नवीन लेखन...

एक अविस्मरणीय सागरी सफर

कधी कधी ना, पर्यटनाचे योग अगदी अचानक जुळून येतात. मनात घोळत होती ती अंदमान सफर. ही दिवाळी संपली म्हणजे करावी का ही सफर? हो-नाही करता करता ती सहल बुक करण्याचे रेंगाळतच राहिले आणि ध्यानीमनी नसतानासुद्धा अचानक पणे ही लक्षद्वीप बेट समुहाची सामुहिक सहल ठरली पण आमची !

लक्षद्वीप म्हटलं की लहानपणी रेडिओवर केंद्र शासित प्रदेशांविषयी दररोज सकाळी नऊ वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी बातमीपत्र. त्यात दररोज एका केंद्रशासित प्रदेशा संदर्भात बातम्या सांगितल्या जायच्या. तेव्हा,”नमश्कार मै केंद्रशासित प्रदेश लक्षव्दिप की चिठ्ठी पढ रहा हूं.”असे ऐकल्याचे क्लिक झाले. बहुतेक असे प्रदेश खूप दूर दूर असतात.हे सूत्र त्या वयात डोक्यात पक्के झाले होते. नकाशावर शोधून बघितले हे ठिकाण, दूर असल्याची खात्रीच झाली.

आमची ही ट्रीप ठरण्याचे कारण ठरले ते मेडिकोज ७८ या डॉक्टरांच्या गेट-टुगेदर चे निमित्त. वास्तविक आमचा या समूहाशी तसा काही जवळचा संबंध नव्हता.पण आमचे जवळचे एक नातेवाईक डॉक्टर त्यांच्या आग्रहास्तव समुहातील रिकाम्या झालेल्या डॉक्टरांच्या जागा आम्ही भरून काढल्या असेच म्हणा ना हवे तर!

सहा महिन्यांपुर्विच युरोप टूर करून आल्यानंतर ही डोमेस्टिक टूर म्हणजे अगदीच जवळ पुण्या-मुंबईला जाऊन आल्यासारखे आहे. त्याची एवढी काय तयारी करायची? असेच ताडले होते मनाने. ही टूर म्हणजे अगदीच हात चा मळ असेल, असे वाटले होते सुरुवातीला. त्यामुळे तोंडावर आलेली दिवाळीची तयारी, फराळ यातच भरपूर वेळ गेला.पण ज्यावेळी तयारी सुरू केली तेव्हा ही सहल काही साधीसुधी नाहीये याची जाणीव झाली.

मूळ सहलीचे बुकिंग झाले आहे तरीही जाता-येता होणारा कोची चा मुक्काम त्याचे बुकिंग जाण्यायेण्याचे कोची ते मुंबई आणि तेथून पुन्हा औरंगाबाद हे बुकिंग होतेच. शिवाय सहल म्हटले की खरेदी आलीच. या सहलीत तर सागर सफरीचा खूप नवखा आणि सुंदर अनुभव मिळणार होता. सहलीची संकल्पनाच मुळी सागरी खेळ अशी असल्यामुळे सहाजिकच स्नॉर्केलिंग सेट, स्विमिंग साठी गॉगल्स, स्विमिंग सुट, फिन्स वगैरे अशा अनेक नवीन वस्तूंची खरेदी मध्ये भर पडली होती. या सर्वांची जमवाजमव करणे आणि समुद्राच्या सान्निध्यात राहण्यासाठी आवश्यक कपड्यांचे अनेक सेट घेणे हे पटकन होणारे काम नव्हतेच.

या साऱ्या गोष्टींची पुर्तता करत आम्ही ठरलेल्या दिवशी उगवत्या सुर्याच्या साक्षीने औरंगाबाद वरुन निघालो. आजच्या भास्कराचे दर्शन घेताना मनात अनेक भावनांचा खेळ चालू होता. साऱ्या भावना मात्र परिपूर्णतेच्या समाधानाने तृप्त करणाऱ्या अशाच होत्या. या दिवसाचे औचित्यही खासच होते.

२३ नोव्हेंबर, दिवसाचा प्रारंभ खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद यांचे पाठबळ मिळवत सुरू झालेला होता. कारण आज या दिवशी माझा जन्मदिवस, वाढदिवस. प्रफुल्लित मनाने समाधानाचे मांगल्याचा अस्वाद चाखत चाखत, आनंदाच्या फुलांची उधळण चालवली होती दिवसभर. मोरपिसासारखे हलके हलके बनत, प्रत्येक क्षण अलगद टिपत सुगंधी कुपीमध्ये जतन करून ठेवावा, असाच तो दिवस ठरला माझ्या आयुष्याचा.

सायंकाळपर्यंत कोचीच्या ठरलेल्या व्हेन्यू वर सर्व मेडिकोज ७८ या समुहातील मंडळी, आमच्या सारखेच इतर काही जणांचे जवळचे कौटुंबिक सदस्य आणि आम्ही दोघे असा जवळजवळ ५० जणांचा आमचा समुह रात्रीच्या जेवणासाठी बँक्वेट हॉल मध्ये एकत्र जमला.

पेशंटची अचूकपणे नाडी ओळखणारे डॉक्टर, सराईतपणे मानवी शरीरावर कैची चालवणारे डॉक्टर, हळुवारपणे पेशंटच्या मनावर आणि आजारावर फुंकर घालणारे,एवढेच नव्हे तर पेशंटच्या हृदयातही डोकावून बघत त्यांना तंदुरुस्त बनवणारे डॉक्टर. लहान मुलांना त्यांच्याएवढेच छोटे बनत हसवताना टूच करत इंजेक्शन टोचणारे,भूल देऊन कोणत्याही वेदनांपासून मुक्ती मिळवून देणारे तर रुग्णाला दिव्यदृष्टी बहाल करत हे जग बघण्यासाठी नव्याने सज्ज करणारे डॉक्टर. याशिवाय नव्या जीवाला सुखरूप पणे या जगात अलगद आणून उतरवणारे डॉक्टर व भारतीय लष्करात राहून देशसेवा करणारे डॉक्टर. अशा सर्व प्रकारच्या अनेक डॉक्टर रुपी देवदूतांचा समावेश होता या समुहात.

सर्वांशी नावाने ओळख होतीच, तरीही प्रत्यक्ष या साऱ्यां बरोबर जवळजवळ एक आठवडा रहावयास जात आहोत आपण ! हे सारे अगदीच वेगळे क्षेत्र असणाऱ्या आपल्याला त्यांच्यात सामावून घेतील ना? याचे थोडे दडपण वाटले सुरुवातीला. पण एकदा या बँक्वेट हॉल मध्ये धमाल चालू झाली आणि हे दडपण कुठच्या कुठे पळून गेले तर! येथे समुहातील एक एक जण स्टेजवर येऊन आपल्या स्वतः मधील कलागुण आपल्या आवडीने भारलेले स्वतःचे छंद यांचे मोकळ्या मनाने आवर्जून प्रदर्शन करत होते. आणि इतरांची दाद मिळवत होते. एक यशस्वी डॉक्टर म्हणून आम्हाला या सर्वांची असणारी ओळख आणखी नव्या रूपाने होत आहे हे लक्षात येऊ लागले आमच्या. आपल्या व्यवसायातून काही दिवसांचा आवर्जून वेळ काढत कुटुंबाबरोबर, मित्र-मैत्रिणींबरोबर, आप्तेष्टांबरोबर पाच-सहा दिवस अगदी रिलॅक्स मूडमध्ये वावरणारे सारे डॉक्टर. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपण्याचा त्यांचेच पेशंट असणाऱ्या आम्हा दोघांना फार गंमत वाटत होती. अर्थात आम्हीपण या साऱ्या प्रवासाची, कार्यक्रमाची मजा घेत आनंद लुटत होतो हे सांगणे न लगे.

एरवी भारताच्या एका टोकाला असणाऱ्या लक्षद्विप बेटांवर जाण्याचे आम्ही कधी ठरवले असते हे स्वप्नातही वाटले नव्हते. पण या समुहातील रिकाम्या जागा भरण्याचे आवाहन, एक नातेवाईक म्हणून हक्काने आम्हाला करण्यात आले आणि ते आम्ही स्वीकारले याचा मनस्वी आनंद झाला यावेळी आम्हाला. शेवटी ‘माणूस हा समाजशील प्राणी असतो’ या तत्त्वाप्रमाणे असा छान समूह बरोबर असताना सहलीला जाणे म्हणजे ‘सोने पे सुहागा’ असेच म्हणता येईल. आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला तो माझ्या नावाचा शुभेच्छा केक माझ्यासमोर ठेवत तो कापण्यासाठी सुचित करण्यात आले त्यावेळी! सुर्योदया बरोबर सुरुवात झालेला शुभेच्छांचा वर्षाव अशाप्रकारे अनपेक्षितपणे केक कापत तोंड गोड करत आणि चविष्ठ जेवणाचा आस्वाद घेत परिपूर्ण झाला असेच म्हणता येईल. या अवर्णनीय परिपूर्तीचा आनंद मनात साठवत झोपेच्या आधीन कधी झालो आम्ही, हे समजलेच नाही. कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच एका अनोख्या सफरीवर निघावयाचे होते आम्हाला……

दुसऱ्या दिवशीच्या सकाळी ताजेतवाने होऊन ब्रेकफास्ट आटोपत उत्साह आणि औत्सुक्याने ओतप्रोत भरलेल्या मनाने आम्ही सर्वजण जहाजावर येण्यासाठी पर्यटक बस मधून धक्क्यावर पोहोंचलो. लक्षद्विप हा केंद्र शासनाच्या अखत्यारीतील प्रदेश असल्यामुळे आवश्यक त्या सर्व औपचारिक गोष्टींची पूर्तता तेथे करून घेण्यात आली. विमान प्रवासात लागणारे सर्व सोपस्कार येथेही पार पाडावे लागतात. वेगळेपण म्हणजे या ठिकाणी गळ्यात घालावयास आपल्या नावाचे बॅच दिले होते. जेणेकरून काही अपघात घडलाच तर त्यावरून पर्यटकांची ओळख पटेल. अतिशय शिस्तीत आणि शांततेत हे सोपस्कार थोड्या अधिक प्रतीक्षेनंतर पार पडले.

शिगेला पोहोचलेल्या औत्सुक्याने आम्ही सारे आमच्या अजस्त्र अशा जहाजाच्या पायऱ्या चढल्या आत्तापर्यंत छोटी नाव किंवा मोठ्या बोटीतून केलेल्या छोट्या प्रवासाचा अनुभव होता. पण सागराच्या लाटांवर विराजमान झालेल्या या अजस्त्र जहाजातून सलग पाच दिवस प्रवास, तेथेच मुक्कामी राहणे या गोष्टींचा अनुभव खूपच विलक्षण असणार आहे, हे पाऊल ठेवताच लक्षात आले.

जहाजात पहिले पाऊल टाकले आणि नकळतपणे ईश्वराचे नामस्मरणही मुखाबाहेर पडले. निसर्ग राजाला, सागराला, मनसोक्तपणे वाहणाऱ्या वाऱ्याला त्रिवार अभिवादन केले. मनोमन त्यांचा आशिर्वाद मागितला. आणि एखाद्या लढाईवर जाण्यासाठी सज्ज झालेल्या आवेशात प्रवासासाठी सज्ज झालो आम्ही सारे.

केवढे हे महाकाय जहाज ! एक अख्खे शहरच सामावलेले होते त्यात! सात-आठशे प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता असणारे हे जहाज आत पाऊल टाकल्याबरोबर आपले घर कधी बनले हे कळलेसुद्धा नाही. आम्हाला देण्यात आलेल्या रुम नंबर शोधताना जयपूरला बघितलेल्या जंतर-मंतर ची आठवण झाली. कुठून आलो आपण आणि जायचे आहे कुठे? याचा काही केल्या ताळमेळ लागत नव्हता. एका बाजूने सम आकड्यांचे क्रम आणि दुसऱ्या बाजूने विषम आकड्यांचे. आपली रूम शोधताना मनात गोंधळ निर्माण करत होता. आम्ही चौथ्या मजल्यावर होतो म्हणजे आमच्या खाली आणखी तीन मजले आणि आमच्या वर एक मजला असे एकूण पाच मजले ! त्यावर भव्य डेक. प्रशस्त अशा विशालकाय जहाजात सलग पाच दिवस राहणे ही कल्पना अंगावर रोमांच उभे करत होती अक्षरशः!

रूममध्ये पाय ठेवला आणि कधीकाळी याही जागेशी आपले ऋणानुबंध लिहिले असावेत का? हा प्रश्न येऊन गेला मनात. रूम बघताना काश्मीर मध्ये शिकाऱ्यात घालवलेल्या दोन दिवसांची आठवण झाल्यावाचून राहिली नाही.

केवढी सुरेख नि सुटसुटीत, थोडक्या जागेत सर्व सोयींनी युक्त अशी होती ही खोली! आपण जणू आपल्या घरातच आपल्या बेडरूम मध्ये आहोत याची जाणीव करून देणारी ! अशाच जवळजवळ सहाशे रूम्सची व्यवस्था होती यावर. याशिवाय प्रशस्त डायनिंग त्यात दोन भाग केलेले. स्वतंत्र किचन तसेच हॉस्पिटल, वेल्फेअर ऑफिसर, टूर मॅनेजरचे ऑफिस, प्रत्येकाचे स्वतंत्र केबिन शिवाय शॉप ची पाटीही दिसली मला एका ठिकाणी. कॉन्फरन्स हॉल, रिक्रिएशन हॉल यात वेगवेगळे बैठे गेम्स. सगळीकडे भरपूर लाइट्स, एसी, स्पीकर्स, पिण्याच्या पाण्याची सोय वगैरे बारीकसारीक गोष्टींची असणारी चोख व्यवस्था बघून तोंडात बोटे घातली गेली आपोआप! तंत्रज्ञानाला आणि तंत्रज्ञ लोकांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे असे वाटले.

कुतुहलाने अंतर्गत व्यवस्था बघत असतानाच दुपारच्या जेवणाची वेळ झाली सुद्धा.

जेवण घेत असताना कुठेही जाणवले नाही की आपण तरंगत्या जहाजावर जेवण घेत आहोत. कारण एखाद्या प्रथितयश हॉटेलमध्ये उपलब्ध असणारे जेवणाचे सारे पदार्थ अगदी गरमागरम उपलब्ध होते या ठिकाणी. शिस्त, वेळेचे अचूक नियोजन, सेवावृत्ती भाव, काम करणाऱ्यांचे चापल्य, या सर्वच बाबी मनात घर करून राहणाऱ्या होत्या. यथेच्छ जेवण झाल्यानंतर टूर मॅनेजरने आम्हा सर्वांची कॉन्फरन्स हॉलमध्ये मीटिंग घेतली. यात येणाऱ्या पाच दिवसात आमच्या बरोबर असणारे क्रूज वरचे एकेक अधिकारी उपकृत झाले आणि त्यांनी यात असणाऱ्या सोयी सवलती तक्रारी असतील तर त्यांच्या मांडणीसाठी ठिकाण वगैरे गोष्टींची कल्पना दिली. शिवाय पुढील पाच दिवस दिनक्रम कसा असेल याचे विवेचन केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही आणीबाणीच्या परिस्थितीत उद्भवल्यास आपल्या व इतरांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी कोणत्या सोयी सुविधा आहेत व त्यांचा उपयोग कसा करावा याबद्दल अतिशय उपयुक्त माहिती दिली. तोपर्यंत सायंकाळ समिप आली होती.

अजूनही आमचे जहाज स्थिरच होते. थोड्या वेळातच ते प्रवासासाठी चालू होणार होत़े. हा नयनमनोहर क्षण आणि सूर्यास्ताचे विलोभनीय दर्शन घेण्यासाठी आम्ही डेक वर आलो .

वाह ! काय सुंदर नजारा होता तो! आमचे जहाज जेथे थांबलेले होते त्याच्या पार्किंगच्या तीनही बाजूंनी अथांग पाण्याची शांत निळाई, स्फटिकरूपी जलतरंगांच्या मखमली गालीचा पसरलेला दिसला. हवेतील थंडावा किंचित उष्मा सोबत घेऊन बेफामपणे वाहत प्रत्येकाच्या केशसांभाराशी शिवना पाणी खेळत होता. स्वच्छ नैसर्गिक हवा आपल्या हृदयात किती किती भरून घ्यावी असे झाले होते प्रत्येकाला.याच्या जोडीला सूर्यास्ताचा नयनरम्य देखावा मनाला भूल घालत होता.आकाशाचे प्रतिबिंब सागरावर पडून आकाश व सागर जणू एकच आहेत असा आभास निर्माण झाला. असे विलक्षण दृश्य डोळ्यात साठवत असताना जहाज चालू होण्या चा भोंगा वाजला.आणि सर्वांचे लक्ष आपल्या पहिल्याच जहाज प्रवासाचा पहिला हलता क्षण टिपण्यात व्यग्र झाले.

खरंच अतिशय मेहनतीचे आणि कौशल्याचे काम आहे हे. एवढ्या अजस्त्र जहाजाला गती देण्याचे काम दुसऱ्या दोन महाकाय बोटी आणि त्यावरील कुशल तंत्रज्ञ यांची फौज कसे करते हे बघताना नतमस्तक व्हायला होते!त्यांचे ते जाड जाड दोर टाकून क्रुझ ला पाण्यात सोडून देणे,त्या साठीचे टाइमिंग, इतर अनेक गोष्टींचे नियमन हे सारे काम करताना त्या लोकांची एकाग्रता हा सर्व कौशल्याचाच भाग होय. प्रवासा साठी लागणारी योग्य ती दिशा देण्याचे काम ही दोन जहाजे मिळून करतात. अशावेळी टिमवर्क चे किती महत्त्व असते याची प्रचिती येते.

अशा पद्धतीने सागर लहरींच्या हिंदोळ्यावर स्वार होत आमचे क्रूझ लक्षद्वीप बेटांच्या दिशेने निघाले. सलग बारा तासांच्या प्रवासासाठी. यावेळी डेकवरून अथांग सागराचे निरीक्षण करताना अक्षरशःवेडे होऊन जातो आपण. हा अनुभवानंद मनात साठवून घेत असताना केव्हा काळोख पसरला हे समजलेही नाही.

डिनर साठी झाली सूचना झाली आणि जेवण घेऊन आम्ही मेडिकोज ७८ च्या समुहाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हॉलमध्ये जमलो.या समुहाने शोले या पिक्चर च्या धर्तीवर आधारित शोले नावाचे बसवलेले नाटक फारच छान झाले.सर्व पात्रांनी आपापली कामं अगदी चोखपणे पार पाडली. यावेळी डॉक्टर लोकांमध्ये दडून बसलेल्या अभिनेत्याचे दर्शन घेताना मजा आली खूप.नाटकाचे दिग्दर्शन लेखन विनोदी शैलीत केलेले आणि त्याच्या संगतीला जातीच्या कलाकारांच्या अभिनयाची साथ! नाटक बघताना हसता हसता पुरेवाट लागली अगदी.हास्याच्या फवाऱ्यां संगे निद्रादेवी खुणावत होती सर्वांनाच. त्यामुळे प्रत्येक जण निरोप घेऊन आपल्या रुममध्ये परतले होते एव्हाना. डेकवर जाऊन सूर्योदयाचा मनोहरी नजराणा बघण्याचे आश्वासन देत देत ..

आकाशात उजळलेली पूर्वदिशा. नव्याने उगवणाऱ्या दिनकराच्या स्वागताला संपूर्ण अंबर सज्ज झालेले. गगन राजा साठी रंगीबेरंगी पायघड्यांची पखरण केलेली. तर खाली अवनीवर शांत तरंगत रहाणाऱ्या छोट्या छोट्या झुळझुळणाऱ्या समुद्राच्या लाटा! जणूकाही उगवत्या दिनकराच्या स्वागतासाठी मंजुळ नाद करत शहनाईचे सूर आळवत आहेत असा भास होत होता.नजरेच्या कवेत मावणाऱ्या गगनाचे प्रतिबिंब तेवढ्याच नजर कवेमध्ये दिसणाऱ्या सागरामध्ये उमटले होते. गगन सागर यांची गळाभेट घडत आहे असे विहङम चित्र आमच्या डोळ्यांचे पारणे फेडत होते! चहाचा कप घेऊन डेकवर आम्ही सूर्योदयाचे हे देखणेपण डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी आलो त्यावेळी सोबतीला वाहणाऱ्या बेभान वाऱ्याची संगत तर होतीच !

प्रत्यक्ष आम्ही बघत आहोत तो खरा स्वर्गच ! अशा या सुंदर क्षणांचे आपण साक्षीदार झाल्याची तृप्ती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटली होती. सूर्योदय होताना तर आकाशात उगवतीच्या दिशेने क्षणाक्षणाला बदलणाऱ्या नानाविध छटा आणि त्यातून सूर्यदेवतेचे सोज्वळ रुपाने होणारे आगमन. अतिशय विलोभनीय दृश्य होते ते! भास्कराने आपला उग्र अवतार धरण करेपर्यंत येथून हलू नयेच असेच वाटत होते. पण आज आम्हाला या विशाल अशा अरबी समुद्राच्या कक्षेनेे व्यापणाऱ्या एका बेटावर,काल्पेनी नाव त्याचे.येथे भेट द्यायची होती ना! त्यासाठी तयार होणे अपरिहार्यच होते.

शुचिर्भुत होऊन नाश्ता आटोपला सर्वांनी.टूर मॅनेजरने दिलेल्या सूचनेनुसार रूम मध्ये असणारे स्विमिंग जॅकेट प्रत्येकाने अंगावर चढवलेले होते.आवश्यक कपडे आणि आणि वस्तूंनी युक्त अशी एक छोटी बॅग घेऊन आम्ही सारे क्रुझ मधून पायउतार झालो.पण त्या साठी लागणारी जमीन होतीच कुठे पायाखाली? चौफेर अथांग पसरलेल्या समुद्राची निळाई चमकत होती.क्रुझच्या दाराशीच आमची वाट बघणाऱ्या बोटींमध्ये बसलो आम्ही सर्वजण. काल्पेनी बेटावर जाण्यासाठी.

नावावरुन लक्षद्वीप म्हणजे एक लक्ष द्वीप आयलँड असा अर्थ होतो.पण असे काही नाही. या बेटांची एकूण संख्या ३६ एवढीच आहे. त्यांपैकी केवळ १० बेटांवरच मानवी वस्ती आहे. आमच्या या ट्रीप मध्ये मुख्य तीन बेटं, दररोज एक अशी आम्ही बघणार होतो.शासनाने केवळ पाच बेटांवर भेट देण्यासाठी अधिकृत परवानगी दिलेली आहे असे समजले.

बोटीने आम्हाला काल्पेनी बेटापर्यंत आणून सोडले. जमिनीवर पाय ठेवण्यासाठी सागरातून प्लास्टिकचे चौकोनी ठोकळे ठेऊन तयार केलेल्या रस्त्यावरून कसरत करत जावे लागले. त्या वेळी गोकाक च्या झुलत्या पुलावरून जाताना जसे वाटत होते ना अगदी तसेच वाटले.

बोटीत बसण्याचा पूर्वीचा अनुभव आणि यावेळी घेतलेला अनुभव अगदीच निराळा ठरला. नजरेच्या चौफेर निळे हिरवे पाणीच पाणी आणि पाणी एवढे स्वच्छ की, आपलेच प्रतिबिंब बघावे त्यात. मोटर बोटीने कापत जाणारे फेसाळलेले पाणी म्हणजे दुधाच्या फेसाळणाऱ्या लाटाच होत्या त्या! हात लावून बघण्याचा मोह आवरता येत नव्हताच.

बेट नजरेच्या टप्प्यात आले आहे हे त्या दिशेला सागर किनार्ऱ्यावर नारळाच्या अगणित झाडांनी नैसर्गिकपणे तयार केलेली हिरवीगार भिंत बघून लक्षात आलेच. खूपच अप्रतिम सौंदर्य होते ते ! अवनी ने समिंदराला मोठ्या प्रेमाने बहाल केलेले! आपल्या दोन डोळ्यात आणि कॅमेरात किती आणि कोणत्या कोणत्या अँगलने साठवून ठेवावे असे होऊन गेले होते अगदी ! वर म्हटल्याप्रमाणे बेटाच्या भूमीचा पायांचा स्पर्श झाला. भूमी म्हणजे बारीक मऊ शुभ्र वाळूचे आगारच होते ते ! समुद्राच्या लाटांनी ओले झालेले आमचे पाय वाळतून फिरले की, फार सुंदर पांढर्‍या नक्षीने सजून जात होते.

तेथे किनाऱ्यावरअसणाऱ्या रिझॉर्ट वर पर्यटकांची सगळी व्यवस्था केलेली होती. गेल्या गेल्या वेलकम ड्रिंक म्हणून हातात जेव्हा शहाळं आलं ना, तेंव्हा हरखून जायला झालं होतं. उग्र होत चाललेल्या उन्हाच्या झाळांनी कोरड्या पडणाऱ्या घशाला शहाळ्याचे गोड गार पाणी आणि त्यातील मलयी खूप थंडावा देऊन गेली.हे वेगळे सांगावयास नकोच. किती किती म्हणून कौतुक करावे तेथील व्यवस्थेचे नारळ पाणी पिऊन झाले की लगेच मलई काढून देण्यासाठी लोक तत्परच असायचे…..

आता येथून मात्र सुरू होतात ते समुद्राच्या पाण्यातील विविध खेळ. ज्यांना पोहण्याची, समुद्र खेळांची आवड आहे त्यांच्यासाठी लक्षद्वीप सारखा समुद्र इतर कुठेही नसेलच हे नक्की. पोहणे येवो अथवा न येवो, पण सारेच जण पोहोण्यासाठी असणारे जॅकेट आणि स्विमिंग सूट घालून पूर्ण सज्ज होते. पोहोण्यासाठी नाही तरी ह्या वेषात फोटो काढण्यासाठी तर असूच शकतात ना! यापेक्षा चांगली नामी संधी कुठे मिळणार?

तर, हौशे नवशे गवशे हे सारेच पोहण्यासाठी तयार होते. कोणी किनाऱ्यावर आरामखुर्चीत बसले,कोणी किनाऱ्यावर उभे राहून किंवा मांडी घालून पायांवर लाटा घेण्यात धन्यता मानू लागले. तर कोणी गुडघाभर पाण्यात जाऊन पुढे जावे किंवा न जावे याचा अंदाज घेत होते. पण प्रत्येकालाच समुद्र मात्र आपल्यात सामावून घेण्यासाठी खूप उत्सुक झालेला होताच ! पट्टीच्या पोहोणारांनी दूरपर्यंत पोहत मजल मारली होती. कोणी स्नोर्केलिंग साठी निघाले तर कोणी स्कुबा डायविंग करण्यासाठी. कोणी बनाना राईड केली तर कोणी कायाकिंग .वेगाची भीती नसणाऱ्यांनी स्पीड बोटीचाही आनंद लुटला.

माझ्यासारख्या कधीच पाण्यात न पडणाऱ्या व्यक्तीला पोहायला येणे केवळ अशक्य होते. ‘पाण्यात पडल्यावर आपोआप पोहायला येते’असे घडण्याची सुतराम शक्यता नव्हतीच मुळी. समुद्राचे शांत झुळझुळ वाहणारे पाणी मात्र मनाला मोहवत होते. त्यात उतरण्यासाठी माझ्या मनाची अवस्था एका डॉक्टर मैत्रिणीने बरोबर हेरली.आणि तिने तिच्या जबाबदारीवर पाण्यात उतरून स्नॉरकेलींग करण्याचा सराव माझ्याकडून करवून घेतला. यामूळे माझ्यातील आत्मविश्वास चक्क वाढला ! हज्जारदा विचार करत पाण्यात पाय ठेवणारी मी यामुळे गाईडच्या मार्गदर्शनाखाली चांगली दहा पंधरा किलोमीटर आत पर्यंत समुद्रात पोहत पोहत अधनं मधनं स्नॉरकेलींग करत फिरले. पाणी ज्या वेळी डोक्याच्या वर जाते आहे हे बघितल्या नंतर थोडीशी घाबरत परत फिरले. किनाऱ्यावर आल्यावर मात्र पोहण्यासाठी घेतलेल्या महागड्या स्विमिंग सूट चे स्नॉरकेलींग सेट चे पैसे फिटले आपले.असे वाटल्यावाचून राहिले नाही मनातच.

पाण्यात डुंबून, खेळून, चालून सर्व मंडळी चेंज करून गरमागरम चहा बरोबर आपल्या उकडीच्या मोदका प्रमाणे वाफवलेल्या मोठ्या करंजीचा आस्वाद घेती झाली. यानंतर आम्ही कोकोनट फॅक्टरी बघण्याच्या निमित्ताने बेटावर फेरफटका मारला या फॅक्टरीत झाडांवरून उतरवत ढीग करुन ठेवलेली नारळं बघून मन हारखून गेले.खोबऱ्याचा गोटा,त्यावरची काळी पाठ सोलणे ही कामे चपळाईने करणाऱ्या महिला कामगार होत्या त्या ठिकाणी. मोठ्या गिरणीतून शुभ्र गोटे टाकून त्याची बारीक डेसिकेटेड कोकोनट पावडर तयार होणे, हे बघणे मजेशीर अनुभव ठरला. तेथेच ओल्या नारळाची छोटे छोटे लाडू,खोबर्ऱ्याचे शुद्ध तेल यांची खरेदी झाली. ओल्या नारळातील पाणी आणि खोबरं हा फलाहार ही झाला तेथे.कामकरी लोकांना बोलता-बोलता अंदाज घेतला, त्यांच्या उत्पन्नाच्या साधनांचा तर मासेमारी आणि नारळ व त्यापासून बनलेले पदार्थ हाच लक्षव्दिप च्या लोकांचा उत्पन्नाचा स्त्रोत आहे हे समजले. जमीन जेवढी उपलब्ध आहे तेथे बिया पडून नारळाची दाट झाडी नारळाच्या जंगलासारखी नैसर्गिक पध्दतीने तयार झालेली दिसत होती. काही ठिकाणी तर जमिनीवर ऊनही पोहोचत नव्हत अशी दाटीवाटी होती झाडांची !

काल्पेनी हे येथील सर्वांत मोठे बेट होते. लोकसंख्या चार ते सहा हजार हजार असावी. या बेटांवर असणारे लोक मात्र केवळ मुस्लिम धर्मीय होते त्यांच्या म्हणण्यानुसार तीन चार हजार वर्षांपूर्वी मुळ बौध्द धर्मिय असणाऱ्या या लोकांना मुस्लिम धर्माची दिक्षा देण्यात आलेली होती.फार प्रामाणिक आणि मेहनती लोक आहेत ही. आश्चर्य म्हणजे ही सगळी एकोप्याने राहतात भांडणं वगैरे होतच नाही कोणाच्याही घरी काही कार्य असेल असेल तर झटून सर्व गाव कामाला लागते. मुख्य म्हणजे चोरी वगैरे सारख्या गोष्टी येथे अगदी वर्ज्य आहेत ! अशीही माहिती मिळाली. खूप कौतुक वाटले. सर्वात शेवटी निघण्यापूर्वी येथील स्थनिक संस्कृतीचे लोकनृत्य बघितले. तालबद्ध पद्धतीने जुन्या हिंदी गाण्यांवर लाकडी फळी आणि चौकोनी लाकडी तुकडे यांच्या साथीने केलेले त्यांचे नृत्य मनाला भावले खूप. चिपळ्यां प्रमाणे निघणारा आवाज आपल्यालाही ठेका धरावयास भाग पाडत होता.

ठरल्याप्रमाणे सुर्यास्ताच्या साक्षीने आम्ही बोटीतून आमच्या घरी,क्रूझ वर परत आलो.डिनर नंतर मेडिकोज ,७८ या समुहाचा रात्री कार्यक्रम ठरलेला होताच. त्यादिवशी समुहात दोन लग्नाचे वाढदिवस साजरे झाले.आणि एक वाढदिवसही!अगदी नावीन्यपूर्ण पद्धतीने खरं खरं मंगलाष्टकं,आंतरपाट धरुन, मुंडावळ्या, हार वगैरे घालून नवरा नवरी चे लग्न लावले सर्वांनी. त्यांच्या लग्नाच्या वेळीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी दोन्ही दाम्पत्य खूपच खूष झाले होते. यानंतर एका डॉक्टर मैत्रिणीचा वाढदिवस केक कापून साजरा केला.तिने आणलेल्या निरनिराळ्या स्नॅक्सची रेलचेल चालू होतीच. यातच वेगळ्या वाटा या कार्यक्रमांतर्गत एका डॉक्टर मित्राने जे स्वतः अँलोपथी डॉक्टर आहेतच पण होमिओपॅथी अभ्यासासाठी कसे प्रेरित झाले ते ! याचे सुरेख विवेचन केले. एका डॉक्टर मैत्रिणीने आपल्या याजमाना सह केलेल्या मानसरोवर यात्रे विषयी सखोल माहिती आणि त्यांचा यात्रा प्रवास कसा साहसी होता याचे छायाचित्रांसह केलेल्या विवेचनातून सांगितलेली माहिती अंगावर रोमांच उभे करत होती ! त्यांच्या या माहितीने प्रेरित व्हायला झाले खचितच! हे नमूद करावयास आनंद होतोय मला….

हा सारा कार्यक्रम आटोपेपर्यंत आमच्या डोळ्यात निद्रादेवी स्वार होऊ बघत होतीच. प्रत्येक जण शुभरात्री चा संदेश देत देत आपापल्या खोल्यां मध्ये जाते झाले……..

एव्हाना, आम्ही क्रूज मधील आमच्या दिनचर्येत चांगलेच रुळलो होतो. बरोबर साडेसहा वाजता चहाचा कप घेऊन सर्वात वरच्या डेकवर जायचे. सूर्योदयाची प्रतीक्षा करत, त्याचे व आकाशाचे सौंदर्य तसेच त्यांची समुद्रा वर पडणारी छाप डोळ्यात साठवून घ्यायची. तयार होऊन आठ वाजेपर्यंत नाश्ता आटोपला की आपले आपले पोहण्याचे जॅकेट्स घालून परस्परांना शुभ सकाळ शुभेच्छा स्मित देत देत क्रूज मधनं बोटीवर उतरायचे. दिवसभर ज्या बेटावर जाऊ तेथे खूप धमाल करायची. नि सूर्यास्ताला न्याहाळत न्याहाळत बोटीवर स्वार होत सुर्याचे अस्ताला जातानाचेही सौंदर्य टिपत टिपत क्रुझवर परतायचे. रात्री डिनर आटोपून मेडिकोज ७८, या समुहाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे.

२६, नोव्हेंबर या दिवशी सुर्यदेव आवतरताना काही दिसले नाहीत. आभाळ भरून आलेले होते. पहाटे पहाटे पाऊसही पडून गेलेला होता. आम्ही कावरत्ती या बेटावर सैर करणार होतो. आमची क्रुझच मुळी कावरत्ती ते कोची अशी होती. कावरत्ती हे लक्षद्वीप बेट समुहांच्या राजधानीचे शहर. राजधानीचे शहर म्हटलं की खूप मोठे सर्वसोयींनी युक्त असे एक कल्पनाचित्र असते आपल्या डोक्यात. पण हे ठिकाण एखाद्या तालूक्या एवढेच असावे. हे जाणवले. वातावरण आल्हाददायक होते.ठिक ठिकाणी नारळाची झाडे मधून मधून बदामाचीही झाडं डोकावताना दिसत होती. नारळाच्या बागांचे सौंदर्य फार विलक्षण दिसत होते. जागा मिळेल तसे वळत वळत सूर्यप्रकाश अंगावर घेणारी ही कमनीय तर कधी आरामात पाठ टिकवून आराम घेण्यासाठी उपयोग व्हावा अशी आरामदायक झाडांची नैसर्गिक रचना. काही झाडं उंचच उंच सरळ वाढणारी तर काही झोके घेत पायापासून वक्रासनात वळलेली. प्रत्येक झाडाचे एक निराळे वैशिष्ट्य म्हणून सौंदर्यही आगळेवेगळे. पण खूप लोभसवाणे हिरवेगार. निसर्गाचे हे अति सुंदर रूप अगदी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ वाटले. कुठेही प्रदुषण नाही. माती तर नाहीच. त्यामुळे धूळही नाही. सागरी किनारे ही अगदी चकचकीत, पारदर्शी सूर्यप्रकाशाला मनसोक्त साथ देणारे. समुद्राचे पाणी सुर्याच्या तेजालाआणि आकाशातील बदलणाऱ्या रंगछटा यांना आपल्यात सामावून घेणारे , म्हणूनच मन मोहून टाकणारे.

कावरत्ती बेटावर पोहोंचलो आणि वरुण राजाने आनंदाने सलामी दिली आम्हाला. पाऊस थांबला आणि उन्हाची तीव्रता खूप जास्त असल्याचे जाणवले लगेच. पण गेल्यागेल्या नारळ पाण्याने मजा आणली होती.लक्षव्दिपचे सर्वच समुद्रकिनारे सागरी खेळांसाठी अगदी योग्य असेच आहेत.याचा उल्लेख पुर्विच आलाय. हा प्रत्येक किनारा हा बराच उथळ आहेत. त्यातून सहजासहजी समुद्रात दूर पर्यंत चालत जाता येते. शिवाय समुद्रामध्ये कुठेही मानवाला घातक ठरतील असे जलचर हिंस्त्र प्राणी नाहीत. त्यामुळे अगदी मनसोक्तपणे समुद्रीखेळांचा आनंद घेता येऊ शकतो. मार्गदर्शनासाठी ठिक ठिकाणी मार्गदर्शक उपलब्ध आहेत. परिणामी सर्वांनीच येथे खऱ्या अर्थाने एन्जॉय केले असे म्हणावयास हरकत नाही. कावरत्ती च्या समुद्रामध्ये सुध्दा सर्वांनी स्नोरकेलींग, स्विमिंग, स्कुबा, स्पीड बोट, कयाकिंग, बनाना राईड इत्यादी खेळ तर खेळलेच. याशिवाय येथे पारदर्शक काचेच्या असणाऱ्या बोटीतून समुद्राच्या आत पर्यंत लांब पर्यंत आम्हाला जाता आले. समुद्रातील कोरल्स ची जादुई दुनिया नुसत्या डोळ्यांनी सुद्धा लख्खपणे बघितली आम्ही सर्वांनी !

समुद्राच्या पोटातील या वैभवाचे किती म्हणून वर्णन करावे ! नानाविध प्रकारचे जलचर प्राणी, ज्यांची नावे सुद्धा माहित नाही बरीचशी ! वेगवेगळ्या आकारातील, रंगांतील मासे, मध्येच लागणारे मोठे मोठे खडक, जिवंत कोरल्स मृत पावलेलल्या कोरल्स पासून बनलेले खडक. अप्रतिम विश्व होते ते ! त्यातील काही प्राणी, ज्यांचा आकारही खूप किळसवाणा वाटत होता बघताना. पण जलसंपत्तीचा तेही एक भाग आहेत हे नाकारता येत नव्हते .

मासे मात्र थव्यांनीच सैर करताना दिसत होते. त्यांना पाण्यावर खाण्यासाठी काही टाकले की धावत पळत येणारा त्यांचा थवा मनाला मोहवून टाकायचा! एवढेच स्पष्ट दिसणारे कोरल्स भारतात क्वचितच एखाद्या समुद्रात असतील. पण हा वरतून विलक्षण सुंदर दिसणारा समुद्र आत खोलपर्यंत पोटातूनही तेवढाच सुंदर दिसत होता यात दुमत नाहीच. एक वेगळी दुनिया बघावयास मिळाली सजीवांची !

बेटावर फिरताना स्थानिक व्यक्ती दिसला की त्याला बोलते करत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. भाषे संदर्भात एकाने सांगितले की यांची बोलीभाषा ‘जिझरी’ ही आहे. केवळ बोलण्या इतपतच उपयोगात आणली जाते. या भाषेची लिपी नाहीए . जिझेरी ही भाषा, सर्व दाक्षिणात्य भाषा उदाहरणार्थ मल्याळम, तेलुगू, कानडा, एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील मराठी या सर्व भाषांची सरमिसळ होऊन बनलेली आहे. लिहिण्यासाठी मल्याळम लिपी आहे. आणि इंग्रजीचे भाषेचा बोलण्यासाठी व लिपीसाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होताना दिसतो.
दळणवळणाचा एकमेव मार्ग म्हणजे समुद्र मार्ग, उपलब्ध आहे या ठिकाणी. काही नैसर्गिक आपत्ती आल्यास आम्हाला मात्र मदत उपलब्ध होईल किंवा नाही अशी भीती वाटते.ही खंत एकाने बोलून दाखवली. पण नेमक्याच केरळमध्ये येऊन गेलेल्या पुराच्या वेळी पूरग्रस्तांना आमच्याकडून आम्ही जमेल तेवढी मदत केली असेही त्याने अभिमानाने नमूद केले.

असे हे लोक सोज्वळ, स्वाभिमानी, माणुसकी असणारे ,सहृदयी, कणखर बांधा असणारे, मेहनती आहेत. तसेच ते सुशिक्षितही आहेत हे लगेच लक्षात आले.

कावरत्ती येथेच दुपारच्या जेवणानंतर गावात थोडी सफर केली .एक प्लॅनिटोरियम सेंटर बघितले. विज्ञानावर ,भौतिक शास्त्रावर आधारित सिद्धांतांवर उदाहरणार्थ आईन्स्टाईन, , गॅलिलिओ, न्यूटन इत्यादी शास्त्रज्ञांच्या सिद्धांतांवर आधारित बघितलेली डॉक्युमेंटरी फिल्म आणि प्रदर्शन खूपच माहितीपूर्ण होते. काहीजणांनी ते अभ्यासू नजरेतून बघितले तर काहीजणांनी बाहेर उष्णतेने अंगाची झालेली लाही लाही शमवण्यासाठी प्लॅनिटोरियम च्या थंडगार अशा हॉलमध्ये चक्क एक डुलकी घेतली. कावरात्ती च्या किनार्‍यावरून निघण्यापूर्वी तेथील मुला-मुलींनी केलेले लोकनृत्य बघत बघत चहा आणि नारळाच्या गोड सारणाने बनवलेले रोल खाऊन क्रूज वर जाण्यासाठी बोटीवर स्वार झालो आम्ही सर्व.

दररोज प्रमाणे रात्री डिनर व त्यानंतर रिक्रिएशन हॉलमध्ये जमत मेडिकोज ७८, या समुहाबरोबर कार्यक्रमाचा आनंद घेतला.

खरे म्हणजे आम्हाला या समुहाच्या विविधांगी कार्यक्रमाचे, त्याच्या आयोजनाचे फार कौतुक वाटले. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात, तो कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असेल तरीही निवृत्त होणे अपरिहार्य बाब आहे. वयोमानानुसार, नियमानुसार हे वास्तव स्विकारावेच लागते. निवृत्तीनंतरच्या आपल्या आर्थिक योजना कशा स्वरुपात असावयास हव्यात?जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कसे बदल अपेक्षित आहेत किंवा आर्थिक गोष्टींचे नियोजन व संग्रहण कसे असावे? यावर एक सुंदर चर्चासत्र झाले. ते प्रत्येकासाठीच फार उपयोगी होते. वर्तमानात मुक्तपणे आनंद उपभोगत असताना भविष्य काळाबाबत गंभीर होण्यासाठी आणि भविष्यकाळ, वार्धक्य सुकर होण्यासाठी या कार्यक्रमातून मिळालेला परिपाठ खूपच मार्गदर्शक ठरला सर्वांनाच. यात शंकाच नाही.

कार्यक्रम संपेपर्यंत निद्रादेवीने डोळ्यावर थाप दिली होती. सर्वांनी आपल्या केबिनमध्ये जाऊन तिचे मनापासून स्वागत केले. नवा सूर्योदय डेकवरून बघण्यासाठीचा संकल्प करत……

मिनिकॉय हे आमच्या सागरी सफरीची शेवटचे ठिकाण. सर्वात लांब असणारेही. कवरत्तीहून येथे पोहोंचण्याचा क्रूझचा प्रवास तब्बल आठ तासांचा होता. पहिल्या दिवसापासून माझ्या मनात एक शंका असायची, क्रुझ जेथे थांबते दररोज, तेथे कोणते स्टेशन असावे? इतर सर्व प्रवास प्रकारांत स्टेशन आल्या नंतरच वाहन थांबल्याचे बघण्याची सवय असते आपल्याला. पण या प्रवासात क्रुझ जेथे थांबते तेथे चोहोबाजूंनी प्रचंड मोठा समुद्रच दिसायचा. कोणते गाव असेल? याचा काहीच बोध होत नव्हता. चौकशीअंती समजले की क्रुझपार्किंग करण्यासाठी समुद्राची खोली किमान पंधरा मीटर पेक्षा जास्तच असावी लागते. त्याशिवाय तिला उभी करता येतच नाही. म्हणूनच या ठिकाणाहून इतर बेटांवर छोट्या बोटीतून जावे लागते.

मिनिकॉय येथील समुद्रकिनारा बराच उथळ असल्याचे लगेच लक्षात आले. येथे इतर सार्‍या समुद्री खेळां सोबत पॅरासिलिंग या खेळाचा नव्याने आनंद लुटता येणार होता. लक्षद्वीप सफरीमध्ये स्कुबा डायविंग, पॅरासिलिंग या खेळांसाठी किमान मर्यादेची अट होती. त्यामुळे प्रत्येक जण याचा अनुभव घेऊच शकेल असे होऊ शकत नव्हते .पण थायलंड सफरीत आम्ही घेतलेला पॅरासिलिंगच्या सुंदर अनुभवाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही.

या सफरीचे मला जाणवलेले आणखी एक चांगले वैशिष्ट्य असे की, या सर्वच बेटांवर मद्य बंदी आहे. कोणत्याही नशा आणणाऱ्या पदार्थांना घेऊन जाण्याची पूर्णपणे बंदी आहे. मला वाटतं त्यामुळेच येथे एकही युरोपियन फिरकत नसावा. नाहीतर या बेटांचे गोवा व्हावयास वेळ लागला नसता.

मिनिकॉय बेटावर १८८५ मध्ये ब्रिटिशांनी बांधून लोकार्पण केलेले लाईट हाऊस बघितले. आरमारावर लक्ष ठेवण्यासाठी, भारतीय सागराच्या हद्दीत इतर राष्ट्रांचे अतिक्रमण होत नाहीये ना? यावर निरीक्षण ठेवण्यासाठी एक भव्य असे निरीक्षणगृह त्यांनी बांधले होते. लाईट हाऊस या ठिकाणाला भेट देणे हा खूप मस्त जरासा साहसी अनुभव होता. ४१.७०मि. असणारे, भव्य घुमटाच्या आकारात बांधलेल्या या लाइट हाऊस ला तब्बल दोनशे पायर्‍या आहेत. अप्रतिम स्थापत्यकलेची ओळख सांगणारी ही बिल्डिंग बांधून किमान दोन शतकं झाली असावीत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे ! सर्व पायऱ्या या लोखंडी जिन्याच्या सहाय्याने गोलाकार बनवलेल्या आहेत. एका वेळेला एकच व्यक्ती वर चढू किंवा खाली उतरू शकते. शेवटच्या बारा पायऱ्या तर खूपच म्हणजे प्रत्येक पायरी दीड फूट उंच असून व अति अरुंद आहेत. आपण ज्यावेळी पायर्‍या चढून वर जातो ना, तेव्हा एखाद्या लादनीतून किंवा भुयारातून वरती चढून जात असल्याचा अनुभव येतो. तिथे पोहोंचल्यानंतर आपल्याला एक प्रिझम दिसतो. म्हणजेच ज्यात भरपूर मोठ्या वॅट्सचे तीन लाईटस् बसवलेले आहेत. आणि ते सारखे ब्लींक होत राहतात. सर्वात वरच्या लेव्हल वर पोहोंचल्या नंतर दिसणारे सागराचे भव्य दर्शन, हिरव्यागार नारळाच्या बागा, आणि मनसोक्त वाहणारा हवेचा स्त्रोत यांच्या समन्वयाने मिळणारा अनुभव व्यक्त करावयास शब्द खरोखरच तोकडे पडतात. अगदीच अवर्णनीय असणारा हा डोळ्यांचे पारणे फेडणारा देखावा आपल्याला या निसर्गापुढे नतमस्तक व्हावयास लावतो. तेथून खाली उतरले की आपली ही सागरी सफर सुफळ संपन्न झाली आहे. याची प्रचिती येतेच .

फोर व्हिलरमधून रिसॉर्टवर परतल्यानंतर खेळलेली अंताक्षरी खूपच लक्षात राहिली.

पुन्हा एकदा पारदर्शक काचेच्या बोटीतून समुद्राच्या पोटातील कोरल्सचे निरीक्षण केले. या बेटावरही लोकनृत्य सादर करत पर्यटकांचे मनोरंजन केले तेथील लोकांनी.

मिनिकॉय यथे मात्र बोलीभाषा मालदिवी असल्याचे समजले .आम्ही येथे असणाऱ्या गावात फेरफटका मारला. येथील पंचायतीचे ऑफिस एका मोठ्या जुन्या वाड्यात पारंपरिक पद्धतीची आसन व्यवस्था ठेवून वेगळेपण दाखवत होती.हे बघत बघत चहा पाणी आणि सामोसा खाल्ला . मनावर मलई धरणाऱ्या समाधानाने सूर्यास्ताचे साक्षी होत, आम्ही बोटीने आमच्या क्रुझवर परतलो.

२७ नोव्हेंबर, आमच्या क्रुझ वरचा हा शेवटचा दिवस. यावेळी मेडिकोज ७८समुहाच्या सान्निध्यातील धमाल करमणूक करण्याची, या सहलीतील ही शेवटची रात्र.ही सुध्दा वेगळेपणाने साजरी होईल याची पुरेपूर दक्षता घेतली होती आयोजकांनी. आज एका डॉक्टर दाम्पत्याची मॅरेज ॲनिवरसरी होती. पूर्वीची दोन दाम्पत्यांची लग्न वैदिक पद्धतीने लावल्यानंतर, हे लग्न मात्र आम्ही रजिस्टर्ड पद्धतीने, व्यवस्थित रजिस्ट्रेशन ऑफिस चा देखावा ऊभा करत, प्रत्यक्ष ऑफिसर्स, दोन्ही बाजूचे वकील, नवरा नवरी अशा साग्रसंगीत पद्धतीने लावले. यासाठी एक छोटी नाटिका तयार करून धमाल विनोद घडवणारे संवाद ऐकताना हसून हसून मुरकुंडी वळली सर्वांची !

दोन डॉक्टरांनी मिळून एक छोटी तेलगू नाटिका सर्वांची दाद मिळवून गेली.

याशिवाय आजच्या या कार्यक्रमात बऱ्याच जणांनी मनोगत व्यक्त करत एकूणच प्रवासाचे अनुभव, मिळालेला आनंद, त्याच्या कृतकृत्यतेचे वर्णन करत कृतज्ञता व्यक्त केली.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंचावन्न प्लस झालेल्या या वयामध्ये सर्वच डॉक्टरांनी पर्यायाने इतर लोकांनीही आपल्या दिनचर्येत, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये, आपल्या व्यायाम पद्धतीमध्ये आपण घेत असणाऱ्या झोपेकडे एकूणच वैयक्तिक आयुष्यात कसे बारकाईने लक्ष द्यावयास हवे? याचे खूप सुंदर पद्धतीने समुपदेशन करत सर्वांना आपल्या आरोग्याबाबत सजग बनवले एका डॉक्टर दाम्पत्याने.

रात्री उशिरापर्यंत डेक वर सर्वच पर्यटकांसाठी क्रुझ मॅनेजरने आयोजित केलेल्या मेलडी नाईट मध्ये बरेच जण सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशीची पहाट, डेकवरून बघितलेला सूर्योदय या गोष्टी मनाला हुरहूर लावणाऱ्या ठरल्या. कारण गेली पाच दिवस या निमित्त्याने मिळणारे अनेक चांगले क्षण त्यांची अनुभूती या दिवशी संपणार होती. या दिवशी बहुतेक सर्वजण डेकवर आले होते. प्रत्येकाने परस्परांशी निरोपाचा संवाद साधत पुन्हा अशीच एखादी टूर करण्याचे आश्वासन दिले.या दिवशीचा आमचा शेवटचा ब्रेकफास्ट आटोपून रिक्रिएशन हॉलमध्ये २८नोव्हेंबर चा खास कार्यक्रम साजरा करण्यासाठी आम्ही सर्व जमलो. निमित्त होते समूहातील एका डॉक्टरांचा वाढदिवस. मस्त केक कापून तो साजरा केला. शुभेच्छा देत देत. टूर मॅनेजरची चांगली सेवा दिल्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली .या नंतर फोटो शूटिंग ची धमाल अनुभवली या सार्‍या धामधुमीत कोची केव्हा आले ते समजलेच नाही.

कोची आल्यानंतरही सर्वजण डेक वर पुन्हा गेले. आणि क्रुझला धक्क्यावर लावतानाची सर्व किमया, कौशल्य, तंत्रज्ञान आम्ही सर्वांनी जवळून बघितले.

कोची या मध्यवर्ती ठिकाणावरून सर्वांचे रस्ते वेगवेगळे झाले. परस्परांचा निरोप पुन्हा एकदा स्विकारला. आम्ही दोघं वेगळ्या क्षेत्रातील असतानासुद्धा मेडिकोज ७८ या समूहात अगदी घरच्या माणसांप्रमाणे आहोत असे सारखे वाटत राहिले. समान कार्यक्षेत्र असणाऱ्या अनेक व्यक्तींच्या समुहाने गेट-टुगेदर कशा पद्धतीने आदर्शत्वाच्या वाटेवरून चालावयास हवे.याचे एक उत्तम उदाहरण, आम्ही त्याचाच एक भाग बनत जवळून अनुभवला. कृतार्थ भावनेने घरी परतलो. खूप साऱ्या आठवणी गोळा करत अजूनही त्यातच रेंगाळत आहोतच. म्हणूनच प्रवास वर्णन लिहून पुनःप्रत्ययाचा आनंद मिळवत आहोत…….

© नंदिनी म. देशपांडे
५ डिसेंबर २०१८ 

Avatar
About नंदिनी मधुकर देशपांडे 18 Articles
ललित लिखाणाची खास आवड आहे. मासिकं,दिवाळी अंक, दैनिकातून लेखन करते.'आठवणींचा मोरपिसारा' हा ललित लेख संग्रह प्रकाशित झालेला असून, त्यास प्रथम प्रकाशनाचा पुरस्कार प्राप्त आहे.(२०१६-१७). 'मनमोर'नावाचा ब्लॉग आहे. वाचनाची आवड जोपासणे. शिक्षण. एम.ए. बी.एड. एल.एल.बी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..