नवीन लेखन...

एक आनंददायी भेट-सांताचं गाव!

“आज्जी, मला झोप येत नाहिये. गाणं म्हण ना!”

“नाही नाही… गाणं नको! तू आपली गोष्टच सांग मला!”

शाल्वलीचे एका मागोमाग पर्याय सांगणं चालूच होतं! तिचा रात्री ११ वाजता सुद्धा ताजातवाना असलेला आवाज एरवी कितीही छान वाटत असला तरी आत्ता तिला झोपविण्यासाठी काहीतरी करणे मला भागच होते. भसाड्या आवाजामुळे नातीला अंगाईगीत म्हणून झोपविणे तर मला शक्य नव्हते, पण गोष्टी सांगणे सहज शक्य होते. डिसेंबरचा महिना असल्याने सांताक्लॉजच्या गोष्टी मला सहज पुरत. त्यातलीच एक मी शाल्वलीला-माझ्या नातीला सांगत होते. ती पेंगुळलीय असे मला वाटले म्हणून मी गोष्ट संपण्याच्या मार्गावर आणणार तोच “आज्जी, सांग ना, तू खरंच सांताक्लॉजला भेटली आहेस?” या शाल्वलीच्या प्रश्नामुळे मी एकदम फिनलंडमध्ये पोहोचले.

लहानपणापासून सांताक्लॉजच्या गोष्टी ऐकल्या होत्या, पण सांगलीसारख्या गावात आमच्या अवतीभवती त्याचा वावर फारसा नव्हता. आम्ही लहान असताना शाळेला ख्रिसमसच्या सुट्ट्याही नसायच्या. त्यामुळे सांताक्लॉज, त्याच्या गोष्टी या शाळेतल्या वाचनालयातून मिळणाऱ्या पुस्तकातूनच वाचलेल्या. मुंबईत त्याची दूरून ओळख झाली खरी पण सिंगापूरला गेल्यावर तिथल्या संस्कृतीमुळे, तो एकदम जवळ आला. “एका रात्रीत जगभर खेळणी वाटत फिरणारा सांताक्लॉज” म्हणून त्याची नव्याने ओळख झाली. यातील खरेपणा किंवा कुतुहल वाटण्याचं वय राहिलं नसलं तरी दरवर्षी ख्रिसमसच्या गाजावाजामुळे मनात कुठेतरी या व्यक्तिमत्त्वाबद्दलचं कुतुहल घर करून होतं. आमच्या ‘दरवर्षी एक परदेश’ या कार्यक्रमात एका वर्षी स्कँडेनेव्हियाची सफर आली अन् अचानक ‘सांताच्या’ गावाला जाण्याची संधी समोर आली. सिंगापूरहून जर्मनी मार्गे फिनलंड ची राजधानी हेलसिंकी, व तिथून विमान बदलून रोवानिएमी या गावी आम्ही पोहोचलो. तिथून आमची टूर सुरू होणार होती. आमचे सगळे सहप्रवासीही जगभरातून कुठून कुठून येऊन आम्हाला तिथेच भेटणार होते.

