साहित्यिक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म २१ जुलै १८९९ रोजी झाला. आपल्या हयातीतच मान, सन्मान, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी मिळण्याचे भाग्य अर्नेस्ट हेमिंग्वे या अमेरिकन लेखकाला लाभले. आपले शिक्षण संपल्यावर त्यांनी ‘कॅन्सार सिटी स्टार’ या वृत्तपत्रात बातमीदाराची नोकरी पत्करली. याच सुमारास युद्ध सुरू झाले. युद्धाचं त्यांना विलक्षण आकर्षण असल्याने सैनिक म्हणून प्रवेश नाकारल्यावर एका रुग्णवाहिकेचे चालक म्हणून ते इटालियन आघाडीवर गेले. युद्धातील तेथील अनुभव कादंबरी लेखनाला उपयोगी पडले. त्यावर आधारित ‘द सन ऑल्सो राइझेस’ ही कादंबरी लिहिली. युद्धोत्तर काळातील हरवलेली पिढी या विषयावरील ही कादंबरी खूप गाजली. ‘फिएस्टा’ ही कादंबरी बैलाशी झुंज लावणाऱ्या एका युवकाची आहे. ‘अ फेअरवेल टू आम्र्स’ या त्यांच्या कादंबरीवर चित्रपटही निघाला.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्पेनमध्ये यादवी युद्ध सुरू होते. या यादवीत एका अमेरिकन क्रांतिकारकाला हौतात्म्य आले. त्यावर ‘फॉर हूम द बेल टोल्स’ ही कादंबरी लिहिली. लेखनाबरोबर बैलांच्या झुंजी, शिकार, प्रवास हे त्यांचे आवडते छंद. यासाठी वेळ काढून ते टांगानिकाला गेले. तेथील खेळांवर ‘डेथ इन द आफ्टरनून’, प्रवासवर्णनांवर ‘ग्रीन हिल्स ऑफ आफ्रिका’ हे ग्रंथ लिहिले. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर पुढे अनेक चित्रपट निघाले. ‘ओल्ड मॅन अॅण्ड द सी’ या कादंबरीत महाकाय मर्लिन मासा जिवाची बाजी लावून पकडणाऱ्या एका म्हाताऱ्या कोळ्याची कथा आहे. या कादंबरीला नोबेल पुरस्कार अर्नेस्ट हेमिंग्वे यांना देऊन गौरविण्यात आले होते. अर्नेस्ट हेमिंग्वे यांचे निधन २ जुलै १९६१ रोजी झाले.
— संजीव_वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply