खरंच सेट झालो होतो का? आमचा ग्रुप बनून उणे-पुरे ३ दिवस झाले होते. उमेश सुद्धा RCA मधेच होता. शनिवार उजाडण्याचाच अवकाश होता की, आम्ही साईटस् बघायला मोकळे!
आणि ३० जुलैलाऑफिसची ती मेल बॉम्बसारखी माझ्या मेलबॉक्स मधे आदळली….
मेलमधे लिहिल्याप्रमाणे मला ३१ जुलैला हॉटेल सोडायचं होतं. ऑफिसने माझी व्यवस्था मेरलीबॉर्नला एका स्वतंत्र फ्लॅट मधे केली होती. शनिवारी सकाळी एक ‘अजय पाठक’ नावाचा आमचाच एक कलिग येवून मला फ्लॅट दाखवायला घेवून जाणार होता.आणि तिथेच किल्ली देणार होता. मला काही सुचत नव्हते आणि आता इंडियात उशिर झाला होता. मी मुकाटपणे माझे पॅकिंग केले.
मग मी,निलेश, कार्तिक, उमेश आणि संतोषने एकत्र जेवण घेतले. गप्पा मारत बसलो. उद्या शिफ्टिंग करायचे होते म्हणून आज रात्री उशिरापर्यंत पत्ते खेळत बसलो. उद्यापासून मी माझ्या दोन्ही गार्डन्सना मुकणार म्हणून मला फार वाईट वाटत होते. मी निलेशला म्हणाले, मला एकदा माझं गार्डन बघायचं आहे.रात्रीचे १२ वाजले होते. तसेच आम्ही बाहेर पडलो. गप्पा मारत मारत आम्ही हाईड पार्कच्या एन्ट्रन्सपाशी पोहोचलो. आत डोकावल्यावर जे द्रुश्य दिसले, त्याचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्य!
देवाने त्याचा बेस्ट फोटो आमच्यासमोर ठेवला होता. समोर सुंदर हिरवेगार लॉन, गेटच्या दोन्ही बाजूला रंग-बिरंगी आर्कषक फुले. गेटच्या अगदी समोर एक सुरुच्या झाडासारखे झाड. आणि त्या झाडाआडून खोडकरपणे डोकावणारा पूर्ण चंद्र! पौर्णिमा असावी किंवा नुकतीच होवून गेली असावी.
इतका सुंदर निरोप मला दिला होता हाईड पार्कने!!
तिथून हलूच नये असं वाटतं होत. शेवटी नाईलाजाने घरी आलो. परत गप्पांचा अड्डा रंगला, ते ३.३० कधी वाजले कळलेच नाही. संतोषने मधेच सर्वांना कॉफी केली.
आता मला झोपायला हवे होते कारण दुसर्या दिवशी मला शिफ्टिंग करायचे होते.
सकाळी-सकाळी ८.३०ला फोनच्या रिंगने जाग आली. अजयचा फोन होता. तो जरा घाईतच होता. त्याने सांगितले,१५ मिनिटांत खाली ये. मी तुला फ्लॅट दाखवतो. मला पुढे इंडियाची फ्लाईट पकडायची आहे.मी झटपट तयार झाले. काल रात्री कॉफीसाठी म्हणून दूध निलेशच्या रुममधे नेले होते ते तिकडेच राहिले. सकाळी सकाळी त्याची झोप-मोड नको म्हणून मी बिन चहाचीच खाली उतरले. आम्ही दोघांनीही वेळ पाळली होती. दोघही बरोब्बर पंधराव्या मिनिटाला RCA च्या रिसेप्शनमधे होतो. मी अजय बरोबर तो नविन फ्लॅट बघायला निघाले. बरोबर ट्युब मॅप, पास, फोनची डायरी आणि थोडे चिल्लर बरोबर घेतले. तो जास्त काही बोलत नव्हता. मी हि जास्त काही बोलण्याच्या मूड मधे नव्हते.दोन वेगळ्या लाईन्स् करुन आम्ही मेरलीबॉर्नला आलो. एका छोट्या पॅसेजमधून आम्ही मेन रोडवर आलो. तो पूर्ण पॅसेज विविध फुलांनी सजलेला होता.ते एक बुके शॉप होते. खूप सुंदर पद्धतीने शॉप ओनरने बुके डिस्प्ले केले होते. मेन रोडवर आलो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला नेटकेपणाने मांडून ठेवलेली एक सारखी घरे, स्वच्छ रस्ते! प्रथम दर्शनी मला ते सर्व खूप आवडले.
आम्ही ४-५ मिनिटे चालून त्यातल्याच एका घरासमोर थांबलो. फूटपाथवर काळे लोखंडी जिने होते.तो जिना रस्त्याच्या एक लेव्हल खाली जात होता. तो जिना जिथे संपला होता, तिथे आमचं स्वागत सिगरेटची थोटके, बिअरचे एम्प्टी कॅन्स यांनी केले. ते बाजूला सारत अजयने समोरचे दार उघडले.
दारतलं ते स्वागत बघून जरा हिरमोडच झाला होता. त्यातून तो बेसमेंटचा फ्लॅट होता. म्हणजे रस्त्याच्या खाली रहायचे? मन अजूनच उदास झाले. किचन आणि बेडरुमला फुल वॉल काचेची खिडकी होती जी बिल्डिंगच्या आतल्या पॅसेजमधे उघडत होती. म्हणजे कोणीही आत डोकावू शकतं. मला ते खूप अनसेफ वाटले. तिथे फोनही नव्हता. तेही पटण्यासारखे नव्हते.
त्यातून त्याने सांगितले की, खिडक्या कायम लॉक्ड ठेव. बाजूच्या घरात चोरी झालीहोती.आणि फ्लॅट ओनरला हा फ्लॅट विकायचा आहे, तो कोणालाही फ्लॅट दाखवायला घेवून येवू शकतो. तू तेंव्हा घरी असायला हवे. असे सांगून तो किल्ली ताब्यात देवून निघून पण गेला. आता माझे उरले-सुरले अवसानदेखील संपले. मी जरावेळ तशीच बसून राहिले.
एक तर काल झोप नीट झाली नव्हती. सकाळी चहा नाही आणि आता हे वाढून ठेवलं होता पुढ्यात. माझं डोकचं चालेनासं झालं. At that moment I felt very helpless and lonely. जरावेळाने मी उठून आठवणीने खिडक्या बंद केल्या.दार लॉक करुन जिने चढून वरती आले.डोळे आधीच पाण्याने भरले होते. त्यातून वरती आल्यावर मगाशी जी नेटकेपणाने सारखी असलेली घरांची अप्रूप वाटलेली मांडणी मला आता भुलभुलैय्या वाटायला लागली. मी कुठून आले, कुठे जायचयं मला काही आठवत नव्हतं, काही सुचतं नव्हतं.
मला एकदम शैलेशला फोन करावा असे वाटले. कारण जेंव्हा केंव्हा मी अडते, तेंव्हा मी शैलेशवर माझा प्रॉब्लेम सोपवून मोकळी होत होते. तो नेहमीच मला योग्य ती मदत करुन माझ्या चेहर्यावरचं स्माईल परत आणतो.
पण लगेच मनाला आवर घातला. कारण आत्ता त्याला फोन करुन मी त्याचे टेंशन वाढवले असते. अजून काही नाही. मग थोडे शांत होवून आजू-बाजूला पाहिले.
लांबवर एक काळा/राखाडी बोर्ड दिसत होता. ह्यावर नक्कीच स्टेशनकडे जाणारीडायरेक्शन असणार, असा विचार केला.रस्त्यावर एक चिट-पाखरु नव्हते कोणाला काय विचारणार?
मी त्या बोर्डपर्यंत चालल गेले. आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे तिथे स्टेशनला जाण्याची डायरेक्शन होती. ती ज्या बाजूने मी आले तीच दिशा दाखवत होती. मनातल्या मनात चरफडत आणि कपाळावर हात मारत मी जेव्हढ चालत आले ते आणि पुढे अजून ३-४ मिनिटे चालले. आणि मी फायनली RCA ला पोहचले.
हॉटेलवर जावून निलेश, संतोषला घडला प्रकार सांगितला. त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे समजावले. त्यांनी सांगितले तुला सेफ वाटतं नसेल तर कोणीही तुला जबरदस्ती करु शकत नाही.लगेच तिथून एडमिन हेड – सुभाष कुलकर्णींना फोन लावला. त्यांना सगळा प्रॉब्लेम सांगितला. त्यानीही लगेच सहकार्य केले. ते म्हणाले की, संडेपर्यंत एडजस्ट कर.मी सोमवारी RCA ला मेल करतो.शनिवार असल्यामुळे ते ऑफिसमधे नव्हते. आता माझ्या जीवात जीव आला. सगळ्यात आधी निलेशने मला चहा दिला.कारण हे सगळे होईपर्यंत सकाळचे ११-११.३० वाजले होते.आणि मी तोपर्यंत बिन चहा-नाष्ट्याची होते. हॉटेलतर ऑफिशियली सोडावे लागणार होते.
मग आमचे असे ठरले की, मी दोन दिवस सामान सगळं ३१२ मधे म्हणजे निलेशच्या रुम मधे ठेवायचं. कारण किचनच निम्मं सामान तिथेच होतं आणि त्याची रूम पण मोठी होती. उमेशची रूम बरीच लहान होती. दिवसभर तसही आम्ही फिरणारच होतो. रात्री उमेश माझ्या फ्लॅटवर झोपायला जाणार आणि मी उमेशच्या रुममधे झोपणार. खरचं सर्वांनी इतकं सहकार्य केल.
काही तासांपूर्वी ऊठलेली वावटळ परक्या देशात लाभलेल्या ‘मैत्र जीवाचे’ यांच्या सहकार्यामुळे क्षणात शांत झाली होती आणि मी उत्साहाने साईट सिईंगच्या तयारीला लागले!
— यशश्री पाटील.
Leave a Reply