श्रीशैलश्रृंगे विबुधातिसंगेतुलाद्रितुंगेsपि मुदा वसन्तम ।
तमर्जुनं मल्लिकापूर्वमेकं नमामि संसारसमुद्रसेतुम ।।२।।
द्वादश ज्योतिर्लिंगातील दुसरे स्थान म्हणजे श्रीशैल पर्वतावर असणारे श्री मल्लिकार्जुन क्षेत्र.
या स्थानाला दक्षिण कैलास असे देखील म्हणतात.
क्रौंच नावाच्या पर्वताजवळ असणाऱ्या राजधानीत राहणाऱ्या चंद्रगुप्त नावाच्या राजाला असणारी कन्या कोणत्यातरी संकटामुळे राजवाड्यातून पळून जाऊन जंगलात राहू लागली.
आसपासच्या गोपालक लोकांमध्ये राहणाऱ्या तिच्या आवडत्या कपिला गायीचे दूध कोणीतरी रोज काढतो असे तिला वाटले.
त्या गाईच्या मागावर असताना तिच्या एक अद्भुत गोष्ट लक्षात आली की ती गाय एका शिवलिंगापाशी जाऊन आपोआप दूध देते.
राजकन्येने त्या दिव्य शिवलिंगावर उभारलेली महान शिवस्थान म्हणजे श्री मल्लिकार्जुन.
येथे देवी पार्वती मल्लिका रूपामध्ये निवास करते.
संसार रुपी सागराला तारुण येणारा सेतू स्वरूप असणाऱ्या भगवंताला , त्यांच्या अत्यंत शुद्ध स्वच्छ वित्र अशा पांढर्याशुभ्र रंगामुळे अर्जुन असे म्हटले आहे.
मल्लिका रुपात राहणाऱ्या पार्वतीच्या सोबत राहणाऱ्या अशा अर्जुन भगवंताला येथे मल्लिकार्जुन रूपात पूजिले जाते.
आसपास आणिक लहान-सहान वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे असणारे हे स्थान.
त्यांचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
श्रीशैलश्रृंगे विबुधातिसंगेतुलाद्रितुंगेsपि मुदा वसन्तम ।
तमर्जुनं मल्लिकापूर्वमेकं नमामि संसारसमुद्रसेतुम ।
उत्तुंग असणाऱ्या शैल किंवा तुला नामक पर्वतावर, ऋषिमुनींसह आनंदाने निवास करणाऱ्या, संसार रुपी समुद्रातून तारुण येणाऱ्या सेतू प्रमाणे असणाऱ्या नावापूर्वी मल्लिका असणाऱ्या अर्जुनाला मी वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply