जसा ईसीजी हृदयाचे आरोग्य सांगतो, तसेच इलेक्ट्रोएनसेफलोग्राफ हा मेंदूचे आरोग्य कसे आहे हे सांगतो. मेंदूतील विद्युत प्रक्रियेची नोंद करणाऱ्या यंत्राला इलेक्ट्रोएनसेफलोग्राफ असे म्हणतात. मेंदूविषयक रोगांच्या निदानासाठी त्याचा उपयोग होतो. मेंदूला गाठ, पक्षाघात अशा आजारात प्राथमिक निदानासाठी ईईजी वापरला जातो. पण आता एमआरआय (मॅग्नेटिक झोनन्स इमेजिंग) व सिटीस्कॅनमुळे ईईजीचा वापर तुलनेने कमी केला जातो.
मानवी मेंदूत अब्जावधी न्युरॉन्स असतात. ते विद्युतभारित असतात. त्यामुळे आयनांचा एक प्रवाहच व्हॉल्युम कंडक्शन प्रक्रियेमुळे मेंदूच्या कवटीपर्यंत पोहोचत असतो. जेव्हा डोक्याला इलेक्ट्रोड लावतात तेव्हा हा आयनांचा प्रवाह इलेक्ट्रोडमधील धातूच्या इलेक्ट्रॉन्सना ढकलतात. त्यावेळी दोन इलेक्ट्रोडमधील व्होलटेजमध्ये असलेला फरक व्होल्टमीटरने मोजला जातो.
ईईजी काढताना रुग्णाला पाठीवर झोपवतात व त्याच्या डोक्याच्या बाहेरच्या भागाला १६ ते २५ इलेक्ट्रोड लावले जातात. या इलेक्ट्रोडचे आउटपुट हे संगणकाच्या पडद्यावर दिसते किंवा सरकत्या आलेख कागदावर रेषांच्या स्वरुपातील आलेख निघतो. ईईजी काढताना काही वेळा रुग्णाला श्वसन किंवा प्रखर दिव्यांकडे पाहणे अशा कृती करायला सांगितले जाते. संगणकावर तर मेंदूतील विद्युतीय घडामोढींचे भौमितिक चित्रच तयार केले जाते. या सगळ्या प्रक्रियेला अर्धा तास लागतो.
मेंदूचा असा आलेख काढता येत असला तरी असंख्य न्यूरॉन्सच्या क्रियाशीलतेमुळे तयार झालेल्या विद्युतीय परिणामाचेच ते प्रतिबिंब असते. कारण केवळ एका न्यूरॉनने निर्माण केलेला विद्युत संदेश हा अगदी क्षीण असतो. मेंदूच्या ईईजीमध्ये आपल्याला डेल्टा, बिटा, अल्फा, बिटा, गॅमा, म्यू अशा लहरी दिसतात. माणसाचा मेंदू जेव्हा पूर्ण कार्यरत असतो तेव्हा तो १० वॉटइतकी विद्युत ऊर्जा बाहेर टाकीत असतो.
ईईजी यंत्राचा शोध लावण्याचे श्रेय जर्मनीच्या जेना विद्यापीठातील न्यूरोसायकिआट्रिस्ट हॅन्स बर्गर यांना जाते. त्यांनी १९२९ मध्ये ईईजी यंत्र तयार केले. झोप, भूल, फेफरे अशा वेगवेगळ्या अवस्थांत मेंदूतील विद्युत संदेश वेगळे असतात, असे बर्गर यांनी सांगितले. त्यातून न्यूरोफिजीओलॉजी ही नवीन वैद्यकशास्त्र उदयास आली. मेंदूतील गाठ शोधण्यास हे तंत्र वापरता येऊ शकते.
हे १९३६ मध्ये डब्ल्यू ग्रे वॉल्टर यांनी सांगितले व १९५७ मध्ये त्यांनी टोपोस्कोप नावाचे यंत्र तयार केले. त्याच्या मदतीने तर मेंदूचा विद्युत नकाशाच तयार करता येऊ लागला. ईईजी यंत्रे किफायतशीर व आटोपशीर बनवणे आवश्यक आहे.
संदर्भ : मराठी विज्ञान परिषदेच्या सौजन्याने – ‘कुतुहल’ या सदरामधील लेख – राजेंद्र येवलेकर.
Leave a Reply