नका हो नका लादू माझ्यावर रोजरोजच हे शिळेपण….
जरा पहा डोळे उघडून…. मीही एक माणूस आहे….डस्टबिन नाही !!
उरलं अन्न, शिळ्या भाज्या घालतेच रोज याच्या पोटात
नको वाटे वाया जाया, पण हे का रोज माझ्याच वाट्यात
दिवसभराचा शीण, त्रागा आणि चिडचिड तुमची
साचलेली गरळ नि मळमळ… चक्क येता नि सरळ ओतून देता या गृहीत धरलेल्या डस्टबिनपोटी
गप गुमान भरून घेतो, कोंबून कोंबून घुसमटून जातो
तरीही कधीच भरून सांडत नाही
पण दररोजचं हे शिळेपण आता सहन होत नाही
अंतरातला ताजा सुवास कधीच का जाणवत नाही?
माणसातलं माणूसपण कधीच दरवळत नाही?
पण आता आहे सारे थांबवायचे
उकिरड्यावरच्या गलिच्छ पेटीगत यापुढं नाही वाहायचे
मलाही जाणिवा आहेत किमान माणसागत जगण्याच्या
मलाही हक्क आहे नको आहे ते नाकारण्याचा
कारण… जरा पहा डोळे उघडून…. मीही एक माणूस आहे….डस्टबिन नाही !!
— वर्षा कदम.
Leave a Reply