मानवी जीवन म्हणजे एक कोडेच म्हणावे लागेल. मानवी मनाचा थांग पत्ताच लागत नाही असे अनेकवेळा म्हटले जाते एव्हढेच नव्हे तर तशी प्रत्यक्ष प्रचिती देखील जीवन जगताना येते. मानवी मन हे गुणअवगुणांचा महासागर आहे. इथे चांगुलपणा आहे वाईटपणा देखील आहे. सद्गुण आहेत तसेच दुर्गुण आहेत , विवेक आहे तर अविवेकही आहे. प्रेम आहे तर तिरस्कार देखील आहे. सुख आहे दुःख आहे अशा अनेक भावनांची गुंतागुंत या मानवी जीवनात आहे. त्यात द्वेषभावना म्हणजे तिरस्काराची भावना देखील आपल्या जीवनात अनुभवास येते . याला इतिहास साक्ष आहे.
जगाचा इतिहास जर पाहिला तर सर्वत्र जशा चांगल्या घटना घडल्या आहेत तशा वाईट घटना घडल्या आहेत हे आपल्याला कळून चुकते. मानवी जीवन हे प्रेम , वात्सल्य , करुणा , आनंद , कृतज्ञता , अशा अनेक सुखद आणी सकारात्मक भावनांनी ओतप्रोत भरलेले आहे. तसेच मनुष्य सकारात्मक भावविचार सातत्याने करीत असल्यामूळे नकारात्मक भावविचार आपण स्वीकार करताना मनाने घाबरून जातो. अशा नकारात्मक विचारा पासून आपण आपल्यास काही गोष्टी न पटल्यामुळे किंवा न आवडल्यामुळे त्याचा आपण तिरस्कार करतो म्हणजे द्वेष करतो . तेंव्हा द्वेष देखील एक भावना आहे. एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसली तरी आपण अगदी नकळत त्याचा मनातून द्वेष करीत असतो तसेच समाजात ,कुटुंबात एखादी अन्यायकारक , मनाला न पटणारी गोस्ट समोर आली तरी नैतिक दृष्ट्या आपण त्याला विरोध करतो , तिरस्कार करतो , म्हणजेच द्वेष करतो तेंव्हा तो द्वेष हा सकारात्मक वैचारिक असतो. त्या द्वेषभावनेतून विधायक कार्य करण्याची मानसिकता प्रत्ययास येते.
मानवी मनातील वैचारिक , तात्त्विक भिन्नता जेंव्हा पराकोटीस जाते तेंव्हा त्यातून कलह निर्माण होतो आणि ही गोष्ट कौटुंबिक , सामाजिक अगदी वैयक्तिक स्तरावर आपल्याला जाणवते. त्या द्वेषभावनेतून निर्माण होणारा संघर्ष देखील आपण पहातो हे कटू सत्य दैनंदिन जीवनात आपल्या समोर येते देखील आणि त्यामुळे नात्यामधील विश्वास , प्रेम , सहिष्णुता याला तडे जातात आणि मग द्वेषभावना मनात रुजली जाते. आणि ती द्वेषभावना ( तिरस्कार ) जर मुक्तपणे , स्वैरपणे जर वाढत गेली , जोपासली गेली त्या द्वेषाची तीव्रता अधिक गंभीर होत जाते आणि कलह , संघर्षाला पुष्टी मिळते त्याला नकळत खतपाणी घातले जाते. त्यामुळे अशा द्वेषभावनेतून गुन्हा देखील करण्याच एक कारण निर्माण होत. असहिष्णुता निर्माण होते. आणि मानसिक भेदभावाची दरी मनात निर्माण होऊन असंतोष माजतो..आणि द्वेषास सुरुवात होते…
मी या धर्माचा , मी या पंथाचा मी या जातीचा , हे माझे , ते माझे , अशा भावनिक विचारांची मानसिकता सर्वत्र फोफावते मग संघर्ष सुरू होतो. आणि त्यातून भांडणे ,तंटे , हिंसा , तिटकारा , असूया , किळस , तिरस्कार , फसवणूक , विध्वंस , करणारी द्वेषप्रवृत्ती मनात रुजली जाते .
द्वेषाने केवळ द्वेष वाढतच जातो त्याला वेळीच आवर घातला नाही तर सारं जीवन ,सारा समाज , सारं कुटुंब उध्वस्त झाल्याशिवाय रहात नाही हे सत्य वास्तव आहे.
द्वेष करणारी व्यक्ती काही वेळ आपल्या स्वतःच्या कर्मठ आत्मविश्वासातून आपल्या वर्तनाने समाजाला वेठीस धरु शकेलही पण विवेकी प्रवृत्ती असणाऱ्या समाजाला व्यक्तीला ही द्वेषभावना रुचणार नाही .
द्वेषभावना मानवी मनाला स्वस्थ बसू देत नाही आणि मग ती अवस्था व्यक्तीला बेचैन करते मन:स्वास्थ्य हिरावून घेते त्यातून अनर्थ घडतो. परस्पर आदर संपुष्टात येतो.
म्हणून मानवाने आपले षड्रिपु आपल्या मनाच्या काबूत ठेवले पाहिजेत म्हणजे कुठलेही नैतिक अधःपतन होणार नाही याची सातर्कतेने काळजी घेतली पाहिजे .
कुणाचाही द्वेष करताना नेहमी परस्परांना समजून घेवून मानवतेचा विचार करून सुसंवाद साधावा त्यातून अपेक्षित मनःशांतीच लाभेल आणि द्वेष संपुष्टात येवून आणि *सहृदयी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित होतील. सर्वच धर्मग्रंथात मानवतेला महत्व दिले असून *जगतकल्याणाचा विचार मांडला आहे हे निर्विवाद सत्य आहे.
भारत देश हा संस्कार आणि संस्कृती प्रधान देश आहे . या भरतभूमीला देवभूमी समजले जाते. या पवित्र भूमीत प्रत्यक्षात देव जन्माला आलेले आहेत. पण ही द्वेषभावनां अगदी अनादीकालापासून रुजत आली आहे. रामायण , महाभारत अशा पौराणिक ग्रंथातून देखील दुष्टप्रवृत्तीचे , पराकोटीच्या द्वेषभावनेचे दृष्टांत , कथा आपल्याला वाचावयास मिळतात. अशा दुष्टप्रवृतींचा विनाश करण्यासाठी पृथ्वीवर भगवंताने अवतार घेतले आहेत याचा उल्लेख आहे.
हे सर्व पाहता , वाचता आपण सर्वांनी विवेकाने *द्वेष ( तिरस्कार ) या भावनेपासून मुक्त झाले पाहिजे आणि सर्वावर निर्मळ प्रेम करीत राहिले पाहिजे तीच मनःशांतीची गुरुकिल्ली आहे. आणि आपल्या मनांतरात सदैव वसुधैव कुटुंबकम ही कल्याणकारी भावना जपली पाहिजे.
इती लेखन सीमा……
वि.ग.सातपुते. पुणे
संस्थापक अध्यक्ष:- *महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे
( 9766544908 )
दिनांक :- 29 एप्रिल 2023 पुणे
Leave a Reply