सध्या ! विजय काय विचार करतोय ? हे त्याच्याच शब्दात … काही दिवसांपासून मी टी. व्ही. वर पिंकीचा विजय असो ! ही नवीन मालिका पाहतोय ! त्यातील नायिका म्हणजे पिंकी कोणताही विषय तिच्या लग्नापर्यत नेण्यात तरबेज असते…तसेच काहीसे माझ्या घरातील लोकही तरबेज झालेत, कोणताही विषय ते माझ्या लग्नापर्यत अगदी सहज नेतात …आज सकाळी – सकाळी बाबांचा प्रश्न…गावची तिकीट काढायला सांगू ना ? त्यावर नेहमी प्रमाणे मी नाही म्हणालो,” का ? या त्यांच्या प्रश्नाला मी नेहमीच खोटं उत्तर देतो पण यावेळी मी खरं उत्तर दिलं की माझा पाय दुखतोय ! येथे इंग्लिश बाथरूम असल्यामुळे काही समस्या नाही पण गावाला माझ्या पायाला त्रास होईल…मग काय कॅसेट चालू झाली…तुला गावाला यायला नको, इतके श्रीमंत लोक आहे आपल्या वाडीतील ते पण वर्षातुन तीन – चार वेळा तरी गावाला जातात…तुलाच मोठी कामे असतात ? त्यावर मी म्हणालो,” ते श्रीमंत आहेत म्हणूनच तीन -चार वेळा जातात…मग ! तुला तरी कोठे तेथे खर्च करायचा आहे ? इथे राहून तरी काय करणार आहेस ? झोपाच काढणार ना ? इथपर्यत विषय येऊन पोहचला…तेंव्हा माझी सटकली आणि मी म्हणालो”, म्हणूनच मी येत नाही ! मागच्या वर्षी आपण सगळे चार वेळा गावी गेलो ! प्रत्येक वेळेला पंदरा दिवस म्हणजे ! वर्षतील दोन महिने गावी राहून आलो ! त्यात तेथे काही आपली शेती नाही…त्यामुळे सर्व विकत घेऊनच खायचं ! चार किलोमीटर अंतरावर कोणाकडे जायचं झालं तरी दोन तीनशे रुपये मोजायचे… दोन महिन्यांच्या उत्पन्नाचे नुकसान…राहण्याचा खर्च डबल…चार वेळा जाण्या – येण्याच्या प्रवासात खर्चात चाळीस हजार घुसले ते वेगळे …सांगायचं कारण इतकंच मागच्या वर्षी नाही म्हणायला,” फक्त गावी जाण्या – येण्याचा खाण्या – पिण्याचा राहण्याचा खर्च पाहता लाखभर रुपये खर्च झाले…मग ! आम्ही श्रीमंत कसे होणार ? असो ! आमच्या बाबांना गावी जाण्यासाठी काहीतरी कारणच लागत असतच… पूर्वी गरीब होते म्हणून जात नसावे पण हल्ली सारखे गावी धावण्याच्या प्रयत्नात असतात म्हणजे ! बहुतेक श्रीमंत झाले असावेत…ह्यावेळी कारण काय तर म्हणे मुंबईत गरम खूप होतंय ! गावी थंडावा मिळेल आणि कोकणातील रानमेवाही खायला मिळेल, आराम करायला मिळेल…जसं काही आम्ही मुंबईत दगडी फोडायचच काम करतो… खरं सांगायचं तर मला कोकणातील सर्व गोष्टी आवडतात पण कोकणातील माणसे माझ्या डोक्यात जातात कारण ती जरा जास्तच गोड वागतात…त्यांना प्रश्न विचारायला खूप आवडतात…सर्वात म्हणजे त्यांना फक्त लग्न ही कोणाच्याही आयुष्यातील सर्वात आनंदाची घटना वाटते…
लग्ना व्यतिरिक्त आयुष्यात दुसरे काही करण्यासारखे असते हे त्यांना माहीतच नसते…लग्न न करता आयुष्यात आनंदी राहणे हे कोकणात बहुतेक पापच समजले जात असावे…त्यामुळे मी जेंव्हा कधी चार दिवस डोक्याला आराम मिळावा म्हणून गावाला गेलो तर डोक्याला आराम तर सोडा ! डोक्याला तापच अधिक होतो कारण जो येतो तो हाच प्रश्न विचारतो लग्न कधी करतोस ? का करत नाही ? कोणी आहे का आयुष्यात ? करून टाकायचं आता वयही वाढत चाललंय ! नंतर कोणी भेटली नाही तर ? त्यापुढेही जाऊन असा सल्ला दिला जातो एखादी गरिबाची बघायची ! जसे काही आम्ही करोडपती आहोत… त्यामुळे माझी भयंकर सटकते…खरं तर लग्न ही माझ्या आयुष्यातील व्यतिगत बाब ! मी लग्न करायचं की नाही करायचं की करायचंच नाही ! ते माझं मी ठरवेल ना ? तुम्हांला त्याची चिंता करायची कारणच काय ? ह्या गोष्टीचा त्रास फक्त मलाच नाही तर माझ्या कुटुंबातील व्यक्तीनांही होतो… खास करून आई – बाबांना ! खरं तर मी लग्न नाही केलं तरी त्यांचं काहीही आडत नाही पण या लोकांमुळे त्यांच्या डोक्याला ताप होतो आणि मग तो ते ताप माझ्या डोक्याला देतात. कधी – कधी मी विचार करतो एखादी बरोबर लग्न करून तिला घटस्फोट देऊन टाकला असता तर हा ताप कमी झाला असता का ? तर नाही … असेच उत्तर दुर्दैवाने मिळते… लग्न केले तर ते लग्न टिकायला हवे ! टिकले तर पोरं व्हायलाच हवी ! आणि एखादीला नाही झाली तर दुसरीला आणण्याचा सल्लाही ही लोक अगदी सहज देतात… बायको मेली तर त्याच्या दुसऱ्या लग्नाची ह्यांना प्रचंड काळजी असते पण नवरा मेला तर तिचं लग्न लावून देण्याचा विचार तर दूरच ! आता तिची जबाबदारी कोणी घ्यायची यावर सभा भरतात हल्ली ! माझ्या एका मैत्रीनीचा नवरा कोरोनात वारला बिचारीला लग्नाला सात – आठ वर्षे झाली तरी मुलबाळ नव्हतं… त्यात ती वेगळी राहत होती.. तिचा नवरा वारल्यानंतर बाराव्याचीही वाट न पाहता त्या मुलीच्या घरच्यांना सांगितले आता हिच्याशी आमचा काहीही संबंध नाही ! हीच आता काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा ! म्हणजे दुसर्यांनी लग्न करावं म्हणून आग्रही असणारा हा समाज प्रत्यक्षात मात्र लग्नाकडे फक्त एक खेळ म्हणूनच पाहतो की काय ? असा विचार करायला वाव आहे ! जर तिच्या सासरचे असे म्हणाले असते की तुम्ही आता शक्य झालं तर तिचे दुसरे लग्न लावून द्या आमची काहीही हरकत नाही तर ! तो समाजाचा पुरोगामी विचार ठरला असता. म्हणजे आता आपण ज्या समाज्याच्या दडपणाखाली लग्न करतो त्या लग्नाची कोणतीही जबाबदारी नैतिक जबाबदारी समाज घ्यायला तयारच नाही तसे असताना लग्न या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या निर्यात समाजाचा विचार करण्यात काही अर्थच नाही. उद्या मी लग्न केलं आणि ती स्त्री जर स्वावलंबी नसेल आणि माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर ! तिची काळजी ही तिची तिलाच घ्यावी लागणार आहे हे मला गृहीतच धरून चालावे लागेल… म्हणूनच आजच्या मुली ज्या लग्नाच्या बाबतीत अत्यंत व्यवहारी झाल्या आहेत त्यात त्यांची काही चूक आहे असे मला नाही वाटत.. आम्ही आयुष्यात व्यवहार कधी पहिला नाही पण आमच्या गाढवपणाची शिक्षा आमच्या होणाऱ्या पत्नीने का भोगावी ? तिला शिक्षा देण्याचा मला नैतिक अधिकारच काय ? असा जर मी विचार करत असेन तर त्यात काही चुकीचे आहे असे मला अजिबात वाटत नाही. समाज्याच्या भितीने लोक लग्न करतात म्हणून हल्लीची लग्ने टिकत नाहीत… काही दिवसापूर्वी फेसबुकवर वधुवर सूचक मंडळाचे एक पेज मी पाहत होतो तर त्यात एका अवघ्या २४ वर्षाच्या मुलीचे स्थळ होते.. मुलगी दिसायला खूप म्हणजे खूपच सुंदर होती.. इतकी की पाहता क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडावं म्हणून मी तिचे डिटेल्स वाचले तर त्यात ती घटस्फोटित होती… आता तिचं घटस्फोट होण्याची कारणे काय असतील ? याचा विचार करता बरीच कारणे पुढे येतात.. ती कोणती यावर चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही…मला विचाराल तर मी कोणालाही त्या मुलीसोबत विवाह करण्यापेक्षा विधवा स्त्री सोबत विवाह करण्याचा सल्ला देईन …आपल्या समाजात घटस्फोटित स्त्रीला विधवा स्त्रीपेक्षा जास्त मान मिळतो हे माझे निरीक्षण आहे… कदाचित आपला समाज आजही विधवा स्त्रियांना कमनशिबी समजतो .. आणि घटस्फोटित स्त्रियांना शूर ,स्वाभिमानी आणि धाडसी वगैरे समजतो… घटस्फोटित स्त्रिया आज समाजात ताठ मानेने वावरताना दिसतात कारण त्यातील बहुसंख्य स्त्रिया … श्रीमंत, उच्चशिक्षित आणि कमावत्या असतात.. याला काही अपवाद असतील पण त्यांचे प्रमाण फारच कमी आहे… हल्ली घटस्फोटित स्त्रीचा दुसरा विवाह जितक्या पटकन जुळतो तितका विधवा स्त्रीचा लवकर जुळत नाही…कारण समाज त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत समाज म्हणून पुढाकार घेत नाही…
— निलेश बामणे.
Leave a Reply