चहाचे शास्त्रीय नाव कॅमेलिया सिनेन्सिस आहे. तसेच या वनस्पतीच्या पाने व पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून चहा हे पेय बनते.. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय बनते.
पाण्यानंतर हे जगातील लोकप्रिय पेय आहे असे मानले जाते. चहा या नावाचे मूळ चिनी भाषेत आहे. चिनी भाषांत चहाला छा म्हणतात. या नावावरून जगातील बहुतेक भाषांमध्ये चहा, छा, चा, चाय अशीच नावे असल्याचे दिसते. इंग्रजी व काही पश्चिम युरोपीय भाषांमध्ये दक्षिणेकडील चिनी भाषांमधल्या ते या नावाशी उच्चारसाधर्म्य असलेले टी हे नाव प्रचलित आहे. चहा आजही लोक आवडीने घेतात. कारण, चहा पिल्याने आपण ताजेतवाने होतो किंवा एक प्रकारचा आळस जातो असा देखील समज आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं, की चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो.
एकोणीशे चाळीस च्या दशका पर्यंत भारता मद्धे सकाळी चहा पिण्याची पद्धत नव्हती. त्याऐवजी लोक लिंबू पाणी प्यायचे. मित्रांना आमंत्रण देतानाही लिंबू पाणी पिण्यासाठी या असे असायचे.
नंतरच्या काळात ब्रिटिश लोकांनी दक्षिण भारत व ईशान्ये कडे डोंगरउतारावर चहाची लागवड सुरु केली. तो चहा खपवण्या साठी त्यांनी लोकांना चांगल्या प्रकारे प्रलोभन दाखवून भारतीयांना चहाची सवय लावली. आमच्या लहान पणी आठवडे बाजारात लिप्टनचा चहाची टांग्यामधून जाहिरात करणारे एजंट यायचे व लोकांना फुकट चहा पावडर वाटायचे. अशा प्रकारे लोकांना सवय लावून नंतर विक्री करायचे.
जगामद्धे नाही तरी भारतात चहाचे असंख्य प्रकार आहेत. त्यातील काही मुख्य प्रकार असे आहेत
१. बदाम पिस्ता चहा, २. बिरयानी चहा, ३. गुलाबी चहा, ४. ईराणी चहा, ०५. आसाम चहा ०६. दार्जिलिंग चहा ०७. निलगिरी चहा ०८. तंदुरी चहा. ०९. कहवा काश्मिरी चहा.१० चॉकलेट चहा ११. कोल्हापूर कडील बासुंदी चहा १२. इराण्यांचा मस्का बन टी १३. ब्रिटिश लोकांचा हाय टी (खारी व बेकरी पदार्था बरोबर)
अलीकडे कोविड महामारीत प्रसिद्धीस आलेले, मसाला टी, मालेगावचा काढा चहा, गवती चहाची पाने, तुळस वगैरे टाकून केलेला औषधी चहा, ग्रीन टी, ब्लॅक टी इत्यादी.
चहा तयार करण्याच्या पद्धती:
चहाच्या पत्तीमद्धे टॅनिन नावाचे रसायन असते. पत्ती उकळत्या पाण्यात टाकली कि त्यातील टॅनिन पाण्यामद्धे उतरते.त्याची चव तुरट-तिखट असते. या रसायनामुळे मेंदूला तरतरी येते व त्याची सवय लागते. ब्रिटिश लोक चहा कोरा बिनदुधाचा घेतात. पण भारतीय लोकांना दूध व पत्ती घालून केलेला चहा आवडतो.
चहाची चव हि पत्ती कितीवेळ उकळत्या पाण्यात आहे व त्यात किती प्रमाणात दूध घातले जाते यावर अवलंबून असते.काहींना कडक चहा आवडतो असा चहा उकळत्या पाण्यात बराच वेळ ठेवला जातो त्यामुळे त्यात ज्यास्त टॅनिन उतरते व चहा कडक बनतो.
चहापत्तीची गुणवत्ता देखील चांगला चहा बनवण्यास कारणीभूत असते. त्यामुळेच बाजारात चहापत्तीचे विविध ब्रँड उपलब्ध आहेत. जो तो आपल्या आवडीप्रमाणे चहापत्ती वापरतो. सर्वात महाग व उत्कृष्ट चहा हा दार्जिलिंगचा मानला जातो.
अनेकांना चहाशिवाय चैन पडत नाही. काही जण आळस घालवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी आवर्जून चहा पितात. तसंच बरेच जण दिवसाची सुरुवात चहाने करतात. विशेषतः विद्यार्थी वर्ग रात्री अभ्यास करताना हुशारी येण्यासाठी व झोप घालवण्या करता चहा घेतात. दिवसाची सुरुवात मनाजोग्या चहाने केली तर संपूर्ण दिवस चांगला जातो, असाही काहींचा समज असतो; मात्र हाच चहा सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं चहा बनवतो. त्यामुळे चहाची चवसुद्धा वेगवेगळी असते.
चहात केवळ चार गोष्टी वापरल्या जातात. प्रत्येक जण आवडीनुसार वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून चहा तयार करत असल्याने चव वेगवेगळी लागते. कोणी साखर वापरून, तर कोणी गुळाचा वापर करून चहा बनवतो. तसंच यामध्ये दूध टाकून किंवा बिनदुधाचाही चहा बनवला जातो.
आपल्या, तसंच मित्र किंवा नातेवाईकांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारे चहा बनवला जातो; पण चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती, तो कसा बनवायचा याची खास माहिती/ पद्धत सांगणार आहे. चहा विविध प्रकारे तयार केला जातो. प्रत्येकाची चहा बनवण्याची एक खास पद्धत असते. तसंच प्रत्येकाची चहा उकळण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. दूध किंवा दुधाशिवायही चहा बनविला जातो. बिनदुधाचा चहा आरोग्यास चांगला असतो; मात्र आपल्याकडे दुध घालून बनवलेला चहा सर्वांत जास्त प्रमाणात प्यायला जातो.
चहा बनविताना चुकीची पद्धत वापरणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे चहाची चव बिघडते. बरेच जण आधी दूध उकळून मग त्यामध्ये पाणी, चहा पावडर घालतात. ही चुकीची पद्धत आहे. यात बराच वेळ दूध उकळावं लागतं. गॅस जास्त लागतो. सर्वांत शेवटी चहा पावडर घालणंही चुकीचीच पद्धत आहे. चहा चांगला उकळावा लागतो. तसं केलं, तर कमी चहा पावडर वापरूनही चहाला चांगली चव आणि गंध मिळतो.
ब्रिटिश स्टँडर्ड इन्स्टिट्यूशनने (BSI) वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने चहा करण्याची पद्धत सांगितली आहे. चहाचे भांडे हे नेहमी स्टीलचे किंवा पितळेचे असावे. या पद्धतीत एका स्टील किंवा पितळी भांड्यामध्ये फक्त दूध उकळवावं. चमच्याने ते ढवळत राहावं. दुसऱ्या भांड्यात चहासाठी पाणी गरम करायला ठेवावं. पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण एकसमान असावं. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये चहा पावडर घालावी. चहा पावडर साखरेच्या प्रमाणापेक्षा थोडी कमी असावी. त्यानंतर चहाला चांगली उकळी येऊ द्यावी. साखर चवीनुसार घालावी. कांही लोक चहा पाण्यामध्ये न उकळवता मुरवत ठेवतात. त्यानंतर आवडीनुसार चहात आलं, लवंग, मिरपूड यांपैकी काही घालायचं असेल तर घालू शकता. चहात आले कुटून घालताना चहाचे तापमान थोडे कमी होऊ द्यावे नाहीतर दूध नासते. त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये उकळायला ठेवलेलं दूध चहामध्ये घालावं. त्यानंतर मात्र चहा जास्त वेळ उकळू किंवा मुरुवू नये.
अशी ही चहा बनवण्याची खास पद्धत आहे. विशेष म्हणजे जुन्या शहरांमध्ये बरीच वर्षं चहा विकणारे अमृततुल्य विक्रेतेसुद्धा चहा बनवण्यासाठी हीच पद्धत वापरतात. ही पद्धत तुम्हीही नक्की वापरून पाहा. ह्यात पण तुम्ही छोटा मोठा बदल करून तुम्हास आवडणाऱ्या चवीचा चहा बनवू शकता.
चहा हे पृथ्वीवरील अमृत समजले जाते व ते प्राशन करण्यासाठी एवढा सोहळा केलाच पाहिजे ना?
सध्या ह्या व्यवसायात उच्च शिक्षित तरुण पण उतरले आहेत. ते वेगवेगळे प्रयोग करून स्वतःचा चहाचा ब्रँड निर्माण करतात. त्यांचा व्यवसाय पण छान चालतो. जसे कि पुण्यात येवले टी ईत्यादी.
सावधानता : चहा हा पित्तकारक गुणधर्माचा आहे. त्यामुळे पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी जास्त चहा घेऊ नये. साधारण पणे दिवसातून २-३ कप चहा पुरेसा असतो.
— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
धन्यवाद ! बरीच नवी माहिती मिळाली. तिबेटमध्ये याकचे लोणी मिसळलेला कोरा चहा प्यायलो होतो, त्याची आठवण झाली.
I will try this method while preparing tea next time
I always put crushed ginger and owayachi pane !