झाले असे – मी मध्यंतरी माझ्या सांगलीच्या रिसबूड सरांविषयी एक आठवण, फोटोसह टाकली होती- २०१९ च्या भेटीचे पुनरावलोकन म्हणून ! लगेच मला मोहिते सरांनी कळविले – ” अहो, रिसबूड सरांच्या सौं चे ऑगस्ट मध्ये निधन झाले.( माझ्या फोटोत उभयता- सर आणि काकू होत्या). त्यांचा मुलगा माझा वर्गमित्र असल्याने त्याने आमच्या वर्गाच्या व्हाट्स अप ग्रुपवर कळविले होते. ” सरांनी सोबत त्या चॅटचा स्क्रीन शॉट ही शेअर केला होता. आम्ही नंतर सविस्तर बोललो आणि पण तरीही माझी अपराधीपणाची बोच जाईना.
दुसऱ्या दिवशी सरांना सांगलीला फोन लावला, त्यांच्याकडून माहिती घेतली आणि मगच माझ्या मित्रपरिवाराला हे वृत्त कळविले.
मध्यंतरी माझ्या रायपूरच्या १-२ विद्यार्थिंनींबद्दल असेच झाले. रोज सकाळच्या आन्हिकांमध्ये मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, आणि नंतर कळले, त्या आता या जगात नाहीत. एकीबद्दल तर मला ती गेली आहे हेही माहित होते,तरी मी विसरलो होतो.
आजही मित्र हेमंत तावडे ने फोन करून वर्गीस जॉर्ज या मित्राला मी सकाळी पाठविलेल्या वाढदिवस शुभेच्छा डिलीट करायला सांगितल्या कारण काही महिन्यांपूर्वी वर्गीस चे (बहुधा कोरोना मुळे) दुःखद निधन झाले आहे .
ज्या मित्रांचे/ परिचितांचे जाणे माहित असते अशांना मी आधीच माझ्या मित्रयादीतून वगळतो. पण या “अनोळखी ” दुष्टाव्यांचे काय? एखाद्या मृत व्यक्तीला शुभेच्छा म्हणजे फारच !
पुलं म्हणतात- ” माणसे असायला हवी पण तेवढे पुरेसे नाही. ती दिसायलाही हवीत. ”
सध्याच्या जगात या दोन्ही साध्या अपेक्षाही पूर्ण होणे दुरापास्त !
या चुका मग कशा दुरुस्त करायच्या? वरील मार्गाशिवाय मला आणखी दोन मार्ग सुचतात –
१) त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी आधी दुःखद वृत्त कळवून समाजमाध्यमावरील सदर खाते बंद करावे. माझा मित्र अनिरुद्ध बनहट्टी गेल्यावर त्याच्या पत्नीने हा मार्ग अवलंबिला होता.
२) स्वतःच्या living will मध्ये what family should know या कॉलम अंतर्गत सगळे यूजरनेम आणि पासवर्डस नमूद करावेत म्हणजे कुटुंबियांना वरीलप्रमाणे कृती करता येईल आणि सगळ्यांनाच अनावश्यक ऑकवर्ड होणेही टाळता येईल.
यापेक्षा आणखी काही वेगळे सुचतंय कां ? ( कृपया समाजमाध्यमे टाळा असा सल्ला देऊ नका).
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply