नवीन लेखन...

एकावर एक !

बघता बघता आपण नकळत स्वतःला “शिक्क्यांची ” सवय लावून घेतो. उदा- टाटा इंडिका म्हणजे टॅक्सी, मारुती व्हॅन म्हणजे स्कूल व्हॅन, (आमच्या लहानपणी) भाजलेले शेंगदाणे म्हणजे चित्रपटाचा इंटरव्हल, तसेच पुण्यातील भनाम (भरत नाट्य मंदिर) वरचा शिक्का म्हणजे राज्य नाट्य स्पर्धा अथवा एकांकिका.

काल चक्क “मी,स्वरा आणि ते दोघं ” या व्यावसायिक नाटकाचा प्रयोग आम्ही तिथे बघायला गेलो. खूप दिवसांपासून मस्ट वॉच या लेबलखाली हे नाटक होतं.हे नाट्यगृह फारसे अग्रक्रमात न बसणारे ! फक्त शहराच्या मध्यवर्ती भागातील एवढेच त्याचे क्वाली. ना पार्किंग,ना छान वॉशरुम्स. दर आवाक्यातील असायचे – कारण वरील शिक्का !

फार पूर्वी तेथे “कै सौ वसुमती विजापुरे एकपात्री अभिनय स्पर्धा “, नाना पाटेकरांचे पहिलं नाटक – ” पाहिजे जातीचे ” आणि वसंतराव देशपांडेंची शोकसभा ! माझ्या एवढ्याच मर्यादित आठवणी. अरे हो, अत्र्यांचा एकपात्री प्रयोग (सदानंद जोशींचा)- “मी अत्रे बोलतोय” राहिलाच.
अदरवाईज बालगंधर्व लाडके. क्वचित सांगलीच्या “त्रिमूर्ती” चित्रपटगृहाला स्पर्धा करणारे लंबुळके टिळक स्मारक मंदीर उर्फ गोडावून ! आजकाल हॉटकेक अर्थातच यशवंतराव चव्हाण !

काल तर तेथील नाटकाचे दरही ४०० वगैरे रुपये ! जीवावरच येणार ना, काहीच सोयी नसलेल्या ठिकाणाला भेट देताना एवढा भुर्दंड ! हे म्हणजे हायवे वरील पाण्याच्या बाटलीचे दर, तेथील टपरीवरही असावेत असेच झाले. गर्दी ठीकठाक कारण पुन्हा – दर ! हे मायावी चक्र पुस्तकांच्या किंमतीबाबत सत्य आहे- खप कमी म्हणून किंमती जास्त आणि किमती जास्त म्हणून खप कमी. नाटकांनी हे प्रारूप उचलले आहे.

आत गेल्यावर कधी नव्हे तर गारेगार ! वातानुकूल यंत्रणेची नव्याने भर. (चला,दर थोडे जस्टीफाय झालेत)

मोबाईलचे त्रासदायक रिंगटोन, सेल्फीचे क्लिकक्लीकाट, आणि महिला गटांच्या बडबडी ! सलग नाट्यानुभवाच्या आड येणाऱ्या या गोष्टींची चीड येते. पूर्वी हे त्रास नव्हते. फारतर उशिरा येणारे अंधारात पायावर पाय द्यायचे इतकेच !

नाटक ठीकठाक – आजच्या भाषेत “वन टाइम वॉच ” अर्थात हा वाक्प्रचार चावून चोथा झालाय. पूर्वीसारखे चित्रपट/नाटके वारंवार बघणारी पिढी अस्तंगत होत चाललीय आणि तशी जबरदस्ती करणारी नाटके, किंवा चित्रपट आजकाल निर्माण होतात कोठे?

वेगळेपण इतकेच-नाटक संपताना कलावंतांनीही आमच्या इन्स्टा/एफबी वर प्रेक्षकांनी मतप्रदर्शित करा अशी गळ घालणे ! आजकाल पेड रिव्ह्यू सर्रास टाकले जातात. कलावंतांनी वेगवेगळ्या रिऍलिटी शोज च्या सेटवर जाऊन अशीच जाहिरातबाजी बघायची सवय झालीय. आमच्या लहानपणी नाटक बघणे अति दुर्मिळ आणि चित्रपटांची जाहिरात छापील चिठ्ठया, बस्स!असो.

नाटक सवयीनुसार उशिरा सुरु झाले आणि हायसे वाटले. नाहीतर बदललेले भनाम अपवाद ठरले असते. म्हणून आम्ही उभयता सदाशिव पेठेत चहाची तल्लफ भागवायला चक्कर मारत होतो. एका रद्दीच्या दुकानावर फेब्रुवारीतील सा. सकाळ चा अंक दिसला- लता मंगेशकरांच्या निधनानंतरचा विशेषांक. मला खूप शोधूनही आजवर न मिळालेला. आमची नजर एकदमच त्या अंकावर पडली. फक्त दहा रुपये मोजून मी तो हस्तगत केला. म्हणून ” एकावर एक—-”
नाटकाच्या तिकिटाच्या दरात हाती पडलेला नाट्यानुभव एकीकडे आणि रद्दीच्या दुकानातील तो अनमोल अंक दुसरीकडे!

कोठले पारडे जड समजायचे?

माझ्या विश लिस्ट मधील आणखी एक नाटक – “३८ कृष्ण व्हिला” ! १० जुलैला, रविवारी पुन्हा भनामला आहे. आम्ही जातोय,

बघू या, पुन्हा असेच काही एकावर एक हाती पडतेय कां ते?

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..