दादासाहेब फाळकेंचा पहिला मूकपट ‘राजा हरिश्चंद्र’ हा १९१३ साली प्रदर्शित झाला. त्यानंतर अनेक मूकपटांची निर्मिती झाली. तेव्हा मूकपट पडद्यावर चालू असताना तबला पेटी वाजवून काहीजण संगीताची साथ देत असत. अशाच एका थिएटरमध्ये संगीत साथ देणारे एकाच ठिकाणी बसून कंटाळले की, त्यांना पाय मोकळे करण्यासाठी संधी देऊन स्वतः पेटी वाजवणारा एक तरुण होता. तो गंमत म्हणून हे काम करीत असे, मात्र काही कालावधीनंतर ह्याच चित्रपटसृष्टीत तो नाव कमविणार आहे हे चित्रगुप्ताने आधीच लिहून ठेवले होते, याची त्याला सुतराम कल्पना नव्हती… त्या तरुणाचे नाव होतं, राजाराम दत्तात्रय परांजपे!!
२४ एप्रिल १९१० रोजी राजाभाऊंचा जन्म मिरज येथे झाला. त्यांना शालेय शिक्षणापेक्षा नाटकाविषयी अधिक आवड होती. लहान वयातच ते रंगभूमीकडे आकर्षित झाले. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील एका नाटकात त्यांनी भूमिका करुन आपल्या अभिनय सादरीकरणाचा श्रीगणेशा केला. नंतर त्यांनी एस. व्ही. वर्तक यांच्या ‘लपंडाव’ नाटकात वाटाणे या विनोदी पात्राची भूमिका साकारली. रसिकांना ती फार आवडली.
१९३५ साली बाबूराव पेंटर यांच्या ‘सावकारी पाश’ या चित्रपटात भूमिका करुन राजाभाऊंनी आपली कारकीर्द सुरु केली. पाच वर्षांनंतर भालजी पेंढारकर यांच्या ‘गोरखनाथ’ चित्रपटात त्यांनी साकारलेला विनोदी भोलेनाथ खूप गाजला. याच दरम्यान त्यांनी भालजी पेंढारकर व मा. विनायक यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून धडे गिरविण्यास सुरुवात केली. त्यांच्यामध्ये चिकित्सक ‘विद्यार्थी’ हा गुण होता, या दोन्ही श्रेष्ठ दिग्दर्शकांकडून ते दिग्दर्शनातील बारकावे शिकत राहिले.
याच अनुभवातून त्यांनी १९४७ साली ‘बलिदान’ हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. त्यानंतरचा ‘जिवासखा’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटापासून एकापाठोपाठ एक सरस चित्रपट देणारं राजा परांजपे, ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके हे अभूतपूर्व त्रिकूट ठरलं!
१९५० साली राजा परांजपे यांनी स्थापन केलेल्या ‘श्रीपाद चित्र’ या संस्थेच्या ‘पुढचं पाऊल’ चित्रपटात राजाभाऊ, गदिमा व पुलंनी भूमिका केल्या होत्या. इथपासून राजाभाऊंचा आलेख उंचावत जाऊ लागला. ‘लाखाची गोष्ट’ने मनोरंजनाचा इतिहास रचला. त्यानंतर ‘पेडगावचे शहाणे’ गाजला. १९५४ साली राजाभाऊंचा ‘उन पाऊस’ हा चित्रपट समाज व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालणारा होता. त्यात त्यांनी मुख्य भूमिकाही साकारली होती. पन्नास वर्षांनंतर याच चित्रपटावर बेतलेला स्मिता तळवलकरचा ‘तू तिथं मी’ सुवर्णमहोत्सवी झाला होता.
१९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटाला जुनी पिढी कदापिही विसरणार नाही. कथा, पटकथा, संवाद, गीतं, संगीत, कलाकार अशा सर्व बाजूंनी हा चित्रपट सरस होता. यातील ‘एक धागा सुखाचा’, ‘तुला पाहते रे’, ‘बाई मी विकत घेतला श्याम’ सारखी अवीट गोडीची गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.
त्यानंतरचा चार्ली चॅप्लीनच्या ‘दि किड’ या चित्रपटाच्या प्रेरणेतून निर्मिती केलेला ‘हा माझा मार्ग एकला’ चित्रपट, सचिन पिळगांवकरच्या यशस्वी चित्रपट कारकीर्दीचा नांदी ठरला.
‘पडछाया’ मध्ये पुन्हा सचिन होताच. ‘पाठलाग’ या रहस्यमय चित्रपटाने राजाभाऊंना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. यावरुनच हिंदी चित्रपट ‘मेरा साया’ ची निर्मिती झाली.
‘आधी कळस मग पाया’ या कौटुंबिक विनोदी चित्रपटातून त्यांनी मनोरंजनाबरोबरच नव्या पिढीला संदेशही दिला. ‘आधार’ हा त्यांचा दिग्दर्शक व अभिनेता म्हणून शेवटचा चित्रपट. त्यावेळी पुण्यात सारसबाग नुकतीच तयार झाली होती. त्या सारसबागेत ‘माझ्या प्रितीच्या फुला…’ या गाण्याचे चित्रीकरण झाले. या चित्रपटात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी दिग्दर्शन सहाय्य व भूमिका देखील केली होती.
राजाभाऊंनी काही चित्रपटात भूमिका, काहींची निर्मिती असे एकूण तेरा हिंदी चित्रपट केले. बिमल राॅय यांच्या ‘बंदिनी’ चित्रपटात लक्षवेधी भूमिका केली. ‘बाप बेटे’ दिग्दर्शित केला. जया भादुरीच्या ‘पिया का घर’ या ‘मुंबईचा जावई’ चित्रपटावरुन रिमेक केलेल्या हिंदी चित्रपटात तिच्या वडिलांची भूमिका केली.
राजा परांजपे यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत ६० चित्रपटांतून भूमिका केल्या, २७ चित्रपट दिग्दर्शित केले, १३ हिंदी चित्रपट केले. व्ही. शांताराम यांच्या ‘माणूस’ चित्रपटात छोटी व जल बिन मछली, नृत्य बिन बिजली’ या हिंदी चित्रपटात मोठी भूमिका केली. त्यांच्या ‘पाठलाग’ चित्रपटास राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. चार चित्रपटांना राज्य पुरस्कार मिळाले.
१९७५ साली ‘या सुखांनो या’ या राजदत्त दिग्दर्शित चित्रपटात शेवटची भूमिका करुन लोकरंजनातून लोकशिक्षण देणाऱ्या राजाभाऊंनी १९७९ साली जगाच्या पाठीवरुन स्वर्गाकडे प्रयाण केले…
भालजी पेंढारकर यांचे शिष्यत्व पत्करून राजाभाऊ श्रेष्ठ दिग्दर्शक झाले, राजाभाऊंचे शिष्यत्व पत्करून राजदत्त श्रेष्ठ दिग्दर्शक झाले… आज राजदत्त यांच्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीला त्यांचा वारसा चालविणाऱ्या दिग्दर्शकाची नितांत आवश्यकता आहे….
आज राजा परांजपे यांची पुण्यतिथी, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!
– सुरेश नावडकर ९-२-२१
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहे
Leave a Reply