नवीन लेखन...

दुसर्‍या महायुद्धातील ‘ही शर्यत रे अपुली’

(शर्यत दोन वा अधीक प्रतिस्पर्ध्यांमधे असते. ती स्थळ काळ ठरवून होते. स्पर्धकांना एकमेकांच्या तयारीचा अंदाज असतो. ससा आणि कासव हे मित्र धावण्याची शर्यत ठरवतात. तयारीत ससा वरचढ असल्याचे माहीत असते. पण अनपेक्षितपणे कासव ही शर्यत जिंकतो. अशीच एक शर्यत दुसर्‍या महायुद्धात लागली होती. ‘दुसरे महायुद्ध’ या विषयावरील हा दुसरा लेख.)


‘ही शर्यत रे अपुली’, ससा आणि कासवाच्या शर्यतीवरील गीतातली ही ओळ आहे. शिक्षण, व्यवसाय, क्रीडा वगैरे क्षेत्रात स्पर्धा, शर्यत असते. लढाया जिंकत जिंकत अंतिमतः युद्धात बाजी मारणे हे युद्धाचे उद्दिष्ट असते. शर्यतीत प्रतिस्पर्ध्यावर मात करावी लागते. हिटलरला युरोप जिंकून साम्राज्य वाढवायचे होते. हिटलरचे प्रतिस्पर्धीं त्याला थोपवायचा प्रयत्न करीत होते. या मित्र पक्षांचा गट बनला होता. युद्धात न उतरलेला एक देश मित्रपक्षांचा सोबती होता.

जर्मनीत 1920 मधे नाझी पक्षाचा उदय होत होता. आर्य हे श्रेष्ठ आहेत, त्यांचेच वर्चस्व असायला हवे, अशी हिटलरची समजूत होती. ज्यूंचा नाश करण्याच्या नाझी पक्षाच्या निर्धारामुळे, जर्मनीतूनच काय इतर युरोपीय देशातूनही ज्यू परागंदा होऊ लागले. नामवंत ज्यू शास्त्रज्ञ, कलावंत, व्यावसायिक यांना असुरक्षित वाटू लागले. अमेरिका, पॅलेस्टाईन, ग्रेट ब्रिटन, मध्य व दक्षिण अमेरिका या देशात ते आश्रयास जाऊ लागले. हिटलर सत्तेत येताच राज्यातील सर्व आस्थापनांमधून ज्यूंची हकालपट्टी केली गेली. हिटलरने 1938 पर्यंत जर्मनीवरच लक्ष केंद्रित केलं होतं. दुसरे महायुद्ध 1939 मधे सुरू होण्यापूर्वी अनेक शास्त्रज्ञ अमेरिकेत पोचले होते. वर्नर हायसेनबर्ग सारखे काही शास्त्रज्ञ देशप्रेमापोटी जर्मनीत राहिले.

अल्बर्ट आइन्स्टीन अमेरिकेत प्रध्यापकपदी काम करत होते. हायसेनबर्ग जर्मनीत संशोधन करीत होते. दोघेही आपापल्या विषयातील तज्ञ. अणुभंजनातून ऊर्जा निर्माण करता येईल हे एव्हाना सर्वांना पटले होते. प्रत्यक्षात हे कसे घडवून आणायचे याबद्दल कोणाला काही माहित नव्हते. अणुऊर्जेचा उपयोग कसा करायचा हा दूरचा प्रश्न होता. सर्व शोधांप्रमाणे याचाही विधायक तसेच विनाशक कामासाठी वापर होऊ शकत होता. दुसरे महायुद्ध 1939 मधे सुरु झाले. जर्मनीने युरेनियमची विक्री थांबविली. ऑटो हानने 1938 मधे केलेल्या प्रयोगानंतर अणूकेंद्र भेदता येते हे सिद्ध झाले. अणुबॉंबची मूळ कल्पना लिओ झिलार्ड या शास्त्रज्ञाची. झिलार्ड यांनी आइन्स्टीन यांची भेट घेतली. त्यांनी 1939 मधे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांना पत्र लिहून कळवले की जर्मनीच्या हाती अणुबॉंब लागण्यापूर्वी अमेरिकेने तो बनवावा. जर्मनी युरेनियमपासून अणुबॉंब बनवू शकेल याची खात्री पटल्याने अमेरिका शर्यतीतील दुसरा देश बनली. पहिला देश अर्थात जर्मनी होता. अमेरिकेने पूर्ण ताकदीने ‘मॅनहटन प्रकल्प’ हाती घेतला तेव्हा 1941 साल उजाडले होते. शर्यत सुरू झाली तेव्हा हे दोन्ही देश संशोधनात एकाच टप्प्यावर होते. या शर्यतीतील महत्वाचे मुद्दे असे होते.

  • जर्मनीत Uranverein हा प्रकल्प सुरू झाला होता. अमेरिकेत Manhattan प्रकल्प आकार घेऊ लागला.
  • जर्मनीत मूलभूत संशोधन विखुरलेल्या स्वरूपात 9 ठिकाणी होत होते. Kurt Diebner अणुभंजनावरील कामाचा प्रमुख होता. अमेरिकेत 3 ठिकाणी पण एकाच नेतृत्वाखाली काम चालले होते, Robert Oppenheimer या शास्त्रज्ञाच्या देखरेखीखाली.
  • हायसेनबर्ग जर्मनीच्या प्रकल्पात काम करीत होते, पण बरेच जण नंतर गळू लागले. आइंस्टीन यांना Security clearance न मिळाल्याने मॅनहटन प्रकल्पात समाविष्ट केलं गेलं नव्हतं. पण इतर महत्वाचे शास्त्रज्ञ काम करत होते.
  • जर्मनी व अमेरिका दोन्ही देशांकडून कामाबाबत गुप्तता राखली जात होती. म्हणून अमेरिकेला जर्मनी कुठपर्यंत पोचली आहे याचा अंदाज येत नव्हता. अमेरिकेच्या अवाढव्य प्रकल्पाचा अंतिम उद्देश काय आहे हे तेथे काम करणार्‍या शास्त्रज्ञांना देखील माहित नव्हते. प्रकल्पातील अगदी मोजक्या लोकांना ते माहीत होते.
  • अणूभंजनाची साखळी प्रक्रिया (Chain Reaction) साध्य करण्यासाठी वस्तुमान (Critical Mass) किती असावे हा अतिशय मोलाचा शोध ठरणार होता. जर्मनीला हे शेवटपर्यंत जमले नाही. अमेरिकेला ते समजले होते.
  • जर्मनीचे अणूभट्टीवरील संशोधन प्रयोगशाळेतच राहिले. अमेरिकेने अणूभट्टी उभारलीसुद्धा.
  • अणुबॉंब विषयी समजून घेण्यात हिटलर कमी पडला, म्हणून 1942 मधे त्याने Uranverein प्रकल्पावरील खर्चात कपात केली. जर्मनीत काय चालले आहे याचा अंदाज नसल्याने गाफिल न राहता अमेरिकेने Manhattan प्रकल्प वेगाने पुढे नेला.
  • हिटलरच्या हाती अणूबॉंब लागल्यास काय होईल हे हायसेनबर्ग जाणून होता. तो आणि अनेक शास्त्रज्ञ बॉंबच्या तयारीविषयी हिटलरपासून माहिती राखून ठेवत होते. हिटलरला पाठपुरावा करायला वेळही नव्हता. जर्मनीने काही प्रगती केलेली नाही हे Intelligence Mission ‘Alsos’ या मोहिमेतून अमेरिकेला कळले.
  • जर्मनी अणुबॉंबचा आराखडा ठरविण्याच्या टप्प्यावर अडकली. अमेरिकेने जुलै 1945 मधे अणूस्फोटाची चाचणी (Trinity) केली तेव्हा अणुबॉंबचा आराखडा तयार झालेला होता.
  • जर्मनी मागे पडली होती. अमेरिका ही शर्यत जिंकणार हे स्पष्ट झाले होते.
  • अमेरिका अणुबॉंबचा वापर जर्मनी विरुद्ध करू शकेल का या प्रश्नाचे उत्तर ठाऊक नव्हते. कारण अणुबॉंब 1945 पूर्वी हाती येणार नव्हता. जर्मनी तोपर्यंत युद्धात शिल्लक राहील का हासुद्धा प्रश्न होता.

महायुद्धाच्या धुमश्चक्रीत हे अणुबॉंब प्रकरण घडत होते. अनेक दोलायमान अवस्थांमधुन जात अमेरिकेने बाजी मारली. शर्यत जिंकली. अणुबॉंब तर बनला. त्यापूर्वीच हिटलरचा अंत होऊन युरोपमधील युद्ध संपले होते. आता बॉंब टाकायचा कुणावर? शर्यतीतला प्रतिस्पर्धी आधीच नेस्तनाबूत झाला होता. हुकुमशहाच्या हाती अणुबॉंब पडला नाही हे चांगले झाले. जगाचा विनाश टळला. पण जपान दुसरे महायुद्ध संपविण्यात अडथळा ठरत होता. पॅसिफिक मधे जपान धुमाकूळ घालत होता. अमेरिकेला ‘पर्ल हार्बर’ आठवत होतेच. अणुबॉंब वापरल्याशिवाय जपान वठणीवर येणार नाही, हे जपानने ‘विनाशर्त शरणागती’ नाकारल्यावर अमेरिकेला कळून चुकले. पुढे असे घडले.

  • ऑगस्ट 6, 1945 हिरोशिमावर अणुबॉंब पडला.
  • रशियाने जपान विरोधात युद्धात उडी घेतली.
  • ऑगस्ट 9, 1945 नागासाकीवर अणुबॉंब पडला.
  • सप्टेंबर 2, 1945 जपानची शरणागती. दुसरे महायुद्ध संपले.

शर्यत जिंकणार्‍या अमेरिकेचे कौतुक झाले. पण अणुबॉंबच्या शोधानंतर अमेरिकेत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. या शोधामुळे निर्माण होणार्‍या भविष्यातील समस्यांना कसे तोंड देता येईल यावर जागतिक पातळीवर खल झाले. काही प्रश्न अनुत्तरित राहतात. ‘संशोधनाच्या निष्कर्षांच्या वापरावर शास्त्रज्ञांची भुमिका काय असावी’ हा एक सतत विचारला जाणारा प्रश्न आहे. बरोबर काय? नैतिकता की विकास? पहिल्या महायुद्धा दरम्यान रासायनिक अस्त्र (विषारी वायू) वापरले गेले. दुसर्‍या महायुद्धात अणुबॉंब वापरला गेला. युद्धजन्य परिस्थिती नसताना काही वर्षापूर्वी कोविड विषाणूने हाहाकार माजवला होता. विज्ञान थांबणार नाही. शोध लागत राहतील. त्यांचा उपयोग व दुरुपयोग दोन्ही होत राहील. हे रहाटगाडगे असेच चालू राहील.

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 38 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..