या नंतर मात्र पुढील महिन्यात मी एकही कार्यक्रम घेतला नव्हता. माझा सख्खा चुलत भाऊ प्रकाश याचे लग्न १ डिसेंबर १९९१ ला ठरले होते. त्यामुळे जोशी परिवारात प्रचंड धावपळ सुरू होती. लग्न भिवंडीला होते आणि दोनच दिवसांनी मोठ्या स्वागत समारंभाचे आयोजन पुण्याला करण्यात आले होते. दिवस गडबडीत जात होते. लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे ३० नोव्हेंबरलाच आम्ही सर्वजण भिवंडीला रवाना झालो. माझ्या मामाकडेच आम्ही उतरलो होतो. १ डिसेंबरचा दिवस लग्नाच्या धामधुमीतच संपला. संध्याकाळी मी आणि माझी पत्नी प्रियांका स्वागत समारंभाच्या आयोजनात मदत करण्यासाठी काकाबरोबर पुण्याला निघालो. धावपळीने थकून गेल्यामुळे आई आणि भाऊ मात्र एक दिवस विश्रांती घेऊन मगच पुण्याला येणार होते. त्यामुळे ते ठाण्याला परत गेले. १ डिसेंबरला रात्री एक वाजता आम्ही पुण्याला पोहोचलो. हास्य, विनोद, चेष्टा, मस्करी सतत सुरू होती. त्यानंतर गप्पा रंगल्या. शेवटी रात्री अडीच वाजता निजानीज झाली. बरोबर पहाटे सव्वाचार वाजता पुण्याला फोन आला. भाऊंना हार्टअॅटॅक आला होता आणि त्यांना हॉस्पिटलला नेण्यात येणार होते. मी आणि प्रियांका तातडीने ठाण्याला परत निघालो. माझा धाकटा चुलतभाऊ प्रमोद त्याची इंजिनियरींगची परीक्षा सोडून आमच्याबरोबर निघाला. सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. पुण्याहून निघण्यापूर्वीच माझ्या सासऱ्यांचा फोन आला. ते डॉक्टर होते. त्यांनी जे सांगितले ते माझ्यावर विलक्षण आघात करणारे होते. हॉस्पिटलमध्ये नेतानाच भाऊंची जीवनयात्रा संपली होती. फक्त ठाण्याला येईपर्यंत प्रियांकाला आणि इतर कुणालाच हे सांगू नका, अशी त्यांनी विनंती केली. गाडीमध्ये प्रियांका आणि प्रमोद मला समजावत होते की, आपण लवकरच ठाण्याला पोहोचू आणि भाऊही लवकरच ठीक होतील. मी काय बोलणार? मला नशीबाने एकदम पोरके करून टाकले होते. कायम त्यांच्याबरोबरच रहाणारे आम्ही भाऊ गेले त्या रात्री नेमके त्यांच्यासोबत नव्हतो. १ डिसेंबर १९९१ ला आमच्या घरचे लग्न आणि मग २ डिसेंबर १९९१ हा माझ्या आयुष्याला धक्का देणारा दिवस ठरला.स्मशानात जमलेल्या तमाम लोकांसमवेत आम्हां सर्वांना माझे भाऊ निरोप देत होते. त्यांचे असे अचानक निघून जाणे आम्हा सर्वांनाच अत्यंत धक्कादायक होते. मला ते नेहमी सांगत, “आज मी उभा असल्यामुळे माझ्या सावलीत तुला सगळे कसं छान छान दिसतेय. पण एके दिवशी मी नसेन आणि मग तुला सगळं कसं स्वच्छ-स्वच्छं, खरं-खरं दिसायला लागेल.” आज तो दिवस आला होता. या एका दिवसाने सारे बदलले. आमचे घर बदलले. माझी आई बदलली. व्यवसाय बदलला. सर्वात लहान प्रियांका एकदम मोठी, कर्ती झाली. भाऊंच्या सावलीत खेळणारे, बागडणारे माझे व्यक्तिमत्त्व, माझे गाणे, माझे बोलणे एकदम प्रौढ झाले.
भाऊ असताना अनेक सामाजिक संस्थांमध्ये भाऊंशी वादावादी करणारे लोक, भाऊ किती मोठे होते, ते मला सांगायला लागले. भाऊंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये अडचणी आणणारे लोक त्यांचा स्मृतिदिन साजरा करण्यासाठी आग्रह धरू लागले. भाऊंनी सांगितलेली एक एक गोष्ट आता मला पटायला लागली. ते अनेकदा म्हणत, “आज तुला कदाचित माझे बोलणे पटणार नाही, पण काही वर्षांनी तुला ते नक्कीच पटेल. फरक इतकाच असेल की, ज्या दिवशी तुला ते पटेल आणि तू मला सांगायला येशील, तेव्हा ते ऐकायला मी नसेन.”
भाऊंनी मला काय दिले? या जगात स्वतःच्या हिंमतीवर उभे राहण्याचा आत्मविश्वास दिला. एक भक्कम असा पाया दिला. त्यांनी केलेल्या अनेक सामाजिक कामांमधून जोडलेल्या माणसांचा मदतीचा हात दिला. त्यांचा मी एकुलता एक मुलगा असलो, तरी आई-भाऊंनी माझ्या मागे एक जिवलगांचा प्रचंड परिवार उभा केला. त्यामुळे मला कधीच एकटे वाटले नाही. आज परत भेटले तर भाऊ मला काय सांगतील? सुरेश भटांच्या गझलचा एक शेर ऐकवतील,
काय सांगावे तुला मी, काय मी बोलू तुझ्याशी,
राख मी झाल्यावरी, गीते तुला माझी स्मरावी…
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply