नवीन लेखन...

इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि तरुणाई

दै. प्रभात, सातारा

जॉन लोगी बेअर्ड नावाच्या संशोधक वृत्तीच्या चौकस शिक्षकाने २० व्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्लंडमध्ये जेव्हा दूरचित्रवाणीचा शोध लावला तेव्हा त्याला कल्पनाही नसेल की आपली ही निर्मिती काही काळाने सारे जग व्यापून टाकणार आहे.

दूरचित्रवाणीच्या तंत्राचा शोध लागून आता सुमारे १०० वर्षे पूर्ण होतील. काही काळापूर्वी ज्या टीव्हीला इडियट बॉक्स म्हणून हिणवले जायचे तोच टीव्ही आता इंटेलिजंट बॉक्स झाला आहे. जगात आणि भारतात जेव्हा हे तंत्रज्ञान पसरत होते तेव्हा शिक्षण, माहिती आणि मनोरंजन हेच टीव्हीचे उद्दिष्ठ असल्याचे जाणीवपूर्वक सांगितले जायचे. आज या उद्देशांप्रमाणे हे तंत्रज्ञान वापरले जात आहे का याचा शोध घेण्याची गरज आहे. काळाच्या ओघात शिक्षण आणि माहिती उद्दिष्ठे मागे पडली. या तीन उद्दिष्टांपैकी मनोरंजन हेच सर्वात प्रमुख उद्दिष्ठ ठरल्यानेच त्याप्रमाणेच कार्यक्रमांची आखणी केली जाऊ लागली. विशिष्ट प्रेक्षक डोळ्यासमोर ठेऊनच कार्यक्रम तयार केले जाऊ लागले.

महिला आणि लहान मुलांचे मार्केट समोर ठेऊन इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी बरेच बदल केले. गेल्या काही काळात तरुणाई हा असाच एक टारगेटेड प्रेक्षकवर्ग झाला आहे. तरुणांच्या सर्वच कार्यक्रमांना जाहिरातींचाही चांगलाच पाठिंबा लाभत असल्याचा अनुभव असल्याने इलेक्ट्रॉनिक माध्यमांना तरुणांची दखल घ्यावीच लागली. त्यामुळे वाहिन्यांवरील कार्यक्रमांच्या विषयापासून सादरीकरणापर्यत आमूलाग्र बदल झाले. अर्थात इलेक्ट्रॉनिक माध्यमे म्हटले की प्रामुख्याने टीव्हीच नजरेसमोर येत असला तरी गेल्या काही काळात याची व्याप्ती खूपच वाढली आहे.

देशात मोठ्या प्रमाणावर वाढलेली एफ़एम स्टेशन्स, वेब सिरीज, यू ट्यूब चॅनेल्स आणि त्यावरील विविधरंगी कार्यक्रम, मोबाईलवरील गेम्स आणि अॅप्स असा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा संपूर्ण विळखा सध्या तरुणाईभोवती पडला आहे. या सर्व माध्यमांचा आनंद घेण्यासाठी हातातील केवळ स्मार्ट फोन पुरेसा असल्याने या माध्यमांची लोकप्रियता वाढत चालली आहे.

दिवाणखान्यात टीव्हीच्या खोक्यासमोर बसून कार्यक्रम पहायलाच पाहिजे असे नाही. किंवा संगणक आणि लॅपटॉपची गरज नाही. मोबाईलमुळे आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तो कार्यक्रम आपण नंतर केव्हाही पाहू शकतो हे आता तरुणांच्या लक्षात येऊ लागले आहे. म्हणूनच गेल्या काही काळात इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा प्रसार वाढला आहे.

 युवकांसाठी खास कार्यक्रम

छोट्या पडद्याचे युवापिढीला खास आकर्षण वाटत असल्याचे लक्षात आल्यानंतर चॅनेल्स जाणीवपूर्वक युवापिढीला समोर ठेऊन कार्यक्रम आणू लागले. बहुतेक वाहिन्यांवरील संगीताच्या स्पर्धा हे याचे उत्तम उदाहरण मानावे लागेल. युवकांमधील कलागुणांना उत्तेजन देणारे असे कार्यक्रम करतानाच युवकांची धाडसाची आवड लक्षात घेऊन तशा प्रकारचे कार्यक्रमही येऊ लागले. विविध रिअॅलिटी शोज तर खास तरुणांसाठीच बनवले जातात. रोडीज हा कार्यक्रम गेली अनेक वर्षे गाजत आहे आणि तितक्याच उत्साहात सुरू आहे.

फिअर फॅक्टर आणि खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमधील साहस दृष्येही युवकांना आवडतात. म्हणूनच मोठ्या पडद्यावरील अक्षयकुमार, प्रियांका चोप्रा यांच्यासारखे अभिनेते आणि रोहित शेट्टीसारख्या दिग्दर्शकांना हा कार्यक्रम होस्ट करावासा वाटतो. परदेशात गाजलेल्या बिग ब्रदर या रिअॅलिटी शोची भारतीय आवृत्ती असलेला बिग बॉस हा कार्यक्रम तर तरुणांच्या प्रतिसादामुळेच गाजला आहे.

दबंग अभिनेता सलमान खानला सलग ७ सिझन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करावेसे वाटते यातच सारे काही आले.भारतातील इतर प्रादेशिक भाषांमध्येही बिग बॉस लोकप्रिय झाला आहे. तामिळनाडूत अभिनेता कमल हासन आणि मराठीत दिग्दर्शक महेश मांजरेकर ही मालिका होस्ट करीत आहेत. मराठी बिग बॉसचा पहिला सिझन गाजल्यानंतर आता दुसरा सिझनही युवापिढीच्या मनोरंजनासाठी येत आहे. वाहिनी क्षेत्रात नवीन प्रयोग करणाऱ्या झी मराठीने दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या रुपाने तरुणांसाठी मनोरंजनाचे आणखी एक दार उघडले होते. तरुणांचेच वेगळे विषय घेउन आलेली ही मालिका ट्रेंड सेंटर ठरली.

युवकांसाठी वाहिनी

टीव्ही पहाणाऱ्या प्रेक्षकांमध्ये मोठा वाटा तरुणांचा आहे हे लक्षात आल्यानेच झी नेटवर्कने खास युवकांसाठी झी युवा ही खास वाहिनी सुरू केली. या वाहिनीवर सर्वच कार्यक्रम तरुणांना डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आले आहेत. तरुणांना आवडणारे विषय, तरुणाईचीच भाषा हे या वाहिनीवरील कार्यक्रमांचे वैशिष्ट्य मानावे लागेल.

इतर कोणत्याही नेटवर्कने अद्याप झी युवासारखी वाहिनी सुरू केली नसली तरी आगामी काळात तशी शक्यता नाकारता येत नाही. भारतातील सर्वात मोठे नेटवर्क असलेल्या झीने मराठीमध्येच फक्त युवा वाहिनी सुरू केली आहे हे विशेष मानावे लागेल. तरीही इतर नेटवर्कही जाणीवपूर्वक तरुणांना डोळ्यासमोर ठेऊन कार्यक्रम आणि मालिकांचे नियोजन करीत आहेत हेही विसरता येणार नाही.

आकाशवाणीला सुगीचे दिवस

दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या मायाजालात आकाशवाणीचे माध्यम हरवून जाईल असे वाटत होते. काही प्रमाणात ते खरेही ठरले. पण एफएम रेडिओ स्टेशनची संस्कृती सुरू झाली आणि पुन्हा एकदा रेडिओला सुगीचे दिवस आले. सध्या देशात आकाशवाणीची म्हणजेच सरकारी ४५० केंद्रे कार्यरत आहेत. तर देशातील विविध १०१ शहरात ३६९ खाजगी केंद्रे सुरू आहेत. खाजगी आकाशवाणी केंद्रांनी जाणीवपूर्वक तरुण श्रोत्यांनाच लक्ष्य केले आहे. त्यामुळे या केंद्रांवरील कार्यक्रम संपूर्णपणे तरुणाईला भावणारे असतात. प्रत्येकाच्या हातातील मोबाईलवर आणि चारचाकी वाहनातही आता एफएम रेडिओ असल्याने इलेक्ट्रॉनिक माध्यमाचीही तरुणांना भुरळ पडली आहे. तरुणांना आवडणारी हिंगलिश आणि मिंगलिश भाषा या कार्यक्रमात वापरण्यात येत असल्याने आकाशवाणीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

वेबसिरीजचे वेड

गेल्या काही वर्षात स्मार्टफोनचा प्रचार आणि प्रसार वाढल्यानंतर तळहातात मावाणाऱ्या या फोनचाच वापर टीव्हीसारखा होऊ लागला. विविध मोबाईव सेवा कंपन्यांनी इंटरनेटच्या स्वस्त योजना बाजारात आणल्याने मोबाईलवरच टीव्हीचा आनंद घेणे तरुणाईला आवडू लागले आणि ही क्रेझ लक्षात घेउनच मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी वेब सिरीज तयार केल्या. सेन्सॉरचे कोणतेही बंधन नसलेल्या आणि सेक्स, हिंसाचाराने व अश्लिल संवादाने बरबटलेल्या या वेब सिरीजना मोठा प्रेक्षक लाभला. ज्यामध्ये मोठी संख्या तरुणांचीच आहे.

छोट्या आणि मोठ्या पडद्यावर गाजलेले अभिनेते या वेब सिरीजमध्ये झळकत असल्याने युवापिढीला याचे आकर्षण वाटले नसते तरच नवल. सॅक्रीड गेम्स या गाजलेल्या वेब सिरीजमध्ये सैफ अली खान होता. तुफान गाजलेल्या या मालिकेचा दुसरा भागही आता येत आहे. एकतर वेब सिरीज कमी भागांच्या असतात आणि सर्वच भाग एकदम अपलोड केलेले असतात.

त्यामुळे या मालिकांचा सलग आनंद घेणे शक्य होते. हातात मोबाईल ठेऊन आणि कानाला इयर फोन अडकवून या मालिका पहाणे ही आता तरुणाईची सवय झाली आहे. नेटफ्लिक्स, ॲमेझॉन अशा परदेशी मनोरंजन कंपन्या त्यांचे परदेशी ओरिजीनल शोजही अपलोड करीत असल्याने तरुणांना मनोरंजनाचे दारच खुले झाले आहे.

  • भाडिपाची लोकप्रियता

हातातील फोन हाच सर्वप्रकारच्या मनोरंजनाचा भक्कम प्लॅटफॉर्म बनल्याने यू ट्यूबवरील व्हिडीओज आणि यू ट्यूबवरील चॅनेल्सचे कार्यक्रम हा एक तरुणांसाठी आकर्षणाचा बिंदू ठरला आहे. तरुणांच्या प्रतिसादामुळे या कार्यक्रमांची लोकप्रियता वाढत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाडिपा हा कार्यक्रम, मराठी कलाकार अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी यांचा कास्टिंग काउच विथ अमेय अँड निपुण हा कार्यक्रम सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. काहीसा बोल्ड आणि बिनधास्त अशा या कार्यक्रमाला तरुणांच्या लिस्टवर पहिले स्थान आहे. यू ट्यूबवर जे लाखो व्हिडीओज पडत असतात त्यापैकी स्टँड अप कॉमेडी शोलाही तरुणांची पसंती असते.

गेमचा विळखा

अशाप्रकारे विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमे तरुणाईचे मनोरंजन करीत असली तरी या माध्यमाची एक काळी बाजुही आहे. मोबाईवरील गेम्स आणि अॅपच्या माध्यमातून तरुणांच्या विशेषतः किशोरवयीन मुलांच्या हाती नको ते पडत आहे. सध्या पबजी गेमच्या निमित्ताने जी चर्चा सुरू आहे ती याचे उत्तम उदाहरण आहे. पबजी गेमच्या नादी लागून आपले दैनंदिन व्यवहार आणि अभ्यासाकडेही दुर्लक्ष करणारी ही पिढी पाहिली की तंत्रज्ञानाचे तोटे समोर दिसू लागतात.

काही महिन्यांपूर्वी ब्लू व्हेल या गेमनेही असाच धुमाकूळ घातला होता. गेम खेळणाऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या या गेमने अनेकांची आयुष्ये उध्वस्त केली होती. अर्थात तंत्रज्ञानाचा कोणताही दोष नसतो. या तंत्रज्ञानाचा वापर कसा होतो यावर सारे काही अवलंबून असते. अशा प्रकारच्या गेममध्ये कोठे थांबायचे हे कळले नाही तर अनेक गंभीर समस्या उदभवू शकतात.

तहानभूक विसरुन मोबाईलवर पबजी गेम खेळणारी तरुणाई पाहिली की त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील याचीच चिंता त्यांच्या पालकांना सतावत असते. सरकारला या गेमवर बंदी घालण्याचा विचार करावा लागला, यावरूनच या विषयाचे गांभीर्य लक्षात येते.

आगामी काळात इलेक्ट्रॉनिक माध्यमे अधिक प्रभावशाली होणार आहेत. विशेषत: वेब सिरीजच्या माध्यमातून तरुणाईचे मोठे मार्केट ताब्यात घेतले जाण्याचे संकेत आहेत. देशातील मोबाईल कंपन्यांनी आपले इंटरनेटचे दर कमी केले आणि राजकारण्यांनी मोफत वायफायसारखी आमिषे दाखवली तर सध्याचे चित्र अधिकच व्यापक होत जाणार आहे. म्हणूनच या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या गराड्यात कोठे थांबायचे याबाबत प्रशिक्षण देण्याची वेळ नजिकच्या काळात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वृत्तवाहिन्याही मागे नाहीत

तरुणाईला साद घालण्यात देशातील वृत्तवाहिन्याही मागे नाहीत.मनोरंजन वाहिन्यांनी तरुणांना डोळ्यासमोर ठेऊन कार्यक्रम तयार करणे समजण्यासारखे आहे. पण आता वृत्तवाहिन्याही खास युवकांसाठी बातम्यांवर आधारित कार्यक्रम प्रसारित करु लागल्या आहेत. सेक्स, विवाह, लिव्ह इन रिलेशनशिप असे अनेक धाडसी विषय आता वृत्तवाहिन्याही हाताळू लागल्या आहेत. प्रत्येक वाहिनीने आपला दिवसाभरातील किमान एक स्लॉट तरुणाईला दिला आहे.

राजकीय विषयातील पोल किंवा चर्चा यासारख्या कार्यक्रमात जाणीवपूर्वक तरुणांना सहभागी करुन घेतले जाते. अनेक वृत्तवाहिन्यांवरील स्त्री अथवा पुरुष निवेदकांना एखाद्या अभिनेत्याएवढी लोकप्रियता मिळत आहे, त्याचे कारणही तरुणांचा प्रतिसाद हेच आहे.

व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात मुकुंद फडके यांनी  लिहिलेला लेख.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..