नवीन लेखन...

खाद्य तेले – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Edible Oils from the Perspective of Ayurveda

खाद्य तेले

आहारात नियमित वापरासाठी कोणते तेल घ्यावे असा आजकाल सगळ्यांच्याच मनात संभ्रम असतो. मोठमोठ्या कंपन्या आकर्षक पॅकिंग करून बेसुमार जाहिराती करतात. त्यामुळे हा संभ्रम दिवसेंदिवस आणखीनच वाढत जात आहे. काही सुशिक्षित कुटुंबांमध्ये तर तेल म्हणजे जणू विषच अशी धारणा झालेली आढळते. तेलाने कोलेस्टेरॉल वाढते आणि हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊन हार्ट अटॅक येणारच अशी भीती मनात कुठेतरी बसलेली मंडळी आहेत. ह्या विषयावर प्रकाश टाकणार आहेच, परंतु त्यापूर्वी एका ओळीत सांगायचे तर “अति सर्वत्र वर्जयेत” हे वाक्य कायम ध्यानात ठेवावे. स्निग्धपदार्थ दोन प्रकारे आहारातून सेवन केली जातात. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष म्हणजे तूप तेल यांसारखे पदार्थ आणि अप्रत्यक्ष म्हणजे आहारातील इतर पदार्थांमधून जाणारा स्निग्धांश, जसे शेंगदाणे, चिक्की, लाडू इ.

ही भीती कोठून आली?

स्निग्ध पदार्थ हृदयाला घातक आहेत ही भीती पश्चिमी देशांकडून आपल्याकडे आली. ज्यांच्या आहारात फक्त आणि फक्त मांसाहारच असतो त्यांना ही भीती असणे साहजिक आहे. मांसाहारातून (रेड मीट) अप्रत्यक्षपणे अवाजवी प्रमाणात घातक स्निग्धांश शरीरात जातो आणि त्यामुळे अशांना “तेल – तूप खाऊ नका” हे आवर्जून सांगणे जरुरीचे आहे. शाकाहारी लोकांच्या आहारात फोडणीच्या स्वरूपात आणि अप्रत्यक्ष स्वरूपात स्निग्धांश सेवन केला जातो. त्यामुळे शाकाहारींनाही ही भीती बाळगायला हवी. प्रथिनांमध्ये आणि पिष्टमय पदार्थांमध्ये प्रत्येक ग्रॅममध्ये ४ तर स्निग्ध पदार्थांमध्ये ९ उष्मांक (कॅलरीज) असतात. म्हणून जास्त स्निग्ध पदार्थ सेवन करणाऱ्यांना व्यायामाच्या माध्यमातून त्या बर्न करणे अधिक जरुरीचे असते. तेल तूप पचायला तुलनेने अधिक जड असतात आणि शरीरातील मेदाशी ह्याचे साधर्म्य असते म्हणून ह्याने चरबी वाढते. प्रौढ पुरुषांना दर दिवशी सुमरे २५ ते ४० ग्रॅम स्निग्ध पदार्थांची गरज असते तर स्त्रियांना २० ते ३० ग्रॅम स्निग्ध पदार्थांची गरज असते.

आयुर्वेदानुसार घृत, तैल, वसा आणि मज्जा असे ४ प्रकारचे स्निग्ध पदार्थ असतात. ह्यापैकी गुणधर्मांच्या दृष्टीने घृत हे सर्वोत्तम, तेल हे त्यापेक्षा कमी, वसा त्याहून कमी आणि मज्जा सर्वात कनिष्ठ असल्याचे वर्णन आहे. ह्या ४ स्निग्ध पदार्थांपैकी तेल संपूर्णपणे वनस्पतीजन्य असून बाकीचे प्राणिज स्नेह आहेत. घृत (तूप) हे प्राण्यांच्या दुधातील स्निग्धांश वेगळा काढून तयार केले जाते आणि वसा आणि मज्जा प्रत्यक्ष प्राण्यांच्या शरीरातून काढली जाते. ह्यात ट्रान्स फॅट्स, धार्मिक विचारांच्या दृष्टीने ह्याचा वापर आपल्याकडे जास्त होत नाही. शिवाय पचनाच्या दृष्टीनेही वसा आणि मज्जा खूप जड आहेत. स्निग्ध पदार्थांमुळे खाद्यपदार्थाची चव सुधारते. भाजलेला पापड आणि तळलेला पापड, साधे वरण आणि फोडणीचे वरण किंवा साधी भाजलेली पोळी आणि तूप लावलेली पोळी अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील.

आधुनिक विज्ञान शाखेत स्निग्ध पदार्थांवर बरेच संशोधन झाले आहे. स्निग्ध पदार्थांचे विश्लेषण करून त्यातील सूक्ष्म घटकांचा अभ्यास आज आपल्याला उपलब्ध आहे. विविध खाद्य तेलांविषयी विचार करतांना पुफा, मुफा, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड असे अनेक शब्द आपल्या वाचण्यात आले असतील. त्याविषयी नेमकी व थोडक्यात माहीती आपल्याला असणे जरुरीचे आहे.

वनस्पतींमधून निर्माण केल्या जाणाऱ्या तेलांना टिकाऊपणा विशेष नसतो. अशा तेलांना लवकर खवट वास येऊ लागतो म्हणून आहारात वापरता येत नाहीत. त्यांना अधिक टिकाऊ व अधिक स्वादिष्ट करण्यासाठी हायड्रोजनेशन नावाची प्रक्रिया केली जाते. ही हायड्रोजनेशनची क्रिया अपूर्ण झाल्यास त्यांच्यामध्ये ट्रान्स फॅट्स तयार होतात. ह्या ट्रान्स फॅट्स रक्तातील एल. डी. एल. (स्वास्थ्यास घातक चरबी) वाढवितातव एच. डी. एल. (स्वास्थ्यवर्धक चरबी) कमी करतात. परिणामी हृदयाला रक्ताभिसरण करणाऱ्या धमन्या कडक होतात, कोलेस्टेरॉल वाढते व हृदयविकाराचा धोका वाढतो. म्हणून तेल खरेदी करतांना शक्यतो हायड्रोजनेटेड तेलाचा वापर करू नये. सरकारी नियमांनुसार तेलाच्या डब्यावर/ पाकिटावर हे छापणे बंधनकारक आहे.

स्निग्ध पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड असे दोन प्रकार आढळतात. २२ ते २५ डिग्री तापमानात गोठणारे सॅच्युरेटेड व ह्याच तापमानात द्रवावस्थेत राहणारे अनसॅच्युरेटेड असे ढोबळ मानाने समजावेत. सॅच्युरेटेड स्निग्धता असलेली तेल द्रव्य स्वास्थ्याच्या दृष्टीने घातक व अनसॅच्युरेटेड त्यामानाने चांगली असतात. संपूर्णपणे अनसॅच्युरेटेड स्निग्धता असलेली तेले असत नाहीत. त्यात किंचित प्रमाणात सॅच्युरेटेड स्निग्धता असतेच. पण हे प्रमाण नगण्य असावे एवढेच ध्यानात असावे.

अनसॅच्युरेटेड स्निग्धता ही पण दोन प्रकारांची असते. ह्यात मोनोअनसॅच्युरेटेड (MUFA) आणि पॉलिअनसॅच्युरेटेड (PUFA) असे दोन प्रकार आहेत. ओमेगा जातीचे वसाम्ले मोनोअनसॅच्युरेटेड (MUFA) मध्ये असतात व ही स्वास्थ्यासाठी अतिशय लाभदायक असतात. हृदय, मेंदू, सांधे, ज्ञानेंद्रियांची शक्ती उत्तम राखणे अशी गुणवत्ता त्यांमध्ये असते.

भारतीय आहारात मुख्यतः खालील तेलांचा वापर मुख्यत्वाने होतो. त्यातील घटकांमधील रसायनांचा तक्ता –

 

मराठी नाव इंग्रजी नाव सॅच्युरेटेड

स्निग्धांश

MUFA PUFA ओमेगा ३ ओमेगा ६
तीळ तेल Sesame oil १४ % ४३ % ४३ % ०.३ % ४१ %
भुईमूग तेल Peanut oil १८ % ४९ % ३२ % ० % ३१ %
पाम तेल Palm oil ५२ % ३८ % १० % ०.२ % ९.१ %
सोयाबीन तेल Soybean oil १५ % २४ % ६१ % ६.७ % ५० %
सुर्यफुल तेल Sunflower oil ११ % २० % ६९ % ० % ५६ %
सरकी तेल Cotton seed oil २४ % २६ % ५० % ०.२ % ५० %
खोबरेल तेल Coconut oil ९२ % ०६ % ०२ % ० % १.८ %
करडई तेल Safflower oil १० % १३ % ७७ % ० % ७४ %
ऑलिव्ह तेल Olive oil १४ % ७३ % ११ % ० % ० %
राईचे तेल Mustard oil १३ % ६० % २१ % ५.९ % १५ %
तांदूळ कोंड्याचे तेल Rice Bran oil २० % ७४ % ३३ % १.६ % ३३ %
मक्याचे तेल Corn oil १३ % २५ % ६२ % १.१ % ५३ %
जवसाचे तेल Flax Seed oil ११ % २१ % ६८ % ५३ % १३ %

तीळ तेल –

रिफाइंड आणि नॉन रिफाइण्ड असे तिळाचे तेल दोन प्रकारचे असते. सेंद्रिय, रिफाइण्ड न केलेले तिळाचे तेल आपल्या अन्नाला मोहक सुगंध देते. तीळ तेलात मोनो आणि पॉलीसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्‌स असतात. तसेच तीळ तेलात फॅटमध्ये विरघळणारे अँटीऑक्सिडन्ट्‌स् असतात जे फ्री रॅडिकल्सची निर्मिती रोखतात. या तेलामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचे गुण आहे. तीळ तेल चिंता करणार्‍यांसाठी तसेच आपल्या नसा (नर्व्ह) आणि हाडांच्या रोगांवर फायदेशीर आहे. ते रक्तप्रवाह सुरळीत करून रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. तसेच पचनाच्या समस्या जसे पोटातील वायू, बद्धकोष्ठता आणि पोटातील मुरडा यांवरही फायदेशीर ठरते. जे लोक तीळ तेल नियमितपणे वापरतात, ते ताण-तणावावर मात करू शकतात, मज्जासंस्थेला पोषक ठरते, थकवा कमी करते, रात्री झोप बरी येते आणि आयुष्य वाढवते. तीळ तेलाने कर्करोगापासून रक्षण होऊ शकते. त्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते वात आणि सांधेदुखीसाठीही उपयोगी आहे.

शेंगदाणा तेल :

यामध्ये जवळपास सगळ्या प्रकारच्या फॅट्‌स्‌चं उत्तम मिश्रण आहे. शेंगदाण्याच्या तेलात नैसर्गिक अँटीऑक्सिडन्ट्‌स असतात जे फ्री रॅडिकल्स (पेशीविघातक दोष) तयार होण्यापासून रोखतात आणि विविध प्रकारच्या कर्करोगांपासून रक्षण करतात. ते शरीरातले वाढलेले कोलेस्टेरॉल आणि वाईट कोलेस्टेरॉलचीही पातळी कमी करतात. चांगले कोलेस्टेरॉल म्हणजेच एचडीएल. हे कोलेस्टेरॉलची परत यकृताकडे पाठविते आणि अडथळ्यांपासून बचाव करते. वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे एलडीएल. हे कोलेस्टेरॉलचे वहन पेशींकडे आणि वाहिन्यांकडे करून वाहिन्यात अडथळे निर्माण होतात.

पाम तेल

जगात होणाऱ्या खाद्य तेलाच्या निर्मितीपैकी ४४ टक्के हिस्सा पाम तेलाचा आहे. ह्यात पाल्मेटिक अम्ल नावाचा घटक असतो. ह्यात ट्रान्स फॅट व सॅच्युरेटेड स्निग्धांशाचे प्रमाण मोठे आहे व हृदयाच्या रक्ताभिसरणासाठी योग्य नाही असे जागतिक आरोग्य संघटन संस्थेने प्रसिद्ध केले आहे.

सोयाबीन तेल

सोयाबीनच्या द्विदल बियांपासून सुमारे ५०% खाद्य तेल काढता येते. यात प्रथिनांचे प्रमाण उत्तम असते. रिफाइंड सोयाबीन तेलाचा खप शेंगदाण्याच्या तेलाच्या खालोखाल आहे. रक्तातील घातक स्निग्धांश व स्वस्थ्यकर स्निग्धांशांचा याने समतोल राखला जातो. प्रथिनांचे उत्तम स्रोत असल्याने शुद्ध शाकाहारी लोकांनी ह्याचा वापर जरूर करावा. सोयाबीनमधील अॅन्टिऑक्सिडंट घटक विशिष्ट कॅन्सर पेशींना आळा घालून त्यांची वाढ रोखतात असे संदर्भ मिळतात.

सनफ्लॉवर तेल –

या तेलामध्ये जीवनसत्त्व ‘ई’ जास्त आणि सॅच्युरेटेड फॅट कमी असते. हे तेल हृदयास हितकर आहे. हे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते कारण त्यात पॉलिसॅच्युरेटेड फॅट आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट योग्य प्रमाणात असते. यातील PUFA आणि MUFA जातीची स्निग्धाम्ले तीव्र उष्णता, प्रखर प्रकाश, हवेतील बाष्प अशा कारणांमुळे तेलाचे गुणधर्म नाश पावतात. म्हणून ह्याच्या निर्मिती प्रक्रियेत आणि साठविण्याच्या पद्धती नियंत्रित असणे जरुरीचे आहे.

सरकी तेल –

कपाशीच्या बियांना सरकी म्हणतात. यात फॉस्फरससुक्त संयुगे, स्टेरॉल, क्षार आणि अ, ब, ड व ई ही जीवनसत्त्वे आहेत. याशिवाय सरकीत अल्प प्रमाणात पण विशिष्ट गुणधर्मांचे घटक म्हणजे ‘गॉसिपॉल’ नावाचे संयुग आणि कच्च्या सरकी तेलाला गडद रंग देणारी रंगद्रव्ये असतात. पितळी भांड्यांवर ह्याची रासायनिक क्रिया होते म्हणून स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा. हृदय स्वास्थ्याच्या दृष्टीने हे चांगले आहेच शिवाय ई जीवनसत्वाचे प्रमाणही ह्यात चांगले आहे. गॉसिपॉल’ नामक विशिष्ट घटकामुळे स्त्री व पुरुष प्रजननक्षमता खालावते असे काही वैज्ञानिकांनी प्रसिद्ध केले आहे.

खोबरेल तेल –

खोबरेल तेलामध्ये सॅच्युरेटेड स्निग्धांशाचे सर्वात अधिक आहे. त्यानुसार हे खाण्यास अत्यंत घातक आहे असा निष्कर्ष निघतो. परंतु ह्यातील मीडियम चेन फॅटी अम्ल हृदयाला हितकार आहेत. ह्याच्या सेवनाने रक्तवाहिन्यांमधील घातक चरबी कमी होते. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच दोन बाजू तेलांनाही असतात. सॅच्युरेटेड स्निग्धांशाचे लाभही अनेक आहेत. मेंदूच्या जडणघडणीमध्ये सॅच्युरेटेड स्निग्धांशाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे अशा तेलांना पूर्णपणे वर्ज्य करून चालत नाही. अल्झेमर्स डिसीजमध्ये (वार्धक्यात होणारा स्मृतिभ्रंश) खोबरेल तेलाचा उपयोग अतिशय प्रशंसनीय आहे असे संशोधन नुकतेच झाले आहे.

करडई तेल (सॅफ्लॉवर) –

ह्या तेलात पॉलिअन्‌सॅच्युरेटेड फॅट भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये असे गुणधर्म असतात ज्यामुळे ते वजन कमी करण्यात मदत करते. तसेच ते पेशीचे आवरण मजबूत करण्यात मदत करत ज्यामुळे विषारी घटकांना प्रवेश करण्यास मज्जाव केला जातो ज्यामुळे मग रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे तेल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या रोगांपासून बचाव करते. हे तेल मधुमेहींनासुद्धा वापरायला सांगितले जाते कारण ते रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. तसेच स्त्रियांमध्ये पाळी येण्यापूर्वीची लक्षणे कमी करते.

ऑलिव्ह तेल

हे ऑलिव्ह ह्या फळापासुन बनवण्यात येणारे एक तेल आहे. भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेल्या देशांमध्ये ऑलिव्ह फळाचे उत्पादन होते. इटली, स्पेन व ग्रीस ह्या देशांमधील ऑलिव्ह तेल जगात सर्वोत्कृष्ट समजले जाते. ऑलिव्ह तेल आरोग्यकारी मानले जाते. रोजच्या अन्नात ऑलिव्ह तेलाचा वापर केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो हे सिद्ध झाले आहे. स्वयंपाकाव्यतिरिक्त ऑलिव्ह तेल बाह्यवापराकरिता देखील वापरले जाते (केसांना लावण्यासाठी, मसाज साठी, इत्यादी). तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये, औषधांमध्ये व इंधनासाठी ऑलिव्ह तेलाचा वापर केला जातो. या तेलाचा वापर तळणीसाठी केल्यास गुणधर्म नाश पावतात म्हणून कच्च्या स्वरूपात याचा वापर करणे अधिक योग्य आहे.

राईचे तेल –

हे खाद्यतेल मोहरीपासून बनविण्यात येते. स्वयंपाकात फोडणी करण्यास याचा वापर करतात, तसेच लोणच्यासाठीही याचा प्रामुख्याने वापर करतात. हे गुणांनी उष्ण असल्यामुळे जेथे जास्त हिवाळा असतो तेथे याचा वापर होतो. भारतात पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली कडे याचा वापर होतो. ह्यात MUFA चे प्रमाण उत्तम असल्याने ओमेगा ३ जातीचे मेदाम्ल प्रचुर प्रमाणात आहेत. हे प्रमाण एकंदरीत स्वास्थ्यासाठी चांगले आहे. मात्र याचा वास उग्र असतो. अन्य तेलांचा वापर करणाऱ्यांना रुचत नाही.

राईस ब्रान तेल –

या तेलात पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्‌स असतात आणि ट्रान्स फॅट नसतात. त्यात जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडन्ट्‌सही असतात. त्यामुळे ते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. याला सूक्ष्म असा वास असतो आणि धुराचा बिंदू जास्त असतो. त्यामुळे ते तळणासाठी व अन्न शिजवण्यासाठी व भाजण्यासाठीही वापरता येते.

मक्याचे तेल –

मक्याच्या अंकुरापासून तेल काढतात. याच्यात क्लोरेस्टेरॉलचे प्रमाण खूप कमी असल्याने हृदयरोगावरती उपयुक्त आहे. मक्याच्या अंकुरातून तेल काढल्यानंतर राहिलेल्या पेंडीपासून जनावरांचे खाद्य तयार केलं जात. तसाच कोरडया प्रक्रियेतून निघालेला कोंडा पशुखाद्यात वापरला जातो. ऑलिव्ह तेलाच्या तुलनेत हे तेल अधिक उष्णता सहन करते म्हणून तळणीसाठी हे अधिक योग्य आहे. मशीनद्वारे काढलेले मक्याचे तेल अधिक स्वास्थ्यकर आहे. आजकाल बाजारात हेक्झेन किंवा आयसोहेक्झेन या रसायनांचा वापर करून काढलेले तेल अधिक प्रमाणात मिळते. त्यातील रसायनांचा घातक परिणाम होण्याची शक्यता असते.

जवसाचे तेल –

जवसाच्या बिया (flaxseed किंवा linseed) अत्यंत आरोग्यदायी आहेत. यालाच अळशी असेही नाव आहे. आजकाल जवसाला खूप महत्त्व लाभले आहे. याचे प्रमुख कारण आहे जवसामध्ये असलेले ओमेगा-3 हे मेदाम्ल. आहारशास्त्रानुसार आपल्या आहारात ओमेगा-3 व ओमेगा-6 या दोन मेदाम्लांचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे. सामान्यतः ओमेगा-6 हे मेदाम्ल रोजच्या वापरातल्या तेलांमधून सहजपणे मिळत असते; परंतु ओमेगा-3 असलेले पदार्थ कमी आहेत. म्हणून हे मेदाम्ल शरीराला सहजासहजी मिळत नाही. तेलीय मासे, अक्रोड, मोहरी, मेथी, जवस या पदार्थांपासून आपल्याला ओमेगा-3 मिळू शकते. हे मेदाम्ल विशेषत्वाने हृदय व त्याच्या धमन्यांचे आरोग्य राखण्याचे काम करते. रक्तातील कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइड्‌स या घटकांचे प्रमाण ओमेगा-3 ने कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे उच्चरक्तदाब, संधीविकार, कर्करोग व स्थूलता यांपासून संरक्षण मिळते. ओमेगा-3 या मेदाम्लामुळे स्मरणशक्ती वाढते, डोकेदुखी, नैराश्‍य कमी होते. जवस हे रजोनिवृत्तीशी संबंधित तक्रारी कमी करते. रोज साधारणपणे ३० ग्रॅम जवस खाण्याने रजःनिवृतीपूर्वी होणारी डोकेदुखी, चिडचिडेपणा, शरीरातून गरम वाफा निघणे, हे त्रास कमी होतात. जवसाची चटणी किंवा जवसाचे तेल या स्वरूपात जवसाचा आहारात वापर करता येईल. जवसाच्या बिया बडीशेपेसारखे तव्यावर परतून खाव्यात. किंचित मीठ घालून मुखवास रूपाने खूप रुचकर लागतात. जवसाचे तेल शक्यतो तापवू नये, ते चटणीवर किंवा सॅलडवर घ्यावे. तापवल्याने याला विशिष्ट उग्र वास येतो.

सारांश:

खाद्य तेलांबद्दल एवढी माहीती वाचल्यावर “मी कोणते तेल वापरू” हा प्रश्न आपल्याला नक्कीच भेडसावणार आहे. म्हणून सारांशाने थोडक्यात महत्वाचे मुद्दे आता पाहूया –

१) लेबलवर “हायड्रोजनेटेड” शब्द दिसला तर असे तेल वापरू नये.

२) तळणीसाठी एकदा वापरलेले तेल परत वापरू नये. (निरांजनात वापरण्यास हरकत नाही)

३) “ट्रान्स फॅट्स” असलेले तेल वापरू नये.

४) मांसाहाराचे बंधन नसेल तर मधूनच फिश ऑईलचा आहारात वापर करावा.

५) सॅच्युरेटेड फॅट्‌सचे प्रमाण अधिक असलेले तेल टाळावे (याला खोबरेल तेल अपवाद आहे)

६) नॉन-रिफाइंड तेलांना नैसर्गिक गंध असतो व ती तेले अधिक पौष्टिक असतात. परंतु तुलनेने लवकर खवट होतात. तळणीसाठी अशा तेलांचा वापर शक्यतो करू नये.

७) रिफाइंड तेलांचा वापर तळणीसाठी अधिक योग्य असतो. रिफायनिंग प्रक्रियेत तेलामधील कित्येक स्वास्थ्यकर जीवनसत्व नाश पावतात. रिफाइंड तेल अधिक टिकाऊ असते, मात्र त्याला नैसर्गिक स्वाद फारच कमी असतो.

८) ज्याज्या ठिकाणी गायीचे तूप वापरता येईल त्यात्या ठिकाणी तेलाऐवजी अशा तुपाचा वापर करावा.

९) उपलब्ध असलेल्या सर्व तेलांचा वापर अदलून बदलून करावा. एकच एक तेल कधीही खाण्यास वापरू नये.

१०) आहारात कोणतेही तेल घ्या पण ‘४५ मिनिटे नियमित व्यायाम करणे’ हा नियम कधीही विसरू नका.

११) स्निग्ध पदार्थ म्हटल्यावर सर्वांच्या मनात “कोलेस्टेरॉलची” दहशत बसलेते. म्हणून ह्याबद्दल थोडी माहीती हवीच –

कोलेस्टेरॉलबद्दल ज्यांच्या मनात भीती आहे त्यांनी त्याचे फायदेही समजून घेतले पाहिजेत. कोलेस्टेरॉल हा यकृतात निर्माण होणारा एक घटक आहे. हा घटक सर्वस्वी वाईट असता तर निसर्गाने ह्याची निर्मिती केलीच नसती. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अति सर्वत्र वर्जयेत हा नियम येथेही लागू होतो. त्याचे संतुलन शरीराच्या गरजेपुरते असावे, अति वाढू नये ह्याची काळजी घ्यावी. शरीरात निर्माण होणाऱ्या कोलेस्टेरॉलशिवाय आपण आहारातून घेतलेले कोलेस्टेरॉल देहाचे स्वास्थ्य खालावत नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

  • ह्याने शरीरातील होर्मोन्सचे संतुलन राखले जाते.
  • इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरोन सारख्या प्रजननासाठी उपयुक्त असलेल्या होर्मोन्सची निर्मिती ह्यावर अवलंबून असते.
  • व्हिटॅमिन डीचे शोषण, हाडांचे पोषण, मज्जातंतूंचे पोषण, मांसाचे पोषण, इन्सुलिनची निर्मिती होऊन रोगप्रतिकारक्षमता सुधारते
  • यकृतातील पित्तामध्ये आवश्यकतेनुसार स्निग्धपणा ह्याने राखला जातो व पचन सुस्थितीत राहते
  • उत्तम पेशीरक्षक (अॅन्टिऑक्सिडंट) गुण असल्याने पेशीविघातक परमाणुंपासून शारीरिक धातूंचे संरक्षण होते.
  • मेंदूचे कार्य निर्विघ्नपणे होण्यासाठी व त्यातील सिरोटोनिनचे संतुलन राखण्यासाठी ह्यचा मोलाचा वाटा आहे.
  • मातेच्या सुवातीच्या दुधात ह्याचे प्रमाण मुबलक असते म्हणूनच बालकाचे सर्वांगीण पोषण व रोगप्रतिकारक्षमता होण्यास ह्याने हातभार लागतो
  • आतड्यांची पुरस्सरण गती आणि शक्ती ह्याने चांगली राहते
  • शरीरातील जवळजवळ सर्वच पेशींची जडणघडण ह्याने होते. रक्ताभिसरण योग्य राहण्यासाठी ह्याने मदत होते. ज्यांचे कोलेस्टेरॉल वाढलेले आहे अशा स्त्रियांचे सरासरी आयुर्मान जास्त असल्याचे न्युयॉर्कवासी डॉ. मेयर टेक्सन यांनी अभ्यासांती प्रसिद्ध केले.

 

डॉ. संतोष जळूकर, मुंबई

drjalukar@akshaypharma.com

+917208777773

 

 

 

 

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 33 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

2 Comments on खाद्य तेले – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..