याबाबतीत मात्र विजय पूर्वीही बदनाम होता आणि आज ही कितीही सुंदर आणि गोड आवाज असणाऱ्या तरुणीने त्याला फोन केला तरी तो तिच्याशी अधिकचा एक शब्दही बोलत नाही. पण एखादी समोरा – समोर भेटली आणि तिची बोलण्याची इच्छा असेल तर तो थांबतही नाही. म्हणूनच तो ज्यांच्या प्रेमात पडतो त्यांच्या बहिणी अथवा मैत्रिणी त्याच्या प्रेमात पडायच्या…विजय उंचीने कमी…दाढी मिश्या ठेवत नाही…काळे केलेले लांबसडक केस… गव्हाळ पावडर लावलेला चेहरा…डोळे लहान तपकिरी रंगाचे…ओठ लहान नाजूक…दात सरळ रेषेत…फक्त नाकात मार खाल्ला होता. नाक थोडे बसके होते. व्यायाम न करताही त्याचे शरीर पिळदार होते. इतके की कोणी ही मुलगी त्याला उगडे पाहिल्यावर त्याच्या प्रेमात पडावी…पूर्वी त्याचे पोटही सपाट होते. मांड्या भरलेल्या होत्या. पण आता ते त्याचे शारीरिक सौंदर्य बऱ्यापैकी ओसरले आहे. कारण आता त्याच्या चेहऱ्याची ठेवण बदलली आहे. पोट बाहेर आले आहे. डोक्यावरील केस थोडे गेले आहेत. डोळे किंचित खोल गेले आहेत.रेखीव शरीर तितकेसे रेखीव राहिले नाहीत. त्यात झालेल्या त्वचाविकारामुळे शरीरावर ठीक ठिकाणी काळे डाग राहिले आहेत. त्यामुळे तो आता ठरवूनही उगडा राहू शकत नाही…जेथे उगडे व्हावे लागेल अशा ठिकाणी तो जातच नाही…तरीही तो हल्लीच गावाला गेला असता एक तरुणी त्याच्या प्रेमात पडली होती. पण त्याच्या पायात बेड्या आहेत अनामिकाच्या ज्या त्याला पुढेही जाऊ देत नाही आणि माघारीही येऊ देत नाही…
महाराष्ट्र सरकारने किराणा दुकान, मॉल आणि सुपर मार्केट मध्ये वाईन विकायला परवानगी दिली. त्यामुळे म्हणे ! शेतकऱ्यांचा फायदा होईल अशी त्यांची भूमिका आहे. वाईन आणि मद्य यात फरक आहे हे विजयला नव्यानेच कळले…दारू पिणारे मग ते कोणती का पित ना ! ते विजयच्या दृष्टीने दारुडे होते. देशातील बहुसंख्य तरुण – तरुणी आता दारू प्यायला लागल्या आहेत. जेष्ठ नागरिकांनी थोडी वाईन प्यायलेली तब्बेतील चांगली असते असे ही कोठेतरी विजयच्या वाचनात आले…ही माहिती नक्कीच त्याला गुगल बाबांनी दिली असेल… वाईनमध्ये फक्त १५% अल्कोहोल असते म्हणे आणि मद्यात ३०% हुन अधिक ! ही खात्री लायक माहिती नाही कारण दारू या विषयाचा फार खोल अभ्यास करण्याची विजयला गरज वाटत नाही. विजय त्याच्या आयुष्यात फक्त दोनच माणसांचा तिरस्कार करतो एक दारू पिणारा आणि दोन दारू पिण्याचे समर्थन करणारा…विजयचे बाबा दारू प्यायचे म्हणून त्याच्या वाट्याला गरिबीचे आणि माणहाणीचे दिवस आले होते. दारू पिणारा मग ती कोणतीही प्यायला असला तरी तो समोरच्याला मानसन्मान देऊ शकत नाही…वाईन पासून सुरू झालेला प्रवास भविष्यात कोठे थांबेल हे वाईन पिणारे सर्व पाहतील…यापुढे वाईन पिणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढेल हे विजय खात्रीने सांगतो…एकीकडे आपण तरुण पिढीला ह्यांचा त्यांचा आदर्श ठेवा म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे तरुण पिढीला चुकीच्या गोष्टींपर्यत पोहचण्याचा मार्ग सुलभ करायचा…हे कोणत्या तत्वात बसते ? तेच विजयला कळत नाही. विजयचा जो मित्र दारू प्यायला लागला , तो विजयला कायमचा दुरावला…विजयने कोणी कितीही जवळचा असला तरी त्याच्या दारू पिण्यामुळे त्याचा तिरस्कारच केला… देशात होणारे बहुसंख्य बलात्कार दारूच्या नशेत होतात… बहुसंख्य गुन्हेगार दारुडे असतात. कित्येक नवरे आपल्या बायकांना दारूच्या नशेत मारझोड करतात तर कधी-कधी त्यांचा जीवही घेतात…कोणतीही दारू पिणे मग ते वाईन पिणे का असेना ? वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जाण्याची पायाभरणी असते…हे विसरून चालणार नाही…दारू न पिणाऱ्या अथवा कोणतंच व्यसन न करणाऱ्या लोकांना व्यसनी लोक विनोदाने म्हणतात. तुमच्या जन्माला येण्याचा काही उपयोगच नाही…दारूची बाटली समोर आणून ठेवली तरी प्यायचे की नाही हे आपल्या हातात असते. मध्यंतरी विजयने एक किर्तन ऐकले त्यात किर्तनकार म्हणाले,” दारू पिणाऱ्या सोबत फक्त बसणाराही पापाचा भागीदार असतो…म्हणूनच विजय जगाच्या दृष्टीत साधुमाणुस आहे….
बऱ्याच दिवसानंतर विजय आज पुन्हा खूप अस्वस्थ होता. कारण एक आठवडा होत आला तरी त्याचा पाय दुखयचा काही थांबला नव्हता. विजय पायामुळे आठवडाभर कामाला गेला नव्हता. अजून किती दिवस जाणार नाही ते ही कळत नव्हते. विजयच्या मनात ही नोकरी सोडून दुसरी नोकरी अथवा उद्योग करण्याचा विचार अधिक दृढ होत चालला होता. पण काय करायचं ? तेच त्याला सुचत नव्हतं. बहुसंख्य लोकांना असच वाटतं त्याला काय करायचेय नोकरी ? पण ज्याच्या मागून जळत त्यालाच कळतं…विजयचे बाबा हे नेहमीच विजयच्या विरोधात भूमिका घेत आले ते आजही थांबलेले नाही. तो जे बोलणार ते त्याच्या विरुद्धच बोलणार हे ठरलेले गणित…त्या माणसाने विजयच्या आयुष्याची वाट लावली होती…करून करून भागलं आणि देव पूजेला लागलं असं ते व्यक्तीमहत्व होतं. सर्व गणित पैशात…विजयने मोठा मुलगा म्हणून जितका त्याग करायचा तो सर्व त्याग करून त्याचा झाला होता. विजयला स्वतःसाठी काहीतरी करायचे होते. स्वतःसाठी आयुष्य जगायचे होते, पण विजयचे बाबा त्याला तसे काही करू देतील तर शपथ ! विजयचा सर्व पगार जो काही तोडका मोडका आहे तो विजय घरी देतो. त्यांना वाटते विजय हातचे राखून घरी पैसे देतो. त्यामुळे वेळेला विजयकडे पैसे नसतात. आणि त्याला कोणाकडे मागताही येत नाही त्यामुळे विजयची आयुष्यभर आर्थिक कुचंबणा झाली असे म्हणता येईल…विजयने जे काम करावे असे त्याच्या वडिलांना वाटते ते काम विजय करू शकत नाही कारण ते त्याच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही आणि ते त्याच्या बुद्धीच्या लायकीचेही नाही. भले विजयला त्याच्या कामाचे योग्य पैसे मिळत नाहीत पण तो जे काम करतो ते नक्कीच नावाजले जाते. विजयने त्याच्या आयुष्यात केलेला सर्वात मोठा गाढवपणा हा होता की तो एकाच ठिकाणी काम आणि एकाच क्षेत्रात काम करत राहिला. त्याच्या बुद्धीचा वापर त्याने इतर क्षेत्रातही करायला हवा होता… पण नशिबाने त्याला साथ दिली नाही. विजयच्या आईलाही वाटते की विजय पैसे कमावण्यासाठी फार मेहनत करत नाही…,म्हणजे तो आळशी आहे…वयाच्या सोळाव्या वर्षांपासून कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेऊन मरमर काम करणारा तिच्या दृष्टीने आळशी होता… कारण एकच ती अज्ञानी होती अशिक्षित होती…म्हणूनच विजयला त्याच्या आयुष्यात अज्ञानी आणि अशिक्षित स्त्री कधीच नको होती…कारण अज्ञानी माणसाच्या दृष्टीत फक्त खूप पैसे कमावणारी माणसे यशस्वी असतात…आणि समाजासाठी काहीतरी करू पाहणारे गाढव…यात राजकारण्यांचा समावेश होत नाही…कारण ते खूप चतुर असतात…त्यांना समाजसेवेचेही भांडवल कसे करायचे हे माहीत असते….विजय कोणाचाही झेंडा खांद्यावर घेऊन यशस्वी राजकारणी झाला असता पण त्याचे मन मानत नव्हते…तशी संधीही त्याला बऱ्याचदा चालून आली होती कारण राजकारणातही त्याचे बरेच मित्र आहेत. दोघे तिघे तर त्याचे वर्गमित्रच आहेत…या क्षेत्रात जाण्यासाठी विजयची सर्वात मोठी अडचण ही होती की त्याला त्याच्या विचारांशी तडजोड करता येत नाही आणि तो खोट्याला खोटंच बोलतो…कोणाची हुजरेगिरी करणे त्याला कधीच जमले नाही…ते जमले असते तर विजय लौकिक अर्थाने खूप यशस्वी असता…सध्याच्या लोकांची बदललेली यशाची व्याख्या पाहून विजय खूप दुःखी होतो. आज समाजाची अशी मानसिकता तयार झाली आहे की तुम्ही यशस्वी असाल तर तुम्हाला सर्व व्यसने करण्याची मुभा आहे… म्हणजे आपले उच्चशिक्षित मूल मुली म्हणजे लाखात पगार घेणारे दारू पित असतील, सिगारेट ओढत असतील तर त्यांचे पालक त्यांना विरोध करत नाही कारण तो त्यांना त्यांच्या कामाचा भाग वाटतो. इतका मानसिक आणि शारीरिक त्रास असताही विजय कधी कोणत्याच व्यसनाच्या आहारी गेला नाही.
— निलेश बामणे
Leave a Reply