२१ ऑक्टोबर १९४३ रोजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘आझाद हिंद सरकार’ची स्थापना केली.
नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील अतिशय प्रभावशाली नेते असून, महात्मा गांधी आणि पंडित नेहरु यांच्या प्रमाणेच ते लोकप्रिय होते. एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांच्या मनात अध्यात्माची ओढ होती. राजकारणात त्यांनी बाबू चित्तरंजन दास या मोठ्या नेत्याचे नेतृत्व स्वीकारले आणि ते कॉंग्रेसच्या चळवळीमध्ये सामील झाले. त्यापूर्वी ते आयसीएस ही परीक्षा अव्वल दर्जाने उत्तीर्ण झाले. पण, स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होण्यासाठी त्यांनी या उच्चपदाच्या नोकरीचा राजीनाम दिला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आक्रमक राजकारणामुळे इंग्रजांनी त्यांना मंडालेच्या तुरुंगात पाठविले. या काळात त्यांना देहदंड सोसावा लागला. बाबू चित्तरंजन दास यांच्या मृत्यूनंतर ते बंगाल कॉंग्रेसचे प्रमुख पुढारी बनले आणि तब्येत नीट नसल्यामुळे काही वर्षे त्यांना युरोपमध्ये जाऊन औषधोपचार घ्यावे लागले.
महात्मा गांधींनी १९३२ ते ३४ या काळात सुरु केलेली सविनय आज्ञाभंगाची चळवळ अयशस्वी ठरली. त्यानंतर १९३५ चा कायदा लागू करण्यात आला आणि १९३७ साली विधानसभेसाठी निवडणुका झाल्या. त्यात ११ पैकी ८ राज्यात कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाले. १९३८ साली मध्य प्रदेशातील त्रिपुरी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली. या काळात स्वातंत्र्यचळवळीला गती देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यानंतरची कॉंग्रेस गुजरात येथील हरीपुरा या गावात होणार होती. ही निवडणूक नेताजींनी लढवू नये, अशी गांधीजींची इच्छा होती. तरीही नेताजींनी ही निवडणूक लढवली आणि काँग्रेस श्रेष्ठींचे उमेदवार सीतारामय्या यांचा पराभव केला. शेवटी नेताजींना काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांनी स्वत:चा फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला.
१९३९ साली दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. जर्मनी, जपान आणि इटली हे तीन देश इंग्रजांच्या विरोधात लढत होते. या तिन्ही देशांची मदत घेऊन भारतीयांचे स्वतंत्र सैन्य तयार करावे आणि सशस्त्र लढा देऊन आपल्या मातृभूमीला स्वतंत्र करावे, अशी नेताजींची भूमिका होती. महात्मा गांधींचा युद्धाला विरोध होता आणि त्यांची सहानभूती इंग्लंड आणि फ्रान्सच्या बाजूने होती. कारण जर्मनी आणि इटली हे फॅसिस्ट विचारांचे देश आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. नेताजींनी भारतातील नजरकैदेतून स्वत:ची सुटका करुन घेण्याचा निश्चय केला आणि अत्यंत चलाखीने आणि शिताफीने वेशांतर करत ते अफगाणिस्थानात पोहोचले.
हा संकटांनी भरलेला आणि धोकादायक प्रवास होता. मजल-दरमजल करत ते अफगाणिस्थानातून जर्मनीला पोहोचले. तेथे इंग्रजांविरुद्ध कार्यरत असणाऱ्या भारतीय देशभक्तांना ते सामील झाले. परंतु, सशस्त्र युद्ध करायचे असेल तर ते जर्मनीपेक्षा जपानच्या मदतीने पूर्व भारतातल्या सीमेवर करावे, असे त्यांना वाटले. तेथे त्यांची जर्मन नेत्यांशी भेट झाली. जर्मनीने नेताजींना काही प्रमाणात पाठिंबा दिला. नंतर त्यांना पूर्वेकडे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. एका जर्मन यू बोट किंवा पाणबुडीमधून त्यांचा अतिशय धोकादायक असा प्रवास सुरु झाला. ते पूर्वेकडे येऊन पोहचले. दक्षिण पूर्व आशियात आल्यानंतर नेताजींनी आझाद हिंद सैन्य उभे करायला सुरुवात केली.
२ जुलै १९४३ रोजी रासबिहारी बोस यांच्यासह ते सिंगापूर येथे आले आणि त्यांना सैन्याने सलामी दिली. आझाद हिंद सैन्यात मुख्यत: तीन प्रकारचे लोक सामील झालेले होते. एक, युद्धामध्ये जपानी सैन्यासमोर शरणागती पत्करलेले भारतीय सैन्य, सिंगापूर, मलेशिया, ब्रह्मदेश या भागात राहाणारे भारतीय देशभक्त आणि भारतातून आलेले क्रांतिकारक देशभक्त. भारताचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हे सैन्य आपण उभे केले असून, या युद्धकाळात आपण नेहमीच अगदी कठीण परिस्थितीत लोकांबरोबर राहू, असे ते म्हणाले.
२१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे नेताजींनी ‘आझाद हिंद सरकार’ या नावाने स्वतंत्र भारताचे सरकार स्थापन करण्याची घोषणा केली. नेताजी स्वत: या सरकारचे अध्यक्ष आणि पंतप्रधान होते. या सरकारला नऊ देशांनी मान्यता दिली. २२ ऑक्टोबर १९४३ रोजी राणी झांशी रेजिमेंटची स्थापना करण्यात आली. आझाद हिंद सैन्याला संघटित करुन त्यांना शस्त्रास्त्र आणि इतर मदत मिळायला सुरुवात झाली. ब्रह्मदेशामधून सरकार काम करत होते.
नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने अंदमान आणि निकोबार ही दोन बेटे नेताजींकडे सुपूर्द केली. अंदमान आणि निकोबार या बेटावरुन नव्या सरकारचे कामकाज सुरु झाले. जानेवारी १९४४ मध्ये सिंगापूरहून रंगून येथे आझाद हिंद सेनेच्या तुकड्या हलविण्यात आल्या. ब्रह्मदेशाच्या आराकान भागातून आझाद हिंद सैन्याने भारताच्या सीमेवर हल्ला केला. सुरुवातीच्या काळात आझाद हिंद सेनेने चांगली कर्तबगारी दाखविली. नेताजींनी आझाद हिंद सेनेसाठी ‘चलो दिल्ली’ची घोषणा केली.
आझाद हिंद फौज ही भारतावर आक्रमण करणाऱ्या विशाल अशा जपानी सैन्याचा भाग होती. इंफाळच्या दिशेने आझाद हिंद सेनेने कूच केले. तेथे इंग्रज सैन्याशी त्यांनी निकराने लढा दिला. त्यांनी काही भाग ताब्यात घेतला व इंफाळच्या जवळपास पोहोचले. हा भाग अतिशय डोंगराळ, जंगलांनी वेढलेला आणि सतत पाऊस पडणारा होता. जपानी आणि इंग्रज सैन्यामध्ये निकराची लढाई झाली. नोव्हेंबर १९४४ मध्ये सीमेवरच्या लढाईत जपानी आणि आझाद हिंद सेनेला पराभवाला तोंड द्यावे लागले. पण, ब्रह्मपुत्रा खोऱ्यात घुसण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. ही अतिशय अटीतटीची लढाई होती.
इंग्रज इतिहासकारांच्या दृष्टीने दुसऱ्या महायुद्धातील सर्व लढायांमधल्या विजयापेक्षा हा विजय जास्त महत्त्वाचा होता.
युध्दाच पारडे १९४५ च्या सुरुवातीलाच जर्मनी व जपानच्या विरुद्ध फिरले होते आणि त्यांचा पराभव नक्की झालेला होता. इम्फाळच्या पराभवानंतर आझाद हिंद सैन्यातील शिस्त बिघडली आणि सैन्यातील अधिकारी व शिपाई आपल्या जागा सोडून पलायन करु लागले. रंगून शहर इंग्रजांच्या ताब्यात गेले आणि नेताजींना उत्तरेकडे आपल्या सर्व सहकाऱ्यांसह पलायन करावे लागले. हा अतिशय अवघड असा प्रवास होता. ऑगस्ट १९४५ रोजी तैवानला विमानाने जात असताना नेताजींचे विमान अपघातामध्ये निधन झाले आणि सशस्त्र क्रांतीच्याद्वारे भारताला स्वतंत्र करण्याचा तिसरा प्रयत्न अयशस्वी झाला.
नेताजींनी प्रचंड धैर्य, साधनसामग्री गोळा करण्याचे कौशल्य आणि प्रेरक नेतृत्व यांच्या साह्याने एक सुसज्ज अशी आझाद हिंद सेना उभी केली. आझाद हिंद सेनेमध्ये एकूण ५० हजारापेक्षा जास्त सैनिक होते. शहानवाझ खान, धिल्लाँ, कॅप्टन लक्ष्मी, अय्यर हे त्यांचे सहकारी.
नेताजींच्या अपयशाची चार मुख्य कारणे सांगता येतील.
१) आझाद हिंद सेनेने ज्यावेळी आपली लष्करी कारवाई सुरु केली त्यावेळी दुसरे महायुद्ध इंग्लंडच्या बाजूने झुकलेले होते. जगभर जर्मनी, जपान व इटलीच्या सेना पराभूत होत होत्या. त्यामुळे आझाद हिंद सेना संघटित करायला उशीर झाला, असे म्हणायला हरकत नाही.
२) आझाद हिंद सेना जपानी सेनेचे सहकारी सैन्य म्हणून लढत होती आणि तिचे यशापयश जपानी सैन्याच्या यशावर अवलंबून होते.
३) आझाद हिंद सेनेमध्ये काही प्रमाणात काहीजणांत इमानदारीचा अभाव होता आणि पराभव होताच शिपायांनी पलायन करायला सुरुवात केली.
४) नेताजींच्या देशभक्ती आणि राष्ट्रीय वृत्तीबद्दल लोकांच्या मनात शंका नव्हती. परंतु, जपानी सैन्याबरोबर आझाद हिंद सैन्याने भारतावर आक्रमण करणे भारतातील अनेक राजकीय पक्षांना आवडणारे नव्हते. त्यामुळे चळवळीच्या नैतिक स्वरुपाबद्दलही लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता.
आधुनिक भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात आझाद हिंद सैन्याने केलेले बलिदान महत्त्वाचे आहे. कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नेताजींनी एक लढाऊ सेना उभी केली आणि या सैन्याने इंग्रजांच्या सैन्याला चांगले तोंड दिले. त्यामुळे इंग्रज सरकारने ज्यावेळी आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना पकडून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे खटले सुरु केले, त्यावेळी संपूर्ण देशभर त्यांना पाठिंबा देण्यासाठी लोक रस्त्यावर आले. थोडक्यात सांगायचे झाले तर भारतीय स्वातंत्र्याच्या सशस्त्र लढ्याच्या इतिहासामध्ये आझाद हिंद सेनेने महत्त्वाची भूमिका बजावलेली होती.
— प्रा. डॉ. अशोक चौसाळकर.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply