकरताच वाट पहात असाव्यात अशी खात्री झाली. मी त्या दोघींना विचारून खात्री करून घेतली. मी हिला हांका मारून बोलवूं लागलो. सर्व सामान घेऊन येतांना तिला त्रास झाला. लॅपटॉपचं वजन जड झालं. हिने त्यावरून त्रागा केला. व्हील चेयरवर बसल्यावर गणवेषातल्या काळ्या मुलीने पासपोर्ट मागितला. सर्व formalities आधीच संपल्या असं समजून हिने पासपोर्ट बॅगेत घातले होते. परत बॅगेतून उपसावे लागले म्हणून पुन्हा हिचा त्रागा. “Can you walk the distance up to the aircraft?” त्या मुलीने विचारलं. आत्ता मात्र हद्द झाली ! मीही इरेला पेटलो. “Nothing doing !  We are taking the wheel chairs” मी उत्तरलो. आम्हां दोघांना बराच वेळ व्हील चेयर वर बसवून त्या दोघी आपसांत कुजबुजत हंसत उभ्या राहिल्या. शेवटी एकदाचं त्यानी आम्हांला  विमानाच्या अंतरभागात आणलं. एयर होस्टेसने आम्हाला आमच्या जागेवर बसवलं. आमच्या एयर बॅग्स वरच्या कॅरीयरवर ठेवून दिल्या. आम्ही seat belts बांधत असतांनांच विमान सुटलं. पुन्हा एकदा मी विमानाचं उड्डाण (take off) समोरच्या टी. व्ही. वर पाहिलं. विमानाच्या प्रवासाचं द़ृश्यही समोरच्या टी.व्ही. वर नकाशात पाहिलं. खाण्यात शाकाहारी पदार्थ मिळाले ह्याची खात्री करून घेतली. चहा-क़ॉफीबद्दल शंका नको म्हणून फळांचा रस (fruit juice) घेतला. आठ तासाच्या प्रवासानंतर विमान टॉरंटोला “पीयर्सन “ (Pearson) विमानतळावर उतरलं. व्हील चेयरची सोय झाली. निरनिराळ्या लिफ्ट्समधून आणि विजेच्या गाड्या (electric buggies) मधून आम्हाला सांभाळून शेवटी सर्व formalities  करून आमच्या सामानासकट आम्हांला गेटमधून बाहेर आणलं गेलं. शेव़टच्या टप्प्यातून आणणारी गणवेषातली मुलगी भारतीय असावी असं मला वाटलं. “Are you Indian?” “आप  हिंदुस्थानी है?” “हां, मै राजस्थानी हूं I”  मला उत्तर मिळालं. आनंद झाला. परदेशात भारतीय व्यक्ती भेटल्याचा आनंद !

विमानतळावर आम्हाला घेऊन जायला माझी मुलगी आली होती. तिने आम्हांला आलिंगन  देऊन स्वागत केलं.

 

Avatar
About अनिल शर्मा 15 Articles
वास्तव्य – बेंगलूरू-कर्नाटक, वय एक्क्यांशी, शिक्षण मराठी भाषेतून झाले. सध्या वृद्धाश्रमात रहातो. एके काळी वकीलीचा व्यनसाय केला. आता स्वस्थ बसून संगणकावर काहीेतरी लिहीत आसतो.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..