नवीन लेखन...

एऽ जिंदगीऽ, गले लगाले

१९५६ सालातील गोष्ट आहे. हाॅलिवुडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड लीन, श्रीलंकेमध्ये ‘दी ब्रिज आॅन दी रिव्हर क्वाय’ या युद्धपटाचे चित्रीकरण करीत होते.. ते चित्रीकरण, एक सतरा वयाचा मुलगा उत्सुकतेने पहात होता. ती परदेशी चित्रीकरणाची भव्यता पाहून त्याला आपणही असंच मोठेपणी कॅमेरामन होऊन, चित्रीकरण करावं असं वाटू लागलं..

माध्यमिक शिक्षणानंतर त्याने लंडनमध्ये जाऊन पदवी घेतली व पुढे आपल्या आवडीचे शिक्षण घेण्यासाठी त्यानं पुणे गाठलं. पुण्यातील एफटीआयआय मध्ये त्यानं सिनेफोटोग्राफीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यामध्ये त्यानं आपलं कौशल्य पणाला लावून ‘गोल्ड मेडल’ मिळविले. त्या तरुणांचं नाव होतं, बालनाथन बेंजामीन महेंद्र उर्फ बालु महेंद्र!!

जर डेव्हिड लीन, चित्रीकरणासाठी श्रीलंकेत आलेच नसते तर भारतीय चित्रपटसृष्टी एका नामवंत सिनेफोटोग्राफर व कुशल दिग्दर्शकाला मुकली असती..

बालु महेंद्र यांनी १९७१ साली ‘नेल्लु’ या मल्याळम चित्रपटापासून कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटाला त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला! त्यानंतर त्यांनी कन्नड, तेलुगू, मल्याळम, हिंदी अशा विविध भाषांतील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण व दिग्दर्शन केले. पाचवेळा राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, नंदी पुरस्कार व भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळविणारे बालु महेंद्र, हे नामवंत व्यक्ती होते..

१९८२ साली त्यांनी ‘मुंद्रम पिराई’ हा चित्रपट, कमल हसन व श्रीदेवीला घेऊन केला. या चित्रपटाने उत्तम व्यवसाय केला. याच चित्रपटाचा १९८३ साली त्याच कलाकारांना घेऊन हिंदी मध्ये ‘सदमा’ नावाने बालु महेंद्र यांनी रिमेक केला..

या चित्रपटाची कथा त्यांनीच लिहिलेली होती. छायाचित्रण व दिग्दर्शनही त्यांचेच होते. सहाजिकच या चित्रपटाच्या कथेला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला..

‘सदमा’ म्हणजे आघात.. चित्रपटातील नायिकेला, एका अपघातामुळे स्मृतिभ्रंश होतो. ती लहान मुलीसारखी, बालीश वागू लागते. घरच्यांना ती ओळखत नाही. वडील तिला उपचारासाठी हाॅस्पिटलमध्ये ठेवतात. तिथून तिचं अपहरण होतं व तिला कुंटणखान्यात आणलं जातं. योगायोगाने तिथे नायक येतो व तिची किंमत मोजून, तिला घेऊन उटीला येतो. तो स्वतः एक शिक्षक असतो. नोकरी सांभाळून तो तिच्यावर जडीबुटीचे उपचार करत राहतो. तिच्या सहवासात, तो नकळत तिच्यावर प्रेम करु लागतो.. दरम्यान तिचे वडील वर्तमानपत्रात जाहिरात देऊन तिचा शोध घेत, तिथपर्यंत पोहोचतात. तो बाहेर गेलेला असताना, त्यांच्या घरी येऊन तिला घेऊन निघतात..

रेल्वे स्टेशनवर, बोगीत ती आपल्या आई-वडिलांसोबत बसलेली असताना, तिची गेलेली स्मृती परत आल्यामुळे ती नायकाला समोर पाहूनही ओळखू शकत नाही.. तो तिच्यासोबत केलेल्या माकडउड्या, कोलांटउड्या करुन दाखवतो.. मात्र नायिका त्याला एक गरीब समजून हातातील पुरीभाजी त्याच्या दिशेने भिरकावते.. नायक हताश होतो व रेल्वे निघून जाते…

नायिकेला झालेल्या अपघातामुळे तिच्या मनावर जो आघात होतो, त्यामुळे तिची स्मृती जाते व ती बालीश होते.. नायक तिला बरं करण्याचा ध्यास घेऊन तिच्यावर उपचार करतो.. मात्र ती बरी झाल्यावर त्याला ओळखू शकत नाही.. इथं नायकावर, मानसिक ‘आघात’ होतो..

या चित्रपटाच्या निमित्ताने गुलजार व इलैयाराजा पहिल्यांदाच एकत्र आले. त्या दोघांनी केलेली, सर्वच गाणी सर्वोत्कृष्ट ठरली. त्यातील ‘ए जिंदगी, गले लगाले..’ हे गाणं बालु महेंद्र यांनी असंख्य मोंटाजमध्ये चित्रीत केलेले आहे. येसुदासच्या तोंडी असलेले, अंगाई गीत अप्रतिम आहे.

बालु महेंद्र यांनी, चाळीस वर्षांची कारकीर्द केली. अनेक दिग्गज दिग्दर्शकांप्रमाणे, बालु महेंद्र यांनीही शेवटच्या कालावधीत केलेले चित्रपट फारसे चालले नाहीत. नवीन पिढीच्या आवडी निवडी बदललेल्या होत्या.. १३ फेब्रुवारी २०१४ साली त्यांनी आपल्या चित्रप्रवासाला पूर्णविराम दिला.

२० मे, हा त्यांचा स्मृतिदिन! त्यानिमित्ताने बालु महेंद्र यांना विनम्र अभिवादन!! त्यांच्या कारकिर्दीतील ‘सदमा’ला कोणताही चित्ररसिक, कदापिही विसरु शकणार नाही.. ‘ए जिंदगी, गले लगाले..’ म्हणत, तो त्या आठवणींना घट्ट कवटाळून ठेवेल…

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

२०-५-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..