नवीन लेखन...

दूतवारी देवत्व व सात्विकता फुलविणारी

अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ! असा नुसता उद्घोष जरी ऐकू आला तरी भगवान श्री दत्तात्रेयांची मनमोहक मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. भारतात परमेश्वराची आराधना करणारे अनेक संप्रदाय आहेत. त्यात दत्तसंप्रदाय हा फार मोठा संप्रदाय आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही महान विभूती होऊन गेली. पवित्र, सात्विक आणि धर्मवान अशी ख्याती असलेले अत्रि ऋषी व पतिव्रता सुस्वरूप आणि कोणतीही असूया नसलेल्या अनुसूया यांच्या पोटी साक्षात त्रिदेव परब्रह्म म्हणून ते जन्मास आले. जो नित्य देतो तो श्री दत्त ! कर्मफल देऊन भक्तांचे दारिद्र्यहरण करणे ही खरी दत्तगुरूची कृपा. तर श्रध्दा, शुध्द भाव, सत्कर्मावर विश्वास ही त्यांची भक्तांकडून माफक अपेक्षा म्हणावी लागले. श्री दत्तात्रेयांनी थोडे थोडके नाही तर तब्बल २४ गुरू केले. त्या गुरूंकडून त्यांनी काही ना काही गुण संपादन केला आहे. जगद्गुरू होण्यासाठी त्याना प्रचंड साधना तपश्चर्या आणि तीर्थाटन केले. श्री दत्तात्रेय हे एक असे दैवत की ज्याचे अस्तित्व चिरंतन आहे. ते सर्वसमावेशक आहे आणि सर्वांना सामावून घेणारे आहे. त्यांचा समन्वयवादी दृष्टिकोन सामाजिक नैसर्गिक, मानसिक, भावनिक व अध्यात्मिक संतुलन राखण्यासाठी साहाय्यकारी आहे. त्यांचे विभूतिमत्व हे अत्यंत प्रत्ययकारी आहे. दत्तात्रेयांचे चोवीस गुरू म्हणजे मानवी शरीरातील २४ शक्तीकेन्द्रांची प्रतीके आहेत. प्रत्येक मानवी शरीर म्हणजे विश्वाची एक प्रतिकृती आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी असे म्हटले जाते. साधनेमुळे आणि उपासनेमुळे ही केन्द्रे जागृत होतात. त्यामुळे माणसाच्या शक्तीमध्ये वाढ होते. त्याला पंचमहाभूतांचे सहकार्य मिळते. सृष्टीचक्राशी त्याचा समन्वय होतो. त्याची कार्यक्षमता वाढते. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढतो. एकंदरीत त्या व्यक्तीचे जीवन प्रगल्भ होते. जाणिवा आणि नेणीवा यातील अंतर कमी होत जाऊन ती व्यक्ती परिपूर्ण होण्यास सुरुवात होते. श्रीदत्त परिक्रमा हा असाच माणसाची शक्तीकेन्द्रे जागृत करण्याचा एक प्रयास आहे. तीर्थाटन त्यासाठी करावयाचे असते. श्री भगवान दत्तात्रेयांची अनेक तीर्थक्षेत्रे असून त्यांची उपासना सर्व भारतात केली जाते. त्यातल्या त्यात महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश तीन ठिकाणचं दत्तसंप्रदायाचे महत्त्व ठळकपणे अधोरेखीत होते. दत्तक्षेत्रे म्हटली की गाणगापूर, पीठापूर, कुरवपूर, गिरनार, औदुंबर, कारंजा, माहुर, नरसोबाची वाडी श्री शैल्य, वाराणसी, भट्टगाव, पांचाळेश्वर या स्थानांची दत्तभक्तांना आठवण हमखास येतेच. त्याशिवाय आणखी काही लहान- मोठ्या दत्तक्षेत्रांना भेट दिल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. दत्तपरिक्रमेतील ही तीर्थस्थाने विविध राज्यात व विविध प्रदेशात आहेत. मात्र दत्तभक्तीचे सूत्र त्यांच्यामध्ये अगदी समान आहे. तेथील भाषा, चालिरीती, संस्कृती आणि खाण्यापिण्याच्या सवयी वेगवेगळ्या आहेत. तेथील भौगोलिक परिसर, जीवनपध्दती समाजव्यवस्था भिन्न आहे. मात्र एका सूत्ररूपाने ही सर्व क्षेत्रे एकत्र गुंफली गेली आहेत हे लक्षात येत. समाजातील विविध स्तरातील जनसमुदायांना एकत्र जोडणारी ही दत्तपरिक्रमा आहे. त्यातून एकत्वाची प्रचिती येते. हात दोन असले तरी त्यांची कृती एक आहे. पाय दोन असले तरी त्यांची चाल एक आहे. डोळे दोन असले तरी दृष्टी एक आहे. कान दोन असले तरी ग्रहणशक्ती एकच आहे. विविधेतील एकत्व जपणाऱ्या या दत्तपरिक्रमेमुळे भक्तांचे जीवन उजळून निघते. त्यांच्या मनाला शांतता लाभते. प्रसन्नता निर्माण होते. ज्यांना या परिक्रमेत अनुभूती येतात त्यांना तर परमोच्च आनंद मिळतो. मानवजन्म ही परमेश्वराने दिलेली एक सुवर्णसंधी आहे. तर पृथ्वी हे एक विद्यापीठ आहे. या विद्यापीठीत शिकून गुणवान होण्यासाठी प्रत्येकाने दत्तवारी करायलाच हवी.

दत्तवारीतील सर्वात महत्त्वाचे आणि ज्याचा त्याच्या तोंडी असलेले प्रसिध्द ठिकाण म्हणजे श्री क्षेत्रगाणगापूर होय. श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले क्षेत्र म्हणून ते सर्वांना परिचित आहे. त्यांचे अवतार कार्य हे अलौकिक व अव्दितीय आहे. त्यांनी दोन तपाहून अधिक काळ भक्तजनांच्या तारणार्थ तेथे वास्तव्य केले. तेथील भीमा अमरजा संगमावर अनुष्ठान करून असंख्य भक्तांना दर्शन दिले. गाणगापूर येथे श्रीगुरूंच्या निर्गुण पादुका मंदिरात दर्शनासाठी हजारो भक्तजन जात असतात. निर्गुण पादुकात दहा शाळीग्राम, तीन स्फटिकांचे लिंग यांचाही निवास तेथे आहे. भीमा अमरजा संगमाजवळ असलेला भस्माचा डोंगर प्रसिध्द असून ते भस्म कपाळाला लावल्याने मनाला शांती मिळून आजार बरे होतात. अनेकांचा अनुभव आहे. तेथील अष्टतीर्थांचा महिमा अगाध असून तेथे स्नान, पूजा-अर्चा, दान, अभिषेक, दीपाराधना पारायण आदि उपासना केल्यास अगणित पुण्य मिळते याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. गाणगापूरक्षेत्री जाऊन गुरूचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याचे अनेकांचे व्रत आहे त्यामुळे दत्तवारी करणारा कोणीही गाणगापूरला गेल्याशिवाय राहत नाही.

श्री दत्तगुरूंचा पहिला अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ तर दुसरा अवतार म्हणून स्वामी नृसिंह सरस्वती यांची दत्तभक्तांना चांगली ओळख आहे. पीठापूर आणि कुरवपूर ही दोन्ही दत्तक्षेत्रे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या अलौकिक कार्यासाठी व त्यांच्या अगाध लीलांसाठी प्रसिध्द आहेत. पीठापूर हे त्यांचे जन्मस्थान असून सन १३२० मध्ये भाद्रपद गणेश चुतर्थीस त्यांचा जन्म झाला. तर कुरवपूर येथे सन १३५० मध्ये अश्विन वद्य द्वादशीस देहसमाप्ती करून कृष्णा नदीत ते अदृश्य झाले. साक्षात्कारी संतांना ही दत्तक्षेत्रे पुरातन काळापासून ठाऊक असली तरी सामान्य जनांसाठी मात्र त्यांचा शोध सुमारे ४० वर्षापूर्वी लागला असे म्हणावे लागले. पीठापूर हे आंध्रप्रदेशात असून कुरवपूर हे कर्नाटकात आहे. पीठापूर येथील मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीदत्तात्रय व श्री नृसिंहसरस्वती यांच्या संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना विधीवत झालेली असून मंदिरासमोर मोठा सभामंडपही उभारण्यात आला आहे. श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानतर्फे रोज पूजाअर्चा, सकाळ-संध्याकाळ आरती, अभिषेक, भजन-गायन, पादुकापूजन, पालखी सोहळा, प्रसादभोजन बहुविध उपक्रमांनी तो परिसर गजबजलेला असतो. प. पू रामस्वामी यांचा श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर उभारण्यात सिंहाचा वाटा आहे. पीठापूरला महर्षी व्यास यांनी आपल्या शिष्यांसहित भेट दिल्याचा उल्लेख स्कंदपुराणात आहे. हरिभाऊ जोशी निटूरकर उर्फ भाऊमहाराज यांच्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर पीठापूर क्षेत्राचा महिमा अनंत पटीने वाढला असून हजारो भक्तगण दर्शनार्थ तेथे जात असतात. मंदिरातील त्रिमूर्ती अत्यंत प्रसन्न नितांत सुंदर व गेल्यावर आसपासची कुकुटेशावर मंदिर, कुंती माधव मंदिर, काकीनाडा समुद्रकिनारा अन्नावरमम ( सत्यनाराण मंदिर), राडमहेंद्री (गोदावरीनदी) आदि ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान म्हणून पीठापूर प्रसिध्द आहे. आपल्या आई-वडिलांना दत्त स्वरूपात दर्शन देऊन त्यांनी पीठापूर आपल्या वयाच्या १६ वर्षानंतर सोडले आणि उत्तरेस तीर्थाटनासाठी प्रस्थान केले. गोकर्ण महाबळेश्वर, श्रीशैलपर्वत असे फिरत फिरत ते कुरवपूर येथे आले. पुढची १४ वर्षे त्यांनी तेथे तपश्चर्या व विविध लीला केल्या. तेथील मंदिरात भव्य अश्वत्थ (पिंपळ) व कडुनिंब वृक्ष असून त्यांना दगडी पार बांधला आहे. या पारावर दक्षिणाभिमुख दोन कमानीवजा मंदिरे असून एका मंदिरात काळ्या शाळीग्राम शीळेची मारूतीची रेखीव मूर्ती आहे. तर दुसऱ्या मंदिरात केशवमूर्ती आणि शिवलिंग पादुका आहेत. या पारासमोरच मुख्य पूजास्थान असून येथेच श्रीपाद श्रीवल्लभ जप-तप अनुष्ठानास बसत असत. त्याच जागेवर सोमसूत्री आकाराचे लांबट चौकोनी पिंडीवजा स्थान आहे. यालाच निर्गुण पीठ असे म्हणतात. श्री क्षेत्र कुरवपूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या काळापासून किंवा त्यापूर्वी पासून असलेला पुरातन वृटवृक्ष व निसर्गनिर्मित गुहा आहेत. कृष्णा नदीचे दोन भागात विभाजन झाले आहे. या भागाला कुरूगुड्डी बेट म्हणतात. हेच ते श्रीपाद श्रीवल्लभांचे स्थान. त्याच बेटावर दगडांच्या गुहेत श्रीपाद श्रीवल्लभ तपश्चर्या करीत व या गुहेसमोरील मोठ्या औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीत. सकाळी उठल्यावर नदीत स्नान केल्यानंतर ते सूर्यनमस्कार घालीत. ते ज्या शीळेवर उभे राहत सूर्यनमस्कार घालीत त्यावेळची त्यांची शीळेवर पडणारी छाया अजूनही स्पष्ट दिसते. त्याच्या पावलांच्या खुणाही त्या शीळेवर दिसतात. हा परिसरच मोठा रम्य आहे. पादुका मंदिर आजूबाजूची वनश्री हे सर्व मन प्रसन्न व मन अंतर्मुख करणारे आहे.

श्रीपादवल्लभ ज्या ठिकाणी अनुष्ठान करीत होते. त्या ठिकाणी पहाटे ५ ते ९ पर्यंत अभिषेक होतात. अश्विन वद्य द्वादशी हा श्रीपाद श्रीवल्लभांचा निजानंदगमनाचा दिवस. या दिवशी कुरवपूरला उत्सव असतो. श्री दत्तात्रेयांच्या या प्राचीन जागृत स्थानाच्या दर्शनासाठी लोक दूरवरून येत असतात. कुरवपूर बेटावर जाण्याकरता कृष्णा पार करण्यासाठी मोठ्या टोपलीवजा नावांचा उपयोग करावा लागतो. कृष्णेच्या पात्रात सभोवार अजस्त्र शीळा आहेत. एका मागून एक असे चार प्रवाह ओलांडून आपण पैलतिरी जातो. कुरवपूरला कृष्णेचा वेढा आहे. पाण्याला खळखळाट फार आहे. कृष्णा पार करून कुरवपुरी जाण्यात कोणताही धोका नाही. तशी पुसटशी शंकाही मनात येऊ देऊ नका. आजवर कुणाला धोका झालेला नाही. व पुढे होणारही नाही. कृष्णामाईनेच सुखरूपपणे नेण्या- आणण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या परिसरातील सारी बेटे वृक्षलता जीवजंतू झाडे- झुडपे पशुपक्षी सर्वजण श्रीपाद श्रीवल्लभांच्या निवासाने पावन झाले आहेत. पीठापूर क्षेत्राला दक्षिण काशी असेही म्हणतात. ते श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान तर कुरवपूर समाधी स्थान. ‘श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये’ असा नामघोष करीत एकदा तरी दोन्ही ठिकाणी जायलाच हवे.

सांगलीपासून २२ किमी अंतरावर कृष्णेचा तीरावर जे दत्तमंदिर आहे. ते श्रीक्षेत्र औदुंबर म्हणून परिचित आहे. श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी यांचा उपनयन झाल्यावर भारत भ्रमणाच्या उपक्रमात त्यांनी या क्षेत्री एक तपाहून अधिक काळ तपश्चर्या केली. येथील औदुंबर वृक्षाखाली असलेल्या त्यांच्या पादुकांमध्ये ते नित्य वास करून आहेत. दत्त उपासनेचे हे फार मोठे केंद्र आहे. भिलवडी गावाजवळ त्या काळी सर्वत्र जंगल होते. नदीमध्ये डोह होता. तेथे सुसरीचा वावर होता. त्यामुळे ह्या परिसरात फारशी मनुष्यवस्ती नव्हती. औदुंबर वृक्षाखाली त्यांच्या तप:साधनेमुळे त्या गुढ ठिकाणी सत्व शक्ती एकत्र झाल्या. औदुंबर वृक्षाखाली कृष्णा नदीच्या तीरावर उघडा सभामंडप असून गाभान्यामध्ये पादुका आहेत. या पादुकांना श्रीविमल पादुका म्हणून ओळखले जाते. विमल म्हणजे शुध्द. भाषिक उन्नती, सद्गुरू कृपा आणि साधना मार्गातील प्रगतीसाठी उत्तम असलेल्या या तीर्थस्थानाला भेट द्यायलाच हवी. श्री दत्तात्रेयांचे व्दितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मगाव म्हणजे कारंजा. त्याचा शोध प.पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी लावला. तेथे श्री दत्तात्रेयांच्या निर्गुण पादुकांचीही स्थापना करण्यात आली आहे. जन्माला आल्याबरोबर ज्या बालकाच्या मुखातून ओंमकाराचा उच्चार बाहेर पडला ते श्रीनृसिंह स्वामी सरस्वती होते. जन्मापासून स्वामींनी जनउद्धाराचे कार्य केले. सन १३७८ मध्ये त्यांचा लाड कारंजा (विदर्भ) येथे जन्म झाला. १३८५ मध्ये त्यांचे मौनी बंधन झाले. १३८७ मध्ये वयाच्या ९ व्या वर्षी त्यांनी घर सोडले. १३८८ मध्ये त्यांनी श्री कृष्ण सरस्वती यांच्याकडून वाराणसी येथे संन्यास घेतला. १४९८ ते १४२१ पर्यंत गौतमी (गोदावरी) च्या तीरावर, परळीवैजनाथ, औदुंबर व नरसोबाची वाडी आदि ठिकाणी त्यांचा निवास होता. इ.स. १४३५ ते १४५७ या कालावधीत त्यांचे भक्तजन तारणार्थ गाणगापूर येथे वास्तव्य होते. १४ जानेवारी १४५९ मध्ये श्री शैल्य पर्व येथे त्यांचे निजानंदगमन झाले.

श्री दत्तात्रेयांचे निद्रास्थान म्हणून माहूर प्रसिध्द आहे. कृतयुगाच्या अखेरीस श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला. अत्रि अनुसूया मातेच्या उदरी भगवान दत्तात्रेयांनी जन्म घेतला. ते ठिकाण म्हणजे आजचे अनुसूया मातेचे मंदिर व श्री दत्तात्रेय हे आपल्या मातृभूमीवर म्हणजे माहूरगडावर निवास करू लागले. समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले व लक्ष्मीचे अंगभूत असलेले आवळीचे झाड प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी श्रीक्षेत्र माहूरगडावर स्थापले. या माहुरगडावर रेणुकामातेचे मंदिर असून हे एक जागृत शक्तीपीठ आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर असलेले श्रीक्षेत्र नरसिंहवाडी जागृत क्षेत्र म्हणून ओळखले जाते. यालाच नरसोबाची वाडी असे म्हणतात. श्रीदत्तगुरूंची सुखाची राजधानी म्हणून या क्षेत्राचा लौकिक आहे. पंचगंगा नदीमध्ये कुंभी, कासारी, तुलसी, सरस्वती आणि भोगावती या ५ नद्यांचे पाणी आहे. या ठिकाणी काशी विश्वेश्वराचा निवास असतो. येथील औदुंबर वृक्षाखाली असलेल्या मनोहर पादुका या भक्तांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या आहेत.

आपल्या खडतर आयुष्यात एकदा तरी गिरनारवारी करावी व तेथील दत्तमहाराजांच्या पादुकांचे दर्शन घ्यावे असे प्रत्येकाला वाटत असते. भगवान दत्तात्रेयांनी आपल्या वास्तव्याने पुनीत केलेले तसेच १२ हजार वर्ष तपाने सिध्द केलेले गिरनार हे अत्यंत पवित्र दत्तक्षेत्र आहे. दत्तगुरूंच्या पावलांचे गुरूशिखरावर उमटलेले ठसे म्हणजे अनेक साक्षात्कारी संताचे प्रेरणास्त्रोत आहेत. गिरनारवारी करण्यासाठी १० हजार पायऱ्या चढाव्या व उतराव्या लागतात. तेथे समुद्रसपाटीपासून ३६६६ फुटांवर उंच गुरू गोरक्षनाथांची अखंड धुनी असून त्याच ठिकाणी गुरू दत्तात्रेयांनी नवनाथांना गुरूमंत्र दिला होता. अंबामाता, गोरक्षशिखर, दत्तपादुकाशिखर व दत्तधुनी या सर्वांचे दर्शन झाल्यावर अनेक प्रकाराचे आत्मिक समाधान मिळाल्याशिवाय राहत नाही.

बीड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरीच्या किनारी श्री पांचाळेश्वर हे आत्मतीर्थ महानुभव पंथाचे पवित्र व श्रेष्ठ दत्तस्थान आहे. या ठिकाणी श्री दत्तप्रभू रोज दुपारी प्रत्यक्ष भोजन स्वीकारण्यासाठी येत असतात. या ठिकाणी दत्तप्रभूंची चरणकमले रोज नियमाने लागतात. म्हणून त्याला आत्मतीर्थ म्हणतात. पांचालश्वराचे विशेष महत्त्व महानुभवीय दत्तभक्तांना आहे.

वाराणसी, श्रीशैल्य आणि भट्टगाव येथील दत्तक्षेत्रेही अत्यंत प्रसन्न व चैतन्यदायी असून तेथील दत्तप्रभूंच्या दर्शनाने मनाला शांती मिळते. वाराणसी हे काशी विश्वेश्वराचे मुख्य स्थान म्हणून प्रसिध्द आहे. हरिश्चंद्र घाट ते मनकर्णिका घाटादरम्यान २५ ते ३० घाट तेथे आहेत. तर श्रीशैल्य ही प्राचीन ऋषी-मुनींची तपोभूमी म्हणून प्रसिध्द आहे.

दत्तवारीबद्दल बोलू तितके थोडेच आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण स्वतःला वेळ देणं विसरलो आहे. तो दिला तर दत्तवारीशिवाय दुसरे सुख नाही असा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. या वारीदरम्यान आपल्याला अनेदका दत्तावतार आणि दत्तकृपांकित संतांचे दर्शन घेता येते. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी, श्री स्वामी समर्थ, टेंबे स्वामी, योगतज्ञ, दादाजी वैशंपायन आदि प्रमुख संतांचा त्यात समावेश आहे. चला तर मग दत्तात्रय असे म्हणत आपण ही वारी पूर्ण करू या. दत्तोहम! याचा अर्थ चांगुलपणाचा, देवत्वाचा, सात्विकतेचा अंश प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. तो फुलविण्यासाठीच तर ही दत्तवारी आहे.

दादाजींच्या साधेनेतून उभे राहिलेले शेवगावचे दत्त मंदिर

नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील दत्तमंदिर अगदी अलिकडचे. अवघ्या १४ वर्षापूर्वी म्हणजे २००६ मध्ये ते अस्तित्वात आले. पण या मंदिराची कथा मोठी अद्भूत, अगम्य आणि रोचक अशी आहे. एकाच वाक्यात सांगायचे झाले तर प. पू. योगतज्ञ दादाजींच्या निरंतर तपस्येच्या साधनेतून ते निर्माण झाले. शेवगाव येथील सर्व वास्तू म्हणजे मंदिर वृध्दाश्रम, प्रसादालय हे सर्व उभे राहिले सन २००६ व नंतर, पण त्याची अचूकभाकिते प. पू. दादाजींनी वर्तविली ती १९९८ व २००४ मध्ये. शेवगावचे अर्जुन फडके यांच्या हातून या गोष्टी घडतील असा उल्लेखही त्यात होता. एवढेच नव्हे तर २००५ मध्ये मंदिरात प्रतिष्ठापना होणाऱ्या दत्तमूर्तीचा रंगीत फोटोही त्यांनी एका पाकिटातून पाठविला होता.

अर्जुन फडके व प.पू. दादाजी वैशंपायन यांची पहिली भेट झाली नोव्हेंबर १९९९ मध्ये तोपर्यंत ते दादाजींना ओळखतही नव्हते. तरीही त्यांनी वर्तविलेली सर्व भाकिते अचूक कशी ठरली? हा विलक्षण चमत्कार नव्हे काय? केवळ सामान्य माणूस नव्हे तर पुरोगामी बुद्धिवाद्यांनाही हा चमत्कारच वाटेल. पण पुरोगामी बुद्धिवादी ते कबूल करणार नाहीत. २४ मे २००६ रोजी प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली दत्तमूर्ती अगदी रंगीत फोटोतील मूर्तीप्रमाणेच आहे. मूर्ती अत्यंत सुबक, प्रसन्न व चैतन्यदायी आहे. मूर्ती संगमरवरी असून एका हातात त्रिशुल तर एका हातात चक्र आहे. अशी मूर्ती अन्य कुठेही आढळून आलेली नाही. येथील मंदिराची उभारणी अगदी शास्त्रोक्त पायावर झाली, हे देऊळ कसे बांधावे, त्याचा आकार कसा असावा चौथरा कसा असावा. मूर्तीची उंची व कळस किती उंचीवर असावा याची त्यात माहिती आहे. त्या संहितेनुसार मंदिराचे बांधकाम झाले असून ते षटकोनी आकाराचे आहे.

या मंदिराचा एकमेव प्रेरणास्त्रोत प. पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन आहेत. येथील चैतन्य, उर्जा सकारात्मकता सारे काही दादाजी आहेत. शेवगावच्या भूमीत धर्मकार्य, भक्ती, साधना चालू रहावी अशी ईश्वरी इच्छाच असावी, त्यातूनच हे घडले असावे. एवढेच या घटनेबद्दल म्हणता येईल. अन्यथा येथील ओसाड माळरानावर दत्तमंदिर उभेच राहू शकले नसते.

काही संत वा योगी सिध्दीसामर्थ्याने संपन्न असलेले दृष्टीस पडतात. त्यातीलच एक होते. प.पू. योगतज्ज्ञ दादाजी. त्यांच्या चरित्रातील चमत्कार हे चमत्कार नसून त्यांच्या अतिंद्रिय सामर्थ्याची गोमटी फळे आहेत असे म्हणावे लागले.

श्री. वा. नेर्लेकर

(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..