कपडे वापरत असताना त्याला काही ना काही कारणाने डाग पडणे हे स्वाभाविकच म्हणायला हवे. कपड्याला पडणारे हे डाग खायच्या पानाचे असतील किंवा चहाचे तर कधी इतर खाद्य पदार्थांचे असतील तर कधी सायकल, मोटारगाडीच्या वंगणाचे असतील, कधी डांबराचे असतील. काही सांगता येत नाही. असे अनेक घटक ह्या डाग पडण्याला कारणीभूत असतात.
एकदा डाग कशाचा पडला हे समजले तर त्यावर उपाय करणे सोपे जाते. यामुळेच ‘हे करून पहा’ या शीर्षकाखाली असे उपाय नियतकालिकात वाचायला मिळतात.
इथे डाग पडण्यास कारणीभूत रसायन कोणते, याचा संबंध लक्षात घेऊन उपाय सुचवलेले असतात. त्यामध्ये उपायाकरिता वापरल्या जाणाऱ्या द्रावणात बहुतांशवेळी डागाला कारणीभूत रसायन विरघळते. परिणामी डाग निघून जातो.
हे सगळे प्रयोग सिद्ध, पडताळा घेतलेले तसेच रसायनशास्त्राला धरुन असलेले उपाय आहेत.
या सर्वांपलिकडे डाग पडण्याचे एक कारण म्हणजे रंगीत कपडे भिजवल्यानंतर इतर कपड्यांवर पडणारे डाग. बहुधा सरळ/ थेट रंगांचा वापर वापर होतो, त्यावेळी हे हमखास घडते म्हणजे मुख्यत्वे सुती कपड्यांच्या बाबतीत हे रंग बाह्य रसायनांच्या मदतीशिवाय चढविता येतात. हे रंग पाण्यात जास्त प्रमाणात विरघळत असल्यामुळे असे रंगवलेले कापड पाण्यात भिजवून ठेवल्यास रंग तंतूंवरुन निघून पाण्यात उतरतो, मग कापड फिके होते. साबणाच्या पाण्यात हे रंग आणखी लवकर फिके होतात.
सहसा आपण धुवायचे कपडे साबणाच्या पाण्यात भिजवतो, त्यामुळे असे रंगीत कपडे व इतर पांढरे किंवा अन्य एकत्र भिजवल्यास ह्या रंगीत कापडाचा रंग काहीवेळा दुसऱ्या कपड्याला लागतो. साबणाच्या पाण्यात ही प्रक्रिया अधिक जलद होते. दुसऱ्या कपड्याबरोबर असा झालेला रंगांचा संयोग टिकून राहतो, त्यामुळे तो रंगीत कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागला की सहसा जात नाही.
त्यामुळे थेट रंगाचा वापर कमी झाला आहेच, शिवाय रंगीत आणि पांढरे कपडे वेगवेगळे भिजवणे असे डाग पडणे टाळण्यासाठी श्रेयस्कर ठरते.
दिलिप हेर्लेकर
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply