उत्पन्नाचा यशस्वी प्रवास – समीर डोंबे यांची यशोगाथा
इंजिनिअरिंगनंतर 40 हजाराची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांनी समीर डोंबेला वेड्यात काढलं. मात्र या अभियांत्रिकी शेतकऱ्याने स्वतःची विपणन व्यवस्था निर्माण केली आणि वर्षातच एक कोटींची उलाढाल करुन दाखवली. पुणे जिल्ह्यातील दौंडच्या शेतकऱ्याचं शेतीतील मॅजिक पाहून भल्याभल्यांनी तोंडात बोटं घातली.
समीर डोंबे याचा इंजिनिअर ते अंजीर किंग असा गेल्या सहा वर्षांचा प्रवास. दौंड तालुक्यातील खोर गावच्या युवा शेतकऱ्याने इंजिनिअरिंगचे लॉजिक शेतात वापरुन अंजिरांच्या शेतीतून मोठी कमाई केली. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या काळातही त्याने तब्बल 20 टन अंजीर विकले.
समीर डोंबेचे “पवित्रक” ब्रँडनेम .. समीरने काही वर्षांपूर्वी शेतीमध्ये नशीब आजमावण्यास सुरुवात केली. त्यातील बाजार यंत्रणेच्या अडचणी लक्षात घेऊन मागील सहा वर्षांपासून प्रयत्न करुन त्याने स्वतःची विपणन व्यवस्था सुरु केली. अंजिरापासून त्याने जॅम, जेली बनवले. “डोंबे पाटील” या नावाने कंपनी स्थापन करुन अंजिराला “पवित्रक” हे ब्रँडनेम दिले आहे. सध्या विविध मॉल, सुपर मार्केटमध्ये त्याने अंजीर विक्रीसाठी ठेवले आहेत.
वीस टन अंजिरांची सुरक्षित विक्री करताना त्यातून सुमारे 13 लाख रुपयांचा व्यवसाय समीरने केला. यामध्ये त्याने काही माल पॅकिंग केला आणि पुण्याच्या सोसायटीत विकला, तर काही माल हा मॉलमध्ये (जे मॉल अत्यावश्यक सेवा देत सुरु होते, किंवा जिथे फळ भाज्यांचे मार्केट सुरु होते) अशा ठिकाणी पॅकिंग करुन विकला.
इतर शेतकऱ्यांच्या अंजिरांनाही बाजारपेठ
लॉकडाऊनच्या काळात स्वतःच्या शेतातील अंजिरासोबत समीरने आपल्या कंपनीमार्फत गावातील 35 ते 40 शेतकऱ्यांच्या अंजिरांनाही बाजारपेठ उपलब्ध करुन दिली. डोंबेवाडी येथे 200 ते 250 एकरात अंजिराच्या बागा असून येथे अंजिराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सुशिक्षित तरुण शेतात उतरले तर करोडोचा टर्नओव्हर करु शकतात, यासाठी आपल्या पोरांनी मार्केटमध्ये उतरलं पाहिजे, असं समीरचं म्हणणं आहे.
— संतोष द पाटील
Leave a Reply