नाव वाचून आश्चर्य वाटलं ना ?
मग तुम्हाला सगळी ष्टोरी सांगायलाच हवी .
तारीख : ३१ ऑगस्ट २०१९
वेळ : सकाळी ६ ते रात्री ९
स्थळ : ठाणे ते पुणे एक्सप्रेस हायवे , पुणे ते रत्नागिरी व्हाया कोकरूड , थोडक्यात मुंबई गोवा महामार्गावरील प्रचंड खड्डे आणि दरवर्षीची अपरिहार्य असणारी ट्रॅफिकमधील घुसमट टाळण्यासाठी ठाणे पुणे रत्नागिरी असा मार्ग धरलेला . एका अर्थानं ट्रॅफिक जॅमला कात्रजचा घाट दाखविण्याचा प्लॅन . मुंबईहून जाणाऱ्या चाकरमान्यांसारखी आपली अवस्था होऊ नये म्हणून माझ्यामते दूरदृष्टीने घेतलेली काळजी.
सोबत अवलोकनार्थ छायाचित्र, त्याचा संदर्भ पुढे येईलच .
मुंबईचा सुप्रसिद्ध पाऊस आणि अवतीभवती किड्यामुंग्यांसारखी प्रचंड संख्येनं असलेली लहानमोठी वाहने , असा प्रवास सुरू झाला .
सुरुवातीला पावसाचं , जॅम झालेल्या ट्रॅफिक प्रचंड कौतुक वाटलं , गाडीत बसल्याबसल्या फोटोसेशनसुद्धा झालं . या अमानवी ट्रॅफिक जॅममध्ये सुद्धा चालक किती सफाईदारपणे गाडी चालवतात वगैरे शाबासकी देऊन झाली .
अंदाजे एक तासानंतर कौतुकाची जागा संतापाने आणि ज्याला मराठी साहित्यात शाब्दिक हिंसा म्हटलं जातं त्या शिवराळ भाषेने घेतली . कारण आमची गाडी एका एका सेंटीमीटरने पुढे सरकत होती . आमचे चालक कुलकर्णी सफाईदारपणे आणि त्यांच्या ओघवत्या अ ,म , भ च्या बाराखडीतील येणाऱ्या शब्दातून व्यक्त होत होते . मध्येच हूल देणे, काही सेकंद थांबून भसकन गाडी पुढे नेणे वगैरे प्रकार करून ते पुढे सरकण्यासाठी चोरट्या धावा घेत होते .
कधीकधी त्यांचा रुद्रावतार बघून काहीजण गपगुमान बाजूला होत होते .
मध्येच केव्हातरी नाश्ता वगैरे पटकन उरकून पुन्हा ट्रॅफिक मध्ये झोकून घेतले.
सातारा येईपर्यंत हा अमानवी अनुभव आम्ही घेतला .
मात्र त्याअगोदर खेड शिवापुरच्या दरम्यान एक विलक्षण गोष्ट आमच्या लक्षात आली .
लोणावळ्यापासून एक टेम्पो आमच्या समोरुन जात होता , कधी आम्ही त्याच्या बरोबर जात होतो, ट्रॅफिक मध्ये असं होत असतं. इतका वेळ आमचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं , कारण लक्षात घ्यावं असं काही नव्हतं . तुम्हीही पहा ते छायाचित्र झूम करून.
डाव्या बाजूला ट्रॅफिक जॅम दिसेल . उघड्या टेम्पोत दोन कामगार दिसतील .बरोबर खूप काही समान . यात लक्षात ते काय ठेवायचं , असं तुम्हाला वाटेल . अगदी बरोबर . आम्हीही लक्ष दिलं नव्हतं . पण खेड शिवापुरच्या दरम्यान टेम्पोत वेगळी हालचाल सुरू झाली आणि अभावितपणे आमचं लक्ष तिकडे गेलं आणि खूप वेळ मग ते आम्ही बघत बसलो .
पुन्हा एकदा चित्र झूम करून बघा .
पुढं बसलेल्या कामगाराच्या पायाजवळ स्टोव्ह आहे. आम्हाला काही कळायच्या आत त्याने स्टोव्ह प्रज्वलित केला .त्यावर भांडं ठेवलं .दोघांनीही जवळच्या पाण्याच्या जार मधून पाणी काढून हात धुतले , पोहे धुतले , एकाने कांदा कापला आणि रीतसर फोडणीला टाकला .कांद्याच्या फोडणीचा स्वर्गीय गंध आसमंतात दरवळला . पोहे न खाताच त्याची चव आम्हाला कळली होती . कारण त्या चवीला कष्टकऱ्याच्या हाताचा सुवर्णस्पर्श झाला होता .दरम्यान आम्ही काचा खाली करून संवाद साधला . मग कळलं ते सगळे एका ठेकेदाराकडे कामाला होते .ट्रॅफिक मध्ये अडकल्याने नंतर जेवायला मिळणार नाही म्हणून हा नाश्ता त्यांनी तयार केला होता . मग आम्ही त्याला फोटोसाठी विनंती केली , त्यानं हसतमुखान ती मान्य केली , तो हा फोटो !
ष्टोरी इथे संपते , पण अनेक प्रश्नांना जन्म देऊन…
वाटलं ,कसलं हे आयुष्य ?
हे लोक कमावतात किती , तरीही हसतमुख कसे ?
आम्ही स्वच्छतेचे ढोल वाजवतो , पण यांची स्वच्छता कुणाला कशी दिसणार ?
ट्रॅफिक मध्ये अडकल्यावर आमचा संताप होतो , पण हे मात्र त्यापरिस्थितीवर मात करतात , हे त्यांना कोण शिकवतो ?
यांना घरदार , ऐशोआराम, भौतिक सुखे याबद्दल काहीच आणि कधीच प्रश्न पडत नसतील ?
हे आणि असे अनेक प्रश्न मनात घेऊन आमचा त्यादिवशीचा कांदे पोह्यांनी भारलेला प्रवास संपला . आता जेव्हा जेव्हा कांदेपोहे खायला घेईन तेव्हा , ‘त्यांची’ आठवण नक्कीच येईल !
— डॉ .श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
अद्वितीय कारकीर्द खूप खूप अभिनंदन. अशीच उत्तरोत्तर बहरत जाओ.