विजयच आयुष्य गरिबीत गेलं असलं तरी दुःखात गेलं नव्हतं. परिस्थिती कशीही असो आपला आनंद हा आपल्यालाच शोधावा लागतो. हे विजय शिकला होता. अगदी लहान असल्यापासून त्याने त्याचा आनंद छोट्या छोट्या गोष्टीत शोधला होता. पण विजय सामान्य मुलांसारखा नव्हता तो लहानपणा पासूनच इतरांपेक्षा वेगळा होता. त्याच्यात प्रचंड जिज्ञासा वृत्ती होती. तो सतत नाविण्याच्या शोधात असे. त्यामुळेच प्रेमाच्या बाबतीतही तो कोणा एकीत फारकाळ रमू शकला नाही. त्याचे विचार तेही जगावेगळे होते. तो सामान्य माणसासारखा विचार करूच शकत नव्हता. प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहण्याची त्याला सवयच जडली होती म्हणूनच देव या संकल्पनेवर त्याचा अजिबात विश्वास बसत नसे. कोणी म्हणतंय किंवा कोणी म्हणालं म्हणून तो कोणाच्याही कोणत्याही म्हणण्यावर विश्वास ठेवत नसे. ती सवय मात्र विजयने अजूनही सोडली नाही. तो जे काही शिकतो, वचतो आणि ऐकतोही ते स्वतःच्या बुद्धीने नीट पडताळून पाहून खात्री पटेपर्यत स्वीकारत नाही.
विजय लहान असताना म्हणजे शाळेच्या प्रथम वर्षात शिकत असताना तो शाळेत आरे मधून जात येत असे. तेंव्हा त्याच्यासोबत त्याची बालमैत्रीण निता त्याच्या सोबत असायची आणि त्यांना शाळेत आणायला आणि सोडायला कधी विजयची आई तर कधी निताची आई येत असे. निता ही विजयची सख्खी शेजारीणही होती. विजयच बरंच बालपण तिच्यासोबत खेळण्यात गेलं होतं. निताची आई ही विजयच्या आईची सर्वात जवळची मैत्रीण होती. दोघी एकमेकींच्या सुख दुःखाच्या सोबती होत्या. विजय दहावीला असताना परीक्षेला जायला विजयकडे एकदिवस बससाठी पैसे नव्हते. तेंव्हा ते त्यांनी दिले होते. फक्त या एका उपकारासाठी त्यांचा प्रति सदैव ऋणात होता. निताच्या आईचा एक गुण विजयला प्रचंड आवडत असे तो म्हणजे ही बाई सर्वांचे सर्व म्हणणे ऐकून घेत असे पण कधीच इकडचे बोलणे तिकडे करत नसे. तर तेंव्हा आरेत शेती केली जायची तर शेतात एक बाईच बुजगावण उभं केलं होतं म्हणजे खऱ्या बाईसारखा दिसावा असा बाईचा सुंदर पुतळा उभा केलेला होता. विजय रोज जाता येताना तो मनमोहक पुतळा पाहात असे. काही महिन्यांनी तो पुतळा तेथून काढला असेल पण तो पुतळा तेथे न दिसल्यामुळे विजय अस्वस्थ होत होता. त्याला अनेक प्रश्न सतावत होते, ती बाई कोठे गेली असेल? ती अदृष्य तर झाली नसेल? ती फक्त मला तर दिसत नव्हती? त्यापुढे जाऊन विजयच्या मनात हा ही विचार आला होता. ती भूत तर नव्हती ना?
दोन वर्षानी विजयने ती शाळा सोडली पण त्यांनंतरही त्या रस्त्याने जाताना त्याला ती बाई आठवायची ! आणि त्याच्या मनात एक अनोळखी भीतीची लहर निर्माण व्हायची.. विजय देव गणाचा असल्यामुळे फार घाबरला नव्हता. निता मनुष्य गणाची होती. विजय आणि निता नंतर ज्या शाळेत जात होते ती शाळा जंगलं तोडून बांधली होती म्हणजे पूर्वी त्या जागेत मृत व्यक्ती पुरल्या अथवा जाळल्या जात होत्या असे म्हणतात. एक दिवस दुपारच्या वेळेला ती त्या शाळेच्या आसपास झपाटली गेली. म्हणजे साधारणतः तेव्हां ती आठ वर्षाची होती म्हणजे नाटकं वगैरे करण्याची बुद्धी तिला नव्हती. तिला झपाटल्यानंतर ती वेड्यासारखी करायला लागली. अंगावरील कपडे काढून फेकू लागली स्वतःच स्वतःचे केस ओढू लागली. तिला खाण्यापिण्याची शुद्ध नव्हती. वेड्यासारखी इकडून तिकडे फिरत राहायची. तिच्या आईबाबांनी बऱ्याच मांत्रिकांना, भगतांना, भूत उतरविणाऱ्यांना दाखविले पण काही फरक पडतच नव्हता. सर्वांचे प्रयत्न फसल्यावर एक दिवस विजयचे बाबा निताच्या आईला म्हणाले,” माझे एक मामा आहेत, ते मांत्रिक नाहीत तर शिवभक्त आहेत. ते लहान असतानाच एक दिवस त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला आणि त्यांनी सर्व अभक्ष भक्षण करणे सोडून दिले ते कांदा लसुणही खात नाहीत. दादरला त्यांचे एक शंकराचे मंदिर आहे आपण एक प्रयत्न म्हणून निताला त्यांच्याकडे घेऊन जाऊ ! निताची आई लगेच तयार झाली. विजयचे बाबा आणि निताचे बाबा तिला घेऊन ! विजयच्या बाबांच्या मामाकडे गेले आणि त्यांना सारा प्रकार कथन केला. त्यांनी तिला आत मंदिरात घेतले आणि दरवाजा बंद केला तर ती दरवाज्याच्या फटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. . विजयच्या बाबांच्या मामांनी काही मंत्र मनातल्या मनात बोलून तिला तिथलाअंगारा लावला आणि घरी घेऊन जा म्हणाले. त्यांनी यासाठी एक रुपयाही घेतला नाही किंवा रुपया खर्चही करायला लावला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी निशा काहीच झाले नाही अशी झोपेतून जागी झाली आणि दुकानावर बटर विकत आणायला गेली. त्यानंतर तिला तसा त्रास पुन्हा कधीही झाला नाही.
आता तिचं लग्न होऊन दोन मुलंही झाली आणि ती सुखाने संसार करत आहे. तिचा लहान भाऊ नितेश विजयहून तीन वर्षानी लहान पण विजयचा मित्र होता. तो त्याच्या आयुष्यातील सर्व गुपिते विजयला सांगत असे आणि विजयची बरीच गुपिते त्यालाही माहीत होती. नंतर विजय कामाला राहिला आणि त्याच्या जगातच रमू लागला. नितेश मात्र आयुष्याच्या स्पर्धेत थोडा मागे राहिला. त्याचा त्याला मानसिक त्रास होऊ लागला आणि त्याजवळ व्यक्त व्हायला कोणी नव्हतं. कारण सर्व मित्र मंडळी आपले नवीन आकाश शोधण्यात गुंग होते. त्यामुळे दिवसभर विचार करून करून त्याचा मानसिक त्रास वाढत गेला. आणि तो वेड्यासारखा करायला लागला त्याला भूत बाधा नाही हे त्याच्या आईने ओळखले होते तरी लोकांच्या सांगण्यावरून त्याला एका भगताकडे घेऊन गेले. विजयही तेंव्हा सोबत होता कारण भगत त्याने कधी पहिला नव्हता. दहाबारा हजार घेऊन त्याने काही बाई केले म्हणजे तेच कोंबडा वगैरे उतरवणे पण त्याला भूतबाधा झालीच नव्हती तर तो काय बरा होणार? त्याच्या मेंदू वरचा ताबा सुटण्याचं खरं कारण विजयला नंतर कळलं ते असं होतं. त्याच्या आईने त्याच्या डोक्यात त्याचं लग्न त्याच्या मामाच्या सुंदर मुलीशी होण्याचं भरलं होतं म्हणजे तसं बोलणी झाली होती. पण त्याच्या मामाने ती मुलगी अठरा वर्षाची होताच तिचं लग्न लग्न एक श्रीमंत स्थळ येताच त्याच्याशी लावून दिल. त्या गोष्टीचा मानसिक त्रास होऊन नितेशची ही परिस्थिती झाली होती. मग ! त्याची के. एम हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट सुरू झाली. तिथेही त्याच्यावर मनोरुग्ण म्हणून उपचार सुरू होते. त्याला पाहायला जो जायचा त्याचे त्याच्या कुटूंबातील जगलाही माहीत असलेले पण वाच्यता न झालेले गुपित तो उगडे करायचा ! विजयच्याही मनात होते त्याला पाहायला जायचे पण हे कळल्यावर त्याने टाळले…पुढे त्यातून तो थोडा बरा झाला पण अधुमधून त्याला वेडाचे झटके यायचे ! कामाला बऱ्यापैकी जात होता पण जिथे कामाला जायचा तेथील मॅनेजरलाच वेडाच्या भरात त्याने मारले त्यांनतर त्यांची घरे एस आर ए मध्ये गेल्यामुळे तो विजयंपासून दुरावला त्यानंतर तो एका ठिकाणी कामाला राहिला तेथील एका गृहस्थाने त्याच्यासाठी त्याच्या बहिणीचे स्थळ सुचवले आणि त्याच्या आईने तडकाफडकी त्याचे लग्न लावून दिले. लग्नानंतर त्याला एक मुलगीही झाली. आणि ट्रीटमेंट मध्ये दुर्लक्ष झाल्यामुळे त्याचा आजार बळावला आणि तो त्याच्या बायकोला मारझोड करू लागला , शेवटचा पर्याय म्हणून त्याचं अक्क कुटुंब गावी स्थलांतरित झालं. तिथे त्याची तब्बेत थोडी सुधारली पण शारीरिक श्रमअभावी त्याचे वजन प्रचंड वाढले आणि त्यामुळे इतर आजारही बळावले. आता तो मानसिक रुग्ण तर आहेच पण त्यासोबत इतर अने आजारांचा रुग्ण झालेला आहे. तो जेंव्हा जेंव्हा मुंबईला येतो तेंव्हा विजयला आवर्जून भेटतो. तो ढोलकी उत्तम वाजवायचा ! खेळातही उत्तम होता. दिसायला सुंदर होता, पण नशिबाने त्याची थट्टा मांडलीच… कोणाचं नशीब कोणाला कोठे घेऊन जाईल काही सांगता येत नाही.. हेच सत्य आहे..
— निलेश बामणे.
Leave a Reply