नवीन लेखन...

एक नवी जबाबदारी

‘भावनिक जगातील या उलथापालथीनंतर व्यावहारिक जग माझी वाट पहात होते, भाऊ गेल्यानंतर केवळ दुसऱ्याच दिवशी या व्यावहारिक जगाच्या मैदानात मला उतरावे लागले. कारण आमच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवहार सुरूच होते. माझे काका गजानन जोशी, वसंत जोशी, श्रीकृष्ण जोशी, माझे मामा सुरेश धनवटकर आणि आमच्या कंपनीचे चार्टर्ड अकाऊंटंट आणि भाऊंचे जवळचे मित्र सहदेव चौगुले यांच्या सल्ल्यानुसार माझे दुःख बाजूला ठेऊन आमच्या कंपनीचा चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर झालो. कंपनीची संपूर्ण जबाबदारी मी घेतली. या कामात अनेकांचे सहकार्य मला लाभले. आमच्या कंपनीचे सप्लायर नानाकाका घाटे, प्रभाकर धामणकर, प्रकाशमामा धामणकर, भाऊंचे मित्र चिदानंद भूमकर, आमच्या कंपनीचा स्टाफ, प्रामुख्याने नामदेव फाटे, चंद्रकांत कदम, सुधीर फाटे, महेंद्र प्रसाद सिंग, संजय ठाकरे या सर्वांचा मी कायम ऋणी राहीन.

या सर्व कामांच्या व्यापात असतानाच अजून एका जबाबदारीची जाणीव मला झाली. भाऊंनी अनेक शेअर्स आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली होती. त्याबद्दलचे काही प्राथमिक शिक्षण भाऊंनी आणि माझा मित्र विनय देवस्थळी यांनी मला दिले होते. माझे मेव्हणे विद्याधर पटवर्धन हे गुंतवणूक सल्लागारच होते. त्यांनी मला फार मोलाची मदत केली. १९९१ चा तो काळ कागदी शेअर्सचा होता. त्यामुळे शेअर्स ट्रान्सफर करणे हे फार जिकिरीचे आणि वेळ घेणारे काम होते. कंपनीच्या कामामुळे दिवसभराचा वेळ माझ्याकडे नव्हताच. मग रोज रात्री तीन वाजेपर्यंतचा वेळ मी या कामासाठी दिला. कधी कधी असे घडते की एखादे संकट किंवा एखादी अडचण आपल्यासाठी एका नव्या क्षेत्राचे दालन खुले करते, फार मोठी संधी आपल्याला उपलब्ध करून देते. माझ्या बाबतीत नेमके हेच घडले. सुरवातीला कंटाळवाणे वाटणारे हे काम हळुहळू मला आवडायला लागले. हे शेअर ट्रान्सफरचे काम मला शेअर मार्केटकडे नेऊ लागले. मी शेअर मार्केटचा अभ्यास करायला लागलो. एक-दोन महिन्यातच म्हणजे फेब्रुवारी १९९२ ला हर्षद मेहता यांच्यामुळे शेअर मार्केट खूपच तेजीत आले. माझ्याकडील शेअर्सचे भाव बरेच वाढले. शेअर मार्केटमध्ये मी अगदीच नवा होतो. शेअर्सचे भाव अजून वाढतील या मोहात न पडता मी सगळे शेअर्स विकून टाकले. मला भरपूरच फायदा मिळाला. खरे म्हणजे गुंतवणूक भाऊंनीच केली होती, पण मी शेअर्स वेळेवर विकल्यामुळे फायदा मला मिळाला. माझा निर्णय योग्य ठरला. कारण काही महिन्यातच हर्षद मेहता यांना अटक झाली आणि शेअर्सचे भाव कोसळले. मी वेळेतच फायदा घेतल्याने पुन्हा शेअर्स खरेदी करण्यासाठी माझ्याकडे पैसे होते. एकूण शेअर मार्केटमध्ये मला चांगले यश मिळाले. त्यानंतर शेअर मार्केटवरील सुमारे सत्तर पुस्तके मी वाचली. त्यांचा अभ्यास केला. शेअर्सवरील अनेक सेमिनारना मी उपस्थित राहिलो आणि माझ्या ध्यानात आले की इन्व्हेस्टर किंवा गुंतवणूकदार हे एक मोठे करिअरच आहे. आपण मराठी माणसे या क्षेत्रापासून थोडे दूर असतो. मला हे क्षेत्र अतिशय आवडले. मी इन्व्हेस्टर बनलो आणि रिअल इस्टेटमध्येही गुंतवणुकीला सुरुवात केली. व्ही.जे.टी.आय. पासूनचा माझा इंजिनीयर मित्र संजय खरे हा सुद्धा एक चांगला इन्व्हेस्टर होता. त्याच्याच भाषेत सांगायचे तर मी एक चांगला इन्व्हेस्टर आहे हे महत्त्वाचे. तशी माझी इंजिनिअरींग उपकरणे बनवणारी फॅक्टरीदेखील आहे. संजयची आणि माझी मैत्री होतीच. पण आता केवळ गुंतवणूक या विषयावर बोलण्यासाठी आम्ही महिन्यातून किमान दोन वेळा भेटायचे ठरवले. १९९२ पासून आजपर्यंत हा प्रघात चालू आहे. गुंतवणूकदार म्हणून आम्हा दोघांनाही याचा प्रचंड फायदा झाला आणि होत आहे.

गुंतवणूकदार झाल्यावर तुम्ही नव्हे, तर तुमची गुंतवणुकीची रक्कम काम करते. तुम्हाला मोकळा वेळ जास्त मिळू शकतो. याचा फायदा माझ्या गाण्याच्या तयारीसाठी मिळाला. शिवाय गुंतवणुकीतून पैसे मिळत असल्यामुळे केवळ पैसे मिळवण्यासाठी करावे लागणारे गाण्यातील प्रोजेक्टस् मला करावे लागले नाहीत. हा सुद्धा मोठा फायदा मला झाला.

-अनिरुद्ध जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..