“कमल आणि विमल”… जुळ्या बहिणी….. साहजिकंच लहानपणापासून सगळं सारखं….. खेळणी, कपडे, दप्तरं, पर्स, वेण्या, रिबीन सगळंच… अभ्यासात सुद्धा थोड्याफार फरकानेच पुढे-मागे असायच्या दोघी…. मोठ्या झाल्या… शिक्षण पूर्ण झालं… आणि बोलता बोलता लग्नाला आल्या सुद्धा… कमलचं लग्न ठरलं… विमलसाठी स्थळं बघणं चालूच होतं… त्यांच्या आई वडिलांचं नशीब थोर म्हणून दोनेक महिन्यात विमलचाही योग जुळून आला आणि थोड्याच दिवसात एकाच मांडवात दोघींचेही विवाह पार पडले….
कमलचे पती मुंबईत मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होते… तर विमलचं सासर पुण्यात. त्यांचा स्वतःचा वर्षानुवर्षे वडिलोपार्जित व्यवसाय होता… दोघीही आपलं शहर सोडून आपपल्या सासरी स्थिरस्थावर झाल्या. चांगल्या गृहिणींची सगळी कर्तव्य बजावत सुखी संसारात गुरफटल्या… नव्या जबाबदाऱ्या, वाढणारा परिवार या सगळ्यात रममाण झाल्या…
“कमल”ला दोन मुलं…. मोठी मुलगी -धाकटा मुलगा…. चौकोनी कुटुंब…सगळं काही अलबेल…. मुलंही खूप हुशार आणि मेहनती… मुलीचं लग्न झालं… जावई IT कंपनीत… काही महिन्यातच कमलच्या पतीचं अल्पश्या आजाराने अकस्मात निधन झालं…. पायाखालची जमीन सरकली… पण मोठ्या धीरानं परिस्थितीला सामोरी गेली….आर्थिक बाजू भक्कम असल्याने ती चिंता नसली तरी मुलाचं उर्वरित शिक्षण, लेकीचं बाळंतपण, नातवंडं, मुलाचं लग्न अशा अनेक जबाबदाऱ्या पेलायच्या होत्या…. मुलाला त्याच्या इच्छेनुसार उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवलं…. तो अपेक्षेप्रमाणे तिथेच रमला…. तिथलाच झाला… तिथल्याच भारतीय मैत्रिणीबरोबर सुत जुळलं…. कमलनेही मुलाच्या सुखाचा विचार करत अगदी थाटामाटात लग्न करून दिलं… सगळं काही समर्थपणे पूर्णत्वास नेत एकेक जबाबदारीतून कमल मोकळी होत होती… आताशा कधीतरी लेकीकडे जाऊन नातवंडांशी खेळण्यात वेळ घालवायची… एक दिवस जावई त्यांना परदेशात चांगली नोकरी मिळाल्याची “गुड न्यूज” घेऊन आले… आता जवळ असणारी लेक सुद्धा परिवारासह भुर्रकन उडून गेली…. तिथे मुलाच्याही कुटुंबाचा विस्तार झाला होता. एक दिवसाआड फोन आणि व्हिडियो कॉल हा दिनचर्येचा भाग झाला होता… किंबहुना दिवसातले तेच क्षण मनाला सुखावणारे होते…. त्यामुळे तिचं “घड्याळ” सुद्धा “त्यांच्याच वेळेप्रमाणे” चालायचं…. दिवसामागून दिवस जात होते….सुरवातीला सोसायटीत, शेजारी पाजारी, देवाधर्माचं करण्यात किंवा TV बघण्यात थोडा वेळ जायचा पण जसं वय वाढू लागलं तसा त्या सगळ्याचाही उबग येऊ लागला, “एकटेपणा” जाणवू लागला…. आपली हक्काची आणि जवळची माणसं दूर असल्याची खंत वाटू लागली…. आयुष्याच्या या टप्प्यावर आनंदाने आपल्या मुला-नातवंडांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घालायच्या ऐवजी आपला आपला एकटीचा “भातुकलीसारखा” स्वयंपाक करायचा……… बालहट्ट पुरवायचे सोडून online लाड करायचे…. कंटाळा येऊ लागला त्या “आभासी वास्तवाचा”…. आपली सुखदुःख सुद्धा स्वतःलाच सांगायची…. सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेली ; चार भिंतीत अडकलेली “कमल” आता अगदी “एकटी” पडली होती…..
तर दुसरीकडे…. “विमल”ची परिस्थिती या बाबतीत मात्र थोडी वेगळी होती…. विमलला २ मुलं आणि एक मुलगी… मुलीचं सासर अगदी हाकेच्या अंतरावर… तर दोन्ही मुलं, सुना, नातवंडं,आई वडिल असं सगळं ८-१० जणांचं कुटुंब एकत्र राहायचं…..स्वतःच्या बंगल्यात…. अगदी गुण्यागोविंदाने… Perfect Joint Family… दोन्ही चिरंजीव त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात चांगले यशस्वी असल्याने वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेणारं कोणी नव्हतं… म्हणूनच विमलच्या यजमानानी वेळीच सगळं बंद करण्याचा निर्णय घेतला आणि मजेत निवृत्त आयुष्य जगू लागले….. पुढे वार्धक्यामुळे ते जग सोडून गेले… पण विमलची मुलं, दोन्ही सुना अगदी व्यवस्थित काळजी घ्यायचे तिची…लेक-जावई सुद्धा नियमित येऊन भेटायचे…. सगळं कसं अगदी सुरळीत… दृष्ट लागावं असं… आणि…. दृष्ट लागलीच….. आधी क्वचितच कधीतरी-काहीतरी विसारणाऱ्या विमलची विस्मृती वाढत पार स्मृतीभ्रंशापर्यंत गेली….. आता विमल वर्तमानात नसायचीच…. ते वगळता बाकी शारीरिक व्याधी काहीच नव्हती.. पण कसला आनंद नाही की दुःख… मुलांचं यश, नातवंडांना मोठं होताना बघण्याचा आनंद…. पडले-धडले तर वाईट वाटणं….. मुलांशी. लेकीशी मनमोकळ्या गप्पा मारणं.. सगळ्यांचे लाड करणं…. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं… हे सगळं तिला शक्य असूनही ती करू शकत नव्हती कारण तिचं जगच वेगळं होतं…. घरातल्या घडामोडींचं तिला काहीच सोयर-सुतक नव्हतं…. काळजी घेणारी, प्रेम करणारी सगळी आपली माणसं आजूबाजूला असूनही विमल मात्र अनेक वर्ष “एकटी” पडली होती.
तिकडे दुरावलेल्या माणसांमुळे कमल “शरीरानी एकटी”…. तर सारं काही समीप असूनही विमल “मनाने एकटी”……. दोघी बहिणी नियतीच्या अशा विचित्र कोंडीत सापडल्या होत्या..सुरवातीला कमल यायची कधीतरी विमलला भेटायला पण वयोपरत्वे तिलाही मुंबई-पुणे प्रवास झेपेनासा झाला… कमलच्या मुलांचाही मावशीवर खूप जीव… त्यामुळे ते सुद्धा परदेशातून आपल्या मावस भावंडाना नेहमी फोन करून ख्याली खुशाली विचारायचे….. तर कमलचा असा एकटेपणा पाहून विमलची मुलं सुद्धा आपल्या मावस भावंडाना परदेश सोडून आईजवळ राहण्याचा सल्ला द्यायचे…. पण करियर हीच त्यांची प्राथमिकता आणि त्या राहणीमानाची सवय झाली असल्याने त्याचा काही उपयोग झाला नाही…….. अशाच एका सकाळी अगदी निपचित पडलेल्या विमलला पाहून मुलांना भलतीच शंका आली म्हणून डॉक्टरांना बोलावलं… दुर्दैवाने शंका खरी ठरली…. विमलचे श्वास संपले होते….. मावशीच्या अशा जाण्याने परदेशातल्या भाच्यांना आता आपल्या आईचा विचार करून अपराधी वाटू लागलं…. आपण आपल्या आईबरोबर असायला हवं याची जाणीव प्रकर्षानी होऊ लागली….जबाबदारीचा साक्षात्कार झाला… बहिण-भावानी आपसात चर्चा करून अखेर भारतात परतण्याचा निर्णय घेतला….. त्या दिशेने परदेशातली सगळी निरवानिरव देखील करायला घेतली….. अखेर ठरलं…..आईला आपला हा निर्णय कळवला…. कमलचा आनंद गगनात मावेनासा झाला…. सगळ्या प्रक्रियेला काही महिन्याचा अवधी लागणार होता…… ती दिवस मोजत होती आणि बेचैन होत होती…. तारीख ठरली….आता रोज एका तारखेवर फुली मारत कमल “आपला एकटेपणा संपणार” या विचारांनी प्रफुल्लीत व्हायची….. इतक्या दिवसांची बरीच हौसमौज राहिलेली….त्यामुळे ते आल्यावर कायकाय करायचं हे सगळं ठरवून ठेवलं होतं…..
अखेर तो दिवस उजाडला…. खचलेल्या कमलला आज नव्याने बळ आलं होतं…. सगळ्यांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि आता एकत्र राहण्याच्या विचारांनी एक उर्जा संचारली होती…. सकाळपासूनच कमल कामाला लागली होती….. स्वतः साफसफाई, आवाराआवर केली….. पडदे-चादरी-आभरे बदलले… फ्लॉवरपॉट मध्ये ताजी फुलं ठेवली….. स्वयंपाकघरात सगळं टापटीप केलं….. अगदी सणासुदीसारखं…. लगबग-धावपळ…….”काय करू आणि काय नको” असं झालं होतं….. तर तिकडे मुलांनी आईला छोटंसं सरप्राईज देण्यासाठी शेजाऱ्यांशी संगनमत करत प्लॅन आखला…. आईला साधारण अंदाज येण्यासाठी म्हणून airport हून निघाल्यावर कळवायचं पण घरी आल्यावर बेल न वाजवता शेजारच्या काकूंकडे कायम ठेवलेली extra किल्ली घेऊन हळूच दार उघडायचं आणि आईला सरप्राईज द्यायचं…. मंडळी रात्री ८-९ वाजेपर्यंत येणार म्हणून कमलनी दुपारनंतरच स्वयंपाकाची तयारी सुरु केली….. भरपूर पदार्थांची यादी केली होते…. प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ… छोटे-मोठे, गोड-तिखट सगळेच… आधीच सगळे एवढा प्रवास करून येणार त्यात जेट लॅग ची भानगड.. त्यामुळे रात्री जेवताना किती उत्साह असेल याची खात्री नसली तरी आपल्याकडून काही कमी पडू नये या हेतूने जय्यत तयारी करून ठेवली….
आल्यावर त्यांचा वेळ जाऊ नये आणि सगळ्यांना भेटायचं सोडून आपण स्वयंपाकघरात अडकून राहू नये म्हणून ७-७.३० लाच सगळा स्वयंपाक करून, छानशी साडी नेसून कमल बाहेर सोफ्यावर बसली…वाट बघत….. आता मात्र कमल सगळ्यांना भेटण्यासाठी काहीशी उतावीळ झाली होती…. कॅलेंडरवर फुल्या मारत अनेक महिने अतिशय संयमाने घालवले असले तरी या घडीला एकटेपणाचा प्रत्येक क्षण नकोसा वाटत होता… थोडी सैरभैर होत येरझारा घालू लागली… इतक्यात विमानतळाहून मुलानी फोन केला… तिला एकदम गहिवरून आलं…. “अजून फक्त काही मिनिटांची प्रतिक्षा” या विचारांनी तिला दाटून आलं,… ती पुन्हा सोफ्यावर बसली…. अगदी शांतपणे… पुढचा अर्धा-पाऊण तास ती एकाच ठिकाणी स्तब्ध बसून….दृष्टी पटलावर अनेक आठवणी उमटू लागल्या…. लहानपणापासून आजवरच्या…….. बरे वाईट प्रसंग,लग्न कार्य, जन्म- मृत्यू,, संसार..ते हे अनेक वर्षांचं एकटेपण आणि आता तो संपण्याची उत्कंठा… सगळं सगळं आठवत होतं….. इतक्यात ठरल्याप्रमाणे शेजारून किल्ली घेऊन मुलानी हळूच दरवाजा उघडला… आणि समोरंच बसलेल्या आईकडे बघत प्रसन्न चेहऱ्याने हसला….. कमल शांतपणे त्याच्याकडे बघत राहिली…. मागून बाकीची मंडळी आत शिरली……. ती मात्र निर्विकार….स्थितप्रज्ञ……. कमल नी काहीच प्रतिक्रिया दिली नाही हे बघून गोंधळून गेलेल्या शेजारच्या काकू शेवटी आत आल्या…. तिला पाहून मात्र कमल हसली.. आणि म्हणाली..
“ तू आहेस होय गं? तुझ्याकडे आले आहेत का पाहुणे? मी म्हंटलं हे कोण आले अचानक??
“अगं काकू!!… ओळखलं नाहीस का यांना??… शेजारच्या काकुंनी काहीसं आश्चर्याने विचारलं…
“नाही गं!! मी आपले बसले होते निवांत… दोघंही येतील आता शाळेतून… म्हणून वाट बघतेय!!…. एक तर भांडत तरी येतील आणि आले की लगेच भूक-भूक करत बसतील… थोड्यावेळानी “हे” पण येतील ऑफिसमधून…. सध्या काम खूप आहे तर चिडचिड होते त्यांची पण!!….या सगळ्यांचं सगळं सांभाळायचं म्हणजे माझी तारेवरची कसरत होते बघ!!
काळजात चर्रर्र झालं….सुरवातीला कोणालाच काही कळत नव्हतं…. पण तिचं कोणालाच न ओळखणं… आणि हे सगळं विचित्र बोलणं ऐकून अंदाज येऊ लागला…. कमलचा हा सगळा प्रवास, मगाचचे सगळे विचार, मनावरचे अदृष्यसे आघात तिला आता स्मृतिभ्रंशापर्यंत घेऊन आले होते…..अगदी “विमल” सारखंच….. शब्दशः “जुळ्याचं दुखणं”…. परदेशाहून निघताना “आपण किती वेळेवर निर्णय घेतला” असं वाटणाऱ्या मुलांना “आपण फार उशीर केला” याची जाणीव झाली…. पश्चात्ताप करण्याशिवाय आता काहीच पर्याय नव्हता…. नियतीनी कमलच्या अगदी हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता…. इतके वर्ष एकटेपणात काढल्यानंतर तो संपायच्या उंबरठ्यावर असतानाच ; सगळे जण सभोवताली असूनही “कमल” मात्र पुन्हा एकदा…… “एकटी”
महत्वाची तळटीप: नेहमी गोड शेवट अपेक्षित असतो त्यामुळे हा शेवट कदाचित थोडा नकारात्मक वाटू शकेल…. पण अनेकांच्या माहितीत-ओळखीत अशा किंवा या सम घटना घडल्याही आहेत……आणि मुळात “ही कथा इथे संपतच नाहीये”…. या काल्पनिक पात्रांचा असा शेवट बघून जर वास्तवातल्या काही ज्येष्ठ नागरिकांचा एकटेपणा संपुष्टात आला ; त्यांना जर आपल्या जवळच्या व्यक्तींचा सहवास लाभला…. तर तेव्हा त्यांच्यासाठी त्यांच्या कथेचा “गोड शेवट” होईल… त्यामुळे कल्पनेतल्या पात्रांच्या नकारात्मक शेवटामुळे वास्तवातल्या पात्रांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार असेल तर नक्कीच आवडेल…. म्हणून ही कथा जर फॉरवर्ड करणार असाल तर या तळटीपेसह करा ही विनंती
— क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply