नवीन लेखन...

एकाकी प्रवास..

शेवटी हा सगळा प्रवास आपला एकट्याचाच असतो नाही! आपल्याला उगाच वाटतं, आज हा आला, उद्या तो आला..

छोट्या मुलांना कसं (उगाच) वाटत असतं, की ही आई म्हणजे आपलं सर्वस्व आहे. आपण कधीही, कोणत्याही गोष्टीसाठी विसंबून राहू, आणि तिथे आधार मिळेलच, असं एकमेव ठिकाण आहे. बाळाचा हा विश्वास पक्का होऊ लागतो, तशी ही (दुष्ट) आईच एक दिवस आपल्या बाळाला शाळेत, नवख्या लोकांमध्ये (एकट्याला) सोडून येते.. रडत धडपडत सावरतो तो जीव बिचारा कसा तरी..काही दिवसांनी.. आणि (नव्याने) त्याच्या शिक्षिकेकडे तो आधारासाठी पाहू लागतो. आपल्या सगळ्या प्रश्नांची (अचूक) उत्तरे इथेच मिळतात, ह्या विश्वासाने तो (पुन्हा) ह्या नव्या आधाराकडे खेचला जातो. हा आधारसुद्धा नेमका आपल्याला नको त्यावेळी सर्वांसमक्ष आपला अपमान किंवा शिक्षा करतो, नि आपला (डगमगता) हात सोडून देतो.. सोबत्यांमध्ये आपली एक छाप निर्माण करायचा प्रयत्न, ह्या (अगदी) विश्वसनीय व्यक्तीनेच फोल ठरवलेला असतो.. की ह्या स्वावलंबी जगण्याच्या प्रयत्नात पुन्हा आपण एकटे!

कालांतराने ती खास जागा आपले मित्र-मैत्रिणी घेतात. पण मुळात हे गृहीतच असतं, की ते (आपल्या एवढेच) पाण्यात राहून, मदतीसाठी हातपाय मारत आहेत. अशी ही धडपड अजून काही काळ चालूच रहाते. पुढे कुणाकुणाला (सच्चे) साथी मिळतात, कुणाची (त्यांच्याशीच) लग्न देखील होतात. तरीही खरा प्रवास मात्र त्यांचा त्यांचा एकट्यानेच चालू असतो. ह्या सच्च्या साथीदाराने जग आपल्या चष्म्यातून पाहावं. निदान ते तसं पाहण्याचा, आपला प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न तरी करावा, (जमल्यास) पुढे साजेशी सोबत करावी. स्वतःचाही प्रवास सांगावा. आणि यापुढचा, दोघांनी (एकत्रितपणे) तो आनंदमयी करावा. पण प्रत्यक्षात काही वेगळंच घडतं. जो तो (एकत्र असूनही) आपल्याच काल्पनिक विश्वात मग्न राहातो. समजुतीने, पुरेसा वेळ देऊन आपली कल्पना मांडण्या ऐवजी, दुसऱ्याने ती आपसूक समजून घ्यावी, अशी अपेक्षा करतो. कधी सांगितलेली समजून घेतली जात नाही, तर कुठे जगरहाटीनिमित्त (फक्त) पसारा मांडला जातो. आणि एकूणच ह्यातला प्रत्येक गडी आपापला डाव एकेकट्याने खेळू लागतो. एकेकटा दमतो, (दुःखी,) कष्टी होतो. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात तर कुणाचीच शाश्वती नाही. इतरांचं सोडा, पण माझं शरीर, बुद्धी, ह्यांच्याही साथीची अपेक्षा करण्यात अर्थ नाही. तेंव्हा आपल्या मनाची ताकदच फक्त साथ देते.

तसे या वाटेत किती जण भेटतात. कुणी (मनात येईल तेवढी) सोबत करतात. कुणी (दुरूनच) ‘आहे हं’ असा विश्वास दाखवत राहतात. कुणी बघून हसतात, कुणी बसून दोन अश्रू गाळतात आणि निघून जातात. शेवटी खरा खुरा प्रवास ज्याचा त्यालाच करायचा असतो (की नाही?)! ना कुणी हर प्रसंगी हात धरायला येतो, ना कुणी वाटेला नियमीत सोबत करतो! इथे कुणीच आपला डाव सोडून येऊ शकत नाही.. शेवटी त्याचाही प्रवास त्यालाही (एकट्यानेच) तर करायचा असतो!

— प्रज्ञा वझे घारपुरे
October 5, 2019

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..