मी सर्वप्रथम अमेरिकेत अपूकडे गेले ती 1998 साली.म्हणजे 25 वर्षांपूर्वी…. ! पहिल्यांदाच विमानाचा प्रवास..आणि तो देखील इतक्या दूरचा आणि एकटीने करायचा… ! मी मुंबईतही कधी एकटीने प्रवास केल्याचं मला आठवत नाही.सासरी जायचं असो नाहीतर माहेरी जायचं असो.
मला कोणीतरी बरोबर लागायचंच. नोकरीसाठी रोज शाळेत एकटी जायचे हेच नशीब आणि आता हा अमेरिकेचा प्रवास एकटीने करायचा….. ? माझं तर धाबंच दणाणलं होतं. मी ज्यादिवशी निघणार होते त्याच्या आधीच माझ्या चार पाच मैत्रिणींनी माझ्या यजमानांना बजावलं होतं की आम्ही सुद्धा मंगलला सोडायला एअरपोर्टवर येणार आहोत.त्यामुळे ह्यांनी आधीच सुमो बुक केली होती. सगळ्याजणी असल्यामुळे माझा अणुशक्तीनगर ते एअरपोर्टपर्यंतचा प्रवास अगदी हसतखेळत झाला.
त्या काळात आपल्याला निरोप द्यायला आलेल्या लोकांनाही तिकीट काढून विमानतळावरआत जाता यायचं.त्यामुळे ह्यांनी सगळ्यांची तिकिटं काढली आणि आमची सगळी फौज आत शिरली.ते सगळे जिथपर्यंत आत येऊ शकत होते, तिथे येऊन आम्ही थांबलो.
सगळ्या जणी मला म्हणत होत्या की खानोलकरांची काळजी करू नकोस…आणि तू विमानातनं जायला भिऊ नकोस..अमेरिकेत आता थंडी असेल. तेव्हा दोन दोन स्वेटर घालून राहा…तब्येतीची काळजी घे…..!’ थोड्याच वेळात माझी आत जायची वेळ झाली.मी माझी पर्स आणि हँडबॅग उचलली आणि कोणाकडेही न पाहता तडक आत निघाले.सगळे मला बाय करायला थांबलेले होते.पण मी एकदाही मागे वळून पाहिलं नाही.मला खूपच धडधडत होतं नि मला वाटत होतं की जर मी एकदाही मागे वळून पाहिलं तर मी पुढे जाऊ शकणारच नाही.तशीच पळतपळत मागे येईन.म्हणून मी अगदी नाकासमोर पाहात पुढेच गेले.
माझं एकटीचं तिकिट काढून झाल्या नंतर मी रोज मैत्रिणींना म्हणायचे,की मला विमानाने जायची खूप भीती वाटते…. मला मैत्रिणी विचारायच्या की’ ‘कसली भीती वाटते तुला… ? विमान कोसळलं तर आपलं काय होईल…?’ असं वाटतं का तुला?’ ‘छे…! असला विचारसुद्धा नाही येत माझ्या मनात..’ ‘मग, तू अटलांटाला पोहोचशील तेव्हा समजा अपू धवल आलेच नाहीत तुला उतरवून घ्यायला… तर….? याची भीती आहे का तुझ्या मनात… ?’ ‘ छे..छे..असं होईलच कसं… ? ते माझ्यासाठी वेळेच्या आधीच अर्धा तास येऊन थांबलेले असतील एअरपोर्टवर… !’ ‘मग तुला भीती वाटतेय तरी कसली…?’ ‘ खरं सांगू का मला काय वाटतं ते.. ? मला वाटतं की मी विमानातल्या टॉयलेट मधे गेले आणि कडी जर जाम झाली…तर मी आतच अडकून पडेन.. आणि मी एकटीच प्रवास करत असल्यामुळे दुुस-या कोणाच्या ते लक्षातही येणार नाही की मी आत अडकले आहे ते…! याची भयंकर भीती वाटते मला आणि मुळातच मला बंद जागेचा fobia आहे…!’ माझ्या या उत्तराने सर्वांना हसूच यायचं.
असे मधले दिवस गेले नि अखेर एकदाची मी हिंमत करून; एअरपोर्टवर आत शिरून विमानात जाऊन बसले. मी विमानात बसले आणि थोड्याच वेळात विमानाने आकाशात उड्डाण केलं. काही तासात आमचं विमान फ्रँकफूर्ट ला पोहोचलं.हा आमचा पहिला हाॅल्ट होता. तिथे उतरल्यावर दुस-या विमानात बसायचं होतं.ते विमान ज्या नंबरच्या gate वर येणार होतं, तिथे जायला मी निघाले.समोरच वरती जाणारे आणि खालती येणारे सरकते जिने escalators होते.
आता आपल्या देशात खूप मोठमोठे malls आहेत.आणि तिथल्या escalators वरून, वर खाली जायची सर्वांना सवय झाली आहे. पण 1998 मधे आपल्या देशात malls वगैरे नव्हतेच. त्यामुळे अशा जिन्यांवरून जायची मला अजिबातच सवय नव्हती.माझ्या एका हातात हँडबॅग, खांद्यावर पर्स आणि त्यात मी साडी नेसले होते.त्यामुळे मला एकटीने वर जायच्या कल्पनेनेच धडकलं.ही कसरत करताना साडीच्या नि-या जिन्याच्या फिरत्या पायरीवर अडकल्या तर काय होईल याचा मला विचारच करवत नव्हता.
लोकं येत होती जात होती…पण मी आपली तिथेच नुसती उभी होते.शेवटी विचार केला की इथे मला कोण ओळखतंंय…? आणि तसाही माझ्याकडे बघत बसायला वेळ.आहे कोणाला…? मग, आपण काम करताना कशा ओचे पदर खोचून घेऊन काम करतो…तशी साडी आणि पदर सगळं खोचून घेतलं आणि हिमतीने पायरीवर पाऊल ठेवलं. आणि वाटलं ‘हे तर एकदमच सोपं आहे’.आणि मग त्याची सवयच झाली.भीती पार गायब झाली. तिथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती की airport वर एवढी गर्दी होती. पण कोणाचंच कोणाकडे लक्ष नव्हतं.प्रत्येकजण स्वतःमधेच मग्न होता…अर्थात आपल्या इथे तरी याहून काय वेगळी परिस्थिती आहे म्हणा…? शेेवटी मी एकदाची अटलांटाला जाणा-या विमानात बसले आणि पोहोचले अखेर मुक्कामाला…! त्यानंतर खूपवेळा प्रवास केला. आठ नऊ वेळा US ला गेलो. आणि ब-याच नवनवीन गोष्टी शिकत आलो.
आता मात्र इतक्या दूरचा प्रवास बंदच झालाय…वाशीच्या बाहेरही फारसं जाणं होत नाही.. सारं काही भूतकाळात जमा झालंय. पण आयुष्यात आताही ”सरकते जिने”आहेतच बरं का….. ! आता मी घरात एकटीच बसलेली असताना, कधीतरी मन उतरत्या जिन्याने क्षणात उतरत उतरत थेट बालपणात जाऊन पोहोचतं. आणि बालपणातील रम्य क्षण आठवून ओठांवर हसू फुलतं.. शाळा काॅलेजच्या दिवसांतली मजा आठवून तो आनंद पुन्हा जिवंत करतं… ! तर कधी लग्नानंतरचे ‘सुनहरे दिन ! ‘..दोन्ही मुलींचं बाल्य… त्यांचे पुरवलेले हट्ट..केलेले लाड.. आपल्या डोळ्यांदेखत एखादी कळी हलकेच उमलत जावी, तसं त्यांचं मोठं होत जाणं..मग त्यांची लग्नं… त्यांचे संसार..त्यांची बाळं या सा-यात मन हरवून जातं…. तर काही वेळा माझे विचार चढत्या जिन्याने भराभर चढत चढत, मला थेट भविष्यकाळात घेऊन जातात आणि माझ्या मनाला,वार्धक्याची..एकटेपणाची…..अवलंबित्वाची.. नको ती काळजी आणि भीती देऊन जातात….. ! अशा वेळेस वाटतं की ‘हा’ वर जाणारा ‘सरकता जिना’ नको…! कधी कधी कसा एखादा जिना बंद पडलेला असतो..आणि बाजूचा चालू असतो,तसा आपल्या बाबतीत ‘भविष्यकाळात’ घेऊन जाणारा जिना सदैव बंद पडलेला असूदे…त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये डोकावता येऊच नये.. आपल्या मनातल्या म्हातारपणाच्या चिंतेपासून आणि एकटेणाच्या भीतीपासून आपण सदैव दूरच राहावं….! या सरकत्या जिन्याने फक्त खालीच उतरता यावं…आणि आपलं चित्त; सदैव आपलं बालपण… तारुण्य..आपला संसार..आपल्या लेकींचं मोठं होत जाणं.. त्यांचं लग्नानंतर परदेशात जाणं..आपण अधूनमधून त्यांना भेटायला जाणं… त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांचं सदैव आपल्या भोवती बागडणं.. त्यांचं लाघव.. त्यांचं हसणं खिदळणं..अशा भूूकाकाळातल्या मोहमयी गोष्टींमध्येच सदैव गुंतून राहावं..! खरंच….. ! असेल का एखाद्याच्या मनात असा फक्त ‘पूर्वीच्या दिवसांमध्ये ‘ जुन्या’ काळामध्ये विनासायास घेऊन जाणारा आणि भूतकाळातल्या सुखकर गोष्टींची पुनःप्रचीती घेऊ देणारा सरकता जिना…. ? ……किंवा दोन्ही सरकते जिने बंद पडून फक्त वर्तमानकाळातच जगू देणारा जिना असेल तर फारच उत्तम…….!!!
— मंगला खानोलकर
Leave a Reply