नवीन लेखन...

एस्प्लनेड मैदान, फोर्ट, मुंबई..

Esplanade Maidan, Fort, Mumbai

मुंबईच्या इतिहासासंबंधीत किंवा इतरही जुनी पुस्तकं वाचताना फोर्ट मधील ‘एस्प्लनेड मैदान’ हा शब्द बर्‍याच वेळा भेटायचा.. फोर्टमधील एस्प्लनेड मैदान म्हणजे नक्की कोणतं, हा माझा गोंधळ नेहेमी व्हायचा..पुढे मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात आलं, की ‘एस्प्लनेड मैदान’ म्हणजे कोणतंही एक मैदान नसून कुलाबा-नरिमन पॉईंटच्या फुटबॉलसाठी प्रसिद्ध असलेल्या कुपरेज मैदानापासून ते सीएसटी-मेट्रो नजीकच्या आझाद मैदान-क्रॉस मैदानापर्यंतचा पसरलेला सपाट जमिनीचा सलग लांब-रूंद मोकळा पट्टा म्हणजे ‘एस्प्लनेड मैदान’..!

आता जरी मुळचं हे एस्प्लनेड फोर्ट विभागातील वेगेवगळ्या रस्त्यांमुळे विभागली जाऊन त्यांना कुपरेज, ओव्हल, क्रॉस आणि आझाद मैदान अशी नांवं पडलेली असली तरी पूर्वी तो एक सलग मोकळा रूंद पट्टा असल्याचं लक्षात येतं..या चारही मैदानांना छेदणारे रस्ते आपल्या कल्पनेतून वजा करून बघीतल्यास कुपरेज ते क्रॉस-आझाद मैदान असं सलग एस्प्लनेड मैदान आपल्याला सहज दिसू शकतं.

‘एस्प्लनेड’ म्हणजे नदीतटाला वा समुद्रकिनाऱ्याला समांतर असा मुद्दाम राखलेला जमिनीचा लांब, रुंद आणि सलग मोकळा पट्टा वा मैदान..अशा मैदानात कोणत्याही प्रकारचं बांधकाम करण्यास मनाई असायची.. अशी प्रशस्त मोकळी जागा सोडण्यामागे दोन महत्वाची कारणं असायची.. पुर्वी मनोरंजनाची साधनं कमी असायची किंवा नसायचीच असं म्हटलं तरी चालेल, अशा काळी स्वत:च्या कुटूंबाबरोबर, स्नेह्या-मित्रांसोबत चार घटका निवांत किनाऱ्यावर फिरता यावं, मनोरंजन करण्यासाठी कधी फिरस्ते कलाकार आलेच तर त्यांच्या तंबूसाठी जागा असावी हे एक कारण आणि दुसरं अती महत्याचं कारण म्हणजे समुद्रातून होऊ शकणाऱ्या शत्रुच्या आक्रमणाचा वेळीच वेध घेणं..! नदी-समुद्रासानिध्यात वसलेल्या सर्वच वसाहतींच्या तटबंदीच्या बाहेर अशी ‘एस्प्लनेड’ असायची.. कलकत्ता (कोलकता) ही ब्रिटीशांची पूर्वीची राजधानी होती, तिथेही एक ‘एस्प्लनेड’आहे..चेन्नई येथेही एक एस्प्लनेड आहेच..

Esplanade-maidan-2मुंबई ‘फोर्ट’ची तटबंदी तेंव्हा दक्षिणेच्या आताच्या काळा घोड्यापासून सुरु होऊन, पश्चिमेच्या चर्चगेटावरून जाऊन उत्तरेला सध्याच्या जीपीओसमोर तेंव्हा असलेल्या बझार गेटा पर्यंत होती.. तटबंदीतील या तीनही गेटांच्या बाहेर मोठा रस्ता (पूर्वीचा मेयो रोड, आताचा महात्मा गांधी मार्ग), व रस्त्याच्या पुढे पश्चिम दिशेला संपूर्ण समुद्र किनाऱ्यापर्यंत राखलेला जमिनीचा मोकळा पट्टा म्हणजे मुंबईचं ‘एस्प्लनेड मैदान’. अर्थात तेंव्हा समुद्र सध्या आपल्याला मरिन ड्राईव्हच्या किनारी दिसतो तिथं नसून सध्याच्या चर्चगेट स्टेशनच्या दक्षिणोत्तर बाजूस पसरलेलाहोता..म्हणजे सध्याच्या हायकोर्ट किंवा मुंबई विद्यापिठाच्या इमारतीच्या समोर असलेल्या ओव्हल मैदानापासून समुद्र किनारा सुरु व्हायचा..आताच्या ओव्हल किंवा क्रॉस मैदानापलीकडच्या सर्व महत्वाच्या वस्तू या समुद्रात भरणी करून नंतर बांधण्यात आल्या आहेत..

क्रॉस मैदान आणि आझाद मैदान

कुपरेज मैदान, त्याच्या शेजारचं ओव्हल मैदान, क्रॉस मैदान व आझाद मैदान या एस्प्लनेडच्या सध्याच्या चार भागातील मैदानांपैकी क्रॉस व आझाद मैदानाला स्वताचा असा इतिहास आहे. क्रॉस मैदान आणि आझाद मैदानाला पूर्वी ‘परेड ग्राऊंड’ वा ‘कापाचे मैदान’ असेही म्हणायचे..अजूनही मुंबईच्या जुन्या पुस्तकांतून या मैदानांचा उल्लेख ‘कापाचे मैदान’ असा असतो. या मैदानात पूर्वी इंग्रजांच्या लष्कराच्या पलटणींचा मुक्काम असायचा..समुद्रातून सैन्याचा किंवा चाचांचा हल्ला झालाच तर सैन्य तयार असाव यासाठी ही योजना होती..त्या काळात मलबारी चाचांचे हल्ले मुंबईवर होत..हे चाचे समोरच्या टेकडीचा आधार घेत हल्ला करायचे..हीच टेकडी पुढे ‘मलबार हिल’ म्हणून प्रसिद्धीस आली(या टेकडीवर ‘चाचे’ आजही आहेत परंतु त्याचं स्वरूप बदलेलं आहे) ..शिवाय उन्हाळ्याच्या दिवसांत ब्रिटीश मुलकी अधिकारी व लष्करातल्या मोठ्या साहेबांचे तंबू या मैदानात लागायचे..सैनिकासाठीचे एक हॉस्पिटलही या मैदानात होत..आपलं सध्याचं बॉम्बे हॉस्पिटल या मैदानात तेंव्हा असलेल्या ब्रिटीश सैनिकांच्या हॉस्पिटलच्या जवळपासच आहे.पलटणी चा मुक्काम ज्या ठिकाणी असतो त्य ठिकाणाला इंग्रजीत Camp असा शब्द आहे व या Campचं मराठी भाषांतर ‘कांप’ असं झालं..नंतर कोणालातरी कांप या शब्दातील अनुस्वार असायला नको असं वाटलं असाव आणि त्याने ‘काप’ हा शब्द कायम केला असावा..नाहीतरी पूर्वी अनुनासिक शब्द जसे बोलतो तसे लिहिण्याची पद्धत होतीच..उदा. ‘कोकण’ या शब्दाची स्पेलिंग काहीजण Konkan अशीही करतात व नंतर मराठीत लिहिताना कोंकण असंही लिहितात..

आझाद मैदानाच्या टोकाशी धोबी तलाव होता..आता तलाव नसला तरी नांव मात्र आहे..या तलावाच्या शेजारी म्हणजे आताच्या क्रॉफर्ड मार्केटच्या जागी आणखीही एक तळं होतं..या तळ्याला ‘फांशीचं तळं’ असे नांव होत व या तळ्याच्या काठाशी पोर्तुगीज अंमलात गुन्हेगारांना फाशी देण्याची जागा होती..धोबी तलावाच्या शेजारी आपल्या ‘मुंबा देवीचं’ मूळ मंदिर होतं. मुंगा नांवाच्या कोळ्याने बांधलेलं हे ‘मुंगा देवी’च मंदीर पुढे ‘गा’चा ‘बा’ होऊन ‘मुंबादेवी म्हणून प्रसिद्धीस पावलं..१८०३ साली ब्रिटीश सरकारने ही जागा लष्करी कॅम्पला हवी म्हणून ताब्यात घेतली व ‘मुंबादेवी’ सध्याच्या जागी स्थानापन्न केली गेली..मुंबादेवी मंदीराच्या शिफ्टिंगचा खर्च सरकार व कोणा पांडुशेठ सोनाराने मिळून केला होता..

याच आझाद मैदानाचा ‘क्रॉस मैदान’ हा एक हिस्सा आहे..या मैदानाच्या उत्तर टोकाला पूर्वी पलटणीतल्या ख्रिस्ती सैनिकांना प्रार्थना करता यावी या साठी एक चॅपेल होतं, ते नंतर इतरत्र हलवलं गेलं. असं असलं तरी आजही या मैदानात एक ‘क्रॉस’ त्याच ठिकाणी उभा आहे व म्हणून या मैदानाला ‘क्रॉस मैदान’ असे नांव मिळाले आहे..

ओव्हल मैदान

सध्याचं ओव्हल मैदान हे मुख्यतः तेंव्हा कोटातील नागरीकांच मनोरंजनाचं ठिकाण होतं.., संध्याकाळी किनाऱ्यावर कुटुंबासहित फेरफटका मारणं , घोड्यावरून रपेट करणं, कोणी फिरस्ता कलाकार इथे आपली कला दाखवत उभा असला तर ते बघत उभे राहणे असे विरंगुळ्याचे उद्योग इथे चालायचे..ओव्हल मैदान व फोर्टचं ‘चर्चगेट’ या मध्ये पूर्वी एक पवनचक्की होती..या पवनचक्कीचा उपयोग लष्करासाठी लागणारे गहू दळण्यासाठी व्हायचा..ही पवनचक्की पाहणे हा ही त्याकाळच्या लोकांचा मोठा विरंगुळा होता..

ओव्हल मैदानासंबंधी एक नवीनच गोष्ट हल्ली हल्ली माझ्या लक्षात अली..’ओव्हल’ हे नांव या मैदानाच्या अंड्यासारख्या आकारावरून त्याला मिळालं हे उघडच आहे; परंतु हे नांव या मैदानाला मिळण्यामागे आणखी एक गोष्ट कारणीभूत आहे असंही अनुमाना काढता येतं..या मैदानाची देखभाल करणाऱ्या संस्थेच नांव आहे “Organisation for Verdant Ambience and Land trust”. या संस्थेच्या नावाची अद्याक्षरे घेतली की *‘OVAL’* हा शब्द मिळतो.. या नांवाची पाटी, नागरिकांना ओव्हल मैदान क्रॉस करण्यासाठी मैदानातून जो पायमार्ग ठेवला आहे, त्याच्या तोंडाशी हायकोर्टाच्या मागील गेटसमोरच्या बाजूस आहे..या पाटीचा फोटो सोबत पाठवत आहे..आता मैदानाच्या आकारावरून संस्थेने आपलं नांव बनवलं की संस्थेच्या नांवावरून मैदानाला नांव मिळाल हा आणखी संशोधनाचा विषय आहे..

*जाता जाता –*

पूर्वी सलग असलेल्या एस्प्लनेड मैदानाचे कुपरेज, ओव्हल, क्रॉस व आझाद मैदान असे चार हिस्से झाले ते सन १८६२ नंतर.. किल्ल्यातील वाढत्या वस्ती-उद्योगाला किल्ल्यातली जागा अपुरी पडू लागली आणि तेंव्हा नवीनच आलेल्या गव्हर्नर सर बार्टल फ्रिअर याने किल्ल्याची तटबंदी पडण्याचा निर्णय घेतला आणि तेंव्हाच्या मुंबईला आताच्या मुंबईचे स्वरूप मिळण्यास सुरुवात झाली..तटबंदी पडून झाल्यावर एस्प्लनेडच्या जागी मुंबई शहराला स्वतःची जागतिक ओळख बनवण्यास कारणीभूत ठरलेल्या वास्तू उभ्या राहू लागल्या..या ठिकाणी पहिली वास्तू उभी राहिली ती ‘डेविड ससून’ लायब्ररीची आणि दुसरी त्याच्या विरुद्ध दिशेला उत्तरेस ‘क्रॉफर्ड मार्केटची’..या दोन वास्तूंमध्ये आर्मी-नेव्ही बिल्डींग, एस्प्लनेड हॉटेल (वॅटसन हॉटेल), मुंबई विद्यापीठ, हायकोर्ट, जीपीओ (आताचं सीटीओ) या प्रसिद्ध इमारती सन १८७०-१८८० या दशकात उभ्या राहिल्या..प्रत्येकीला स्वत:चा असा दैदिप्यमान इतिहास असलेल्या या वास्तू एस्प्लनेडच्या अंगाखांद्यावर उभ्या राहिलेल्या आहेत..आणि आजही स्वतःची आणि मुंबई शहराची शान आणि मान टिकवून आहेत..

आणि सर्वात शेवटी म्हणजे ज्या सर हेन्री बार्टल फ्रिअर याने फोर्टची तटबंदी पडून मुंबईला एस्प्लनेड मैदानाच्या खुल्या हवेत झेप घेण्याची संधी दिली त्या गव्हर्नर फ्रीअरच्या सन्मानार्थ मुंबईकर नागरिकांनी वर्गणी काढून उभारलेलं कारंजं आजही डौलानं उभं आहे..ज्या कारंज्याला आपण ‘फ्लोरा फाऊंटन’ म्हणून ओळखतो, रोज पाहतो, ते वास्तविक ‘फ्रिअर फाऊंटन’ म्हणून उभारलं गेलं आणि त्याच खरं नांव ‘फ्लोरा फाऊंटन’ असं नसून ‘फ्लोरल फाऊंटन’ असं आहे..

हे फाऊंटन मुळात उभारायचं होतं राणीच्या बागेतील भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या समोर, परंतु तेंव्हाच्या मुंबईकर नागरिकांच्या हट्टामुळे हे कारंजं फ्रीअरच्या सन्मानार्थ चर्चगेट समोर उभारलं गेलं..! ज्या फ्रिअरने एस्पलनेडचं महत्व ओळखून किल्याची तटबंदी तोडली व मुंबई शहराला जगाचं अवकाश मोकळं करून दिलं त्याच्या सन्मानार्थ एस्प्लनेडच्या हृदयापाशी जागा मिळणंच जास्त योग्य होतं..!!

— गणेश साळुंखे
9321811091

मुंबईतील इतिहासाच्या पाऊलखुणा – लेखांक १४ वा

संदर्भ –
१. मुंबईचे वर्णन – ले. गोविंद मडगावकर – १८६२
२. मुंबईचा वृत्तांत – ले. मोरेश्वर शिंगणे – १८९३
३. मुंबई नगरी – ले. न.र. फाटक – १९८३
४. स्थल-काल – ले. डॉ. अरुण टिकेकर – २००४

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..