हेलसिंकीहून रोवानिएमीला जाण्यासाठी आम्ही फिन एअरचे विमान पकडले. विमान वर चढताच खाली धरित्रीने अलगद ढगांची चादर पांघरून घेतली. तरीपण खोडकर मुलाप्रमाणे अनेक छोटी मोठी गावं ढगांच्या चादरीच्या छोट्या छोट्या भोकातून आम्हाला दर्शन देत होती. याप्रवासात ढगांच्या विविध रंगछटा पाहायला मिळाल्या आणि विविध आकार सुद्धा. सकाळची वेळ होती. आमचे छोटेसे विमान वाऱ्याच्या झोतावर थोडेथोडेसे हेलकावे खात होते. नुकताच नाश्ता झाला होता आणि रात्रभराचा प्रवासाचा थकवा होता त्यामुळे नाही म्हटले तरी डोळ्यांवर मधून मधून निद्रादेवी आपली मायेची पाखर घालत होती. मीही याला अपवाद नव्हतेच. डोळे मिटून घेण्याअगोदर ढगांना ‘गुड नाईट’ करण्यासाठी खिडकीकडे नजर टाकली. तर खिडकीतून खाली एक अगदी अनोखे दृश्य अनपेक्षितपणे दिसले. स्वच्छ पांढऱ्या ढगांवर संपूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य!! त्याचे सातही रंग अतिशय सुस्पष्ट दिसत होते. अगदी करकटक ठेऊन काढावा तसा इंद्रधनुष्याचा आखीव रेखीव गोल नजर खिळवून ठेवत होता. बराच वेळ ते इंद्रधनुष्य आमच्या बरोबर पुढेपुढे जात होते. कधीकधी ढगांच्या छोट्या भोकातून खालची गावेही त्या गोलात येत होती. विमानाशेजारून विमानाची छोटीशी सावलीही चालली होती. विमानाच्या गतीशी जुळवून घेताना कधी ती खालच्या ढगांवर स्वार होत होती तर कधी ठेचकाळून उडी मारत होती. बराच वेळ अशी विमानाबरोबर पळापळ केल्यावर सावली दमली. इकडे इंद्रधनुष्याचाही विमानाजवळ येण्याचा वेग वाढला व ते इतके जवळ आले की बघता बघता विमानाची छोटीशी सावली इंद्रधनुष्याच्या गोलाच्या मधोमध दिसू लागली. थोडावेळ ही गंमत दिसली. सावली व इंद्रधनुष्याचा खेळ बघता बघता वेळ कसा गेला कळलेच नाही. रोवानिएमी जवळ आले तशी विमानाचीही उतरण्याची तयारी सुरू झाली. जसे विमान ढगांच्याजवळ यायला लागले तशी सावली मोठी मोठी व्हायला लागली आणि इंद्रधनुष्यात मावेनाशी झाली. सावलीला सामावून घेण्यासाठी तेही मोठेमोठे होत गेले तसे त्याचे रंग फिकूटायला लागले. पहातापहाता विमान ढगांचा पडदा फाडून रोवानिएमी कडे झेपावले आणि आम्ही भानावर आलो.

रोवानिएमी हे अगदी छोटेसे पण टुमदार गाव. पर्यटन हाच मुख्य व्यवसाय. पण आर्क्टिक सर्कल वरचे पहिलेच गाव म्हणून महत्वाचे. वर्षातले काही दिवसतरी २४ तास सूर्य बघणारे गाव. हातातले घड्याळ रात्रीचे ९ वाजल्याचे सांगत होते म्हणून रात्र झालीय असे समजायचे. बाकी संध्याकाळच्या ५-६ वाजता अस्तो तेवढा लख्ख उजेड. उद्या आम्ही इथे आमची पहिलीच सामी व्हीलेजची टूर करणार होतो. गाव पहाण्याची उत्सुकता होती पण थकलेले शरीर आम्हाला हॉटेलवर घेऊन गेलेच. सूर्याच्या उजेडात कशीकाय झोप लागेल कोणजाणे असे म्हणत सगळे अंथरूणावर पडताच ढाराढूर झोपलो.

सकाळी तिथल्या किमी नदीच्या काठी जायला निघालो ते सामी व्हीलेजला जाण्यासाठी. आमचा वाटाड्या रोवानिएमीची माहिती सांगत होता, महत्वाची ठिकाणे दाखवत होता. किमी नावाची निळ्याशार पाण्याची नदी स्वच्छ सूर्यप्रकाशात न्हाऊन निघाली होती. आमची नाव काठावर आमची वाट पहात होती. स्वच्छ स्फटिकासारखे पाणी आमची नाव पुढे ढकलत मागे मागे जात होते. त्याच्या फेसात हात बुडवण्याचा मोह आवरत नव्हता. पण ‘जर ते पाणी तोंडात गेले तर पुढचा सगळा मुक्काम इस्पितळात नक्की इतके ते नवीन माणसाला पचायला जड आहे.” हे वाटाड्याकडून ऐकल्यावर हात आपोआपच खिशात गेले. फक्त आसपासचा भाग पहात व या नदीचे पाणी केसांच्या वाढीसाठी किती उत्तम आहे हे ऐकत, बाजूचे निसर्ग सौंदर्य पहात १ तासाने सामी व्हिलेजच्याजवळ आम्ही पोहोचलो. तिथे उतरलो तर आश्चर्यचकितच झालो.गावात जाणारी लाकडी पायवाट सोडली तर आजुबाजूला काहीच दिसलं नाही. नावेचा मुक्काम चुकला की काय असे वाटतय तोच एक सामी माणूस त्या पायवाटेवरून पुढे आला. आमचे स्वागत करून त्याच्या अगम्य भाषेत बडबड करत आमची वरात त्याने त्या शेतातून जाणाऱ्या १ फूट उंचीच्या वाटेवरून चालवली. तो अखंड बडबडत होता पण एक शब्द कळेल तर शपथ.

आम्हाला कुठे नेत होता तोच जाणे. याच भाषेत जर सामी लोकांच्याविषयी माहिती मिळणार असेल तर उगीचच वेळ फुकट घालवायचा का असाही विचार मनात डोकावला. फक्त इथे सामी व्हिलेजला भेट दिल्याचे व आर्क्टिकरेषा ओलांडल्याचे सर्टिफिकेट मिळणार होते हाच काय तो फायद्याचा मुद्दा आम्हाला पुढे नेत होता. आमची वरात त्या पायवाटेवरच्या दुसऱ्या टोकाला पोहोचली तर तिथे एकदम वेगळेच दृश्य बघायला मिळाले. एक गोलाकार भल्यामोठ्या घरासारखी झोपडी, तिच्याभोवती आणखी ३-४ छोट्या छोट्या झोपड्या, आर्क्टिकरेषा काढलेला बोर्ड, आणि रेनडियरच्या पाठीवर हात ठेऊन उभ्या असणाऱ्या अप्सरेसारख्या २ सुंदर मुली. वेशभूषा सामी पद्धतीची होती. ते पाहून तर आता अगम्य भाषेतलाच सगळा व्यवहार असणार याची खात्रीच झाली. माहिती कळाली नाही तर निदान रेनडियरचे फोटो तरी काढू म्हणून आम्ही पुढे सरकणार तोच स्वच्छ स्पष्ट इंग्रजीत त्या दोघींच्याकडून आमचे स्वागत झाले व आम्हाला सुखद धक्का बसला. मग काय, आम्हाला न्यायला आलेला तो माणूसही हसतहसत पुढे आला. त्याने आम्हाला मोठ्या झोपडीत नेऊन शुद्ध इंग्रजीत सामी लोकांच्या जीवनपद्धतीची माहिती देणे, त्यांच्या टोप्या घालून आमचे फोटो काढणे, रेनडियरबरोबर फोटो काढणे, त्या सुंदर मुलींबरोबर फोटो वगैरे सर्व उपचार यथासांग पार पाडले. शेवटी आम्हाला सर्टिफिकेट देऊन आमची रवानगी केली. (रेनडियरचे दूध फक्त पुरुषांनाच प्यायला मिळाले हा अन्याय बराच वेळ मनात डाचत होता.)

फिनलंडमधील रोवानिएमी या आर्क्टिक सर्कलवरील गावापासून ८ कि.मी. वर सांताव्हिलेज आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेला ६६०३२°३९° अक्षांशावर आर्क्टिक ही काल्पनिक रेषा आजपर्यंत फक्त नकाशावर पाहिली होती. (परीक्षेत मिळणारा एक मार्क इतकेच त्याचे तेंव्हा महत्व) ती प्रत्यक्षात पायाखाली आल्यावर थ्रिल तर वाटलंच पण लहानपणच्या अनेक कल्पना किती हास्यास्पद होत्या त्याचीही गंमत वाटून गेली. रोवानिएमीला मुक्काम व रात्रभर (न मावळलेल्या) सूर्याचे निरीक्षण करून आम्ही पुढे निघालो. बसचा प्रवास मला मनापासून आवडतो. खिडकीबाहेरची धावती दुनिया आपल्याला खूप काही वैविध्य दाखवत असते. एखाद्या सुस्तावलेल्या अजगराप्रमाणे काळाभोर रस्ता दूरपर्यंत दिसत होता. दोन्ही बाजूंनी देवदाराचे वृक्ष होते. रस्त्याच्या अगदी कडेला छोटी छोटी झुडुपे आपली वेषभूषा, फुलांच्या पाकळ्या पूर्ण उलगडून करत होती. चढ-उतार भरपूर होते. ठिकठिकाणी “रस्त्यावर रेनडियर फिरत असतील, चालकांनी योग्य काळजी घ्यावी.” अशा तऱ्हेच्या पाट्या होत्या. त्या पाट्यांची मला खूपच गंमत वाटली. रेनडियर असे रस्त्याच्या अधेमधे कशाला येतील(मरायला) असा विचार मनात येत होता तोच बस कचकन ब्रेक दाबून थांबली. दचकून समोर बघतो तो काय! शे-दीडशे रेनडियर ‘रास्ता रोको’ च्या पवित्र्यात उभे! झालं! बसचा मुक्काम तिथेच! ड्रायव्हर साहेब हॉर्नसुद्धा न वाजवता बस बंद करून स्वस्थ बसलेले पाहिले आणि आम्हीही त्यांच्या परवानगीने खाली उतरलो. रस्त्यात दोन्ही बाजूंना, समोर रस्त्यावर सगळीकडे रेनडियरच रेनडियर. तास-दीडतास त्यांना भेटून व भरपूर फोटो काढून त्यांची समजूत काढली तेंव्हा कुठे पुढे जाण्याची परवानगी मिळाली. अन खरोखरच रस्ते मोकळे व गुळगुळीत असूनही वाहने काळजीपूर्वक व सावकाश का चालवली जात होती याचे रहस्य कळाले. स्वच्छ सूर्यप्रकाश व सकाळची वेळ असूनही सर्व वाहनांचे दिवे चालू होते. (तसा नियमच आहे म्हणे.) रेनडियर त्यांना हवे तसे वागतील, रस्ता व सगळा परिसर त्यांच्यासाठी आधी व मग इतरांसाठी हा नियम इथे काटेकोरपणे पाळला जातो. नशीब त्या वेळी आम्ही बोगद्यात नव्हतो. नाहीतर बसमध्येच बसून रहावे लागले असते. हे सगळं पहाताना ८ कि.मी. चा रस्ता भुर्रकन मागे पडला.

अचानक समोर “सांता व्हिलेज” ही पाटी दिसली आणि सर्व प्रवाशांमधे एकदम चैतन्य संचारले. सांताक्लॉज ही व्यक्ति जगभरात सर्वांनाच परिचित आहे. त्याच्याबद्दलच्या खऱ्या-खोट्या गोष्टी लहानपणापासून ऐकून त्याच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाबद्दल, कर्तृत्वाबद्दल सर्वांना खूपच कुतूहल वाटते. अशी जगप्रसिद्ध ‘सेलेब्रिटी’ सहजासहजी भेटेल किंवा बघायला मिळेल यावर विश्वास बसणं थोडं कठीणच! (विशेषत: भारतातल्या मोठ्या माणसांच्या भेटीतले अडथळे आठवल्यावर).

सांता व्हिलेज या छोटेखानी (कमर्शियल) खेड्यातली महत्त्वाची ठिकाणे म्हणजे सांताचे ऑफिस, पोस्ट ऑफिस, रेनडियरची बाग, बर्फावरचे खेळ आणि अर्थातच गिफ्ट शॉप. हो! मुख्य म्हणजे आर्क्टिक सर्कलची रेषा व त्या ठिकाणाहून महत्त्वाचे छोटे मोठे देश कुठल्या दिशेला किती अंतरावर आहेत ते दाखवणाऱ्या पाट्यांना सांभाळणारे खांब.

समोरची कमान ओलांडून पुढे गेलो तो जिंगल बेल जिंगल बेल या गाण्याचे सुमधुर, मन उल्हसित करणारे सूर ऐकू येऊ लागले. साथीला मंद आवाजात घंटाही होती. मुख्य कमानीपासून थेट सांताच्या ऑफिसपर्यंत सरळ पांढरा पट्टा जमिनीवर आखलेला आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर आखलेली ही आर्क्टिक रेषा आता आपण खरोखरी ओलांडणार ही कल्पनाच अंगावर रोमांच आणणारी होती.

त्यावर पाय ठेवताना काय वाटले हे शब्दात वर्णन करणे कठीण आहे.

उन्हाळ्यात सूर्य आर्क्टिक रेषेच्या उत्तरेला ओव्हर टाईम करतो व निदान २-३ दिवस तरी तो २४ तास ड्यूटीवर असतो. जसजसे उत्तरेला जावे तसतशी सूर्याची रजा कमीकमी होत जाते. याउलट हिवाळ्यात सूर्यदेव पूर्णपणे दांडी मारतात. म्हणजे २४ तास फक्त संधिप्रकाश किंवा रात्रच असते. या सगळ्याची शाळेत मार्कासाठी घोकंपट्टी केली होती. आता ते प्रत्यक्ष अनुभवत होतो. आर्क्टिक रेषेवर उभे रहाण्याचा थरार पुरेसा झाल्यावर आम्ही सांताच्या ऑफिसकडे निघालो.

वरवर साध्यासुध्या घरासारखे दिसणारे हे तीन मजली ऑफिस त्याच्या छतावर लावलेल्या सांताच्या भव्य चित्रामुळे व दाराबाहेरच्या बिनचाकाच्या गाडीमुळे लगेच ओळखू येते. २-३ पायऱ्या चढलो.

“चला बाई, एवढं लांब आलो तसे सांताक्लॉज चे घर तरी बघायला मिळाले.”

“हो बाई, कधी आपण सांताक्लॉजच्या घरी येऊ असं वाटलं नव्हतं हो!”

“आता सांतासाहेब दिसले की झालं!”

“नसले तरी काय झालं? आपण थोडेच त्यांना कळवून आलोत? त्यांची त्यांना कामं असणारच.”

अश्या अर्थाची पण वेगवेगळ्या भाषेतील वाक्ये आसपास ऐकू येत होती.

आमच्याही ग्रुपमधे अशीच वाक्ये बोलली जात होती. शेवटी “नसतील सांतासाहेब तर नसू देत. आपण त्यांचे घर, ऑफिस तर बघू.”

अशी चर्चा खरतर कितीही वेळ चालली असती. पण गाईड साहेबांना फुकट घालवणे फारसे मंजूर नव्हते.

“प्रथम त्यांचे पोस्ट ऑफिस पाहू. इथून जगभरच्या चहात्यांच्या पत्रांना सांताउत्तरे पाठवतो.” असे सांगत आमचा मोर्चा गाईड साहेबांनी सांताक्लॉजच्या घरा शेजारील पोस्ट ऑफिसकडे वळवला. भले मोठे चौरस डेस्क, सांताची खुर्ची, पेन, शाई व भरपूर कप्पे असणारे शेल्फ अशी सुटसुटीत मांडणी असणारे हे ऑफिस कमालीचे स्वच्छ होते. तऱ्हेतऱ्हेची ग्रीटिंग कार्डे, पाकिटे शेल्फमधे व्यवस्थित रचून ठेवलेली होती. हे पोस्टऑफिस तीनचार चुणचुणीत गोऱ्यापान मुली सांभाळत होत्या. आपण कार्ड विकत घेऊन त्यावर पत्ता व तिकीट लावून त्यांच्याकडे द्यायचं म्हणजे ते सांताच्या सही शिक्यानिशी त्या पत्त्यावर रवाना होते. त्यावर रोवानिएमी/फिनलंडचा शिक्का न येता ‘सांताक्लॉज पोस्टाचा’ शिक्का येतो.

एका बोर्डावर सांताने आपल्या किती चाहत्यांना पत्रे लिहिली याचा आकडा होता. जगभरातून लाखो मुले त्याला दरवर्षी पत्रे लिहितात. येणाऱ्या प्रत्येक पत्राला तो स्वत: उत्तर देतो असे म्हणतात.

“चला, आपण आत सांताच्या ऑफिस कम घराकडे जाऊ” असे म्हणत गाईड साहेबांनी आम्हाला सांताक्लॉजच्या घराकडे वळवले. सांताच्या घराच्या ४ पायऱ्या चढलो ते “सांता इथे नसणारच, त्याच्या वस्तू, घराचा आतला भाग पाहून परतू” अशी खात्री मनात बाळगूनच. इथे बसमधून उतरल्यापासून बराच वेळ झाला होता. सांताव्हिलेजचा काही भागही पाहून झाला होता. अजूनतरी ‘तो’ कुठे भेटला नव्हता. ऑफिसात काय, फार तर क्लार्क लोकांची टेबले व इतर गोष्टी असणार या समजूतीतच बाहेर ठेवलेली गाडी, वेगवेगळे फोटो, बर्फातल्या प्राण्यांची कातडी, रेनडियरची शिंगे इ. गोष्टी पहात आम्ही पुढे सरकत होतो. एका मोठ्या पॅनलवर सांताची माहिती वाचायला मिळाली. सांता आपल्याला माहित असतो तो दरवर्षी नाताळमध्ये दिसणारा. मूळचे ४थ्या शतकातले तुर्कस्थानातील बिशप सेंट-संत निकोलस गरीबांना मदत करीत. आजूबाजूच्या मुलाबाळांना ते खेळणी, भेट पैसे वगैरे मदत स्वरूपात देत असत. अत्यंत कनवाळू म्हणून ते त्या भागात प्रसिद्ध होते. सेंट निकोलसचे ‘सांता निकोलस’ नंतर सांताक्लॉज हे नाव प्रचलित झाले. गरीबांना भेट वस्तू देणे व मदत करणे ही परंपरा पुढे सांताक्लॉजच्या रूपात चालू राहिली. आम्ही भेट दिली तो१९२० मधे फिनलंडमधील कुरवातुंतुरी या डोंगरावर रहाणारा सांता. हा डोंगर आपल्या कानाच्या आकाराचा आहे. त्यामुळे तिथे रहाणाऱ्या सांताला सर्व जगातल्या लोकांच्या हाका ऐकू येतात म्हणे. ४८३ मी. उंचीचा हा डोंगर दुर्गम आहे. त्यावर जाण्याचा मार्ग फक्त श्री. व सौ. सांता, त्यांची जादूची हरिणे व देवदूतासारख्या सेवकांनाच माहित आहे. त्यांच्या साहाय्यानेच ते एका रात्रीत जगभर संचार करू शकतात अशी दंतकथाही आहे. १९५० पर्यंत सांता रोवानिएमी या गावात डोंगर उतरून वरचेवर येत असे, पण १९८५ पासून त्याने आपले खेडेच इथे वसवले. आणखीही खूप लिहिलेले होते. पण तेव्हढा दम आता निघत नव्हता.

पायऱ्यांच्या समोर एक लांबलचक कॉरीडॉर होता व उजव्या हाताला एक खोली. इतक्या वेळात आम्हाला एकही माणूस भेटला नव्हता-ना हटकायला, ना आमच्यासारखा प्रवासी. आजूबाजूला कोणीच कसे नाही याचे आश्चर्य वाटत होते तोच “हॅल्लो फ्रेन्ड्स” असा गोड आवाज व त्या पाठोपाठ पायघोळ अंगरखा घातलेला, उंच, उंचीला योग्य अंगाबेताचा, गोरापान चश्मेवाला माणूस अवतरला. “या मित्रांनो, सांताक्लॉजच्या ऑफिसमधे स्वागत आहे. या असे पुढे या” हे ऐकून हा सांताच्या अनुपस्थितीबद्दल कदाचित दिलगिरी व्यक्त करणारा कोणी बाबू असावा याची खात्री बाळगत पुढे सरकत होतो तोच पुढचे “या, आत या. सांताक्लॉज तुमची वाट पहात आहे” हे शब्द ऐकून अवाकच झालो. सांता आपली वाट पहात थांबला आहे या कल्पनेनेच अपरिमित आनंद झाला. खोलीत गेलो तो काय!’सांताक्लॉज’ स्वतः एका प्रशस्त खुर्चीवर बसून आमचे स्वागत करीत होते.लाल रंगाचा पांढऱ्या किनारपट्टीचा पोशाख-अंगरखा, तसाच पायघोळ व भरपूर ढगळ पायजमा, पोटावर रुळणारी भली मोठी पांढरी शुभ्र दाढी, कानावरचे कल्ले, मोठ्या छपरी मिशा, गोल भिंगाचा सोनेरी चष्मा, पांढऱ्या गोंड्याची लाल टोपी, भले मोठे कातडी बूट मोजे……सगळे पहाताना आपण स्वप्नात तर नाहीना असे वाटत होते. धिप्पाड नव्हे, पण सुदृढ वयस्कर व्यक्तिमत्त्व, गोरापान रंग, नितळ त्वचा, हालचालीतला वयाला शोभेसा संथपणा, चेहऱ्यावरच्या अस्पष्टशा सुरकुत्या, लांबसडक बोटं असणारा किंचित नाजुकसा पंजा.. सगळं काही सांताक्लॉजच्या चित्रासारखं वाटत होतं. पिवळी झाक असणारा गोरापान रंग, लाल कपड्यात उठून दिसत होता. निळे निळे डोळे अगदी नजर खिळवून ठेवत होते. चेहऱ्यावरचं प्रेमळ हसू त्याच्या दाढीमिशामधूनही वातावरण प्रसन्न ठेवत होतं. जुन्या कथांमधला सांता तो हा नव्हे हे माहित असूनही अगदी अस्सल वाटत होता. भारलेल्या अवस्थेतच आम्ही पुढे गेलो. त्या भल्यामोठ्या खोलीत सांताच्या आसनाखेरीज भली मोठी फायरप्लेस, कोपऱ्यात उभा असणारा चमकणारा ख्रिसमस ट्री, खरी खोटी झुडुपे, प्राचीनकालीन वाटणाऱ्या मातीच्या फुलदाण्या, जमीन, छतावरची तुळई, रेनडियरचे पुतळे-सगळे काही अगदी खरेखुरे भासत होते. एवढे सगळे निरीक्षण करून होतंय तोच “वेलकम इन माय ऑफिस” असे खुद्द सांताचे स्वागत ऐकून आम्ही पूर्णपणे भारावून गेलो. तो खुर्चीत बसला होता. लांब हात करून त्याने आमचे हात हातात घेतले व जवळ बसायला सांगितले. आम्ही त्याच्या जवळ बसताच तिथल्याच फोटोग्राफरने आमचे त्याच्याबरोबर फोटो काढले. आम्ही अगदी मंत्रमुग्ध होऊन सांताकडे पहात होतो.

त्याने आम्हाला जवळ बसवून कोठून आलात, मूळ देश कोणता, उद्योग व्यवसाय काय याची चौकशी सुरू केली तेव्हा त्याच्या आवाजातली जादू खरी जाणवली. अगदी खोलवरून येणारा गूढ पण गोड आवाज कान तृप्त करत होता.

आजूबाजूचे सर्व काही विसरायला लावणारा त्याचा आवाज आता खोलीभर पसरला होता आणि सोनेरी चष्म्यातून त्याचे निळेनिळे प्रेमळ डोळे मनाच्या तळापर्यंत वेध घेत होते. त्याने जेव्हा आमच्या मुलाबाळांची चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा तर तो प्रेमळ आजोबाच वाटून गेला. त्यानंतर त्याने आमच्या देशाला केव्हा (म्हणजे गेल्या नाताळला)भेट दिली होती तेही सांगितले. (अर्थात तो प्रत्येकाला तसेच सांगणार कारण दरच ख्रिसमसला सांता जगात सर्वत्र हिंडतो.) सकाळी फारशी गर्दी नसल्याने त्याने आमच्याशी जवळजवळ २० मि. गप्पा मारल्या. पण त्याचा आवाज सोडला तर त्याने काय विचारले आणि आम्ही काय सांगितले, काही म्हणता काही आठवत नाही. आठवतो तो फक्त त्याचा आवाज आणि नजर! आजही सांता म्हटले की तो आवाज कानात घुमू लागतो व अंगावर रोमांच उभे रहातात आणि त्या अनोख्या अविस्मरणीय भेटीची आठवण मनात ताजी होते.

–अनामिका बोरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..