एक अनोखा कार्यक्रम याच सुमारास माझ्या वाट्याला आला. माझे गझलचे गुरु श्रीकांत ठाकरे यांच्याकडे मी नियमितपणे जातच होतो. एकदा त्यांच्याकडे गेलो असता श्रीकांतजींनी एका व्यक्तीची माझ्याशी ओळख करून दिली. ‘केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा’ हे अत्यंत लोकप्रिय आणि अजरामर गीत लिहिणारे हे कवी होते रमेश अणावकर. अणावकरांनी एका कार्यक्रमासाठी श्रीकांतजींबरोबर मलाही निमंत्रित केले. हा कार्यक्रम विक्रोळी येथे होता. संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची प्रकट मुलाखत सुरू होती. मुलाखतकाराने श्रीकांतजींना विचारले, एखादे गाणे तुम्ही कसे स्वरबद्ध करता? यावर श्रीकांतजी म्हणाले,
“गीतकार रमेश अणावकर इथे आहेत. गायक अनिरुद्ध जोशीसुद्धा इथे आहे. मी रमेश अणावकरांना विनंती करतो, की त्यांनी एक नवे गीत आत्ता इथेच सर्वांसमोर मला लिहून द्यावे. मी तुमच्यासमोरच त्या गीताला चाल लावतो. लगेचच अनिरुद्ध जोशी तुम्हाला ते गाऊन दाखवेल.’
रसिक श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांना आज काही निराळेच पहायला मिळणार होते. रमेश अणावकरांनी पाच मिनिटात काही ओळी श्रीकांतजींना लिहून दिल्या. श्रीकांतजींनी त्या लगेच स्वरबद्ध करून मला शिकवल्या आणि पंधरा ते वीस मिनिटात एक संपूर्ण नवे गीत मी रसिकांसमोर सादर केले. श्रोत्यांच्या टाळ्या थांबत नव्हत्या. श्रीकांतजींनी स्टेजवर चमत्कार घडवला होता. माझा आनंद हा की, या चमत्कारातला मी एक भाग होतो. आणि त्याचा साक्षीदारही होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकऱ्यांनी जिंकलेल्या अनेक सभा मी ऐकल्या होत्या. आज संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्याबरोबर त्यांनी जिंकलेला कार्यक्रम पहात होतो. अशा गोष्टी नियोजन करून कधीच घडत नसतात, तर त्या घडून जातात. असे क्षण अनुभवण्यासाठी आपले नशीब लागते एवढेच.
गझलचा एक मोठा कार्यक्रम ‘गोल्डन स्वान सिटी क्लब, विलेपार्ले, मुंबई’ येथे केला. तसेच माझ्या गाण्यावर प्रेम करणारे माझे स्नेही ठाण्याचे प्रकाशजी गुप्ते यांच्यासाठीही एक कार्यक्रम केला. तसेच माथेरानच्या ‘आनंदरिट्झ’ या प्रसिद्ध रिसॉर्टमध्ये गझलचा एक छान कार्यक्रम झाला.
एक दिवस संगीतकार अनिल मोहिले यांनी बोलावून घेतले. त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटी करिता नव्या संगीतकारांसाठी एक अभ्यासक्रम तयार केला होता. त्यात गझल या विषयावर मार्गदर्शन मी करावे अशी त्यांची इच्छा होती. मुंबई युनिव्हर्सिटीसाठी गझल या विषयासाठी गेस्ट लेक्चरर म्हणून काम करणे माझ्यासाठी नवीनच आव्हान असणार होते. मी लगेचच होकार दिला. मी व्यवस्थित तयारी केली. लवकरच युनिव्हर्सिटी क्लब हाऊस, चर्चगेट मुंबई येथे मी नवीन संगीतकारांना मार्गदर्शन करणारे पहिले सत्र घेतले. गझल गायकी कशी असते ते गाऊनही दाखवले. या सत्रामुळे अनेक नवीन संगीतकारांशी परिचय झाला. तेव्हापासून आजपर्यंत हे काम मी आनंदाने करतो.
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply