इलेक्ट्रॉनिक पेपर याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक इंक डिस्प्ले. आपण जसे कागदावर पेनने लिहितो तशीच अक्षरे यावर उमटतात, ती छापील शब्दांप्रमाणे कायम राहतात. पारंपरिक फ्लॅट पॅनल्समध्ये रंगबिंदू प्रकाशित करण्यासाठी वेगळे तंत्र असते.
इलेक्ट्रॉनिक पेपर त्यापेक्षा वेगळा असून यातआपल्या नेहमीच्या कागदावरून प्रकाश जसा परावर्तित होतो व मग अक्षरे दिसतात तसेच घडते. इलेक्ट्रॉनिक पेपरवर लिहिलेले आपल्याला सहजपणे वाचता येते. सूर्यप्रकाशातही त्यावरील मजकूर अंधुक न होता वाचता येतो. रिटेल शॉपमधील किमतींची यादी, मोबाईल फोन डिस्प्ले, जाहिरातींसाठीचे इलेक्ट्रॉनिक बोर्ड, ई-पेपर वर्तमानपत्रे, ई-पेपर नियतकालिके यात त्याचा वापर होतो.
इलेक्ट्रॉनिक पेपर म्हणजे डिजिटल पेपर नाही. डिजिटल पेपर हा एक पॅड असतो व त्यावर डिजिटल पेनने लिहिले जाते. झेरॉक्सच्या पालो अल्टो रीसर्च सेंटरमध्ये इलेक्ट्रॉनिक पेपरची पहिली निर्मिती निक शेरिडॉन यांनी १९७० मध्ये केली. त्यावेळी त्यांनी बनवलेल्या इलेक्ट्रॉनिक पेपरला गायरिकॉन असे नाव दिले होते. त्यात त्यांनी पॉलिथिनचे गोळे वापरले होते, त्यात काळ्या प्लास्टिकचे ऋणभारित कण व पांढऱ्या प्लास्टिकचे धनभारित कण मण्यांसारख्या स्वरूपात होते, ते तेलाच्या बुडबुड्यात सोडले होते व हे सगळे सिलिकोनच्या आवरणात बसवले होते. सुधारित तंत्रात टिटॅनियम डायॉक्साईडचे कण हायड्रोकार्बन तेलात पसरवले जातात. तेलात गडद रंग मिसळला जातो, टिटॅनियम डायॉक्साईडच्या कणांना विद्युतभार मिळतो.
दोन्ही बाजूला आच्छादन असलेल्या आवरणात हे मिश्रण बसवले जाते. आवरणाच्या दोन्ही प्लेट्सना व्होल्टेज मिळाले की, इलेक्ट्रोफोरेटिक डिस्प्ले तंत्राने हे भारित कण मिश्रणात पळू लागतात त्यातून प्रतिमा मिळते व अक्षरे उमटू लागतात. १९९० च्या सुमारास जोसेफ जॅकबसन यांनी वेगळा इलेक्ट्रॉनिक पेपर तयार केला.
अगदी अलीकडे म्हणजे २०११ मध्ये तैवानमध्ये लवचिक ई-पेपर तयार करण्यात आला असून त्यात अॅक्टिव्ह मॅट्रिक्स इलेक्ट्रोफोरेटिक डिस्प्ले वापरण्यात आला आहे. त्यात अॅनिमेशन्सही चांगल्या प्रकारे दिसतात. या तंत्रज्ञानात सुधारणेचा वेग एलसीडीच्या तुलनेने कमी आहे. डिजिटल स्कूलबुक्स, मनगटी घड्याळे, ई-बुक्स, इलेक्ट्रॉनिक वृत्तपत्रे यात या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
Leave a Reply