नवीन लेखन...

एक प्रश्नचिन्ह

‘भले – बुरे ते घडून गेले
विसरुनी जाऊ सारे क्षणभर,
जरा विसाऊ या वळणावर……….’

सुख-दु:ख , यश -अपयश , लाभ-हानी अनेक घटनांनी आपले जीवन भरलेले आहे. कधी-कधी परिस्थितींना तोंड देत असताना कितीतरी वेळा आपल्या मनात हा विचार येतो कि माझ्याबरोबरच असे का झाले ?…. माझ्याच जीवनात अशी लोक का आली ? इतके श्रम करुनही नेहमी मलाच का अपयश मिळते ?…….. प्रश्नांचे जाळे विणून स्वत: गुंतत जातो. जो पर्यन्त त्याचा शोध लागत नाही, उत्तर मिळत नाही तो पर्यन्त मनात विचारांचे वारे वाहतच राहतात.

जीवनाचा हा प्रवास खूप दूरवर चालत राहणारा आहे. हा फक्त जन्मापासून मृत्यूपर्यन्तचा प्रवास नाही परंतु जन्मोजन्मीचा प्रवास आहे. ह्या प्रवासामध्ये अनेक व्यक्तींशी सुख-दु:खांचे ऋणानुबंध जोडले गेले . हे धागे वेगवेगळ्या नात्यांनी गुंफले गेले. परंतु प्रवासात भेटलेली व्यक्ती, वस्तू, साधने…….. क्षणिक आहेत, कालांतराने सर्वांनाच आपल्या मार्गाने पुढे जायचे असते. चांगल्या-वाईट कर्मांचा गाठोडया व्यतिरिक्त आपल्या जवळ काहीच उरत नाही.

‘कर्म’ हा शब्द खूप छोटा आहे. परंतु त्या मध्ये जीवनाची अनेक सत्ये दडलेली आहेत. ह्या पृथ्वीवर आपण मनुष्यांची रूपे, त्यांची विचारसरणी, कार्यपद्धती ……… ह्यांची विविधता बघतो. थोडस थांबून स्वत:च्याच जीवनाला न्याहाळले तरी ही आढळून येईल कि प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण काही वेगळा अनुभव देऊन जातो. आणि प्रत्येक वेळी कर्मांचे धागे अनेकानेक व्यक्तींबरोबर आपण बांधत राहतो. सुख-दु:खाचे धागे असे विणले गेले आहेत कि ज्यातून सुटका होणे कठीण.

‘जे पेराल ते उगवेल’ हा सिद्धांत आपल्याला माहीत आहे. म्हणून जेव्हा खूप दु:खी होतो तेव्हा अनायासच आपल्या मुखावर शब्द येतात की ‘माहीत नाही हे कोणत्या जन्माचे, कोणत्या पापकर्मांचे फळ आहे ? आपण हे सुद्धा समजतो कि जे आज आपल्याला लाभले आहे ते पूर्व जन्माचे संचित कर्मफळ आहे. त्या कर्मांचे बीजे कधीतरी जाणता-अजाणता आपल्याकडून पेरली गेली होती. आज त्याचे फळ आपणास मिळत आहे. चांगल्या-वाईट सर्व घटनांच्या पाठीमागे आपलेच कर्म कार्य करीत असतात.

जसे प्रत्येक फळातले बीज दुसऱ्या वृक्षाला जन्म देते. तसेच आपण केलेल्या प्रत्येक कर्मांमध्ये अनेक सुख-दु:खांची बीजे पेरण्याची शक्ती आहे. ते फळ फक्त आपल्यालाच मिळते. हजारो गाईमध्ये छोटेसे वासरू ही आपल्या जन्मदात्रीला शोधून काढते तसेच कर्मरुपी वासरू ही त्याच्या जन्मदात्रीला शोधून काढतो. मग ते सुंदर असो वा कुरूप असो ते आपल्या जवळच येते. प्रत्येक कर्मांची सुरुवात संकल्पानी होते. संकल्पांच्या गर्भामध्ये रोज नव्या कर्मांचा जन्म होतो. नकारात्मक संकल्प वाईट कर्मांना व सकारात्मक संकल्प चांगल्या कर्मांना जन्म देतात. त्या द्वारेच आपण सुख-दु:ख, लाभ-हानी, यश-अपयश यांचा अनुभव करतो. जीवनाच्या ह्या प्रवासात ही आपल्याला तेच लाभते जे आपण दुसऱ्याला देतो.

फार वर्षांपूर्वीची सत्यघटना. अहमदाबादला एक विद्वान, अनुभवी सत्र न्यायाधीश (sessionjudge) होते. वेदान्ताचे गाढे अभ्यासी व कर्मसिद्धांतावर जबर विश्वास ठेवणारे. एका गावी सूर्योदयाच्या वेळी नदीकाठी प्रातविधीसाठी गेलेले असताना जवळूनच एक माणूस पळताना व हातात सुरा घेतलेला दुसरा माणूस त्याचा पाठलाग करताना त्यांनी पाहिले. सुरा हातात असलेल्या माणसाने पळणाऱ्या माणसाच्या पाठीत सुरा खुपसला व तो माणूस तत्काळ खाली पडून मेला. खुनी माणसाचा चेहरा जज्ज साहिबांनी बरोबर बघितला होता. काही महिन्यानंतर तो खुनाचा खटला कोर्टात दाखल झाला व तो त्याच सत्र न्यायाधीशांसमोर ठेवण्यात आला. परंतु आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असणारा संशयित कोणी दुसराच व्यक्ति आहे हे त्यांच्या लक्षात येते.

पुढे रीतसर खटला सुरू होतो व पोलिसांनी सदर आरोपी विरुद्ध इतका आणि सबळ पुरावा दाखल केला की आरोपीच खरा खुनी होता असे साक्षी पुराव्याने सिद्ध झाले व आरोपीला फाशीची शिक्षा दिली गेली. सत्य परिस्थिती जाणणाऱ्या न्यायाधीशांनी सदर आरोपीला आपल्या चेंबर मध्ये खाजगीत बोलण्यासाठी पाचारण केले. आरोपी रडू लागला व वारंवार म्हणू लागला कि ‘मी निर्दोष आहे. पोलिसांनी माझ्या विरुद्ध जबरदस्त पुरावे सादर करून कोर्टाच्या दृष्टीने कायद्याप्रमाणे मला खुनी ठरवले आहे.’ न्यायाधीशांनी संमती दिली परंतु कायदा हा पुराव्याच्या आधारे चालतो हे त्याला समजावले. परंतु परमेश्वर निर्मित कर्म-कायद्यामध्ये कधी ही गफलत होऊ शकत नाही हे ही तितकेच खरे. त्यांनी त्या आरोपीला खाजगी प्रश्न विचारला कि ‘ईश्वराला स्मरून खरे सांग – भूतकाळात तू कोणाचा खून केला होतास का ?’

आरोपीने रडत-रडत सांगितले की ह्या पूर्वी एक सोडून दोन खून केले होते. त्याच्यावर दोन वेळा खटला भरला गेला परंतु पैश्याच्या जोरावर त्याने दोन्ही वेळा नामवंत हुशार वकील नेमले व पोलीस खात्यात ही खूप पैसा दिला त्यामुळे दोन्ही वेळा त्याची सुटका झाली. पण ह्यावेळी आर्थिक स्थिती खालावल्यामुळे तो तसे करू शकला नाही व पूर्ण निर्दोष असूनही या वेळी तोच खुनी म्हणून सिद्ध करण्यात आला.

तात्पर्य हे कि कर्म करण्यापूर्वी विचारांना तपासून घ्यावे. त्याचे होणारे परिणाम बघावे. मनाच्या खोल दरीत जाऊन शांत चित्ताने आलेल्या परिस्थितीचा अभ्यास करावा व मगच ते कर्मामध्ये उतरवावे. दिवसातून अनेक वेळा स्वतःच्या कार्याची उजळणी घ्यावी . जेणेकरून आपल्याला स्वतःच्या चुका दिसून येतील. स्वनिरीक्षणाने स्वपरिवर्तनाची शक्ती येते.

जीवन म्हणजेच परिवर्तन. प्रत्येक प्रश्नांचे उत्तर आपल्या मध्येच दडले आहे. हे नेहमी लक्षात ठेवावे की ‘प्रत्येक घटनेमागे काही कारण आहे. प्रत्येक प्रश्नांचे काही उत्तर आहे तर प्रत्येक परिस्थितीला काही समाधान ही आहे.’ म्हणून व्यक्ति, परिस्थिती, साधन…… ह्यांना दोषी न ठरवता प्रत्येक परिवर्तनासाठी स्वतःला तयार करावे. जेणेकरून जीवनाचा प्रवास सुखद व सुलभ होईल.

— ब्रह्माकुमारी नीता

Avatar
About ब्रह्माकुमारी नीता 44 Articles
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..