चला बंधूहो एक होऊ या शपथ तुम्हाला शिवरायाची
आज देऊ या, खंबीर शाश्वती, समर्थ भावी भारताची ॥ धृ ॥
प्रणाम असू द्या त्या शिवबाला प्रणाम हा लोकमान्यांना
प्रणाम असू द्या वीरांना माझा, निष्ठांना नि मूल्यांना ॥
हिमालयासम पावित्र्याला नि शांतिच्या येथील पूजेला
प्राणांहूनही प्रिय अशा या विशाल माझ्या देशाला ॥ १ ॥
हा हिंदूचा देश मुलांनो आहे भूमी गौतम बुद्धाची
इस्लाम-ईसाई सर्वांस शाश्वती बात कशास हो युद्धाची ॥
दुभंगलेली मने सांधूनि विभागलेले हात जोडूया
एकदिलाने एकमनाने भूमीचे या पांग फेडूया ॥ २ ॥
भारत माझी जात आणिक धर्मही माझा भारत आहे
एक धर्म नि एक कुळीचे आपण एकच आपला मांडव आहे
एक ईश्वर एकच अक्षर, एक सदा काळीज अपुले आहे
एकतेचा मंत्र जपोनी, शांतीचा आपला जयघोष आहे ॥ ३ ॥
एकोप्याने जवळ येऊ या, एक होऊ या प्रवाहाने
एकजूटीने उत्कर्ष साधू या मिळून होऊ या एक मने
खांद्यास मग भिडवून खांदा एक घेऊ या शपथ साथीहो
एकमुखाने, एक लयीने गर्जत राहू जयजय हिंदुस्थान हो ॥ ४ ॥
रामायणाचे करुनी पारायण आदर्शाचे करुया मंथन
विषमतेला बूजवून; अस्मानी झेपाऊ या उदंड उन्मन
संकोचित तणांना खुडूनी फुलवू प्रेमाच्या विश्वकळ्यांना
समर्थतेची रुजवून स्वप्ने जोपासूया निरोगी मनांना ॥ ५ ॥
बंधुभावाशी नाते अतूट होवो अडसर जातीचा नको
सर्वांप्रती असू द्या समान आदर आनंदाला मग पार नको
हातात गुंफूनी हात करुया मोहक मोत्यांच्या माळा
समर्थतेच्या कळसास नेऊया गोवर्धन होऊन सारे गोळा ॥ ६॥
— यतीन सामंत
Leave a Reply