माझा मामेभाऊ डॉ. प्रद्युम्न करंदीकर याच्यासाठी गझलचा कार्यक्रम केला. आयोजक आणि गायक महेश लिमयेबरोबर वसई येथे भक्तीसंगीताचा कार्यक्रम केला. ‘स्वर – मंच’च्या गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे झाला. मुंबई दूरदर्शनसाठीही एक कार्यक्रम केला. पण कार्यक्रमाचा वेग एकदम मंदावला होता. २०१३ वर्षअखेर कार्यक्रमांची संख्या मी फक्त ९६३ पर्यंत वाढवू शकलो.
कार्यक्रमाचा वेग मंदावण्याचे अजून एक कारण जानेवारी २०१४ मध्ये घडले. गेली काही वर्षे मी गाण्याचे कार्यक्रम स्वर – मंच म्युझिक अॅकॅडमी आणि गुंतवणूक क्षेत्रात व्यस्त झाल्यामुळे आमच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नव्हता. त्यामुळे कंपनीचे काम कमी झाले होते आणि काम करणाऱ्या माणसांचे पगार आणि इतर खर्च वाढला होता. १९७६ साली माझ्या वडिलांनी स्थापन केलेली मेसर्स ऑरनेट केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी त्यांच्या निधनानंतर म्हणजेच १९९९ सालानंतर बावीस वर्षे मी यशस्वीपणे चालवली होती. पण आता माझे कार्यक्षेत्र बदलले होते. त्यामुळे ही कंपनी विकून टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला. हे काम अजिबात सोपे नव्हते. तसेच बराच वेळ घेणारे होते.
जानेवारी २०१४ मध्ये याची प्रक्रिया आम्ही सुरू केली. माझी इतर कामे बाजूला ठेऊन मला यात लक्ष घालावे लागले. या कामात आमचे चार्टर्ड अकाउंटंट लक्ष्मीकांतजी काब्रा यांची मोलाची मदत झाली. जानेवारीमध्ये सुरू झालेली ही प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये संपली. थोडक्यात या वर्षाचे दहा महिने या कामी खर्च झाले. हे सर्व सुरू असताना काही कार्यक्रम माझ्या वाट्याला आले.
जानेवारीतच मुंबई होजिअरी असोसिएशनसाठी गझलचा कार्यक्रम केला. तसेच उपवन फेस्टिव्हलसाठी गझलचा कार्यक्रम केला. पी. सावळाराम गीतगायन स्पर्धेचे नाशिक आणि ठाणे येथे परीक्षण केले. याबद्दल पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला. भारत पेट्रोलियमसाठी एक कार्यक्रम केला. ‘मेटकॉन’ या संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या कॉन्फरन्समध्ये पंचतारांकित हॉटेल रिनसन्स, पवई येथे गझलचा कार्यक्रम केला. या मोठ्या कार्यक्रमाच्या आयोजनात माझे मित्र संजय पवार यांचा मोठा वाटा होता. २०१४ वर्षाअखेर मी ९८० कार्यक्रम पूर्ण केले. अनेक कार्यक्रम मोठ्या स्तरावरील होते. या वर्षात एक हजार कार्यक्रमांच्या दिशेने माझी वाटचाल सुरू होती. पण अत्यंत संथ गतीने.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply