रेल्वेवाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि जलद अशी अखंडपणे सुरू राहण्यासाठी रेल्वेमधले कर्मचारी व तंत्रज्ञ हे जसे महत्त्वाचे दुवे असतात, अगदी त्याच तोलामोलाचं महत्त्व रेल्वेमधल्या आधुनिकीकरणालाही आहे. काळ बदलला, रेल्वेप्रवाशांची गर्दी वाढली, रेल्वेचा विस्तार वाढला, तसं दर टप्प्यावर रेल्वेनं बदलांना, नव्या तंत्रांना आपलंसं केलं. या प्रवाहात रेल्वेला खऱ्या अर्थानं वेग आणण्यात विद्युतीकरण हा भाग अत्यंत महत्त्वाचा ठरला.
विजेवर चालणारं पहिलं रेल्वेइंजिन ‘एडिंबरो ते ग्लासगो’ या दरम्यान सन १८३९ साली धावलं. पुढे १८७९ मध्ये बर्लिन येथील प्रदर्शनात विजेवर चालणाऱ्या रेलगाडीचं प्रात्याक्षिकही दाखविण्यात आलं.
भारतात मात्र विद्युतीकरणासाठी १९२५ साल उजडावं लागलं. १९२५ मध्ये मुंबईच्या ‘हार्बर लाईन’वर मुंबई ते कुर्ला ९.५ मैलांचं अंतर पहिल्या विद्युत गाडीनं कापलं आणि पुढे १९२८ मध्ये मुंबई सेंट्रल ते बोरिवली हे बी.बी.सी.आय.वर, तर १९२९ साली जी.आय.पी.वरील कल्याणपर्यंत विद्युतीकरण पूर्ण झालं. इलेक्ट्रिसिटीचा उपयोग रेल्वेनं काळाचा विचार करता फार लवकर सुरू केला. रेल्वे यार्ड, स्टेशन, सिग्नल्स, रेल्वेचे डबे, या सर्व ठिकाणी अखंडपणे विजेचा पुरवठा मिळाल्यानं रेल्वेची सेवा उत्तम दर्जाची झाली. विजेवर चालणाऱ्या लोकल गाड्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केल्यामुळे मुख्यत: मुंबई व कलकत्ता ही शहरं कल्पनेच्या पलीकडे पसरत गेली.
धुराच्या इंजिनासाठी कोळसा महाग पडत असे, शिवाय गाडीला वेग मिळण्यास वेळ लागायचा. घाटात गाडी चढणं कठीण जात असे. त्यामुळे हळूहळू अनेक मार्गांचं विद्युतीकरण होत गेलं आणि धुराची इंजिनं इतिहासजमा होत गेली.
२१ व्या शतकात यांत आणखीही बदल होणार आहेत. काळापुढे चालणारी रेल्वे लवकरच छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे डी.सी. (Direct Current)-ए.सी. (Alternating Current) परिवर्तन पूर्ण करेल. त्यानंतर या बदलामुळे दर दिवशी १ कोटी रुपयांची विजेची बचत होणार आहे. नवीन ‘बंबार्डियर’ गाड्या धावण्यासाठी हे आवश्यक आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसपासून लांब पल्ल्याच्या गाड्या यानंतर ए.सी. पद्धतीनं चालणार आहेत.
या सर्व कामासाठी मधून मधून रेल्वेचे मेगा ब्लॉक घडविणं आवश्यक ठरणार आहे. पूर्वी डी.सी.चं ए.सी.मध्ये रूपांतर करण्यात रेल्वेलाईनच्या बाजूनं अनेक ट्रान्सफॉर्मर लागत. त्याकरता जास्त लोक कामावर ठेवावे लागत व हे रूपांतर करण्यात वीज वाया जात असे. आता ए.सी. आल्यानंतर कामावर कमी लोक लागतील. पश्चिम रेल्वेवरचं काम पूर्ण झाल्यावर मुंबईची संपूर्ण लोकल व इंजिन वाहतूक ए.सी. मार्गानं होईल. दिल्ली, कलकत्ता, मद्रास येथे मुंबई इतक्या लोकल कधीच नव्हत्या. तिथे ए.सी.मधील रूपांतर आधीच झालेलं आहे. भारतीय रेल्वेने ही एक मोठी यशाची पायरी गाठली आहे.
आता जवळजवळ डी.सी. ते ए.सी. काम संपूर्ण भारतभर पूर्ण होत आलं
आहे. प्रथम डी.सी. करंट येत असताना बरीच यंत्रे व मनुष्यबळ रेल्वेलाईनच्या बाजूस ठेवावे लागे, हा सर्व खर्च आता वाचणार आहे; शिवाय, विजेची बचत झाल्याने त्यातही पैसे वाचणार आहेत. हळूहळू भारतभर सर्व रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण चालू आहे. याचा खर्च डिझेल इंजिने चालविण्यापेक्षा कमीच आहे व वेगात काहीच फरक पडत नाही आणि हवेत प्रदूषण तर अजिबातच होत नाही. पण याकरता मुबलक वीजपुरवठा असणे आवश्यक आहे; त्याकरता लागणारी वीज जल, कोळसा आणि सौरऊर्जेमार्फत मिळवावी लागेल.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply