नवीन लेखन...

इक्वेटर क्रॉसिंग

जहाज जेव्हा पृथ्वीचे विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात किंवा दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात प्रवेश करते त्यावेळी जहाजावर इक्वेटर क्रॉसिंग सेरेमनी साजरी केली जाते. पहिल्यांदाच जहाजावर काम करायला आलेल्या कॅडेट, जुनियर इंजिनियर किंवा इतर कुठल्याही ट्रेनीची मिरवणूक काढण्यासाठी इक्वेटर क्रॉस करतात त्यानिमित्ताने सर्वांसाठी एक मोठी पार्टी ठेवली जाऊन मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

मी ज्यावेळी माझ्या पहिल्याच जहाजावर होतो त्यावेळी जहाजावर भरपूर दारू मिळायची तसेच दारू पिण्यावर फारशी बंधने नव्हती. आमचे जहाज ब्राझीलच्या किनाऱ्यावर फिरत असल्याने पंधरा वीस दिवस झाले न झाले की लगेच पार्टी करायचा सगळ्यांचा मुड झालेला असायचा. कॅडेट पासून कॅप्टन पर्यंत सगळ्यांना पार्टी करण्यासाठी निमित्त पाहिजे असायचे. जहाजाचा एखादे इन्स्पेक्शन किंवा सर्वे यशस्वी झाला, कोणाचा वाढदिवस, भारत पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट मॅच जिंकला तरीही जहाजावर पार्टी . शक्यतो जास्त करून शनिवारी पार्टी करण्यावर भर असायचा कारण रविवारी अर्धा दिवस सुट्टी किंवा ओव्हर टाईम असल्याने शनिवारी रात्र भर खाऊन, पिऊन आणि नाचून धिंगाणा करायचा आणि रविवारी झोपा काढायच्या. आमचे जहाज फॉरेन गोईंग आणि नॉर्वे या देशात रजिस्टर असल्याने स्थानिक नियम पाळण्याकरिता जहाज दर तीन महिन्यांनी ब्राझीलच्या सागरी हद्दबाहेर काढावे लागायचे. मागील वेळेला जहाज ब्राझिलच्या दक्षिणेकडील पोर्ट मध्ये असल्यामुळे त्यावेळेस खालच्या बाजूला असलेल्या उरुग्वे मधील मोंटेविडिओ पोर्ट मध्ये फ्युएल घेण्यासाठी ब्राझिल च्या हद्दी बाहेर काढले होते. यावेळेस तीन महिन्यानंतर उत्तरेकडे अमेझॉन नदीतून बाहेर पडल्यावर वेस्ट इंडियन बेटापैकी त्रिनिदाद येथील पोर्ट मध्ये फ्युएल घेण्यासाठी जहाजाला पाठवले गेले. त्रिनिदाद कडे जाताना विषुववृत्त ओलांडले जाणार होते. अमेझॉन नदीमध्ये जाऊन पुन्हा बाहेर येईपर्यंत वीस एकवीस दिवस गेले होते त्यामुळे साधारण महिनाभर जहाजावर पार्टी झाली नव्हती. न्यू जॉईनर म्हणून इक्वेटर क्रॉसिंग पार्टी बद्दल माझ्यासह आणखीन तीन जणांना थोडी जास्तच उत्सुकता लागून राहिली होती.

आम्हा चार जणांना या इक्वेटर क्रॉसिंग सेरेमनी बद्दल सगळ्यांनी तुम्हाला असे करतील तसे करतील असे सांगितले होते. कोणी सांगितले की तुम्हां चौघांचे जावळ केले जाईल मग तुमच्या टकलावर काळा रंग फासून तुमच्या गळ्यात कागदी फुलांचे हार घालून संपूर्ण जहाजावर वाजत गाजत मिरवणूक काढली जाईल. फॅशन शो होईल , वेगवेगळे गेम्स खेळले जातील, टेबल टेनिस, चेस आणि कॅरम स्पर्धा वगैरे वगैरे.
शेवटी चार दिवसांनी इक्वेटर क्रॉसिंग झाले आणि संध्याकाळच्या पार्टी साठी जय्यत तयारी सुरू झाली. इक्वेटर क्रॉसिंग करताना वेगळे असे काही जाणवले नाही, समुद्र शांत होता डेकवर थोडीफार गर्मी जाणवत होती मंद खारा वारा वाहत होता. चीफ कुक आणि स्टीवर्ड बारबेक्यू साठी चिकन, मटण, बीफ, पोर्क्क मॅरीनेट करून आणखीन बरेच चमचमीत डीशच्या तयारीत गुंतले होते. बारबेक्यू साठी मोठा ऑईल चा रिकामा ड्रम कापून त्यात लाकडाच्या फळ्यांचे तुकडे जमा केले. कॅडेट ने बियर च्या केस फ्रिज रूम मध्ये चिल्ड करायला ठेवल्या.

जहाजावर वयाने सगळ्यात जास्त असलेल्या अधिकाऱ्याला समुद्राचा अनभिषिक्त सम्राट बनवला जातो आणि त्याच्या डोक्यावर कागद किंवा पत्र्यापासून बनवलेला मुकुट घातला जातो. जहाजावर एकापेक्षा एक कलाकार किंवा कुशल कारागीर असतात कोणी पेंटर तर कोणी कार्पेन्टर, एका मोटारमन ने तांब्याच्या प्लेट पासून एक सुबक मुकुट तयार केला होता. जहाजावर आमचा चीफ इंजिनियर वयाची साठी ओलांडली होती, सगळ्यात जास्त वय असल्याने त्यालाच तो मान दिला गेला. संध्यकाळी पाच वाजता म्हातारा चीफ इंजिनियर मुकुट परिधान केलेल्या समुद्री सम्राटाच्या पेहरावात एकदम शोभून दिसत होता. त्याने त्याचा रंगीबेरंगी नाईट सूटला अंगरख्या सारखे घातले होते. डोक्यावर लांब पांढरे शुभ्र केस आणि फ्रेंच कट मध्ये कोरलेली करडी दाढी त्याच्या गोऱ्या रंगाला एकदम सूट झाले होते. मग त्याला एखाद्या दरबारात जसे विचारले जाते तसे आम्हा चार जणांचा समारंभ सुरू करण्याची परवानगी मागण्यात आली. वीस लिटरच्या प्लास्टिक रिकाम्या ड्रम ना ढोल समजून बडवले जाऊ लागले कोणी एका गोल लोखंडी प्लेट वर लांब रॉड ने वाजवून घंटानाद करू लागला. बोसन ने वस्तरा आणि हेअर ट्रिमर आणला आणि चौघांचे केस काढण्याची परवानगी मागायला लागला. पण आमच्या म्हाताऱ्या सागरी सम्राटाला दया आली त्याने सांगितले जे स्वतःहून तयार होतील त्यांचेच केस काढले जावेत. आमच्या चौघांपैकी कोणीही केस काढून द्यायला तयार झाला नाही. मग सिनियर कॅडेट ने एका 200 लिटर च्या ड्रम मध्ये पाण्यात दहा बारा अंडी काही बियर चे कॅन फोडून आणि त्यात काळे क्रूड ऑइल मिक्स करून ठेवले होते. त्या पाण्यात चौघांना एक एक वेळा बुडी मारून बाहेर येण्यासाठी पुन्हा एकदा सागरी सम्राटाला साकडे घालण्यात आले, यावेळीसुद्धा आम्हाला ज्याची इच्छा असेल त्याला बुडी मारू द्या अशी अपेक्षा होती. पण यावेळी त्याने सगळ्यांना ड्रम मध्ये बुडी मारण्याचा आदेश दिला. पण कॅडेट ने त्या पाण्यात क्रूड ऑईल मिक्स केल्याने बुडी मारून झाल्यावर मिरवणूक निघाल्यावर सगळ्या डेकवर काळया क्रूड ऑईल चे ठिपके पडत जातील म्हणून बोसन ने कॅडेटला या कल्पेबद्दल शिव्या घातल्या आणि आम्हाला फायर पंप चालू करून सी वॉटर मध्ये भिजवून मग मिरवणुकीला सुरुवात केली. संपूर्ण जहाजाच्या डेकवर एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे वाजत गाजत एक पूर्ण राऊंड मारला गेला. ड्रम आणि घंटानाद यांच्या तालावर नाचत नाचत सगळे खलाशी आणि अधिकारी एन्जॉय करत होते. कोणी कोणी तर आमच्या चौघांना खांद्यावर घेऊनसुद्धा नाचवले. म्हाताऱ्या चीफ इंजिनियर ला सगळे समुद्र सम्राट म्हणून खूप मान देत होते. प्रत्येक वेळी त्याला पुढे करायचे आणि आमचा म्हातारा चीफ इंजिनियर सुद्धा स्वतः ची रँक आणि वय विसरून खरोखर एखाद्या प्रेमळ राजाप्रमाणे सगळ्यात हौसेने सहभागी होत होता. मिरवणूक झाल्यावर बारबेक्यु मग खाणे पिणे आणि नाच गाणे संपता संपता रात्रीचे दोन वाजून गेले होते. जे लवकर सटकायचे त्यांना केबिन मध्ये जाऊन उचलून आणले जायचे आणि पुन्हा नाचायला लावले जायचे. हल्ली तर झीरो अल्कोहोल पॉलिसी मुळे जहाजांवर हळू हळू पार्ट्या तर नामशेष व्हायला लागल्या आहेत पण इक्वेटर क्रॉसिंग सारख्या सेरेमनी आणि आणखीन कितीतरी प्रथासुद्धा बंद होत चालल्या आहेत.

© प्रथम रामदास म्हात्रे

मरीन इंजिनियर,

B. E. (Mech), DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..