गेले काही दिवस चाललेल्या लोकशाहीच्या महोत्सवाची उद्या सांगता होणार. कोणत्याही उत्सवाची सांगता जशी गोड होते, तशीच परवा महाप्रसादाच्या दिवशी एकमेंकांवर केलेले भले-बुरे आरोप प्रत्यारोप विसरून पुन्हा सर्व एकत्र येणार आणि एकमेकाला पावन करून घेणार आणि पुढची पांच वर्ष xxxx पण एकत्र नांदणार.
या सर्व पार्श्वभुमीवर सर्वपक्षीयांनी एकमेकांवर केलेले गंभीर आरोप, मतदारांनी आपल्याच पक्षाला मत द्यावं म्हणून केलेली आवाहनं, आश्वासनं व या सर्वांच्या प्रभावाखाली येऊन मतदारांनी त्या त्या पक्षाला केलेलं मतदान यांचा विचार मात्र कोणताही पक्ष करताना दिसत नाही. एकमेकांना पाण्यात बघणारे पक्ष निकालानंतर एकत्र येतात तेंव्हा त्या मतदारांच्या भावना पायाखाली तुडवल्या जातात याचं भान तरी या पक्षांना असतं की नाही कुणास ठाऊक..!
याचा विचार आता मतदारांनी घेऊन त्यांना आवडणाऱ्या नव्हे तर आपल्या शहराचा विकास करू शकणाऱ्या पक्षालाच भरघोस मतदान करावं. भावनेच्या, तत्वज्ञानाच्या मोहजाळात न अडकता शहराचा विकास या एकाच मुद्द्यावा प्राधान्य देऊन मतदान करावं.
लोकशाहीत सत्ताधारी पक्षाला नव्हे तर सक्षम विरोधी पक्षाला महत्व असतं. लोकशाही जिवंत राहाते ती विरोधी पक्षामुळे. एकाच पक्षाची सर्वत्र सत्ता असणं म्हणजे लोकशाहीची ‘सांगता’ होणं..त्याचप्रमाणे एकाच पक्षाची दिर्घकाळ सत्ता असणंही सोकशीहीत चुकच असतं. सत्तेची पोळी सारखी परतवत राहीलं पाहीजे अन्यथा द्या नागरीकांच्या मतावर निवडणूका लढल्या जातात, त्या नागरीकांचं-मतदारांचं महत्व नाहीसं होऊन त्यांना गृहीत धरणं चालू होईल आणि तुमच्या भावनां निडणूकांच्या तोंडावर भांडवल म्हणून वापरलं जाईल, ते ही कोणताही डिव्हीडंड न देता. असं कृपया होऊ देऊ नका
उद्या मतदान आहे. सर्वांनी आवर्जून मतदान करावं. ही महानगरपालिकेची निवडणूक आहे, देशाची किंवा राज्याची नाही. महनगरपालिका व तिचं सक्षम असणं आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत असतं. त्यामुळे आपले रस्ते, पाणी पुरवठा, गटारं-सांडपाणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इ. आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत प्रश्न जो पक्ष समर्थपणे सोडवू शकेल किंवा तसा प्रयत्न तरी करू शकेल असं तुमच्या विचारांती तुम्हाला वाटेल अशाच पक्षाला मत द्या मग तो पक्ष तुमच्या मतांशी, भावनेशी, तत्वज्ञानाशी फारसा सहमत नसला तरी चालेल. स्वत:पेक्षा स्त:च्या आवडी निवडीपेक्षा स्वत:च्या शहराच्या सुंदरतेचा, सुविधांचा विचार तरा आणि डोळसपणे मतदान करा हे तुम्हा सर्वांना नम्र आवाहन..
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply