थोड्या वेळापूर्वी ” आंटीने वाजविली घंटी ” हा चित्रपट टीव्ही वर लागला होता. १९८८-८९ ला आम्ही इस्लामपूरला असताना एक स्थानिक दिग्दर्शक श्री दिनेश साखरे (ते एका शाळेत शिक्षकही होते) यांनी हा चित्रपट काढला. निळूभाऊ, अलका कुबल, लक्ष्मीकांत बेर्डे , आशा पाटील अशी तगडी स्टारकास्ट. त्याच्या तीन आठवणी –
१) माझ्या पत्नीला एक छोटा रोल (जो एडिटिंग नंतर जवळजवळ अगदीच छोटा झाला) मिळाला होता. दुपारी दोन वाजता शूटिंगसाठी आम्ही साखर कारखान्यावर (साखराळे) पोहोचलो. नुकतेच आम्ही एक तीन अंकी नाटक इस्लामपूरला केले होते त्यामुळे कदाचित दिग्दर्शकांपर्यंत माझ्या पत्नीचे नांव पोहोचले असावे. बराच मोठा रोल तिला प्रॉमिस केला असला तरी प्रत्यक्षात तिला फक्त २-३ वाक्ये होती. आम्हांलाही हा अनुभव नवीन ! साधारण ४-५ रिटेक नंतर सायंकाळी सातच्या सुमारास आम्ही घरी परतलो. ८० टक्के शूटिंग कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर झालं होतं. काही महिन्यांनी चित्रपट इस्लामपूरला लागला. खूप स्थानिक कलावंत असल्याने पहिल्याच दिवशी खच्चून गर्दी होती. आम्ही रात्रीच्या शोला (स्वखर्चाने) गेलो. हाऊस फुलचा बोर्ड ! त्याकाळी सर्रास ब्लॅक चाले. पण तेथेही काम झाले नाही. घरी परतलो. यथावकाश पाहिला. (पाहिला नसता तरी चालले असते. आजही माझ्या मुलाने तो १० मिनिटात बदलला.) आम्हाला आजही अपूर्वाई इतकीच – माझ्या पत्नीने एका मराठी चित्रपटात काम केले. आणि चित्रपटातील कलावंताला सुद्धा स्वतःच्या चित्रपटाचे तिकीट न मिळाल्याने घरी परतावे लागले.
२) दुसरी आठवण – निळूभाऊंची ! गावातल्या एका सरकारी गेस्ट हाऊस च्या एका खोलीत त्यांची राहायची सोय केली होती. प्राचार्य जोगळेकरांच्या सांगण्यावरून आम्ही त्यांना आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात बोलाविले. नुकत्याच पार पडलेल्या रक्तदान शिबिराची प्रशस्तिपत्रे त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना वाटली. त्यानंतर ” निळूभाऊ उत्तर द्याल?” असा मुलाखतवजा कार्यक्रम मी केला. बॉक्समध्ये खूप प्रश्न आधीच सगळ्यांनी टाकले होते, त्यातील निवडक प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. सुमारे दोन तास ते कॉलेज वर होते- एक संयत /अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्व ! आणि अर्थातच जनमानसातील प्रतिमेशी विसंगतही !!
३) आमच्या अंतिम वर्ष पदवी आणि पदविका विद्यार्थ्यांसाठी “निरोप सोहोळा ” आम्ही आयोजित केला होता. त्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून अलका कुबल यांना बोलाविले होते. त्यांच्या प्रतिमेशी विसंगत असा जीन्सची पॅन्ट आणि टी -शर्ट असा पोशाख करून त्या आल्या होत्या. त्याही सुमारे तासभर महाविद्यालयात थांबल्या होत्या.
आज या तिन्ही आठवणी जाग्या झाल्या.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply