सानन्दमानन्दवने वसन्तम्
आनन्दकन्दं हतपापवृन्दम ।
वाराणसीनाथम्
अनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये ।।७।।
आनंदवन, आनंदकानन, अविमुक्त नगरी, तपस्थली, महास्मशान, मुक्तिधाम, रुद्रावास अशा अनेकानेक नावांनी हजारो संस्कृत ग्रंथांमध्ये गौरविलेला स्वर्गीय प्रांत म्हणजे वाराणसी काशी.
असी आणि वरुणा अशा दोन नद्यांच्या संगमावर ही नगरी वसली असल्यामुळे हिला वाराणसी असे म्हणतात.
आयुष्यात एकदा तरी तिचे दर्शन व्हावे आणि जमल्यास आयुष्याचा अंत तेथे व्हावा अशी इच्छा प्रत्येक भारतीय श्रद्धाळू मनात निवास करते ती नगरी म्हणजे काशी.
८८ घाट आणि सार्वजनिक स्वरूपातील तब्बल १६५४ मंदिरे हे काशीचे अद्वितीय वैशिष्ट्य.
शैव, वैष्णव, गाणपत्य, शाक्त, सौर या सगळ्याच पंथांना काशी परम वंदनीय आहे.
केवळ भगवान गणेशांचा विचार करायचा तरी काशीचे ५६ विनायक विश्वविख्यात आहेत.
“काशी के कंकर
सब शंकर ही शंकर”
अर्थात काशीतला प्रत्येक पाषाण भगवान शंकर स्वरुपच आहे. इतके या नगरीचे आणि भगवान शंकरांचे एकरूपत्व.
या नगरीमध्ये भगवान विश्वनाथ निवास करतात.
वर्णनाच्या सर्व मर्यादा गळून पडणाऱ्या या अद्वितीय स्थानाच्या वंदना साठी आचार्यश्री शब्द वापरतात,
सानन्दम्- सदैव आनंदस्वरूप असणारे आनंदवने वसन्तम् – आनंदवन अशा काशीनगरीत निवास करणारे.
आनन्दकन्दं- अंतर्बाह्य केवळ आणि केवळ आनंदाने भरगच्च असणारे. हतपापवृन्दम – सगळ्या पाप समुदायाचा विनाश करणारे.
वाराणसीनाथम्- वाराणसी नगरीचे नाथ असणाऱ्या,
अनाथनाथं – विश्वातील सकल अनाथांचे नात असणाऱ्या, श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये – श्री विश्वनाथांना मी शरण जातो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply