सौराष्ट्रदेशे विशदेsतिरम्ये ज्योतिर्मयं चन्द्रकलावतंसम ।
भक्तिप्रदानाय कृपावतीर्णं तं सोमनाथं शरणं प्रपद्ये ।।१।।
भगवान शंकर यांच्या नावाचा उल्लेख निघाल्या बरोबर प्रत्येक भक्ताच्या मनात येणारी प्रथम गोष्ट म्हणजे द्वादश ज्योतिर्लिंग.
भारतीय संस्कृतीमधील महान उपास्य स्थाने असणाऱ्या या बारा स्थानांचे महत्त्व सांगणारे स्तोत्र आहे द्वादशलिंगस्तोत्र.
या स्तोत्र ला समजून घेताना त्यातील शब्दांपेक्षा त्यामागील कथा समजून घेणे अधिक आनंददायी विषय आहे.
प्रथम स्थान आहे सौराष्ट्र प्रांतातील श्री सोमनाथ.
सोम म्हणजे चंद्र. त्याचा नाथ तो सोमनाथ.
या स्थानाची रोचक कथा अशी आहे की दक्ष प्रजापती यांनी आपल्या २७ कन्या चंद्राला प्रदान केल्या. त्या देत असताना या सगळ्यांवर सारखेच प्रेम करावे अशी विनंती केली.
मात्र कालांतराने चंद्राचे एकट्या रोहिणी प्रति असणाऱ्या विशेष आकर्षणाने संतापलेल्या अन्य पत्नींनी पित्याकडे तक्रार केली.
मागचा पुढचा विचार न करता दक्षांनी शाप दिला, तुझे तेज क्षीण होऊन तू मृतप्राय होशील.
मात्र यात आपल्या मुलींचे नुकसान आहे हे लक्षात आल्यानंतर दक्षाने देवी सती च्या द्वारे भगवान शंकरांना प्रार्थना केली.
श्री शंकरांनी आपले हे आत्मलिंग प्रदान करून गतप्राण झालेल्या चंद्राजवळ त्याची स्थापना करून सर्व नातेवाईकांनी सप्तर्षींसह महामृत्युंजयाचा जप करण्यास सांगितले.
त्याद्वारे चेतना परत आलेल्या चंद्राला भगवंतांनी, जेथे मृत्यू पोहोचू शकणार नाही अशा, आपल्या मस्तकावर धारण केले.
चंद्राला जीवन प्रदान करणाऱ्या त्या स्थानाला श्री सोमनाथ असे म्हणतात.
त्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
सौराष्ट्रदेशे विशदेsतिरम्ये ज्योतिर्मयं चन्द्रकलावतंसम ।
सौराष्ट्र प्रांतात आकाशामध्ये रम्यपणे विहार करणाऱ्या चंद्राच्या कलेला धारण करणाऱ्या,
भक्तिप्रदानाय कृपावतीर्णं तं सोमनाथं शरणं प्रपद्ये ।
त्याला भक्तिप्रदान करण्यासाठी कृपाळूपणे अवतीर्ण झालेल्या, श्री सोमनाथांना मी शरण जातो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply