व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात रविराज गंधे यांनी लिहिलेला लेख.
१८९६ साली मार्कोनी ह्या संशोधकाने इंग्लंडमध्ये रेडिओ टेलिग्राफ ह्या बिनतारी यंत्राचा शोध लावला आणि १९०६ साली आपल्या खाजगी मालकीच्या मार्कोनी रेडिओ कंपनीची सुरुवात केली. त्याकाळी ह्या रेडिओवरून फक्त भाषणं आणि संगीत प्रसारित केले जाई. नंतरच्या काळात म्हणजे साधारण १९९६ साली अमेरिकेने आपल्या अमेरिकन रेडिओ अँड रिसर्च कॉर्पोरेशन द्वारा रेडिओ कार्यक्रमांचे रीतसर प्रक्षेपण सुरू केले; परंतु त्यानंतर पहिल्या महायुद्धामुळे १९१९पर्यंतच्या काळात सर्व खाजगी कंपन्यांचे प्रक्षेपण बंद होते. पहिल्या महायुद्धानंतर १४ नोव्हे. १९२२ साली इंग्लंडमध्ये बी.बी.सी.ची स्थापना झाली आणि त्यांनी आपली रेडिओवरील प्रक्षेपणसेवा सुरू केली. नंतरच्या काळात म्हणजे १९२८च्या दरम्यान इंग्लंडमध्ये काही खाजगी कंपन्यांमार्फत दूरचित्रवाणीच्या रंगीत कार्यक्रमांच्या प्रक्षेपणांचे प्रयोग सुरू झाले होते आणि १९४१ साली बी.बी.सी. ने आपले पहिले रंगीत दूरचित्रवाणीचे प्रक्षेपण सुरू केले.
त्यानंतरच्या काळात इंग्लंड व अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, इटली या देशांमध्ये रेडिओ आणि दूरचित्रवाणीचा जोरात प्रसार व संशोधन सुरू झाले. त्यामुळे साहजिकच ह्या विषयातील ज्येष्ठता व श्रेष्ठता आणि प्रयोगविषयक संशोधनाचे सारे श्रेय त्या त्या देशांकडे जाते. आणि म्हणूनच ७५ वर्षांपेक्षा अधिक काळाचा ह्या माध्यमाचा इतिहास असलेल्या इंग्लंड, अमेरिका या देशातील लेखक, कलाकार, दूरचित्रवाणीचे निर्माते आणि इतर संशोधकांनी, समाजशास्त्रज्ञांनी दूरचित्रवाणी ह्या विषयावर विपुल लेखन केले आहे. सी.बी.एस. मधील उत्कृष्ट वृत्तनिवेदक एडवर्ड मरो, बी.बी.सी. मधील प्रसिद्ध मुलाखतकार रॉबिन डे आदी मंडळींनी आपल्या दूरचित्रवाणीवरील कारकिर्दीतील अनुभवांवर आधारित काही आत्मचरित्रवजा लेखन केले आहे. राजकारण आणि दूरचित्रवाणी, दूरदर्शन सामाजिक व मानसशास्त्रीय परिणामांवर आधारित संशोधनपर अशीही काही महत्त्वपूर्ण पुस्तके उपलब्ध आहेत. बी.बी.सी. तर्फे दरवर्षी त्यांच्या कार्यक्रमांची माहिती देणारे एक इअर बुक प्रसिद्ध केले जाते. वाचकांना ते नक्कीच माहितीपूर्ण वाटेल.
आपल्याकडे ह्या माध्यमांचा उगम व प्रसार कालपर्यंत फारसा झालेला नसला तरी ही माध्यमे भारतीयांना तशी तितकीशी नवी नाहीत! कारण ब्रिटिशांनी भारतामध्ये रेल्वे, धरण, महामार्ग इत्यादी काही ठळक सुधारणांची बीजं आपल्या राजवटीच येथे रुजविली; त्यातच भारतातील रेडिओ केंद्र सुरू करण्याचे श्रेय त्यांच्याचकडे जाते. ब्रिटिशांनी १९२७ साली इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीची स्थापना करून मुंबई आणि कलकत्ता येथे भारतातील पहिली रेडिओ केंद्रे सुरू केली आणि १९५९ साली युनेस्कोने जर्मन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्या विकासकार्याचा एक भाग म्हणून दिल्ली येथे प्रायोगिक तत्त्वांवर दूरदर्शनचे समाज व शिक्षणविषयक कार्यक्रम भारत सरकारच्या नभोवाणी खात्याच्या परवानगीने प्रक्षेपित करायला सुरुवात केली.
अधिकृतरित्या भारतातले पहिलेवहिले दूरदर्शन केंद्र दि. १५ सप्टेंबर १९५९ साली दिल्ली येथे डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या शुभहस्ते सुरू झाले. त्यावेळी जर्मन तंत्रज्ञाच्या साहाय्याने स्टुडिओ आणि कॅमेरे आदी तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली. त्यावेळी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम हे ४० ते ५० किमी. अंतरावरील प्रेक्षकांपर्यंत पोहचत असत, पाहिले जात. त्यालाच टेलिव्हिजन असे म्हटले जाई. कार्यक्रमाचे स्वरूप चर्चा, मुलाखती, छोट्या नाटिका अशा प्रकारचे होते. आरोग्य स्वच्छता, गर्भवती महिलांचा व मुलांचा पोषण आहार, दारुबंदी, शेतीविषयक पीके आणि खतांचा वापर याविषयी सल्ला – मार्गदर्शन असा कार्यक्रमांचा विषय आशय असे. आजही दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या कार्यक्रमांची रचना ही समाज प्रबोधन आणि उद्बोधनपर अशीच असते.
अधिकृतरित्या पहिले आकाशवाणी केंद्र दिल्ली येथे १९५६ साली सुरू झाले. आजमितीला आकाशवाणीचे जवळपास ४२० आणि खाजगी रेडिओवाहिन्यांची २४५ केंद्रे कार्यरत आहेत. भारतातल्या एकूण टीव्ही चॅनेल्सची संख्या जवळपास ८५७ च्या घरात आहे. त्यातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक दूरदर्शनच्या ३४ वाहिन्या कार्यरत आहेत. २३ प्रमुख भाषा आणि १७५ बोली भाषेतून आकाशवाणीचे कार्यक्रम प्रसारित केले जातात. देशातल्या ९९ टक्के लोकसंख्येपर्यंत पोहचण्याची क्षमता असलेल्या आकाशवाणीचा उल्लेख विकीपीडियाने जगातील सर्वात मोठा रेडिओ नेटवर्क असा केला आहे. हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर झालेल्या कौरव-पांडवांच्या युद्धाची रम्य वार्ता संजयने आपल्या दिव्यदृष्टीने मृत्युशय्येवर पडलेल्या धृतराष्ट्राला इत्थंभूत सांगितली. त्याकाळी दिव्य समजली जाणारी ती दृष्टी आज विज्ञानाने सामान्यांच्या घरात चित्रवाणीच्या रूपाने पोहोचविली आहे.
प्रख्यात फ्रेंच चित्रकार अल्बर्ट रोबिडा याला संजयसारखी दिव्यदृष्टी जरी लाभलेली नसली तरी त्याच्या प्रतिभेला मात्र भविष्यकालीन चित्रवाणी युगाची चाहूल जरूर लागली होती. १८८२ साली ह्या कलावंताने काढलेल्या काही रेखाचित्रांमध्ये लोक आपल्या घरात बसून चित्रवाणीवर चालणारी नृत्ये, संगीत, युद्धांच्या हालचाली पाहत आहेत अशी दृश्ये रेखाटलेली दिसतात. त्याचे हे द्रष्टेपण निश्चितच कौतुकास्पद असेच म्हणावे लागेल.
खऱ्याखुऱ्या चित्रवाणीच्या उभारणीचे श्रेय जे. एल. बेअर्ड यांचेकडे जाते. बी. बी. सी. ( ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) ने सर्वप्रथम त्यांनी तयार केलेली चित्रवाणीची साधने वापरात आणली. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी या देशांमध्ये चित्रवाणीचा विकास फार मोठ्या प्रमाणावर झाला.
इलेक्ट्रॉनिक मीडियाची वैशिष्ट्ये
दूरचित्रवाणीच्या रूपाने जे न देखे रवी ते देखे कवी ह्या उक्तीप्रमाणे दूरचित्रवाणीचा कॅमेरा डोंगर, नद्या, समुद्र, जंगल, अंतराळ, भूगर्भातील रहस्य आपल्यापुढे उलगडू लागले. प्रकाशाच्या वेगाने अतिजलद रीतीने विविध दृश्यं तुमच्यासमोर उमटू लागली. हा खरंच चमत्कारच म्हणायला हवा. जसं म्हणतात की माणसाचे डोळे कधी खोटं बोलत नाहीत, त्याप्रमाणे कॅमेरा तुम्हाला खरं तेच दाखवतो. खरं म्हणजे प्रत्यक्ष त्याच्यासमोर जे असेल ते, तसेच तुमच्यापर्यंत पोहचवितो. अर्थात काय दाखवायचे अन् काय नाही ह्याचा निर्णय कॅमेरा स्वतः घेत नाही तर त्यामागील माणूस घेत असतो. म्हणजे जे कॅमेऱ्याचे तांत्रिक वैशिष्ट्ये असते, तसेच त्यामागे उभे राहणाऱ्या माणसाचेदेखील काहीएक वैशिष्ट्य असते. हीच माणसं इलेक्ट्रॉनिक मीडियाची ओळख अन् वैशिष्ट्ये निर्माण करीत असतात. माध्यमांची गुणवत्ता त्याचे फायदे-तोटे, उपयोगिता ठरवित असतात. म्हणूनच जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वैशिष्ट्याची अन् उपयोगितेची चर्चा करतो, तेव्हा कॅमेरामागील माणसांमधल्या गुणवैशिष्ट्याचीच चर्चा करीत असतो. तो माणूस माध्यमाला सकारात्मक वा नकारात्मक, विधायक की विघातक स्वरूप देतो, ह्यावर त्या माध्यमांची उपयोगिता अवलंबून असते. म्हणूनच प्रसारमाध्यम ही समाजाभिमुख असणे हाच सर्वात मोठा त्याचा गुणविशेष म्हणावा लागेल.
दुसरे महत्त्वाचे ह्या माध्यमाचे वैशिष्ट्य म्हणजे दृश्यात्मक परिणाम साधणे, दृश्यांची आपली स्वतःची एक भाषा असते. त्या भाषेत जर इलेक्ट्रॉनिक मीडियातील कार्यक्रमांची निर्मिती झाली तर अधिक प्रभावी अन् सहजरित्या जनसामान्यांपर्यंत पोहचू शकते. प्रेक्षकांच्या हृदयाशी भिडू शकते. अर्थात ती दृश्याची भाषा नेमकी काय आहे हे समजून घेणे व अवगत करणे गरजेचे आहे.
महाकवी ग. दि. माडगूळकर हे उत्तम पटकथाकार म्हणून प्रसिद्ध होते. अनेक मराठी सिनेमांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. आपल्या उमेदवारीच्या काळातील सिनेमाच्या पटकथालेखनाचा अनुभव सांगताना माडगूळकर सांगतात, दिग्दर्शक मास्टर विनायकांनी मला एका प्रवेशावर सीन लिहायला सांगितला. ते दृश्य असे होते की नायक सुंदर नायिकेला स्विमिंग पूलमध्ये जलक्रीडा करताना पाहतो आणि तो ते आपल्या मित्राला वर्णन करून सांगत असतो. ह्या दृश्यामध्ये नायकाच्या तोंडी मी दोनतीन पानांचे, नायिकेच्या सौंदर्याचे वर्णन करीत असल्याचे लंबेचौडे भाषण घातले. ते ऐकल्यावर दिग्दर्शक मला म्हणाले, अहो माडगूळकर तुमचा नायक त्या सुंदर तरुणीच्या सौंदर्याने घायाळ झाला असे तुम्हाला म्हणायचे आहे ना? मग इतके वर्णन त्याच्या तोंडी कशाला? सरळ तुमच्या नायिकेला पाण्यात बुडवा आणि बाहेर काढा की संपलं दृश्य ! हे ऐकल्यावर माझ्यातला पटकथाकाराचा जन्म झाला ! शब्द आणि दृश्य ह्या दोन्हीमधला नेमका काय फरक आहे हे दृक-श्राव्य माध्यमांच्या संदर्भात लक्षात घ्यायला हवे. कारण हे दूरचित्रवाणी माध्यमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
दूरचित्रवाणी पाहण्याच्या प्रक्रियेमध्ये ऐकणे आणि पाहणे ह्या सहजसाध्य कष्टरहित नैसर्गिक सवयींचा अंतर्भाव असल्याने व त्यासाठी कुठल्याही साक्षरतेची गरज नसल्याने ही सवय सर्वात जास्त लोकप्रिय अन् लोकाभिमुख झाली. हेच दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी माध्यमाचे सर्वात महत्त्वाचे शक्तिस्थान आहे. निरक्षर लोकांसाठी तर ते वरदानच आहे असे म्हटल्यास वावगं ठरू नये. ज्यांना लिहिता-वाचता येत नाही, त्यांच्यासाठी ज्ञान, मनोरंजन अन् उद्बोधनाचे साधन आहे. अर्थात् ह्या माध्यमाचा त्या अनुषंगाने उपयोग केला तर ! कारण लोकशिक्षणाचे अन् जनजागरणाचे मोठे काम दूरचित्रवाणी करू शकते. काही प्रमाणात करते देखील. समाजातल्या सर्व थरातल्या अन् वयोगटातील लोकांना समजतील, रुचतील असे कार्यक्रम करणे दूरचित्रवाणीच्या माध्यमात सहज शक्य होते. हा माध्यमाचा महत्त्वाचा गुणविशेष आहे. ह्याच गुणविशेषाच्या आधारे दूरदर्शन आणि अन्य काही वाहिन्यांवरील कार्यक्रमांची आखणी झालेली आपण पाहतो.
दूरचित्रवाणीच्या ह्याच गुणविशेषामुळे काही वाहिन्या जनता की आवाज, सबसे तेज, सबसे तीखी नजर, महाराष्ट्राचे महाचॅनल अशी विविध बिरूदं घेऊन कार्यरत झालेली आपल्याला दिसतात. आपले चॅनेल हाच जनसामान्यांचा आवाज आहे अथवा आपणच खऱ्या अर्थाने प्रासंगिक घडामोडीचे जनतेचे प्रतिनिधी म्हणून अचूक विश्लेषण करतो असाही दावा करतात. त्यात काही अंशी तथ्यही आढळते. कारण आणीबाणीच्या अनेक प्रसंगी आधी उल्लेख केल्याप्रमाणे प्रसारमाध्यमे अतिशय द्रुत गतीने बातमी- परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. प्रसारमाध्यमाच्या ह्या फिरत्या तिसऱ्या डोळ्यांमुळे जनता, सरकार, प्रशासन आणि अनेकविध क्षेत्रातील मंडळींना संबंधित बातमीची परिस्थितीची माहिती मिळते. हे ह्या माध्यमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल.
ही माध्यमं ज्या दोन महत्त्वाच्या खांबावर उभी आहेत किंवा असायला हवी, ती म्हणजे संदेशप्रसारण आणि जनमत तयार करणे. ह्या दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर आहेत. जसे घरामध्ये एखाद्या विषयाबाबत – गोष्टीबाबत कुटुंबातल्या सर्व सदस्यांचे एकमत होते किंवा विचारविनिमयाने मत तयार होते, तसेच देशातील विविध समस्या-प्रश्नांसंदर्भात सर्वसामान्य माणसाला केंद्रिभूत ठेवून त्याच्या कल्याणाची भूमिका घेऊन लोकमत तयार करणे, जनजागरण करून विकास अन् प्रगती कार्यात सहभागी होणे ही आजची गरज आहे आणि त्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियाने आपल्या सर्व गुणवैशिष्ट्यांसह स्वतःची समाजाप्रती असलेली उपयोगिता सिध्द केली पाहिजे. माध्यम आणि माध्यमकर्मींनी प्रसारमाध्यमातील व्यापार आणि हितसंबंध यापलीकडे जाऊन आपली उपयोगिता सिद्ध केली पाहिजे. असे झाले तर माध्यम जनसामान्यांमध्ये आश्वासक वातावरण निर्माण करण्यात यशस्वी होतील.
व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात रविराज गंधे यांनी लिहिलेला लेख.
— रविराज गंधे
माध्यम अभ्यासक आणि लेखक
(‘माध्यमरंग’मधून साभार)
Leave a Reply