मुक्काम पोस्ट एक हजारमुळे माझ्याकडे असलेल्या मर्यादित वेळेची मला प्रो. अरुण गाडगीळ याने भिवंडी कॉलेजसाठी माझा कार्यक्रम आयोजित केला. महाराष्ट्र राज्य अल्पबचत योजनेतर्फे केंद्रिय अपंग कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी मान्यवर गायिका पुष्पा पागधरे, चंद्रशेखर गाडगीळ आणि श्याम हर्डीकर यांच्याबरोबर खोपोली, रोहा आणि ठाणे येथे तीन कार्यक्रम केले. या मदतीसाठी अजून दोन कार्यक्रम पालघर आणि डहाणू येथे सादर केले. या कार्यक्रमांना सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ आणि मुकेश खन्ना उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री शरद पवार, अर्थमंत्री सुशीलकुमार शिंदे, ठाण्यातील शिवसेनेचे सर्वेसर्वा आनंद दिघेसाहेब आणि महापौर वसंत डावखरे यांच्या विशेष उपस्थितीत माझा कार्यक्रम झाला. कलर सोसायटी ऑफ इंडियाच्या अॅन्युअल कॉन्फरन्समध्ये भक्तीसंगीताचा कार्यक्रम मी मुंबईच्या हॉटेल लीला येथे सादर केला. सुप्रसिद्ध कवी शांताराम नांदगावकर यांच्या ‘रजनीगंधा’ या कार्यक्रमात मान्यवर गायक शरद जांभेकर, अरुण इंगळे, शिवानंद पाटील, सुहासिनी चितळे, चंद्रशेखर गाडगीळ यांच्यासोबत मी गायलो.
याचवेळी एक वेगळीच संधी माझ्याकडे चालून आली. सुप्रसिद्ध लेखक श्री. शशिकांत कोनकर यांनी लिहिलेले एक बालनाट्य ‘उंदीर मामा आला कामा’ रंगमंचावर येणार होते. या नाटकाचे संगीत दिग्दर्शन मी केले व त्यातील तीनही गाणी माझ्या आवाजात रेकॉर्ड केली. याबद्दल मी शशिकांत कोनकर यांचा कायम ऋणी राहीन. कारण या संगीत दिग्दर्शनाच्या अनुभवाचा फायदा मला पुढील गाणी गाताना झाला. संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘गंगेच्या काठी’ या टीव्ही फिल्मसाठी एक मराठी काव्य ‘हरवले गंगेच्या काठी’ हे ग.दि. माडगूळकरांचे अप्रतिम गाणे माझ्या आवाजात रेकॉर्ड झाले.
माझ्या आयुष्यातील महत्त्वाची घटना यावेळी घडली. माझे लग्न ठरले. माटुंगा रोड दादर येथे राहणारी विनीता पटवर्धन नावाची देखणी मुलगी माझ्या आयुष्यात आली. आम्ही अनेकदा भेटलो. तिला गाण्याची खूप आवड होती. पण गाणे आवडणे आणि एखाद्या गायकाची पत्नी होऊन त्याच्याबरोबर सतत गाणे अनुभवणे ह्या खूपच वेगळ्या गोष्टी होत्या. यातील फरक मी तिला समजावून सांगितला. ती किती वेळ गाणे ऐकू शकते हे पाहण्याची संधी मला लवकरच मिळाली. निर्माते सचिन पारेकर आणि संजय पारेकर यांच्या ‘शेजारी-शेजारी’ या मराठी चित्रपटाच्या रेकॉर्डिंगची तयारी सुरू झाली होती. या चित्रपटात मी आघाडीचे मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी पार्श्वगायन करणार होतो. अशोक सराफ यांच्यासाठी सुरेश वाडकर गाणार होते. संगीतकार विश्वास पाटणकर यांनी खूपच मोठा विश्वास माझ्यावर दाखवला होता. या गाण्यासाठी खूपच मेहनत ते माझ्यावर घेत होते.
या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याच्या (एक बायको तुझ्यासारखी नशीबाने भेटली) रेकॉर्डिंगची तारीख लवकरच पक्की झाली. दादरच्या श्री साऊंड स्टुडिओमध्ये दिवसभर या गाण्याचे रेकॉर्डिंग होणार होते. आघाडीचे पार्श्वगायक सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल यांच्याबरोबर मी आणि प्रज्ञा खांडेकर हे गाणे गाणार होतो. या रेकॉर्डिंगचे निमंत्रण मी विनीताला दिले. ती आनंदाने तयार झाली.
सकाळी दहा वाजता सुरू झालेले रेकॉर्डिंग रात्री नऊ वाजता संपले. जराही न कंटाळता संपूर्ण दिवस विनीताने रेकॉर्डिंग एन्जॉय केले. माझा निर्णय पक्का झाला.
५ मार्च १९९० रोजी माझे लग्न झाले. माझे सासरे डॉ. व्यंकटेश पटवर्धन हे प्रथितयश डॉक्टर होते. मेहुणे विद्याधर पटवर्धन हे गुंतवणूक सल्लागार म्हणून स्वतंत्र व्यवसाय करीत होते. विनीताची मोठी बहीण वैजयंती केतकर ही पुण्याला रहात होती. मी एकुलता एक मुलगा असल्याने मला सख्खे भावंड नव्हते. आता पटवर्धन परिवाराचा मी जावई म्हणून सदस्य झाल्यामुळे माझी ती कमी पुरी झाली. माझे साडू मकरंद केतकर यांनी तर थोरल्या भावासारखे माझ्यावर प्रेम केले व आजही करतात.
८ मार्च १९९० रोजी आमच्या लग्नाचा स्वागत समारंभ ठाण्याच्या सेंट जॉन दी बाप्टीस्ट स्कूलच्या भव्य पटांगणावर थाटात साजरा झाला. नातेवाईक आणि मित्रमंडळींसह अनेक नामवंतांची उपस्थिती या समारंभाला लाभली. ठाण्याचे कलेक्टर श्री. पिंगुळकरसाहेब, आयुक्त सुरेश जोशी, ठाण्यातील शिवसेनेचे सर्वेसवा आनंद दिघे साहेब, महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती माननीय वसंत डावखरे यांच्यासह गायिका रंजना जोगळेकर, मृदुला दाढे-जोशी, शोभा जोशी, गायक विनायक जोशी, चंद्रशेखर गाडगीळ, सुप्रसिद्ध शहेनाईवादक शैलेश भागवत, सतारवादक शशांक कट्टी, संगीतकार प्रभाकर पंडित, कवीवर्य शंकर वैद्य आणि मंगेश पाडगावकर यासारखे अनेक मान्यवर समारंभाला उपस्थित होते. माझे वडील लायन्स क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर असल्याने अनेक लायन्स क्लबचे पदाधिकारीही समारंभाला आवर्जून उपस्थित होते. ठाणे वैभवचे संपादक मिलींद बल्लाळसारखे माझे अनेक पत्रकार मित्र समारंभात सामील झाले होते.
माझ्या जीवनाची नवी सुरुवात झाली. लग्नानंतर हनीमूनसाठी आम्ही पुण्याला गेलो. वाचून थोडेसे आश्चर्य वाटेल, पण गोष्ट खरी आहे. कारण पुण्याला संगीतकार राम पेठे यांच्याबरोबर माझी गाण्याची रिहल्सल होती. लग्नसमारंभाच्या गडबडीत अनेक दिवस मी गाण्यापासून दूर होतो. त्यामुळे आता वेळच नव्हता. लवकरच मुंबई दूरदर्शनसाठी मी राम पेठे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘शब्दांच्या पलीकडले’ या कार्यक्रमात गायलो. या कार्यक्रमातील आमच्या समोरील प्रेक्षकात माझी पत्नी प्रियांका आणि माझे सासू-सासरे उपस्थित होते.
लवकरच प्रियांका आमच्या घरात रूळली आणि आमच्या कंपनीच्या कामात सहभागी झाली. तेव्हापासून आजपर्यंत सतत तिची साथ मला लाभली आहे. याही बाबतीत मी नशीबवान ठरलो. कारण घरात जर अशांती असेल, तर कोणीही आपल्या क्षेत्रात काम करताना पूर्ण योगदान देऊ शकत नाही. आपल्या जोडीदाराचे सहकार्य असेल तरच आयुष्याच्या परीक्षेत आपले मार्क वाढतात. त्याचप्रमाणे जोडीदाराचे सहकार्य नसेल तर निगेटीव्ह मार्कंग सिस्टीमप्रमाणे आपले मार्क कमी होतात. आईवडिलांनी पत्रिका पाहून आमचे अरेंज मॅरेज झाले. पण लग्नानंतर प्रेमविवाह झाला.
लग्नानंतर आमच्या कंपनीच्या मार्केटिंगमध्ये मी जातीने लक्ष घातले आणि त्यासाठी भारतभर फिरलो. भाऊ आणि प्रियांका ऑफिस सांभाळत असल्याने मला ते शक्य झाले.
दरम्यानच्या काळात महाराष्ट्राबाहेर बडोदा, अहमदाबाद, इंदौर, कलकत्ता आणि दिल्ली येथे मी गझलचे कार्यक्रम केले. आता कार्यक्रमांची संख्या थोडी कमी होत होती, पण भौगोलिक कक्षा वाढत होत्या.
त्याचे दुसरे कारण असे होते की ‘शेजारी शेजारी’च्या पुढील गाण्यांची तयारी जोरात सुरू होती. लवकरच या चित्रपटाचे टायटल साँग मी सुरेश वाडकरांबरोबर रेकॉर्ड केले आणि सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्याबरोबर एक द्वंद्वगीतही रेकॉर्ड केले.
सुप्रसिद्ध गायक रविंद्र साठे यांच्यामुळे अजून एका रेकॉर्डिंगची संधी मला मिळाली. त्यांनी मला एच.एम.व्ही. स्टुडिओत बोलावून घेतले आणि संगीतकार रघुनाथ सेठ यांची ओळख करून दिली. रघुनाथजी एच.एम. व्ही.साठी दुर्गा चरित्राचे दोन हिंदी अल्बम्स बनवत होते. त्यात गाण्याची संधी त्यांनी मला दिली. या अल्बममध्ये मी रविंद्र साठे, दिलराज कौर, आनंदकुमार सी, घनश्याम वासवानी आणि विनोद सेहगल यांच्याबरोबर गायलो. संपूर्ण महिनाभर एच.एम.व्ही.च्या स्टुडिओत याचे रेकॉर्डिंग सुरू होते. ख्यातनाम संगीतकार यशवंत देव यांनी सारडा ट्रस्टसाठी संपूर्ण ज्ञानेश्वरीचे रेकॉर्डिंग केले. अनेक मान्यवर गायक-गायिकांबरोबर या प्रोजेक्टसाठीही मी अनेक ओव्या गायलो. रेकॉर्डिंगचा भरपूर अनुभव मला मिळत होता आणि भरपूर शिकायला मिळत होते. कारण कार्यक्रमात गाणे आणि रेकॉर्डिंगसाठी गाणे यात जमीन-अस्मानचा फरक असल्याचे मला जाणवले. रेकॉर्डिंगसाठी गाताना गायकाला अचूकता लागते, तर कार्यक्रमासाठी गाताना गाणे रंगवण्याची गरज असते. मला रसिकांचा प्रतिसाद घेत गायला आवडते तर रेकॉर्डिंग रूममध्ये तुमच्यासमोर रसिक प्रेक्षक नसतातच.
यानंतर एअर इंडिया एक्झिक्युटीव्ह क्लबसाठी हॉटेल जुहू सेन्टॉर, मुंबई येथे गझल नाईट सादर केली. याच सुमारास भिवंडीचे श्री. संतमाऊली शांताराम भाऊ जयवंत यांच्या श्री एकनाथ मंदिर संस्थानचे बांधकाम सुरू झाले होते. या पवित्रस्थानी एकनाथ षष्ठीच्या उत्सवात दरवर्षी मी कार्यक्रम गात असल्याने आयोजकांनी या संस्थानच्या मदतनिधीसाठी एक कार्यक्रम करण्याची कल्पना मांडली. यामुळे या कार्यात माझाही खारीचा वाटा असणार याचा मला अतिशय आनंद झाला. कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी मी घेतली. लवकरच ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये सुप्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे यांच्यासह ‘देवाचिये द्वारी’ हा अभंगाचा कार्यक्रम सादर केला. याचे निवेदन आणि निरूपण पुण्याच्या सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती वीणा देव यांनी केले. त्यावेळी टेलिव्हिजनवर रमाबाईंच्या भूमिकेत गाजत असलेली अभिनेत्री मृणाल देव (सध्याच्या मृणाल कुलकर्णी) हिची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली आणि कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. श्री एकनाथ मंदिर संस्थानला भरीव मदतनिधी मिळाला. एकूणच या कार्यक्रमाने मला फार समाधान लाभले. कोणत्याही मदतकार्यात आपण सर्वजण आपल्याला जमेल तितकी आर्थिक मदत करतोच, पण आता एक गायक या नात्याने मला त्यापुढे जाऊनही थोडी मोठी मदत करता येऊ शकते हे मला जाणवले.
यानंतर ‘संकल्प’च्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्तच्या कार्यक्रमात सुरेश वाडकर, विनय मांडके, रंजना जोगळेकर, मिलिंद इंगळे यांच्यासोबत आक्सा बीच, मालाड येथे गायलो आणि त्यानंतर के.जी. ट्रस्ट अॅन्ड फाऊंडेशनच्या मदतीसाठी इस्कॉन ऑडिटोरियम, जुहू येथे २४ नोव्हेंबर १९९१ रोजी गझल नाईट सादर केली.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply