नवीन लेखन...

एकच पर्याय

“ही साडी नेसू?”
“अहो/अरे, कशी दिसतेय मी?”
“हा ड्रेस मला छान दिसतो ना?”
“मला काहीही शोभूनच दिसतं, हो की नाही हो?”
“कित्ती सुंदर आलेयत ना माझे सगळे फोटो?”
“मी वयाने चाळीशीच्या आतलीच वाटते ना रे?”
या सगळ्या प्रश्नात नवऱ्यांना दोनच उत्तरांचा चॉईस असतो, ‘हो ‘ किंवा ‘सुंदर ‘.
या प्रत्येक प्रश्नात आपल्याला फारसं गृहीत धरलेलच नसतं. आपल्याला हे प्रश्न असेच विचारलेले असतात, पण उत्तर मात्र त्यांना हवं असतं तेच द्यावं लागतं. आता,
“ही साडी नेसू?” किंवा
“कोणती साडी नेसू ?”
या प्रश्नांवर आपण कितीही अभिनय करून म्हणा किंवा अगदी मनापासून जरी सांगितलं, तरी जी नेसून येते ती साडी वेगळीच असते. मग विचारायचच कशाला? म्हणूनच म्हटलं हे प्रश्न आपल्याला असेच विचारले जातात. पण म्हणून आपण,
“कुठलीही नेस गं, पण चल पटकन”
असं म्हटलं की लगेच,
“तुला/तुम्हांला (वाचकांनी आपापल्या सोयीनुसार घ्यावं )ना कौतुक म्हणून नाही बायकोचं. एव्हढं विचारतेय प्रेमाने तर कद्धी नीट सांगणार नाही. आणि तसंही तुझं प्रेमच कुठे आहे म्हणा माझ्यावर !.”
म्हणजे विषय भलतीकडेच जाऊ शकतो. त्यामुळे प्रश्न विचारल्यावर, कपाटात लाटकलेल्या भरघोस साड्यांमधली एक चटकन निवडून सांगून टाकावं,
“ही नेस ” म्हणून.
कपाटात कितीही साड्या (कित्येक न वापरलेल्या )असल्या तरी, “आजच्या फंक्शनसाठी माझ्याकडे एकही साडी नाहीय.”
हे प्रत्येक बायको अगदी दुःखाने म्हणत असते. आता त्यावर वेड्यासारखं, “या काय इतक्या तर आहेत ” असं अजिबात म्हणायचं नसतं. तर आपणही तिच्या दुःखात सामील आहोत एवढेच चेहऱ्यावर भाव आणायचे असतात.
“कशी दिसतेय मी?”
या प्रश्नावर आपण,
“छान, चल निघूया?”
इतकंच म्हटलं की,
“अरे, पण काय विचारतेय मी?तुझं ना माझ्याकडे लक्षच नसतं.”
हे म्हणणारी बायको आपल्या नवऱ्याला रस्त्यात अनेकदा अनाकलनीय प्रश्न विचारून गोंधळात टाकते. उदा.
“ऐक ना, आता तीं आपल्या समोरून बाई गेली तिचा ब्लाउज पहिलास?”
आता मला सांगा बिचारा नवरा यावर काय उत्तर देणार ?
म्हणजे आपण बघितलाच असणार याची खात्रीच असते प्रश्नात. आता पाहूनही फार आत न शिरता आपण , “हं ” असं म्हटलं की ती म्हणते,
“तशा फॅशनचा शिवायचाय मला.”
(हे आधी माहिती असतं, तर मोकळ्या मनाने नीट नसता का बघितला?)
आता दुसरी गंमत म्हणजे, कधी आपणही अगदी फारच लाडात येऊन मनापासून म्हणतो,
“अगं आज तो अमुक ड्रेस घाल ना, खूपच छान दिसतो तुला.”
त्यावर उत्तर मिळतं,
“शी ! काही काय? तुला काही समजतं की नाही? किती जुना झालाय तो ड्रेस.”
आता ड्रेस किंवा कपडे जुने होणं याची बायकांची व्याख्याच वेगळी असते, आणि तीं आपल्याला तरी न समजणारी असते.
बरं, कधी,
“आज साडी नेस ना, सणाचा दिवस आहे. छान वाटेल.” असं म्हटलं की तो जुना ठरवलेला ड्रेस घालून हजर होतात. आपल्याला वाद ओढवून घ्यायचाच असेल तर विचारावं,
“त्या दिवशी मी सांगितलं तेव्हा हा ड्रेस जुना झालाय म्हणाली होतीस. मग आज कसा गं घातलास?” पण हे अजिबात मान्य न करता ती म्हणणार,
“उगाच काहीही बोलू नकोस. या ड्रेसला मी कशी जुना म्हणू शकते? माझा अगदी आवडता ड्रेस आहे हा.”
काय बोलणार आपण?.
आता आपण समारंभ किंवा मंगल कार्य, म्हणजे जिथे गेलेलो असतो, तिथे आलेली प्रत्येक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं वरपासून खालपर्यंत, म्हणजे केशभूषा, मेकप, दागिने, साडी, ब्लॉउज ते अगदी चपलांपर्यंत निरीक्षण करत असते. आता हे आपल्याला कसं
कळतं ? तर…… असो,
घरी आल्यावर सुरु होतं,
“काही बायकांना आपण कोणती साडी नेसावी, कशी नेसावी, आपल्याला कोणता रंग चांगला दिसतो, हेअरस्टाईल कशी करावी याचा जराही सेन्स नसतो ना?”
या वाक्यांनी आपण चटकन सावध व्हायचं आणि समजून जायचं की आता हा विषय तिच्याकडे वळण घेणार आहे. पण आपणही थकलेलो असतो. सगळं कळूनही म्हणतो,
“का? काय झालं ?” त्यावर,
“झालं काही नाही, मी आपली सहजच म्हणत होते.(खोटं ) काहीही फॅशन करतात बायका. आपल्याला शोभतंय की नाही याचा जराही विचार करत नाहीत. आता माझी गोष्टच वेगळी आहे, कोणतीही फॅशन शोभते. साडी असो किंवा ड्रेस दोन्हीमध्ये मी….. जाऊदे काय बोलत बसलीय मी.”
हे प्रश्नासारखा वाटत नसलं तरी ते नुसतं विधान नसतं तर तो आपल्याला विचारलेला प्रश्नच असतो आणि बोलणं मध्येच सोडून बायको आत गेली असली तरी कान आपल्या प्रतिक्रियेकडेच असतात.
“हो की नाही हो/रे???” हे त्यामध्ये सायलेंट असतं. आणि आपण काय उत्तर देऊन हे प्रकरण लगेच संपवायचं हे चणाक्ष नवरे समजून असतात.
अहो, फोटोसाठी या इतक्या वेड्या असतात की लग्नसमारंभात फोटोसाठी बोलावलं की आधी,
“अहो, माझा कशाला?”
“आधी तुमचं होऊंदे ना “
“अगं नको “
असं म्हणत म्हणत प्रत्येक ग्रुपमध्ये शिरून फोटो काढून घेतात. या फोटोच्या उत्साहात शेजारी नवरा उभा आहे नाही, कोण उभं आहे शेजारी याचं भानही नसतं. फोटो पहाताना,
तुझा नवरा कुठे दिसत नाही फोटोत? असं कुणी विचारल्यावर त्यांच्या लक्षात येतं आपण एकट्यानेच फोटो काढल्याचं.
इथेच हे प्रकरण संपत नाही, तर ते फोटो नंतर पहाणं आणि स्वतःचा प्रत्येक फोटो आल्यावर आपल्याला पुढे जाऊ नं देता ते पान घट्ट धरून आपला फोटो पहात बसणं हे आपल्याला जास्त तापदायक होतं. थोड्या थोड्या वेळाने,
“मस्तच आलेयत नं माझे सगळे फोटो?” हे सुरूच असतं. आता यावर आपण “हं !” असं म्हणून चालत नाही. बरं इतर फोटोत आपण जरा जास्त इंटरेस्ट घेऊन ते पाहूही शकत नाही. कारण स्वतःचा फोटो आल्यावर बायका(आपापल्या नवऱ्यांच्या )शेजारी बसून आपल्या चेहऱ्यावरचे भाव पहात असतात. त्यामुळे बायकोचा फोटो आला की ते पान पटकन न उलटता अर्धा मिनिट तरी त्याकडे पहात रहावं लागतं, ते ही चेहऱ्यावर प्रेमभाव ठेवून.
आपल्यावर कधी कोणता प्रश्न न कळता सवरता अचानक येऊन आदळेल आणि कशाला तोंड द्यावं लागेल हे काही सांगता येत नाही. म्हणजे आपली बायको कधी बाहेरून किंवा वॉक घेऊन आल्यावर तिच्या चेहऱ्यावर गोड हास्य आणि ओठांवर गुणगुणणारं गाणं असा भाव दिसला की आपण समजून जावं की बाहेर जे काही तिच्या दृष्टीने चांगलं घडलंय त्यामध्ये आपली साक्ष घेतली जाणार. आपण क्षणार्धात सावध होऊन शक्यतो दुसरा विषय काढावा.
“तू लिंबू सरबत वगैरे घेणारायस का? मी करतो लगेच, आणि बस जरा पाच मिनिटं. अगदी लगेच नको लागू कामाला.”
पान तिचं आपल्या या कौतुकाकडे लक्षच नसतं. आणि त्याचं कारण लक्षात येतं नसल्यामुळे आपलं टेन्शन वाढत असतं.
ती आपल्यालाच चहा घेणार का असं मृदू शब्दात विचारते (इतर वेळी, ‘चहा हवाच असेल ना ‘ असा टोन)
“अगं नको, सकाळपासून झालाय दोन तीन वेळा”
असं म्हटल्यावरही,
“घे रे, तुला लागतो ना थोडा, करते मी “
चहा टाकायला तीं आत जाते आणि आपणही, जाऊदे म्हणून पेपरात डोकं खूपसतो न खूपसतो इतक्यात……
चहाच्या कपासहं बाहेर येऊन विचारते,
“ऐक ना/ऐका ना, माझं वय चेहऱ्यावरून चाळीसच्या पुढे वाटतं? अगदी खरं सांग हं!”
ज्या प्रश्नाची आपण इतका वेळ वाट पहात असतो तो दत्त म्हणून समोर येऊन उभा रहातो. पोटातला गोळा मोठा होऊ लागतो. आपण आधी तिच्या हातातला चहाचा कप ताब्यात घ्यायचा. उत्तराने चहा फुकट जायला नको इतकंच. आणि नंतर नीट ऐकू न आल्यासारखं करून म्हणायचं,
“काय म्हणालीस? मला काही म्हटलंस का? पेपर वाचताना लक्षात नाही आलं.”
या आपल्या प्रश्नावर इतर वेळी,
“दुसरं कोण आहे तुमच्याशिवाय घरात आता?” अशी reaction आली असती. पण आज मात्र तसं होत नाही. पुन्हा विचारलं जातं,
“नाही म्हणजे मी म्हणत होते, माझं वय चाळीशी ओलांडलेलं वाटतं का?”
(‘तू पन्नाशीची झालीस गं’ हे आपलं मनात )
प्रत्यक्षात उत्तर सुचत नसल्यामुळे आणि प्रश्नाचा नेमका अंदाज येत नसल्यामुळे म्हणायचं,
“का गं ! काय झालं एकदम ?”
“अरे/अहो, तीं माझी मैत्रीण नाही का सुलू…” (सु्लूचा चेहरा फिगर आठवून आपल्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव नाही आणायचे. गंभीरपणे उगीच म्हणायचं,
“कोण सुलू? हं हं ! ती जाडजूड झालीय ती?”
बायकोही खुश तिला जाडी म्हटल्याबद्दल.
“ते जाऊदे, तर आज तीची लेक सुद्धा आली होती पहिल्यांदाच तिच्याबरोबर. माझी ओळख करून दिल्यावर मला लगेच म्हणाली अरे,
‘अय्या आंटी तुम्ही काय मेंटेन केलंय स्वतःला. एकदम यंग दिसता. Sooo cute.’
आणि आपल्याला तिच्या खुश असण्याचा उलगडा होतो आणि ती सुलूची लेक सुद्धा सगळ्या आंट्याची नाडी ओळखणारी असणार हे लक्षात येतं. इतक्यात,
“मी सुलू आणि तिच्या लेकीला बोलावलंय आपल्याकडे या रविवारी.”
हे ऐकून चेहऱ्यावर जराही आनंद नाही आणायचा. आतून, सुलू येणार म्हणून उकळ्या फुटत असल्या तरी म्हणायचं,
“कशाला रविवारी तिला बोलावलंस?”
“असुदे रे, माझी चांगली मैत्रीण आहे ती. पण ते जाऊदे, तू सांग ना, वाटते ना मी चाळीशीचीच.”
यावरही आपणा नवऱ्यांकडे “हो” म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय काय असतो सांगा ना?
प्रासादिक म्हणे,
प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..