जहाजावर अधिकाऱ्यांचे तीन ते पाच महिने आणि खलाशांचे सहा ते नऊ महिने कॉन्ट्रॅक्ट असतात. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे प्रत्येक वेळी ज्या जहाजावर पाठवले जाते तिथे, समजा चार महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट असते तर तिथे प्लस मायनस वन मंथ म्हणजे तीन ते पाच महिन्याच्या आत कंपनी कधीही त्या अधिकाऱ्याला जहाजावरून परत घरी पाठवू शकते.
शक्यतो चार महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट असले तर चार महिने पूर्ण झाल्यावरच घरी पाठवले जाते. क्वचितच एखाद्या अधिकाऱ्याचा एन आर आय टाइम पूर्ण करायचा असल्यास किंवा एखाद्या घरी प्रॉब्लेम किंवा एखादे कार्य असल्यास कॉन्ट्रॅक्ट पूर्ण व्हायच्या आत कंपनी रिलीव्हर अरेंज करते.
कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होऊनही जहाजावरून घरी जाण्याऐवजी थांबणारे पैशांची अडचण असेल किंवा एन आर आय टाइम पूर्ण करायचा असेल त्या अनुषंगाने उत्सव, सण किंवा घरातील कार्ये मिळावीत म्हणून कॉन्ट्रॅक्ट एक्स्टेंशन करत असतात.
जहाजावर कामं करणाऱ्या जवळपास नव्वद टक्के जणांना फक्त जहाजावर असतानाच्या दिवसांचाच पगार मिळतो. तर ईतर दहा टक्के जणांना राउंड द ईअर म्हणजे वर्षाचे बाराही महिने पगार मिळतो. परंतु कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे जेवढे दिवस जहाजावर तेवढे दिवसच पगार आणि राऊंड द ईअर सॅलरी म्हणजे बाराही महिने पगार यांची तुलना केली तर सगळ्यांच्या हातात प्रती महिना सारखाच पगार येतो.
जसे की कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे वर्षातून सहा महिने काम करणाऱ्याला प्रतिमहिना समजा पाच हजार डॉलर्स असेल तर वर्षभरात तीस हजार डॉलर्स, तर राऊंड द ईअर वाल्याला प्रतिमहिना अडीच हजार डॉलर्स पगार देऊन वर्षभरात एकूण तीस हजार डॉलर्सच दिले जातात.
जेव्हा कॉन्ट्रॅक्ट चार महिन्याचे असते, आणि जहाजावर जाऊन तीन महिने झालेले असतात तेव्हा जहाजावरून घरी जाण्यासाठी किंवा जहाजावर एक्स्टेंशन घेऊन थांबण्यासाठी एक महिन्याची नोटीस दिली जाते.
कधी कधी घरी असलेल्या अधिकाऱ्यांना जॉईन करायचेच असल्याने एक्स्टेंशन देऊन सुद्धा कंपनी त्या अधिकाऱ्याला रिलीव्ह करते तर कधी कधी ज्याला घरी जायचे असते त्याला रिलिव्हर मिळत नसल्याने जहाजावरच अडकून राहावे लागते.
बऱ्याच वेळा तर अशी वेळ येते की जहाजाला पोर्ट म्हणजे बंदरात पोहचायलाच दोन महिने लागतात, किंवा जहाज अशा शहरातील किंवा देशातील पोर्ट मध्ये जाते की जिथे विजा, तिथले नियम व कायदे इतके कठीण असतात की कंपनीला क्रू चेंज करता येत नाही. कधी कधी तर विमानाची तिकिटं सुद्धा मिळत नाहीत.
पोर्ट, विजा, विमानाची तिकिटं मिळून सुद्धा शेवटच्या क्षणाला जहाजावर रिलीव्ह करायला जाणारा रिलीव्हर शेवटच्या क्षणाला टांग देतो, कधी त्याच्या कुटुंबातील कोणाचा तर कधी कधी त्याचा स्वतःचाच अपघात झालेला असतो, काहीजणांना दुसऱ्या कंपनी कडून महिन्याला दोन चारशे डॉलर्स सॅलरी वाढवून मिळत असल्याने ते दुसऱ्या कंपनीत निघून जातात.
मी तर असे सुद्धा ऐकले आहे की रिलिव्हर जहाजावर येऊन सुद्धा आल्या पावली परत निघून जातात कारण जहाजाची अवस्था किंवा जहाजावर असलेला कॅप्टन किंवा चीफ इंजिनियर यांच्यासोबत त्याने पूर्वी काम केलेले असते आणि त्यांच्याशी पटत नाही भांडण होईल अशी परिस्थिती असते.
बऱ्याच वेळेला जहाज जॉईन करणाऱ्याला कंपनी कडून कोणत्या जहाजावर पाठवले जाते तिथे कोण कोण काम करत आहेत याबद्दल कल्पना दिली जात नाही किंवा आयत्या वेळी अचानक ज्या जहाजासाठी लाईन अप केलेले असते त्याऐवजी दुसऱ्याच जहाजावर पाठवले जाते.
जहाजावर काम करणे म्हणजे कायम एक प्रकारच्या लॉक डाऊन मध्येच असल्याप्रमाणे आहे जेवढा कॉन्ट्रॅक्ट असतो तेवढा जहाजावर कामं करणाऱ्यांच्या आयुष्यतील त्या त्या वर्षातील लॉक डाऊन असतो. कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होऊन जेव्हा घरी जायचा दिवस येतो त्याच्या आदल्या दिवशी एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो.
पण ज्या वेळेस समजते की रिलिव्हर येणार नाहीये त्यावेळेस सगळ्या उत्साहावर आणि आनंदावर विरजण पडते आणि मन लॉक डाऊन वाढल्यामुळे खिन्न आणि उदास होते.
जहाजावर असताना पुन्हा घरी कधी जायचे या विचारांनी एक एक दिवस आणि क्षण घालवला जातो. घरी गेल्यावर हे करू ते करू याचे प्लॅन्स आखले जातात, स्वप्नं रंगवली जातात. कंपनी कडून सुद्धा रिलिव्हर येऊ शकणार नाही शेवटच्या क्षणाला माहिती दिली जाते कारण अगोदरच कळवले तर जहाजावर कामं करणारे गोंधळ घालायला सुरवात करतात, रिलिव्हर अरेंज करता येत नाही म्हणून जहाजावर कॅप्टन आणि कंपनीला दोष देत बसतात. कॅप्टन सरळ सरळ मी काही करू शकत नाही, कंपनीने प्रयत्न केले पण नाही अरेंज होऊ शकले असं सांगून हात वर करतात.
लॉक डाऊन संपून लगेचच आपले दैनंदिन जीवन सुरळीत होईल या अपेक्षेने आणि आशेने एक एक दिवस घालवल्यानंतर ज्या दिवशी लॉक डाऊन संपणार आहे त्याच्या एक दिवस अगोदरच लॉक डाऊन पुन्हा एकदा वाढवले गेलेय हे समजल्यावर जशी अवस्था होते तशी अवस्था आम्हा जहाजावर काम कारणाऱ्यांना नेहमी अनुभवायला मिळते. लॉकडाऊन मध्ये कुटुंबासाह घरात राहून वर्क फ्रॉम होम करूनही कंटाळणाऱ्यांनी कुटुंबाशिवाय एखाद्या बंद घरात राहून वर्क फ्रॉम होमच्या कल्पनेचा विचार नक्कीच करावा.
आता तर लॉक डाऊन आणि पॅनडेमिक मुळे त्याची तीव्रता एवढी वाढली आहे की कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होऊन एक महिनाच काय पण चार चार महिने रिलीव्ह केले जात नाहीये.
मी इंडोनेशियातून गेल्यावर्षी मे महिन्यात आणि यावर्षी एप्रिल महिन्यात दुसऱ्यांदा लॉक डाऊन मध्येच परतलो, जानेवारी ते मार्च संपेपर्यंत इंडोनेशियात परदेशी नागरिकांना यायला बंदी होती, सुदैवाने मार्च एंड ला बंदी उठवली आणि माझा रिलिव्हर इंडोनेशियात आला पण जहाजावर पाठवण्यापूर्वी त्याला हॉटेल मध्ये चौदा दिवस क्वारंटाईन करावे लागले. एप्रिल च्या तिसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा इंडोनेशिया मध्ये भारतातील अनियंत्रित कोरोना वाढीमुळे भारतीयांच्या प्रवेशावर बंदी घातलीय, जर मी तीन आठवड्यापूर्वी आलो नसतो तर आणखीन किती दिवस किंवा महिने अडकलो असतो ते काही समजले नसते आणि खिन्न पणे अथांग समुद्राकडे आणि निळ्या आकाशाकडे बघत वाढलेले दिवस काढावे लागले असते.
— प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर,
B.E.(mech), DME, DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply