विजय आज जेंव्हा त्याच्या आयुष्याचे आर्थिक गणित मांडतो तेंव्हा त्याला असे वाटते की त्याने त्याच्या आयुष्यात फार मोठा गाढवपणा केलेला आहे. विजयने वयाच्या सतराव्या वर्षी कामाला सुरुवात केलेली होती तेंव्हा त्याला ३० रुपये रोज होता. पंचवीस वर्षांनंतर ३० चे ४०० झाले म्हणजे त्याचा आर्थिक विकास हा ना च्या बरोबर होता. जेवढे कमावले तेवढे खर्च झाले. त्याने त्याच्या भविष्याचा विचार करून काहीही बचत केली नाही म्हणजे त्याला बचत करण्याची संधीच मिळाली नाही हे एक कारण होतेच पण त्याने स्वार्थी विचारही केला नव्हता. त्याच्या मालकाची संपत्ती मात्र दहा पटीने वाढली होती. त्या मालकाने त्याच्या चांगूलपणाचा फायदा घेतला होता की गाढवपणाचा हे विजयला आता कळत नव्हते. विजयने जितका पैसा कमावला तो सुरुवातीला भावंडांच्या शिक्षणात, वडिलांचे कर्ज फेडण्यात आणि त्या नंतर घरखर्चात त्याच्या आणि कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणात आणि त्यांच्या आनंदात खर्च केला. तो खर्च करताना त्याला अपेक्षित होते कि त्याचे कुटूंब त्याच्यासाठी उभे राहील पण प्रत्यक्षता मात्र तसे झाले नाही. तोपर्यत वेळ निघून गेलेली होती. विजय आर्थिक दृष्ट्या अपंग झालेला होता. म्हणजे त्याला करावेसे तर खूप काही वाटत होते पण आर्थिक समस्येमुळे तो काहीच करू शकत नव्हता. विजयची आता कोणाच्याही हाताखाली काम करण्याची अजिबात इच्छा नव्हती कितीही पैसे मिळाले तरी ! कोणासाठी तन – मन आणि बुद्धी लावून फारशी आर्थिक अपेक्षा ना करता ज्याच्यासाठी त्याने आयुष्यातील २५ वर्षे मोजली होती. त्याच्याकडून त्याला एक दमडीही जास्तीची मिळालेली नव्हती… सांगायचे तात्पर्य इतकेच की कलियुगात इमानदारीच्या आयला पांडुरंग ! असो ! तो इमानदारीत वागला याचे विजयला दुःख नाही पण दुःख ह्याचे होत आहे की त्याने लायकी नसलेल्या माणसासाठी आयुष्यातील २५ वर्षे मोजली होती. या २५ वर्षात तो कवी / लेखक होता म्हणून त्याला स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण करता आली , समाजात मान – सन्मान मिळविता आला. त्यामुळे त्याचे आयुष्य अगदीच वाया गेले नाही असे त्याला वाटते. पण त्याच्या कुटुंबातील लोकांना वाटते माझ्या लिखाणाच्या व्यसनापायीच तो त्याच्या आयुष्यात फार काही भव्य दिव्य करू शकला नाही म्हणजे गाडी घोडे घेऊ शकला नाही. त्याने लग्न करून संसार केला नाही. पण विजयच्या लेखक होण्याचा आणि त्याच्या विवाहाचा काडीचाही संबंध नव्हता. विवाह न केल्यामुळे सर्वसामान्य लोकांना वाटणारी कोणतीही खंत त्याला वाटत नव्हती. मध्यन्तरी विजयच्या वाचनात एक बातमी आली होती की भारतातील एका तरुणीने स्वतःशीच विवाह केला आणि आणि ती मधुचंद्र करायलाही गेली.. तर काही लोकांनी तिला फेसबुकवर प्रश्न विचारला होता… स्वतःच स्वतःशी विवाह केला हे ठीक आहे पण एकटीच हनिमून कसा कसा करणार तर त्यावर त्या तरुणीचं उत्तर होत , तुम्हाला काय अकराय्चे आहे ? ते माझे मी काय ते पाहून घेईन ! हा सर्व प्रकार लक्षात घेऊन विजयनेही विचार केला मी ही असाच स्वतःच स्वतःशी विवाह केला तर ? कारण तशीही मला माझ्या आयुष्यात तशी कोणी स्त्री नकोच होती. म्हणजे मला माझ्या आयुष्यात एखादी स्त्री यावी आणि तिने माझे आयुष्य बदलून टाकावे किंवा तिच्यासाठी मी माझ्या आयुष्यात बदल करावेत हे मला मान्यच नव्हते. माझ्या आयुष्यात मला माझ्या तत्वांचा आदर करणारी आणि त्या तत्वांप्रमाणे वागणारी स्त्री हवी होती. तशी स्त्री मिळणे आजच्या जगात अशक्य नव्हते ! पण सोप्पेही नव्हते. तरीही फक्त अनामिकासाठी मी माझ्या तत्वांशी तडजोड करायलाही तयार होतो. पण ती तडजोड मी अनामिकाच्या बाबतीत करण्याऐवजी माझ्या आयुष्यात आलेल्या एकाही तरुणीच्या बाबतीत केली असती तर आज मी ऐश्वर्यात लोळलो असतो. अनामिकाला स्वतःलाच असा नवरा हवा होता कि तिला त्याच्या जीवावर तिच्या सर्व भौतिक आशा- अपेक्षा पूर्ण करता येतील. मला इतर तरुणींच्या बाबतीत जसे शारीरिक आकर्षण वाटत होते तसे आकर्षण ठरवूनही मला अनामिकाबद्दल वाटत नाही…का वाटत नाही ते देव जाणे ! मला नेहमीच अतिशय बुद्धिमान तरुणी , आत्मविश्वास असणाऱ्या तरुणी, स्वतःच्या हिमतीवर काही तरी करू पाहणाऱ्या तरुणी, मोकळ्या मनाच्या आणि विचाराच्या तरुणी आवडतात. अनामिकात यापैकी एकही गोष्ट नव्हती तरी ती मला तिच्या प्रेमात कशी पडून ठेवू शकली याचेच मला आश्चर्य वाटत होते… असो… जिच्याबद्दल आपल्याला शारीरिक आकर्षणच वाटत नाही अशा तरुणीसोबत विवाह करणे योग्य आहे का ? याचाही मला नव्याने विचार करावा लागेल… तसेही विवाहात शारीरिक संबंधा व्यतिरिक्त आणखी कशाला महत्व असते असे मला वाटत नाही…आपल्या आयुष्यात, आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून येणारी व्यक्ती अशी हवी की ती सर्वार्थाने आपले प्रतिबिंब असावी. तशाही मला माझ्या जोडीदाराकडून सर्व सामान्य लोकं कडून असणाऱ्या कोणत्याच अपेक्षा नाहीत म्हणजे तिला स्वयंपाक उत्तम यावाच , तिने मुलांना जन्माला घालावेच, तिने सर्व धार्मिक संस्कार पाळावेत अशा… काही तासापूर्वी विजयने फेसबुकवरील त्याच्या काही जेष्ठ मित्राच्या पोस्ट वाचल्या त्यात त्यांनी, रामदासी बैठकीत आणि वारीत असणाऱ्या तरुण आणि लहान मुलांच्या सहभागाबद्दल चिंता व्यक्त केली होती. विजयचे ते मित्र अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे सदस्य आहेत, ज्योतिष हे थोतांड आणि काही लोकांचे उदरर्निवाहाचे साधन आहे असेही त्यांचे म्हणणे आहे. ज्योतिष शास्त्राबाबत त्याच्या मताशी सध्यातरी विजय सहमत नाही कारण विजय कोणत्याही गोष्टीचा सखोल अभ्यास केल्या खेरीज आपले मत मांडत नाही आणि बदलतही नाही….. असो ! वारी आणि रामदासी बैठकीच्या बाबतीत त्यांनी व्यक्ती केलेली चिंता विजयला भविष्याचा विचार करता काही प्रमाणात योग्यच वाटते कारण विजयाच्या मते कोणतेही व्यसन मग ते अध्यात्माचे का असेना ! वाईटच !! अति अध्यात्मिकता माणसाला भौतिक गोष्टींच्या मोहापासून दूर नेते, त्यांच्यातील वैराग्याची भावना वाढवते, शारीरिक आकर्षण आणि श्रुंगाराचे आकर्षण कमी करते त्यासोबत असे लोक आपल्या जोडीदाराच्या शारिरीक आणि मानसिक गरज पूर्ण करायला कमी पडतात असे निरीक्षण सांगते…या लोकांच्या मानतील विज्ञानाचे महत्व कमी होते जे त्यांना कधी कधी संकटात घेऊन जाते. विजयाच्या त्या मित्राच्या पास्टवर त्यांचे विरोधक मनसोक्त शिव्या हासडत होते… आपल्या देशातील लोकांना विचारांची लढाई विचाराने लढायला कोणी शिकविलेलेच नाही. त्यामुळेच अशा विषयांवर विजय फेसबुकवर व्यक्त होणे टाळतो. फेसबुकवर कोणाच्याही विचारांवर टिका करताना टिका करणारे स्वतःची आणि समोरच्यांचीही लायकी पाहात नाही. शाब्दिक बाचाबाची नंतर हे लोक हाणामारीवर येतात. फेसबुकवर व्यक्त होणे हल्ली तितकेसे शहाणपणाचे राहिलेले नाही. मूर्खांशीही विनाकारण वाद घालावा लागतो… सर्वच फक्त मोठेपणा मिळवायला तेथे आलेले असल्यामुळे दुसऱ्याना मोठेपणा देणे हे त्यांच्या गावातच नसते. मागे एकदा विजयने काही विरह कविता फेसबुकवर पोस्ट केलेल्या होत्या त्या वाचून त्याच्या एका फेसबुकवरील मित्राला वाटले की त्याचा प्रेमभंग वगैरे झालेला आहे पण त्याला काय माहित विजयचे बिद्र वाक्य आहे की त्याचा प्रेमभंग व्हावा इतकं प्रेम तो कधीच कोणावर करत नाही. त्याने विजयला मानसिक आधार वगैरे देण्याचा प्रयत्न केल्यावर विजय त्याला म्हणाला, ” तुला वाटलो तसा मी अजिबात नाही आणि मी कसा आहे ते तुला माहीत नाही. विजय त्याच्या चेहऱ्यावरून लोकांना अतिशय भोळा वगैरे वाटतो पण विजय एक लबाड पुरुष आहे हे तो स्वतःच मान्य करतो. विजयच्या प्रेमात पडलेल्या सर्वच्या सर्व विजयला तेव्हाही भोळा समजत होत्या आणि आजही भोळा समजतात त्यांच्यातील प्रत्येकीचे त्याच्यावर प्रेम आहे हे त्याला पक्के माहित होते अपवाद फक्त अनामिका ! विजयला प्रेम कसे व्यक्त करतात अथवा त्याच्यात प्रेम व्यक्त करण्याची हिंमत नव्हती हा त्यांचा सर्वात मोठा गैरसमज होता. विजय मधील लबाड पुरुषाला विजयने नाही तर नियतीने लगाम घातली होती त्याला एक असाध्य ! सोरायसिस सारखा त्वचाविकार देऊन…
— निलेश बामणे.
Leave a Reply