माझी “फ्रेम्स” नावाची एकांकिका- ” माणूस नांवाचे निगेटिव्ह वर्तुळ” या एकांकिका-संग्रहातील. तिचा एक प्रयोगही माझ्या विद्यार्थ्यांनी इस्लामपूरला , सदर एकांकिका-संग्रह प्रकाशन प्रसंगी केलेला होता.
माझी “सहवास ” नामक कथा- “दोहा” या कथासंग्रहातील ! त्याहीपूर्वी ती “सा. सहयाद्री ” मध्ये प्रकाशित झालेली.
दोन्ही कलाकृती माझ्या आवडत्या- विशेषतः कथा अतिशय तरल ! एकांकिका त्यामानाने मुक्त /प्रायोगिक वगैरे !
मागील आठवड्यात माझ्या शालेय मैत्रिणीच्या मुलीने फोन केला- पुढील महिन्यात तळेगांवला होणाऱ्या एका एकांकिका -वाचन स्पर्धेसाठी तिला (माझ्याकडे एखादी रेडिमेड असली तर ती किंवा नवी लिहिणं शक्य असेल तर नवी) माझी एक एकांकिका १५ ऑगस्टच्या आत हवी होती. पात्रं तीन हवीत आणि वाचन -कालावधी किमान एक तास ! ती “पुरुषोत्तम” आणि “फिरोदिया” वाली नवी पिढीची आणि मी एकांकिका -लेखन थांबवून २५ हून अधिक वर्षे झालेली.
मी तिला पाहिलं नाहीए/भेटलो नाहीए . (किंबहुना माझ्या शालेय मैत्रिणीलाही शाळा सुटल्यापासून पाहिलं नाहीए /भेटलो नाहीए. आमच्या गप्पा फोनवरच आजवर झालेल्या आहेत आणि माझी माहिती असल्याने बहुधा तिने मुलीला माझे नांव सुचविले.) मुलीने तिच्या वयानुसार आधी २-३ स्क्रिप्ट्स मिळवायचा प्रयत्न केला आणि हाती काही लागत नाही म्हटल्यावर मला फोन केला. ( मीही वालचंद मध्ये हीच प्रक्रिया करून लेखक झालोय. सांगलीत एकही स्त्री-पात्रविरहित चांगली एकांकिका न मिळाल्याने शेवटी लेखणी हातात घेतली आणि आजवर १५ एकांकिका लिहिल्या आहेत. बाय द वे -स्त्री पात्रविरहित ही महाविद्यालयाची त्या सुरुवातीच्या काळातील अट होती. आमच्या बरोबर इंजिनिअरिंग ” हाताच्या बोटावर ” असणाऱ्या मुलींनी, (साल १९७७) स्टेजवर मुलांबरोबर काम करायचं नाही असा दंडक होता , जो कालांतराने सैलावला.) असो.
तिच्या नियमात बसणाऱ्या “फ्रेम्स” ची मी निवड केली (नवं काही लिहिणं इतक्या कमी कालावधीत शक्य नाही म्हणून) आणि वाचन -कालावधीत स्क्रिप्ट बसावी म्हणून ” सहवास ” चे त्यावर बेमालूम कलम केले. साहित्यातील हा माझा आणखी एक प्रयोग.(इतर प्रयोगांबाबत पुन्हा कधीतरी) पण मनासारखा जमल्यावर आज दुपारी तिला PDF पाठविली.
रविवारपासून ही कारागिरी चालली होती.
आवडली तर बसवेल, नाही आवडली तर नाही बसवणार , काही बदल करून हवे असतील तर येत्या २-३ दिवसात करून देईन.
माझ्या दृष्टीने आता ते महत्वाचे नाही.
प्रोसेस एन्जॉय केली, नवा आत्मविश्वास आला- दोन साहित्यप्रकारांचे कलम करण्याचा ! होपफुली नव्या पिढीला हे लिखाण अपील होईल आणि हा अवतार रंगमंचावर येईलही.
आणखी एक आनंद – पुनर्लेखन करताना दोन्ही साहित्यप्रकारांना फारसं बदलावं लागलं नाही, किंचित/किरकोळ शब्द इकडे-तिकडे ! म्हणजे एकदा जे लिहून ठेवलंय, त्याचा चिरा भक्कम आहे. स्वतःवरचा आणि स्वतःच्या शब्दांवरचा विश्वास दुणावला. मी आणि म्हणून माझे शब्दही तेच आहेत हा आनंद अधिक आणि महत्वाचाही !
” शब्दांचा हा खेळ मांडला , तुझ्या कृपेने ईश्वरा ! “
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply